Sakal Saptahik Special Story Ketki Joshi  Marathi Article

केतकी जोशी
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

‘ती’ची गोष्ट

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा दिमाख आणखीनच वाढवला तो महिला शक्तीनी.. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही परेड फक्त अभिमानास्पद नव्हती तर खूप लांबचा पल्ला गाठून लष्करात आत्ता कुठे समान संधी मिळवू पाहणाऱ्या भारतीय स्त्रीच्या यशस्वी संघर्षाचेही प्रतीक होती. 

या  वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करताना राजपथावर झालेल्या बहारदार संचलनात भारतीय हवाईदलाचे सामर्थ्य दाखविणारा ‘फ्लायपास्ट’ हे मुख्य आकर्षण होते. भारतीय हवाईदलात नव्यानेच समाविष्ट झालेल्या राफेल या लढाऊ विमानांसह ७५ विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा यात सहभाग होता. या संचलनातली आणखी एक विशेष बाब म्हणजे, राफेलची पहिली महिला पायलट फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंगनेही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाबरोबर शिवांगी सहभागी झाली होती. याशिवाय यंदाच्या परेडमध्ये राजपथावर विविध मार्चिंग गटांचे नेतृत्वही महिलांनी केले. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सची लेफ्टनंट मनीषा बोहरा आणि बीएसएफचे महिला मोटरसायकल पथकही लक्षवेधी होते. देशातील ज्या मुलींनी सैन्य दलात उच्चपदावर आणि अविस्मरणीय कामगिरी करण्याची स्वप्ने पाहिली आहेत, त्यांचे प्रतिनिधित्वच शिवांगीने केले असे म्हणता येईल. 

राफेलची पहिली महिला पायलट शिवांगी सिंग ही प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेली दुसरी महिला पायलट ठरली आहे. गेल्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट भवानी कांतने भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधित्व केले होते. शिवांगी सिंग २०१७मध्ये भारतीय हवाई दलात भरती झाली. ती मूळची वाराणसीची आहे. शिवांगी फायटर पायलट्सच्या दुसऱ्या बॅचची विद्यार्थिनी. ती पंजाबच्या अंबालामधील आयएएफच्या गोल्डन ॲरो स्क्वाड्रनची सदस्य आहे. शिवांगी विज्ञान शाखेची पदवी घेत असतानाच एअर एनसीसीमध्येही भरती झाली होती. सगळ्यात आधी तिने बीएचयूमध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले. 

शिवांगीचे वडील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. शिवांगीचे आजोबा भारतीय लष्करात होते आणि त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते. अगदी लहानपणापासून शिवांगीने आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले होते; अथक मेहनतीच्या जोरावर तिने ते पूर्णही केले, आणि एक ऐतिहासिक नोंदही आपल्या नावावर केली. २०१७मध्ये फायटर विमान उडवणाऱ्या ज्या पाच महिला भारतीय हवाई दलात सामील झाल्या होत्या, त्यात शिवांगीही होती. राफेलआधी मिग-21 बायसन विमान उडवण्याचा तिला अनुभव आहे. 

ज्याची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे अशा राफेल लढाऊ विमानांची पहिला ताफा २९ जुलै २०२० रोजी भारतात दाखल झाला. भारताने फ्रान्सकडून ही ३६ लढाऊ विमाने घेतली आहेत. आत्तापर्यंत त्यातील बहुतांश विमाने भारतात आली आहेत आणि उरलेली विमाने या वर्षीच्या एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलातील सर्वांत जास्त ताकदवान, शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या राफेलचे पायलट होणे हा जितका मोठा बहुमान आहे, तितकीच मोठी जबाबदारीही आहे. राफेल लढाऊ विमान उडवणे हे अजिबातच सोपे काम नाही. एक महिन्याचे तांत्रिक प्रशिक्षण घेतल्यानंतर पात्रता निकष पूर्ण करून शिवांगी आता राफेलच्या पहिल्या स्क्वाड्रनची सदस्य झाली आहे. प्रजासत्ताक दिनी तिला पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी तिला ‘राफेल राणी’ असे म्हटले होते. तिला बघून असंख्य भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. 

