सापुताऱ्याची सफर 

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 27 जुलै 2018

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

नाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा, गावाचा रम्यपणा अनुभवण्यासाठी सापुताऱ्यात किमान एक दिवस तरी थांबावे लागेल. 

शांत, रम्य सापुतारा 
सापुताऱ्याच्या बाबतीतले काही विरोधाभास हे बघण्यासारखे आहेत. नाशिकहून सापुतारा जवळ असले तरी सापुतारा गुजरात राज्यात येते. डांग जिल्ह्यातल्या सापुताऱ्यात स्थानिक लोक मांसाहार करीत असले तरी सापुताऱ्यात मात्र बहुतांश ठिकाणी शाकाहारी जेवण मिळते. अपेयपानसुद्धा निषिद्ध असल्याने असेल कदाचित परंतु शनिवार-रविवार वगळता माथेरान-महाबळेश्‍वरसारखी गर्दी सापुताऱ्यात सहसा नसते. सापुतारा आपल्याच संथ लयीत राहणारे, चालणारे आहे. कदाचित म्हणूनच निसर्गप्रेमींचे ते आवडते ठिकाण आहे. 

आम्ही प्रथमच सापुताऱ्याला गेलो होतो तेव्हा दुपारी सापुताऱ्यात पोचून संध्याकाळी रोपवेची छोटीशी सफर करून, सनसेट पॉइंटवर गेलो होतो. तिथे तुरळक गर्दी होती. पर्यटक उंटावरच्या सफारीचा आनंद घेत होते. सूर्यास्त झाल्यावर थंडी वाढत गेली. बोचरी होत गेली. रात्री जेवणे झाल्यावर, हॉटेलच्या व्हरांड्यात आम्ही ३-४ जण गप्पा मारीत बसलेलो होतो.  बसल्या बसल्या आमच्यातील एकाने हॉटेलच्या वेटरला ‘समोरच्या तळ्यात भल्या पहाटे बोटिंग करायला मिळेल काय?’ असे विचारले असता, त्या वेटरने आपल्या माणसाला सांगून आमच्यासाठी बोटिंगची वेळ ठरवून टाकली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे बोटिंग करायला मिळणार म्हणून आम्ही खुशीत झोपून गेलो. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून बोटिंग करताना समोर दिसणारे दृश्‍य अतिशय रोमांचक होते. तळ्यावर धुके पसरलेले होते. बोटिंग करताना इलेक्‍ट्रिक वायरवर बसलेले पक्षी आमची नजर वेधून घेत होते. इवल्याशा सापुताऱ्याच्या इवल्याशा तळ्यातल्या लटकणाऱ्या वायरवर बसलेले ते गोजिरवाणे दोन पक्षी आमची सकाळ सुंदर करून गेले. ऊन्हे वाढू लागताच धुक्‍यातले धुंद वातावरणही बदलून गेले. 

परिसर स्वच्छ दिसू लागल्यावर आम्ही हॉटेलवर परतलो. छोटेखानी सापुताऱ्यातले छोटे छोटे बगीचे, छोटेसे संग्रहालय बघून झाले. परंतु त्याहूनही वेगळीच गोष्ट सापुताऱ्यात पाहायला मिळाली. सापुतारा संग्रहालयाजवळ असलेल्या गवळी तुळशीराम या तारपा वादकाने दोन छान धून वाजवून वातावरणांत जान आणली. नंतर बोलण्याच्या ओघात कळले, की गवळी तुळशीराम यांनी वाई-भोरवरून आपला मुक्काम डांगी जिल्ह्यात हलवला होता. गुजरात सरकारतर्फे ते गोवा, दिल्ली वगैरे ठिकाणी जाऊन ‘तारपा वादन’ करून आलेले होते. तारप्याला (तारप्याला ते पावरी म्हणायचे) त्यांनी मोरपिसे का लावली? असे विचारले असता, ‘बायकोला जसे सजवतो तसे पावरीला सजवले’ असे मिश्‍किल उत्तर त्यांनी दिले. 

नंतर आम्ही सापुताऱ्याचा निरोप घेतला आणि वाघई गावाकडे जायला निघालो. वाघईमधील गिरा धबधबा बघून बलसाडमार्गे अहमदाबाद हायवेवरून मुंबईला परतलो. 

सापुताऱ्याचा अविस्मरणीय प्रवास 
एकदा हिरेश आणि साधना चौधरी, मी आणि स्वाती अशा चौघांनीच सापुताऱ्याला जायचा बेत आखला. चक्रधर प्रतापराव हंजणकर  सोबत होतेच. प्रवासाला निघताना काहीही नियोजन करायचे नाही. मनमुराद भटकायचे. वाटेल तिकडे थांबून फोटो काढायचे. हॉटेल बुकिंग करायचे नाही आणि ऐनवेळी वाटले तर कुठेही आणि कुठलाही मार्ग बदलून निसर्गस्थळे पाहून, एका सकाळी निघून दुसऱ्या दिवशी रात्री परतायचे असे ठरले. 

