चिमणचेटूक...!

माधव गोखले 
गुरुवार, 22 मार्च 2018

ट्रॅक्‍स ॲण्ड साइन्स     

काही प्राण्यापक्ष्यांची मला नेहमी गंमत वाटते. त्यांची आपली ओळख खेळण्यांच्याही आधी होते, आणि भेट नंतर केव्हातरी. या यादीच्या अग्रभागी राहण्याचा मान अर्थातच जातो तो चिऊ आणि काऊकडे. मग या यादीत मोर असतो. वाघोबा असतो. मिठूमियाँ पोपट असतो. पाठीवर मखमली जिन आणि पायात रुपेरी तोडा लेऊन फिरणारा घोडा असतो. क्वचित हत्तीही असतो. यादीतल्या प्राण्यांच्या संख्येत किंवा प्रत्यक्ष प्राण्यापक्ष्यांमध्ये पुढेमागे होऊ शकेल; पण या यादीतलं चिऊचं स्थान पक्कं असतं. बाळजगातल्या या न देखिल्या (किंवा अजून नीट ओळख नसलेल्या) या सवंगड्यामुळे बाळाच्या किंवा बाळीच्या मागे धावणाऱ्या आईबाबांसाठी, आज्जीआजोबांसाठी खूप गोष्टी सुकर होतात. काऊचिऊच्या नादात दोन घास जास्त जातात, तळहातावर क्षणभर टेकून भूऽऽऽऽऽ र्रर्र उडून जाणारा मोर किंवा याऽऽऽ टोकापासून त्याऽऽऽ टोकापर्यंत पाठीवरून दौडत नेणारा घोडा रडं थांबवतो, न मिटणाऱ्या डोळ्यांना वाघोबाच धाक असतो.

मुलगा लहान असताना त्याच्या इवल्याशा तळहातावर बोट नाचवत मोराला ‘इथं इथं बैस..., चारा खा, पाणी पी...’ असं सांगून आणि मग पुढच्या ओळीतील गाळलेली जागा त्याच्या नावानी भरली की तो जाम खूष व्हायचा. त्याच्या चेहऱ्यावर पसरत जाणारी ती खुषी आठवली की आजही त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अंगांगावर पसरत गेल्यासारखं वाटतं.

’चिमणीचं घर होतं मेणाचं.... आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं.... एक दिवस खूप पाऊस आला....’ ही लिळाचरित्रातली कथा ही मी ऐकलेली आद्य गोष्ट असावी. अलीकडच्या नर्सऱ्यांमध्ये चिऊताई असते का, आणि असली तर मॉम किंवा मिस ती कशी सांगतात आणि त्या सांगण्यात कायकाय मिस होतं ते कळायला काही मार्ग नाही; आणि आता शहरांत उगवणाऱ्या एकछापी बिल्डींगा आणि त्यांच्याहीवर डोकं काढून उभ्या राहणाऱ्या टॉवरांच्या चकचकीत जंजाळात चिऊताईच हरवून गेलीय हे सगळं आठवलं कारण गेल्या मंगळवारी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन होता. नव्या शैलीतील बांधकामे, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे दीन झालेल्या चिमण्यांचा किंवा अधिक नेमकेपणाने सांगायचे तर हाउस स्पॅरोज्‌चा -घरचिमण्यांचा -दिवस. दहा वर्षे झाली. महम्मद दिलावर या नाशिकच्या उत्साही पक्षिअभ्यासकाच्या प्रयत्नांतून २००९ पासून चिमणी दिन जगभरात साजरा होतो आहे.  दहा वर्षांनंतर आता चिमण्यांसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढते, हीच बाब मला आश्‍वासक वाटतेय.

***

ज्या चिमणीबद्दल बोलतोय ती त्या अर्थाने वाइल्ड नाही आणि माणसाच्या ऐकण्यात असण्याइतकी माणसाळलेलीही नाही. माणसाच्या आजूबाजूला वावरत असल्या तरी चिमण्या कोणी हौसेने पाळल्याच ऐकिवात नाही. पण चिमणी हा आजच्या धोक्‍याच्या पातळीपर्यंत पोचलेल्या नागरी जैवविविधतेचा -अर्बन बायोडायव्हर्सिटीचा -एक महत्त्वाचा भाग आहे हे मात्र नक्की. 

