Sakal Saptahik Visvace Arta Dr. Sadanand More Marathi Article

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

विश्‍वाचे आर्त

अमेरिकेचे नेतृत्व ज्या राष्ट्रांनी स्वीकारले होते त्यांच्यात आणि अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर मतभेद झाल्याची व त्यामुळे या राष्ट्रांनी अमेरिकेचे नेतृत्व झुगारून दिल्याची उदाहरणे क्वचितच सापडतील. याउलट परिस्थिती रशियाच्या बाबतीत आढळते. बाकीच्यांचे जाऊद्या, परंतु ज्या चीनने क्रांती करून कम्युनिस्ट राजवट आणली व ज्याला रशियाने सुरुवातीपासून साहाय्य केले, त्याच चीनशी रशियाचे संबंध बिघडले.

आधुनिक काळातील भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन्ही व्यवस्थांची मांडणी युरोपात झाली याला योगायोग म्हणता येत नाही. त्यातील मार्क्‍सप्रणित साम्यवाद हा भांडवलशाहीला दिलेला प्रतिसाद होता हे वेगळे सांगायची गरज नाही. ज्या वैचारिक, सामाजिक, राजकीय वातावरणात भांडवलशाहीची मांडणी झाली, त्याच वातावरणात साम्यवादाची मांडणी होणे अगदीच स्वाभाविक होते. भांडवलशाही हे जसे मुख्यतः आर्थिक तत्त्वज्ञान आहे तसेच साम्यवादी आर्थिक तत्त्वज्ञान आहे. या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अर्थशास्त्रे अनुस्यूत आहेत. भांडवलशाही अर्थशास्त्राचा उदय होण्यापूर्वी युरोपात ‘भूमीवाद’ आणि ‘वाणिज्यवाद’ अशी दोन अर्थशास्त्रे प्रचलित होती. युरोपीय सत्तांचा वासाहतिक साम्राज्यवाद वाढीस लागला त्याचा सैद्धांतिक आधार याच अर्थशास्त्रांचा होता. व्यापाराच्या वाढीसाठीच वॉस्को द गामा, कोलंबस असे दर्यावर्दी खोल समुद्रात जात होते. मात्र संपत्तीची अमर्याद वाढ करायची असेल तर या अर्थशास्त्रांपेक्षा वेगळे अर्थशास्त्र पाहिजे असे लक्षात आल्यामुळे भांडवली अर्थशास्त्राचा उदय झाला. ॲडम स्मिथ या अर्थशास्त्राचा प्रणेता व आद्य प्रवक्ता मानला जातो. त्यानंतर जगभरात भांडवलशाही व्यवस्थेचा फैलाव झाला. 

या भांडवलशाहीचा फुगा वैचारिक आणि राजकीय पातळीवर फोडणारा प्रभावी विचारवंत म्हणजे अर्थातच कार्ल मार्क्‍स. मार्क्‍स केवळ पर्यायी अर्थशास्त्राची मांडणी करूनच थांबला नाही. त्याने पर्यायी राज्यव्यवस्थेचेही सूचन केले. इतकेच नव्हे, त्यासाठी चळवळही उभारली. आपल्या अर्थशास्त्रीय विचारांची राजकीय फलनिष्पत्ती त्याला आपल्या हयातीत पाहायला मिळाली नाही. त्याचा स्वतःचा होरा होता, की साम्यवादी क्रांती पहिल्यांदा प्रगत भांडवली देशात होईल. असा देश म्हणजे अर्थातच इंग्लंड. तथापि, हा होरा चुकला. पहिली साम्यवादी क्रांती (व तिला अनुसरून साम्यवादी सत्ता) पहिल्यांदा रशियात १९१७मध्ये झाली. अर्धा युरोप खंडात आणि अर्धा आशिया खंडात वाटल्या गेलेल्या रशियाला प्रगत भांडवली राष्ट्र असे कोणीच म्हटले नसते. 

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा राजकीय भूगोलच बदलला. युरोपातील जी राष्ट्रे रशियाच्या प्रभावाखाली आली, त्यांनी साम्यवादाचा स्वीकार केला. त्यानंतर अशीच एक क्रांती १९४९मध्ये चीनमध्ये होऊन तेथे माओ झेडॉंग यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राजकीय व्यवस्था आली. रशिया निदान अर्धा युरोपीय असल्याने त्याचा युरोपातील वैचारिकतेशी व घडामोडींशी संबंध येत असे. चीन हा तसा त्यापासून अलिप्तच व मागासलेला. तेथे साम्यवाद आला व इंग्लंडसारख्या अपेक्षित देशाने मात्र मार्क्‍सचे भाकीत चुकवावे हे एक आश्‍चर्यच म्हणावे लागते. 

