प्रीमियर

संतोष भिंगार्डे
सोमवार, 25 जुलै 2022

पावसाळ्यात आपल्याला जशी कामं थांबवता येत नाहीत, तसेच आपल्या आवडत्या मालिकांचे शूटिंगही थांबत नाही. बाहेर कितीही पाऊस असला तरी विविध चॅनेलवरच्या विविध मालिकांचे शूटिंग सुरूच असते. अशाच काही मालिकांमधल्या कलाकारांनी पावसाळ्यातल्या शूटिंगच्या आठवणींना दिलेला उजाळा...

धो धो पावसात मालिकेचा पहिला एपिसोड

‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरलेल्या आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे मुंबईत लॉकडाउन असल्याने या मालिकेचे चित्रीकरण सिल्व्हासा येथे पार पडले. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीने तेथे पावसाळ्यात केलेल्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या; ‘त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते. त्याच वेळी मोठे वादळही आलेले होते. आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहात होतो, तेथील झाडे उन्मळून पडलेली होती. शूटिंग होणार की नाही याची काही शाश्वती नव्हती. कारण पाऊस आणि त्यातच वादळामुळे झालेले नुकसान पाहता चित्रीकरण करणे कठीण होते. तरीही आमचे दिग्दर्शक रवी करमरकर यांनी चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. एका कॉटेजजवळ आम्ही चित्रीकरण केले. त्या कॉटेजमध्ये वरून पाणी गळत होते आणि आम्ही चित्रीकरण करीत होतो. कसेबसे आम्ही त्या दिवसाचे चित्रीकरण पूर्ण केले. तो एपिसोड पाहताना प्रेक्षकांना कदाचित ते जाणवले नसेल. परंतु, वरून टपटप पाणी झिरपत असताना आम्ही चित्रीकरण केले. 

आतादेखील पावसाचे दिवस आहेत आणि आतादेखील अशीच एक वेगळी घटना घडली. ठाण्यात आमच्या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. माझा व अरुंधतीचा एक सीन गाडीमध्ये चित्रित करायचा होता. आम्ही दोघे त्या सीनसाठी गाडीत बसलो आणि धो धो पावसाला सुरुवात झाली. सगळ्यांची पळापळ सुरू झाली. परंतु, आम्हाला गाडीतच बसण्यास सांगण्यात आले. कारण गाडीच्या बाहेर उतरलो तर कॉस्च्युम खराब होईल ही भीती होती. त्यामुळे आम्ही गाडीत बसून राहिलो. थोडा वेळ झाला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. मग गाडीत बसून करणार तरी काय? मग आम्ही दोघांनीही ‘हॉटस्टार’वर आमच्या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला. तो पाहताना आम्हाला खूप गंमत वाटली. तो आमचा  पहिला एपिसोड तीन वर्षांंपूर्वी २०१९मध्ये चित्रित झाला होता.’

अखेर पिल्लू सापडले
‘कलर्स मराठी’वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारीत आहे. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू आहे. योगिता सांगते, ‘कोल्हापुरात चित्रीकरण सुरू आहे. आता पावसाला धो धो सुरुवात झाली असली तरी ही त्यापूर्वी घडलेली घटना. आम्ही एका खोलीत चित्रीकरण करीत होतो. तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जोराचे वादळ सुरू झाले आणि बाहेरील काही पत्रे झपाझप उडाले आणि झाडेही पडली. सगळीकडे पाणी साचू लागले. हळूहळू आम्ही चित्रीकरण करीत असलेल्या खोलीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. आम्हा सगळ्यांची धावपळ सुरू झाली. त्या खोलीच्या बाहेर आसपास तीन-चार कुत्र्यांची पिल्ले होती. ती सेटवर इकडे-तिकडे फिरत असायची. त्यामुळे आम्हाला त्यांचा चांगलाच लळा लागलेला होता. परंतु, त्या दिवशी पाऊस आल्यानंतर त्यातील एक पिल्लू गायब झाले आणि आमची चिंता वाढली. त्यानंतर आम्ही त्या पिल्लाची शोधाशोध सुरू केली. कारण आम्हाला चैनच पडत नव्हते. खूप शोध घेतल्यानंतर आमच्या मालिकेतील मल्हारला अर्थात अभिनेता सौरभ चौघुलेला ते पिल्लू सापडले आणि आमची चिंता मिटली.

पावसाळा आणि चटपटीत भेळ
‘कलर्स मराठी’वरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून सध्या घरोघरी पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री तन्वी मुंडले. तन्वी या मालिकेत कावेरी ही भूमिका साकारीत आहे. ती पावसाळ्यातल्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा देताना सांगते, ‘नुकताच तुफान पाऊस झाला. सगळीकडे पाणी तुंबले होते आणि अशा धो धो कोसळणाऱ्या पावसात आम्हाला काही तरी चटपटीत खावे अशी तीव्र इच्छा झाली. बाहेर थंडगार वातावरण होते. मग काय, आमच्या मालिकेत रत्नमाला ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ आणि आकांक्षाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री नंदिनी वैद्य यांनी आम्हा सगळ्यांसाठी भेळ तयार केली. त्यांनी सगळे सामान बाहेरून मागविले आणि छान अशी भेळ केली. एवढेच नाही तर निवेदिताताईंनी मला स्वतःच्या गाडीने घरी सोडले आणि त्यानंतर त्या घरी गेल्या. त्या दिवशी निवेदिताताईंनी केलेली ती भेळ मी कधीही विसरणार नाही.

एकमेकांशी बाँडिंग छान जुळले

‘झी  मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका कमालीची लोकप्रिय ठरलेली होती. या मालिकेत राधिकाची भूमिका अनिता दातेने साकारली होती. ही मालिका आणि तिची भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेमुळे अनिताला स्टारडम प्राप्त झाले. ती म्हणाली,  ‘एखाद्या मालिकेत काम करणे म्हणजे आपल्या कुटुंबासारखेच असते. मालिकेतील सहकलाकार तसेच इतर लोक एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांशी वागत असतो. परंतु कुटुंबातील बाँडिंग कसे असते, एकमेकांतील गप्पा-गोष्टी कशा रंगतात, हे मला एका पावसाळ्यात चित्रीकरण करीत असताना समजले. या गोष्टीला साधारण दोन
किंवा तीन वर्षे झाली असतील. 

आम्ही ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे चित्रीकरण ठाण्यामध्ये करीत होतो. दिवस पावसाळ्याचे होते आणि बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावर पाणी साचलेले होते. सेटवरील कुणीही घरी जाऊ शकत नव्हते. मग त्या एका रात्री आम्ही सेटवरच राहणे पसंत केले. त्यावेळी आम्ही खूप मज्जा केली. सगळे जण एकत्र बसलो आणि आमच्यामध्ये गप्पांचा फड चांगलाच रंगला. कुणी गाणी म्हणू लागले, तर कुणी किस्से ऐकवू लागले. त्या रात्री आम्ही डाळ-खिचडीचा बेत आखला आणि रात्रभर धम्माल केली. कारण एरवी अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र यायचे ठरविले तरी ते शक्य होत नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतो. परंतु पावसाळ्यातील त्या एका दिवसाने आम्हा सर्वांना एकत्र आणले. तेव्हा आमचे एकमेकांशी छान बाँडिग जुळले. एकमेकांतील बाँडिग कसे असते ते तेव्हा मला समजले.’

संबंधित बातम्या