पक्ष्यांच्या पॅसेरिडी कुळातील ही चिमणी घनदाट अरण्ये वगळली तर युरोपात, उत्तर आफ्रिकेत आणि आशियाच्या बहुतेक भागात आढळते. चिमण्यांच्या काही उपजाती अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही आहेत. अंदमान आणि निकोबार बेटे वगळली तर भारतात चिमण्या सगळीकडे आहेत, अशी नोंद मराठी विश्‍वकोषात आहे; पण बर्ड लाइफ इंटरनॅशनलची जी बर्ड चेकलिस्ट ऑफ वर्ल्ड  आहे त्यातल्या अंदमानच्या यादीत चिमण्यांच्या दोन जातींची नोंद सापडली, त्यातली एक म्हणजे पॅसर डोमेस्टिकस, म्हणजे आपली घरचिमणी. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोषा’तल्या नोंदीप्रमाणे, ‘‘कोणत्याही जातीच्या लहान पक्ष्यास पूर्वी चिमणी असे म्हणत असत, परंतु अलीकडे चिमणी या शब्दाने कुंपणात असणाऱ्या, घरांभोवती असणाऱ्या, वृक्षांवर असणाऱ्या व वेळूच्या वनात असणाऱ्या या चार जातींच्या पक्ष्यांचाच मर्यादित बोध होतो.’‘ ही नोंद आहे विसाव्या शतकाच्या सुरवातीची.

चिमणा म्हणजे मिस्टर पॅसर डोमेस्टिकस आणि चिमणी म्हणजे मिसेस पॅसर डोमेस्टिकस यांच्यातला फरक ओळखणे हा शालेय वयातल्या माझ्या पक्षीनिरिक्षणातला पहिला धडा होता. मिस्टरांच्या गळ्यावर एक छानदार काळा ठिपका असतो, त्यामुळे चिमणा लगेच ओळखता येतो. हे काय कोणालाही माहिती असतं, पण निरिक्षणाअंती मला आणखी एक माझा स्वतःचा असा शोध लागला होता. चिमणा म्हणजे साधारणतः ‘बापूसाहेब...’ म्हटल्यावर जे काही व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतं तसा असायचा. गुबगुबीत, काहीसा गुलछबू; पण मिसेस पॅसर डोमेस्टिकस मात्र नाजूक चणीच्या, शेलाट्या अंगाच्या आणि जरा जास्तच ‘ह्या’. (या निरिक्षणातल्या ‘ह्या’ या शब्दाच्या अर्थाचा विस्तार -जरा जास्तच टुणटुण्या, बऱ्याचशा उद्योगी आणि काहीशा भांडकुदळ, आढ्यताखोर -इतका असू शकतो, असो.) अर्थात ‘शेलाट्या अंगकाठीच्या’ वगैरे निरीक्षणं त्यावेळी कोणाला सांगायची सोय नव्हती, आणि नंतर माझ्या पक्षीनिरिक्षणाचा व्याप एकंदरच वाढल्यामुळे ते मागे पडले... (आणखी एकदा) असो. सतत माणसाच्या आजूबाजूला वावरूनही चिमणी तशी माणसाच्या खिजगणतीही नाही; म्हणजे नव्हती गेल्या दहाबारा वर्षांपूर्वी पर्यंत. मग कधीतरी कुणालातरी जाणवलं, अरेच्चा पूर्वी वाड्यातल्या झाडावर खूप चिमण्या असायच्या, नुसता कलकलाट असायचा, वाळवणं टाकायची सोय नसायची.... आता काहीतरी बदललं.... वाड्यात तुटक्‍या का होईना पण पारासकट उभं असणारं झाड आता बिल्डिंगच्या भिंतीला लागून उभं आहे.... भिंतीला घासत राहिल्याने त्याची एक बाजू वाढायचीच थांबली, भुंडी झालीय.... आणि त्याच्या फांद्यांच्या आधाराने होणारा ते कलकलाटही आता जवळजवळ थांबलाय... 