खरेतर आपल्या इतिहासातही महाराणी ताराबाई, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गामती, राणी चेन्नम्मा, सुलताना चाँद बीबी या स्त्रियांनी रणांगणावर गाजवलेले शौर्य आपल्याला चांगले परिचित आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्येही कॅ. लक्ष्मी सहगल यांच्या नेतृत्वाखाली महिला सैनिकांची एक तुकडी होती. युद्धनीती, धाडस, शौर्य अशा गुणांनी या सगळ्या रणरागिणींनी इतिहासावर आपले नाव कोरले. पण देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलात मात्र स्त्रियांचा प्रवेश काहीसा उशिराच झाला. लष्कराच्या वैद्यकीय सेवेमध्ये स्त्रियांचा समावेश १९५८पासून असला तरी भारतीय संरक्षण दलात महिला अधिकाऱ्यांच्या नेमणुका १९९२मध्ये सुरू झाल्या. मात्र लष्करात प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्याची परवानगी देण्यासाठी २०२० वर्ष उजाडावे लागले. लष्करातील वैद्यकीय क्षेत्र, प्रशासकीय विभाग, सिग्नल यंत्रणा, अभियांत्रिकी अशा विविध पदांवर महिला काम करतच होत्या. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊनही त्या चोख कामगिरी बजावतील यावर विश्वास ठेवला जात नव्हता. त्याचप्रमाणे एसएससी म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गतच फक्त महिला अधिकाऱ्यांच्या नेमणुका होत असत. पण सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. अजय रस्तोगी यांनी महिलांना पर्मनंट म्हणजे कायम नियुक्ती म्हणजेच पर्मनंट कमिशन देऊन निवृत्त होईपर्यंत सेवेत राहण्याचा अधिकार देणारा ऐतिहासिक निर्णय दिला आणि खऱ्या अर्थाने गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले. दिल्ली उच्च न्यायालयात याबाबतच्या अर्जाची सुनावणी झाली होती. त्यावेळेस महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जावी असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता. पण संरक्षण विभाग आणि केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी तर केली नव्हती. याच अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. पठडीतल्या पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या कानपिचक्याही न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. 

भारतीय सैन्यदल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सैन्यदल आहे, २०१९च्या आकडेवारीनुसार भारतीय हवाई दलात तेरा टक्के, तर नौदलात केवळ सहा टक्के महिला आहेत. भारतीय लष्करात तर ही संख्या फक्त ३.८ टक्के इतकीच आहे. सैन्य दलात एकूण पुरुष अधिकाऱ्यांची संख्या ४० हजारांपेक्षा जास्त आहे. पण महिला अधिकाऱ्यांची संख्या मात्र फक्त दीड हजार आहे. त्यामुळे अर्थातच सैन्य दलात नारीशक्तीची संख्या वाढण्याची अत्यंत गरज आहे.

यापूर्वीही प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिला शक्तीच्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडले होते, पण ते तुरळक होते. आता महिला अधिकारीही मुख्य भूमिका बजावताना दिसत आहेत. त्यांना बघून देशातील अनेक मुलींनाही प्रेरणाही मिळतीय. देशाच्या प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रप्रमुखांसमोर सलामी देतानाचा क्षण आपणही अनुभवावा असे अनेकींना वाटत असेल. यासाठीच्या संधी उपलब्ध होत आहेत. मानसिक अडथळे आपणच निर्माण केले आहेत. ते दूर झाले की मग ‘Touch The Sky With Glory,’ या हवाई दलाच्या घोषवाक्याला अनुसरून अशा अनेक भवानी, शिवांगी, मनीषा बोहरा यापुढे प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसतील अशी आशा आहे!

यंदाची (२०२२) परेड गाजवणाऱ्या रणरागिणी

  •  लेफ्टनंट मनीषा बोहरा ः लेफ्टनंट मनीषाने ऑल मेल कॉन्टिजन्टचं नेतृत्व केलं. मनीषाचे वडील आणि आजोबा सैन्य दलात होते. याआधी १५ जानेवारी म्हणजे ‘आर्मी डे’लाही मनीषा यांनी पुरुष दलाच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. पुरुष गटाचे नेतृत्व करणाऱ्या महिला म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. 
  • लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा ः परेडमध्ये लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा यांनी भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व केले. सध्या त्या इंडियन नेव्हल एअर स्क्वाड्रनमध्ये ऑब्झर्वर ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. राजपथावर राष्ट्रपतींना सलामी देण्याचा क्षण हा आयुष्यभर जपून ठेवण्याचा क्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
  • महिला मोटरसायकल पथक ः बीएसएफच्या ‘सीमा भवानी’ मोटरसायकल पथकाने या परेडमध्ये सगळ्यांना त्यांच्या ताकदीचं प्रदर्शन घडवून थक्क केले होते.

संबंधित बातम्या