‘नायिकांचा ट्रेंड बदलतोय...’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

प्रीमियर

विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे आता कल्पेश भांडारकरदिग्दर्शित ‘चाबुक’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. त्यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद...

‘चाबुक’ या चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे?
स्मिता शेवाळे ः या चित्रपटात मी वैभवी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. आज शिकल्यासवरलेल्या आणि आपले कुटुंब उत्तम प्रकारे सांभाळणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांचे प्रतिनिधित्व मी या चित्रपटात करीत आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. या चित्रपटात समीर धर्माधिकारीने माझ्या पतीची भूमिका साकारली आहे. तो मोठा बिझनेसमन आहे. आपल्या बिझनेसबरोबर तो घरची जबाबदारी सांभाळीत असतो खरा, परंतु त्याच्या पत्नीच्या काही आशाआकांक्षा किंवा अपेक्षा असतात. त्याकडे त्याचे लक्ष नसते. त्याची पत्नी कोणतीही अपेक्षा न करता घर सांभाळत असते. तिचे कौतुक करणे किंवा तिची हौसमौज पुरवणे याकडे तो दुर्लक्ष करतो. या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या लक्षात येत नाहीत. तरीही वैभवी घरसंसार व्यवस्थित सांभाळत असते. त्यांच्या कुटुंबात काही ताणतणाव येतात आणि मग त्याला हे कसे सामोरे जातात, हे या चित्रपटात पाहायला मिळेल. 

चित्रपटाचा विषय हा आजचा आहे. आपल्या अवतीभोवतीचा आहे. कारण आपण नकळतपणे आपल्याच माणसांना गृहीत धरीत असतो. त्यांच्या अपेक्षा आणि आशाआकांक्षांकडे आपण दुर्लक्ष करतो. खरेतर घरची माणसे आपल्या सुख आणि दुःखात सहभागी असतात. आपली स्वप्ने तेदेखील जगत असतात. मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल....  

कल्पेश भांडारकर या दिग्दर्शकाबरोबर काम करताना कसे वाटले?
स्मिता शेवाळे ः कल्पेश मुळात उत्तम सिनेमॅटोग्राफर. त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. त्याने विषय छान निवडला आहे. काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.

एखाद्या भूमिकेची तयारी तू कशी करतेस?
स्मिता शेवाळे ः आता मी सर्व प्रकारच्या भूमिका करत आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि कौटुंबिक धाटणीच्या भूमिका करत आहे. वैभवी ही आत्ताच्या काळातील एका महिलेची भूमिका आहे. तसेच आता आलेल्या ‘मुरंबा’ या मालिकेत माझी भूमिका नकारात्मक छटा असलेली आहे. आता खऱ्या अर्थाने मी विविध प्रकारच्या भूमिका साकारत आहे. कारण काही वर्षांपूर्वी मालिकांमध्ये मी हिरॉईन म्हणून काम करीत होते. एखाद्या मालिकेत ज्या प्रकारची हिरॉईन अपेक्षित असते तशीच कामे करीत होते. मात्र खऱ्या अर्थाने वेगळ्या भूमिका करायला मला आता मिळत आहेत.

तू म्हणतेस की आता विविध प्रकारच्या भूमिका तू साकारत आहेस. मग यापूर्वी तुला टाईपकास्ट प्रकाराला सामोरे जावे लागले का?
स्मिता शेवाळे ः एखाद्या वेळी आपण टाईपकास्ट होतोच. माझ्या ते लक्षात आले आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून मी काम सुरू केले, तेव्हा टीव्हीचा एक ट्रेंड होता आणि त्यानुसारच काम करावे लागत होते. तरीही मी त्यामध्ये काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज टीव्हीवरील नायिकांचा ट्रेंड बदलला आहे. आता ती स्वतंत्र विचार करणारी, धाडसी तसेच स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी आहे.

संबंधित बातम्या