***

चिमणी दिसेनाशी झालीय.... हे असं कधीतरी अचानकच जाणवतं, कारण आपण चिमणीला गृहीतच धरलेले असतं. आपल्या जाणिवांच्या कॅनव्हासवर जे भवताल नावाचं चित्र असतं, त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ती असणारच अशी आपली खात्रीच असते. मलाही ते असं अचानकच लक्षात आलं. पाचएक वर्षांपूर्वी हेलियम डेच्या निमित्ताने कणकवलीला जाणं झालं होतं. गोवा हायवेवरच्या एका हॉटेलात मुक्काम होता. सकाळी उठून बाहेर आलो आणि समोरच्या चिऱ्यांच्या भिंतीवर चिमण्या दिसल्या. काहीतरी वेगळंच बघितल्यासारखा माझ्या खगोल संशोधक मित्राला हाक मारून बोलावलं. चिमण्या इतक्‍यात पाहिल्याच नव्हत्या हे एकदमच लक्षात आलं. ‘‘मुंबईत नाहीच्चेच रे चिमण्या... कुठे एकदम नाहीशा झाल्या कोण जाणे...’’ मित्रही मला सांगत होता. 

***

जगभरात चिमण्यांच्या सव्वीस प्रजाती आहेत, आणि त्यात आणखी बारा उपजाती आहेत असं पक्षिशास्त्रज्ञ सांगतात. सुदान गोल्डन किंवा डेड सी स्पॅरो सारख्या काही जातींच्या चिमण्या (इतर चिमण्यांच्या मानाने) देखण्या असल्या तरी काळसर तपकिरी, गडद करड्या रंगाची भारतीय चिमणी रूढार्थाने देखणी नाही. चिमणीच्या एका उपजातीत डोक्‍याकडे लाल रंग असतो. गळ्याजवळचा पिवळा ठिपका एवढ्या साम्यानिशी दिसण्यात सुगरणीच्या जवळ जाते ती पीतकंठी चिमणी. या उपजातीच्या चिमण्यांमधील नरांच्या गळ्यावर हा छानदार पिवळा ठिपका असतो. भारतीय चिमणीची एवढी एकच उपजात महाराष्ट्रात सापडते, अशी एक नोंद वाचायला मिळाली.

‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ डॉ. सालिम अलींना पक्षिअभ्यासाच्या वाटेवर नेलं ते या पीतकंठी चिमणीनी. ‘द फॉल ऑफ ए स्पॅरो’ या त्यांच्या आत्मचरित्रात डॉ. अली हा किस्सा सांगतात. शिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सालिमना त्याच्या गळ्यावर एक पिवळा ठिपका होता. ही वेगळी दिसणारी चिमणी मामांनाही नीटशी ओळखू आली नाही. त्यांनी सालिमला ती चिमणी घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये, बीएनएचएसमध्ये, पाठवलं. सालिम बीएनएचएसमधून परतला तो वाचायला मिळालेली दोन पुस्तकं घेऊन. पुढे सालिमच्या बीएनएचएसमधल्या खेपा वाढल्या आणि त्याच्या मनात पक्षिअभ्यासाचं बीज रुजलं.