पण महत्त्वाचा मुद्दा वेगळाच आहे. ॲडम स्मिथ हा भांडवलशाहीचा प्रमुख प्रवक्ता मानला गेला तरी त्याच्या ‘द वेल्थ ऑफ नेशन्स’ ग्रंथाची पवित्र पोथी करण्यात आली नाही. ज्याला अभिजात (Classical) अर्थशास्त्र म्हटले जाते त्याच्यात नंतर आणखी ग्रंथांची भर पडत गेली. इतकेच नव्हे, तर ‘अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप नको’ हे भांडवलशाहीचे मूळ सूत्रच खुंटीला गुंडाळणाऱ्या केन्स या अर्थशास्त्रज्ञाला भांडवलशाहीचा तारणहार मानले गेले. थोडक्‍यात काय तर परिस्थितीप्रमाणे बदलण्याची लवचिकता भांडवली व्यवस्थेने स्वतःच्या अंगात बाणवून घेतली. साम्यवादाच्या बाबतीत तसे घडले नाही. साम्यवाद्यांनी मार्क्‍सची ‘पोथी’ बनवली. त्याच्या ग्रंथांना जणू धार्मिक ग्रंथांचे पावित्र्य बहाल करण्यात आले. त्यामुळे तो बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यात अपयशी ठरला. 

पण हा झाला तात्त्विक मुद्दा. प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर काय दिसते? जोपर्यंत मार्क्‍सचा विचार तात्त्विक पातळीवरच रेंगाळला होता तोपर्यंत भांडवलशाही व्यवस्था मानणाऱ्या राष्ट्रांना तो गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. पण रशियात बोल्शेव्हिक क्रांती होऊन खरोखरच कम्युनिस्टांची राजवट आली तेव्हा मात्र साम्यवादाला गंभीरपणे घेणे त्यांना भाग पडले. खरे तर या क्रांतीपर्यंत भांडवलशाही राष्ट्रांमध्ये इंग्लंड अग्रणी होते. ब्रिटिश सत्तेचा सूर्य जगाच्या पाठीवर मावळतच नाही अशी परिस्थिती होती. तिकडे अमेरिकेत मात्र वासाहतिक विस्तार न करता समृद्धीचा पूर लोटला होता. तरीही अमेरिका जगाच्या राजकारणापासून तशी अलिप्तच होती. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्तेचा सूर्य अस्ताचलाला जाऊ लागला व त्यामुळे निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याची संधी अमेरिकेला आयतीच उपलब्ध झाली. भांडवलशाही राष्ट्रांचे नेतृत्व अमेरिकेकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, ब्रिटिश साम्राज्याचा अस्त झाला होता. महायुद्धात बसलेल्या फटक्‍यामुळे इंग्लंडसह युरोपातील सर्वच राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाली होती. त्यांचे धुरिणत्व पेलण्याचे सामर्थ्य त्यांच्यापैकी कोणाकडेच नव्हते. 

या घडामोडींना आणखीही एक किनार आहे. महायुद्धोत्तर परिस्थितीत रशिया एक नवी महासत्ता म्हणून उदयाला येत होती. अमेरिकेच्या पाठोपाठ अणुशक्तीची कास धरणारा रशिया हा पहिला देश ठरला. इतकेच नव्हे, तर हायड्रोजन बॉंबच्या निर्मितीत रशियाने आघाडीसुद्धा मारली. अशा परिस्थितीत युरोपीय राष्ट्रांना केवळ आर्थिक पुनर्रचनेसाठीच नव्हे, तर सुरक्षिततेच्या कारणासाठीही अमेरिकेचा आश्रय घेतल्याशिवाय पर्यायच उरला नाही. नॉर्थ ॲटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) हे याच परिस्थितीचे अपत्य. महायुद्धोत्तर युरोपची आर्थिक घडी बसवण्यासाठी सिद्ध करण्यात आलेली मार्शल योजना आणि नाटो या खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. 

या सर्वच प्रकाराची परिणती शेवटी जगातील राष्ट्रांची दोन गटांत विभागणी होण्यात झाली. एका गटाचे नेतृत्व अमेरिकेकडे व दुसऱ्याचे रशियाकडे. एकाला भांडवलशाही व्यवस्था मान्य, दुसरा साम्यवादाचा पुरस्कर्ता. 

युरोपमधील (खरे तर जागतिक स्तरावरील) भांडवली राष्ट्रांचे नेतृत्व करणे, त्यांना आर्थिक मदत करून संरक्षणछत्र पुरवणे हे अमेरिकेच्या दृष्टीने अजिबात अवघड नव्हते. तो एक संपन्न आणि समृद्ध देश बनला होता. दोन्ही महायुद्धांची झळ त्याला पोचली नव्हती. तसे रशियाच्या बाबतीत म्हणता येणार नाही. दुसऱ्या महायुद्धात तर रशियाची अतोनात हानी झाली होती. जर्मनीचा प्रतिकार करताना त्याला दग्धभू  धोरणाचा अवलंब करावा लागला होता एवढे सांगितले तरी पुरे. 