मुंबईतून निघालो तेव्हा चांगला पाऊस होता. हायवेवरून भिवंडी बायपासने वाड्यापर्यंत जाताना वाटेत दिसणाऱ्या निसर्गदृश्‍यांना वा वा म्हणत विक्रमगडपर्यंत पोचलो. विक्रमगडला गाडीतून मुद्दाम उतरून व्हाळाच्या पाण्याचा नैसर्गिक आवाज, निर्मनुष्य परिसरात ऐकून, ओलेत्या रस्त्याचे फोटो घेत जव्हारच्या वाटेल लागलो. एव्हाना पाऊस वाढला होता. सर्वत्र धबधबे कोसळताना दिसत होते. प्रवासाच्या सुरुवातीलाच एवढे धबधबे कोसळताना पाहून डोळे शांत, तृप्त झाले. सगळी सामान्य स्थळे ही पावसाच्या पाण्याने नक्षत्रांची बेटे बनली होती. त्या आनंदाच्या उत्साहातच सहसा न बघितला जाणारा दादरकोपरा धबधबाही बघायला गेलो. नेहमी सुतळीसारखा भासणारा ‘दादरकोपरा’ ओसंडून वाहताना बघून आडवाटेवरचा प्रवास त्रासदायक न वाटता उलट सुखावून गेला. पाऊस पडतच होता. आम्हाला काही जाणीव नव्हती. आम्ही हरखून गेलो होतो. त्यानंतर अक्षरशः प्रपातासारखा कोसळणारा दाभोसा पाहिला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे थेट खालपर्यंत दरीत उतरून वगैरे तो धबधबा अनुभवला. त्या धबधब्याचे तुषार अंगावर झेलून-झेलून कसले त्यात पुरते चिंब भिजून, पुन्हा ट्रेक करून ‘वर’ येऊन भिजक्‍या अंगानेच गाडीत बसून खानवेल-सिल्वासा-धरमपूर-वासंदा फाटा करीत वाघईला गिरा धबधब्याजवळ जाऊन पोचलो. 

खरे सांगायचे, तर आम्ही इतक्‍या रमत-गमत गिरा धबधब्यापर्यंत आलो, की पाऊस पडतोय, संध्याकाळ झालीय याचा जणू विसर पडला. परंतु झरझर अंधार पडू लागल्यावर आम्ही पटकन गाडीत बसून सापुताऱ्याच्या वाटेल लागलो. आता रस्ता खराब झालेला पाहायला मिळाला. धुके पसरायला सुरुवात झाली. त्यात घाटाचा रस्ता लागला. प्रतापरावांना वळणावरून गाडी थोडी सांभाळून न्यावी लागत होती. अशा गंभीर वातावरणात - आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचे तर थोड्या तंतरलेल्या अवस्थेत ‘आम्ही कुठे आहोत?’ हा प्रश्‍न पडत पडत एकदाचे सापुताऱ्याला जाऊन पोचलो. आमच्या दुर्दैवाने सापुताऱ्यातली सर्व हॉटेल्स त्या दिवशी फुल्ल होती. सर्व हॉटेलांत जाऊन चौकशी केली, परंतु सगळीकडे नन्नाचाच पाढा ऐकायला मिळाला. जेवण मिळायची मुश्‍कील झाली. शेवटी एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. मिळेल ते जेवलो आणि पुन्हा हॉटेल शोधायला लागलो. दूरवर एका टोकाला ३-४ दिवे लागलेले दिसले. गाडी सुरू करताच प्रतापरावांनी कचकन ब्रेक मारून गाडी थांबवली. धुके विरल्यावर गाडी दरीच्या तोंडावर उभी असलेली दिसली. आता मात्र सगळेच टरकले! आम्ही गुपचूप दिव्याच्या दिशेने जाऊ लागलो. नशिबाने ते एक हॉटेल होते. अर्थात तिथेही राहण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. अखेर हिरेशने ‘मधाळास्त्रा’चा वापर करून ‘सोबत फॅमिली आहे. काहीतरी बघा. रात्रीचे १० वाजलेत..’ वगैरे सांगून पाहिले. हॉटेल मालक म्हणाला, ‘हॉटेल तर फुल्ल आहे. पण तुमची अवस्था बघून वेटर्स राहतात त्या खोलीत तुम्हाला चालणार असेल तर तुम्हाला राहायला देतो.’ आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्‍नच नव्हता. वाऱ्याने सतत पडदे हलणाऱ्या एका मोकळ्या खोलीत आम्हाला झोपायला मिळाले. आम्ही इतके दमलो होतो, की फक्त पलंगावर टेकायचा अवकाश... आम्ही सर्व झोपी गेलो. बॅगांचा विचार नाही... पाकिटांचा विचार नाही... कसलाच विचार नाही... गाढ झोपी गेलो. 