***

चिऊताईची कथा आता नीटशी आठवत नाही. पण कावळेदादाच्या तुलनेत चिऊताई बरी, असं काहीसं सांगणाऱ्या त्या कथेतून चिऊताईचं एक फारच कौटुंबिक रूप डोळ्यासमोर येत असलं तरी पक्षिअभ्यासकांच्या मते चिऊताई अधिक त्रासदायक आहे. उदाहरणार्थ मराठी विश्‍वकोशातल्या पाचव्या खंडातली ही नोंद पहा -‘कावळा आणि चिमणी आपापल्या परीने मनुष्याला त्रास देत असतात, पण कावळ्यापेक्षा चिमणी शतपटीने अधिक त्रासदायक आहे. कावळ्याला हाकलल्यावर तात्पुरता तरी तो दुसरीकडे जातो, परंतु चिमणी इतकी खमंग  असते की; कितीही हाकलले तरी लोचटासारखी ती जागेवरून हालत नाही. अगदीच नाइलाज झाला म्हणजेच ती दृष्टीआड होते, पण आपली पाठ फिरताच ती परत येते. कावळा घरात शिरायला भितो पण चिमणी मात्र घराची सगळी दालने ओलांडून स्वयंपाकघरात प्रवेश करते. ती इतकी धीट आहे की, पुष्कळदा उडत उडत येऊन जेवणाऱ्या माणसाच्या ताटातील पदार्थ पळवून नेण्याचा प्रयत्न करते. चिमणी सर्वभक्षक आहे. मनुष्याने स्वतःकरिता शिजविलेले अन्न, सगळी धान्ये, किडे, सुरवंट, नाकतोडे, कोळी, कोवळ्या रोपांचे शेंडे वगैरे ती खाते. शेतातील तयार कणसांवर चिमण्यांचे थवे हल्ला चढवून दाणे खातात आणि कणसांची नासाडी करतात. बाजारातील धान्यांच्या दुकानांसमोर मांडलेल्या टोपल्यांतले धान्य चिमण्या सर्रास खातात. कोणी हाकललेच तर उडून जातात व पुन्हा येतात.’

(ही नोंद पहिल्यांदा वाचल्यावर मी मनातच ‘युरेक्का...’ केलं कारण, चिमण्या जरा ‘ह्या’च असतात ह्या माझ्या शालेय वयातल्या निरीक्षणाला ह्या नोंदीमुळे एक भारदस्त लेखी आधारच मिळाला होता.) 

चिमण्यांची घरटीही घरात कुठेही सापडतात. छताला लटकलेली कितीही ॲन्टीक किंवा आर्टिस्टिक झुंबरे, हंड्या, फोटोंच्या मागे, रिकामे कोनाडे, वळचणीच्या जागा, पन्हाळी आणि भिंतींच्या मधल्या जागा. माणसाच्या सान्निध्यात जिथे म्हणून घरटं बांधता येईल असं चिमणीला वाटतं तिथे घरटं बांधलं जातं, असं पक्षिअभ्यासक सांगतात. 

***

चिमणीच्या त्रासदायक लोचटपणामुळे साहित्यिक, कवी, चित्रकार वगैरे प्रतिभावान मंडळींचं लक्ष चिमणीकडे गेलं नसावं. कारण चिमणी म्हटल्यावर ‘चिऊताई चिऊताई दार उघड...’ जितकी पटकन आठवते तितक्‍या पटकन आणखी काही आठवत नाही. संस्कृत नाटकांमध्ये, काव्यांमध्ये प्रांतोप्रांतीच्या लोकगीतांमध्ये, कथांमध्ये आलेले चिमण्यांचे संदर्भ (मला तरी) पटकन आठवत नाहीत. कोणत्या नाटकात किंवा काव्यात एखादा महत्त्वाचा निरोप देण्याचं काम कोणी चिमण्यांवर सोपविलेले नाही; एखाद्या देखण्या राजकन्येचा, राजपुत्राचा किंवा गेलाबाजार एखाद्या राक्षसाचा प्राण चिमणीच्या कंठात असल्याचा उल्लेख नाही; ती कोणत्या विशेष गुणाचं प्रतीक नाही. पंचतंत्रातल्या दमनक आणि करटक या दोन कोल्ह्यांच्या संभाषणात चिमणीचा एकदोनदा उल्लेख येतो पण तोही दुर्बल, विचारहीन अशाच अर्थाने. त्यातल्या एका गोष्टीतील चिमणी पावसात भिजून थंडीने कापणाऱ्या वानराला शहाणपणा शिकवायला जाते आणि स्वतःचं घरटं गमावून बसते. पारंपरिक दैवतकथांमधल्या सोनसाखळी किंवा श्रावणसाखळी या सात भावांच्या एकुलत्या एका बहिणीच्या कथांची जी विविध रूपं आजही प्रचलित आहेत त्यातल्या गुजराती पर्यायात चिमण्या सोनबाईला टोपलीभर भात मुसळाशिवाय कांडायला मदत करतात, असा उल्लेख दुर्गा भागवतांच्या ‘लोकसाहित्याची रूपरेषा’मध्ये आहे. ‘चिमणी पडली खिरी, चिमणा चिंता करी... ’ या मालाकथेचाही उल्लेख या पुस्तकात येतो.