दुसरा मुद्दा म्हणजे रशियाने जो आर्थिक व तात्त्विक विचार स्वीकारला होता त्या साम्यवादाच्या चौकटीत राहून समृद्धीची शिखरे पादाक्रांत करणे शक्‍यच नव्हते. या चौकटीत राष्ट्राच्या उत्पादनक्षमतेच्या पायांत खोडा घातला जातो. कशाचे उत्पादन करायचे, किती करायचे याचे धोरण सरकारी नियोजनाच्या माध्यमातून करण्यात येते. त्याचा सामान्य माणसांच्या गरजांशी व कर्तृत्वाशी काहीच संबंध उरत नाही. अमेरिकेने अणुबॉंब तयार करणे किंवा अवकाशयाने पाठवणे आणि रशियाने याच गोष्टी करणे यात मोठा फरक होता. अमेरिकेतील नागरिकांच्या गरजा भागविण्यात कोठे कमतरता नव्हती. शस्त्रस्पर्धा वगैरे गोष्टी हा बोनस होत्या. तसे रशियाच्या बाबतीत म्हणता येत नाही. शिवाय अमेरिकेतील लोक स्वातंत्र्य नावाच्या गोष्टीचा पुरेपूर उपभोग घेत होते. ते रशियात औषधापुरतेही नव्हते, या गोष्टीचाही विसर पडू देता कामा नये. 

अमेरिकेचे नेतृत्व ज्या राष्ट्रांनी स्वीकारले होते त्यांच्यात आणि अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर मतभेद झाल्याची व त्यामुळे या राष्ट्रांनी अमेरिकेचे नेतृत्व झुगारून दिल्याची उदाहरणे क्वचितच सापडतील. याउलट परिस्थिती रशियाच्या बाबतीत आढळते. बाकीच्यांचे जाऊद्या, परंतु ज्या चीनने क्रांती करून कम्युनिस्ट राजवट आणली व ज्याला रशियाने सुरुवातीपासून साहाय्य केले, त्याच चीनशी रशियाचे संबंध बिघडले. माओ झेडॉंगसारखे चिनी सत्ताधीश रशियावर ‘प्रतिक्रांतिवादी’, ‘सुधारणावादी’ अशा पारिभाषिक शिव्याशापांचा वर्षाव करू लागले. त्याच चीनला रशिया या आपल्या सरहद्दीवरील देशापासून धोका वाटू लागला व या सगळ्यांचे अंतिम पर्यवसान चीन आणि अमेरिका यांच्या साटेलोट्यात झाले. 

वरील मुद्दा आंतरराष्ट्रीय संबंधांशी निगडित होता; पण देशांतर्गत परिस्थितीचा आढावा घेतला तर काय दिसते? सत्तास्पर्धा अमेरिकेतही आहेच; परंतु तेथे दर चार वर्षांनी निवडणुका होऊन अध्यक्ष बदलता येतो. एरवीही अध्यक्षावर कोणीही कसलीही टीका करतो. रशियातील एकपक्षीय राजवटीत असे काही करायला वावच नाही. त्यामुळे, उदाहरणार्थ, स्टॅलिन जिवंत होता तोपर्यंत त्याला बदलायचा प्रश्‍नच नव्हता आणि त्याच्या विरोधात काही बोलायचाही. त्याच्या मृत्यूनंतर राष्ट्रप्रमुख झालेल्या कृश्‍चेव्हला कंठ फुटला व त्याने पक्षाच्या बैठकीत स्टॅलिनच्या कृत्यांचा पाढाच वाचला. 

या संदर्भातील एक दंतकथा प्रचलित आहे. कृश्‍चेव्ह बोलत असताना एका सदस्याने, अर्थातच आपला नामोल्लेख न करता, त्याला चिठ्ठी पाठवली की, ‘आपण तेव्हा काय करीत होता?’ ती वाचून कृश्‍चेव्हने ही चिठ्ठी कोणी लिहिली याची विचारणा केली. कोणीच प्रगट होईना. तेव्हा कृश्‍चेव्ह हसून म्हणाला, ‘‘मी तेव्हा हेच करीत होतो!’’

वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर स्टॅलिनच्या काळात रशियात खुलेपणा नव्हता; कृश्‍चेव्हने तो आणण्याचा प्रयत्न केला, परंतु स्टॅलिनच्या पश्‍चात व आपल्यापुरताच. तो येण्यासाठी जगाला गोर्बाचेव्हची प्रतीक्षा करावी लागली.

संबंधित बातम्या