सकाळी उठलो. खूप तरतरीत वाटले. पावसाळी, थंड हवेने एकदम उत्साहित, टवटवीत करून टाकले. आम्ही चहा, नाश्‍ता करून आमचे सामान गाडीत ठेवून नाशिकच्या दिशेला लागलो. वाटेत बोलताना साऱ्यांचा सूर एकच होता, की एखाद्या ठिकाणी गेले की सारे बघितलेच पाहिजे असा अट्टहास नसतो ते बरेच आहे. नाहीतर सापुताऱ्यात त्या दिवशी आम्ही काय बघणार होतो? तलाव ओसंडून वाहत होता. रोपवे बंद होता. बागेत पाणी साचले होते. संग्रहालय बंद होते. आमच्या जागी कुणी असते तर कदाचित निराश झाले असते. आम्ही मात्र झालेल्या प्रवासावर आणि वाटेतल्या महाअप्रतिम निसर्गदृश्‍यांवरच फिदा होतो. 
मजा म्हणजे सापुतारा सोडताना पुन्हा जोरात पाऊस सुरू झाला. पुन्हा  आमचे ‘नक्षत्रांचे देणे’ वगैरे बोलणे सुरू  झाले. दुपारीच नाशिकला आल्यावर  वाटले, संध्याकाळी मुंबईत जाण्याऐवजी  भंडारदरा, रंधा फॉल करूनच जाऊया. गाडी घोटीवरून भंडारदऱ्याकडे वळली. बाहेर पाऊस वाढतच होता. वाढलेल्या पावसाने गाडीतले वातावरण अबोल व्हायला  सुरुवात झाली. परंतु गाडीबाहेरच्या जगात निसर्गाने रंग भरायला सुरुवात केली होती. शिवाराचे, भातशेतीचे, निसर्गाचे, हिरवाईचे बरेच फोटो घेऊनसुद्धा मन भारत नव्हते. 

रंधा फॉलजवळ आलो तर तोदेखील आपल्या सर्व सामर्थ्यानिशी ओसंडून वाहात होता. माघारी फिरताना परतीच्या वाटेवर भोवतालची दृश्‍ये डोळ्यात किती साठवायची, असा प्रश्‍न पडेपर्यंत ती दृश्‍ये पाहिली. डोळ्यात साठवली. पाऊस वाढतच होता. रस्त्यावरचे पाणीदेखील वाढत गेले. अखेर आम्ही रात्री मुंबईत परतलो. सापुतारा एकूण ५-७ वेळा तरी पाहिले. पण आम्ही चौघांनी भर पावसात सापुताऱ्याची फेरी केली, त्या आठवणी काही  वेगळ्याच आहेत. केवळ अविस्मरणीय!

कसे जाल? 

 •     सापुतारा आडवळणावर असले तरी चहूबाजूंनी जोडलेले आहे. रेल्वेने नाशिक (८० किमी), बिलिमोरा (११२ किमी) वरून सापुतारा गाठू शकतो. 
 •     रस्त्याने तर अहमदाबाद, औरंगाबाद, बिलिमोरा, बलसाड, पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, सिल्वासा अशा सर्व बाजूंनी तुम्ही सापुतारा गाठू शकता.
 •      असे असले, तरी १. मुंबई-नाशिक-सापुतारा-वाघई-बलसाड-मुंबई २. मुंबई-वाडा-विक्रमगड-जव्हार-दाभोसा-खानवेल-सेल्वास-धरमपूर-वासंदा फाटा-वाघई-सापुतारा. ३. सापुतारा-नाशिक-घोटी-भंडारदरा-रंधा फॉल-घोटी-कसारा-मुंबई.. अशा मार्गांचा अवलंब केल्यास अनोखी निसर्गयात्रा घडेल. 

काय पाहाल? 

 • सापुतारा म्युझियम, गोंडोला सफर, लेक गार्डन, स्टेप गार्डन, एको पॉइंट, सनसेट पॉइंट, गीर धबधबा, तळ्यातले बोटिंग. 

कुठे राहाल? 

 • चित्रकूट हॉटेल, वैती रिसॉर्ट, हॉटेल पतंग आणि अन्य पर्याय उपलब्ध आहेत. 
 • अंतर 
 •     मुंबई-सापुतारा = २५२ किमी - ५ तास. 
 •     पुणे-सापुतारा = २९० किमी - साडेसहा तास. 
 •     वणी-सापुतारा = ४८ किमी - सव्वा तास. 
 •     सापुतारा-वाघई = ५२ किमी - सव्वा तास. 
 •     नाशिक-वणी = ७१ किमी - पावणेदोन तास. 
 •     नाशिक-सापुतारा = ८० किमी - दोन तास.

फोटो फीचर

संबंधित बातम्या