नाही म्हणायला, ‘एक चिमणी आली, एक दाणा घेऊन गेली... दुसरी चिमणी आली एक दाणा घेऊन गेली, तिसरी चिमणी आली ....’ अशी कापूसकोंड्याच्या गोष्टीला पर्याय असलेली आणखी एक ‘चिमणगोष्ट’ आठवते. चिमण्या वाचवण्याचा संदेश देणाऱ्या निम्म्या लेखांमध्ये लिहिणाऱ्यानी ‘गदिमा’ची ‘या चिमण्यांनो परत फिरा रे...घराकडे आपुल्या’ ही ओळ आळवलेली असते; पण त्या या चिमण्या नव्हेत (असा एक नम्र खुलासा)...

शाळेत असताना चिमणीच्या दातांनी तोडलेले चिंचेचं बुटूक, चॉकलेटचा, लिमलेटच्या गोळीचा तुकडा किंवा पेरूची फोड हे चिमणीशी जोडलेलं आणखी एक भावनिक नातं. हे नातं ज्यांच्या वाट्याला आलं नाही त्यांना त्यातली खुमारी अशी शब्दांत सांगणं कठीण आहे.

चिमण्यांच्या, म्हणजे केतकरांच्या कोशात म्हटल्याप्रमाणे कोणत्याही लहान पाखरांच्या, संदर्भाने ऐकलेला एक शब्द मात्र आवडून गेला होता. ‘चिमणचेटूक’. शांताबाई शेळके आळंदीला झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. संमेलनातल्या त्यांच्या एका भाषणात हा त्यांचाच शब्द त्यांच्याकडून ऐकायला मिळाला होता. संदर्भ काय होता ते आता स्मरत नाही, पण बहुधा भाषांतराविषयी काहीतरी असावे. इंग्रजीत ‘फॉल्स डॉन’ अशी एक कल्पना आहे. एखाद्या शुभशकुनाच्या पाऊलखुणा उगाचच दिसल्यासारख्या होतात, लवकरच उजाडणार असं वाटतं, पण अंधार काही सरत नाही, अशा अर्थाची ती कल्पना आहे. निसर्गात काही वेळा रात्रीच्या मधल्याच प्रहरात घरट्यात गाढ झोपलेल्या पक्ष्यांना झुंजूमुंजू झाल्याचा भास होतो आणि त्यांची लगबग सुरू होते. थोड्यावेळाने आपण फसल्याचे त्यांच्या लक्षात येते. पावसाळ्यानंतरच्या निरभ्र आकाशात पहाटे उगवणाऱ्या शुक्राच्या चांदणीच्या प्रकाशाला पाखरं अशी फसतात, असं म्हणतात. या ‘फॉल्स डॉन’चं शांताबाईंनी ‘चिमणचेटूक’ म्हटलं होतं. ‘चिमणचेटूक’, एका आभासी प्रकाशाचं फसवं गारूड. आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यातही असं एक चिमणचेटूक येत असतं -एखाद्यावेळी त्याचं येणं आवश्‍यकही असतं.     

***

चिमण्यांचं नातं भाषेत जोडलं गेलय ते लहानखुरेपणाशी. ‘चिमनी मैना, चिमना रावा, चिमन्या अंगनी, चिमना चांदवा, चिमनी जोडी, चिमनी गोडी...’ यातलं चिमणेपण इवलंसं आहे, छोटुस्स्‌ आहे, पण खुजं नाहीये.

डॉ. सालिम अलींनी ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस्‌’ मध्ये पक्षिनिरिक्षण करताना पाहिलेल्या एखाद्या पक्ष्याचा आकार नोंदवण्यासाठी अकरा पक्ष्यांचेच अकरा आकार ठरवलेत. त्यातला सगळ्यात लहान आकार आहे चिमणीचा म्हणजे चिमणीपेक्षा मोठा पण लावरीपेक्षा लहान म्हणजे तो पक्षी लांबीला सहा ते आठ इंचांच्या मध्ये कुठेतरी आहे, हे नोंद वाचणाऱ्याच्या लक्षात येते.

***

चिमण्यांच्या संदर्भात आणखी एक विचित्र नोंद सापडते ती फोर पेस्ट्‌स कॅम्पेनची. चीनमध्ये १९५८ ते १९६२ अशी चार वर्षे चिमण्या मारण्याची मोहीमच राबवली गेली. चिमण्यांच्या बरोबर आणखी तीन उपद्रवी प्राणी - उंदीर, माशा आणि डास -मारण्याचा सरकारी हुकूम होता. चिमण्याविरूद्ध आरोप होता खादाड असल्याचा. एक चिमणी एका वर्षात चिनी गोदामांमधलं पावणे दोन किलो धान्य फस्त करते, अशी त्यावेळची आकडेवारी होती. चिमण्या मारल्यामुळे तांदुळावरची कीड फोफावली, टोळधाडी वाढल्या आणि उत्पादन कमी झाल्याचे लक्षात आल्याने हा चटकःमेध थंडावला. 

***

चिमण्यांचं पोट या ना त्या प्रकारे माणसांच्या जगावर अवलंबून असते. माणसाशी जोडलेल्या चिमण्यांच्या या जगात गेल्या काही वर्षांत खूप उलथापालथी झाल्यात. वाड्यांच्या अपार्टमेंट झाल्या, वाळवणं कमी झाली, वळचणीच्या जागा, कोनाडे संपत गेले तशा चिमण्याही दिसेनाशा झाल्या.  चिमण्या दिसेनाशा होण्यामध्ये मोबाईल टॉवर्समुळे होणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचाही हात असल्याच्या चर्चा असतात. पण यावर पक्षितज्ज्ञांमध्ये अजून एकमत नाही. तरीही हवामान बदल आणि प्रदूषण नावाचे धोके आहेतच. यावर अधिक संशोधनाची गरज आहे, असे अभ्यासक सांगतात.

ही परिस्थिती फक्त भारतात आहे असे नाही. नष्ट होणाऱ्या, दुर्मिळ होत जाणाऱ्या प्रजातीची नोंद घेणाऱ्या इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएनच्या) नोंदींनुसार पश्‍चिम युरोपातही हा प्रश्‍न भेडसावतोय. 

कृत्रिम घरट्यांच्या प्रयोगाला गेल्या दहा वर्षांत चिमण्याही सरावल्यात. महाराष्ट्र सरकारचा वनविभाग, ‘स्पॅरो मॅन’ महम्मद दिलावर यांची फॉरेस्ट फॉरएव्हर सोसायटी, पुण्यातले इला फाउंडेशन, मुंबईतील स्पॅरोज शेल्टर अशा अनेकांनी आता चिमण्यांच्या संरक्षणाच्या व संवर्धनाच्या कामात पुढाकार घेतला आहे. या संस्था गावोगावचे पक्षीमित्र, पर्यावरणात रस असणारे तरुणांचे गट यांच्यामुळे चिमण्यांची नोंदही ठेवली जाते आहे. हे सगळंच आश्‍वासक आहे. मुख्यतः किडे खाणारे हे पक्षी हा निसर्गाच्या समतोल राखणाऱ्या व्यवस्थेचा भाग आहे. अन्यथा चिनी अनुभव आपल्या गाठीशी आहेच.   

फोटो फीचर

संबंधित बातम्या