लेखक : प्राजक्ता कुंभार
पारंपरिक कांदेपोह्यांनी ‘बैठकीची खोली ते कॉफीशॉप’ असा बराच लांबचा पल्ला गाठलाय. अर्थात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून केलेलं लग्न असू दे, किंवा अगदी आजही आई-बाबांच्या पसंतीने झालेला ‘कांदेपोह्यांचा’ कार्यक्रम असू दे, ‘योग्य जोडीदाराची निवड’ हा मुद्दा लग्न जुळवण्याचा या कोणत्याही प्रकारात महत्त्वाचा आहे.
“तू कशी शोधली रे हिला, नेमकी सापडली कुठे ही तुला?” त्यादिवशी उगाच आईला छळायचं म्हणून मी बाबाला हा प्रश्न विचारला. आई कामात असताना हे असे प्रश्न विचारून त्रास देण्यात एक वेगळंच सुख असतं आणि बाबाला माझे ‘हे असे’ प्रश्न, ते विचारण्यामागची कारणं हे अगदी व्यवस्थित डिसायफर करता येतं. तो अशा प्रश्नांना नेमकी मला अपेक्षित असणारी उत्तरं देतो.
‘अगं काही नाही, मी ऑफिसमधून घरी निघालो होतो स्कूटरवर. तर मला ही दिसली बस स्टॉपवर उभी. मी विचार केला की लिफ्ट देऊया. हिला तिच्या घराच्या दारात सोडलं, तर आतून हिचे बाबा बाहेर आले. मला म्हणाले, आता आलाच आहात तर घेऊनच जा मुलीला लग्न करून तुमच्यासोबत, अगदी आताच तयारी करतो मी लग्नाची. मग काय? झालं लग्न आणि आलो मी हिला घेऊन घरी. ते लिफ्ट देणं फारच महाग पडलं बघ मला.’
आता यातला गमतीचा भाग सोडला तरी लहानपणापासून जे आई-बाबा मी माझ्या आसपास वावरताना बघत आलीय, त्यांच्याकडे बघून मला त्यांचं ‘अरेंज्ड’ वगैरे झालं असेल असं कधीच वाटलं नव्हतं. मला उगाच वाटायचं की हे दोघे एकाच वर्गात, किमान एकाच शाळेत असतील, मग सोबत कॉलेज आणि जॉब वगैरे करून यांनी लग्न केलं असेल. कारण दोन अनोळखी माणसं एकमेकांवर इतकं प्रेम करत आणि एकमेकांचा इतका आदर करत इतकी वर्ष एकत्र कसे राहू शकतात? फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, नॉन एक्सक्लुसिव्ह रिलेशन, इट्स कॉम्प्लिकेटेड, रिबॉउंड, लिव्ह इन हे आणि असे नात्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार सहज अॅव्हेलेबल असणाऱ्या आत्ताच्या आमच्या पिढीला, दोन अनोळखी माणसांनी असं ३०-३५ वर्षं आनंदाने एकत्र राहणं हे जरा कमीच झेपणारं आहे.
माझ्या आई-बाबांचं टिपिकल ‘कांदेपोहे’ लग्न होतं. आईला तर म्हणे एकाच दिवशी बाबा आणि अजून एक मुलगा पाहायला आला होता आणि बाबानीही आईच्या आधी काही ‘स्थळं’ पाहिली होती. आई-बाबानं एकमेकांना होकार देण्याआधी, दोन्ही घरात सगळ्या नातेवाइकांसोबत बैठक वगैरे झाली होती. एकमेकांच्या घरी जाऊन, सगळ्यांसोबत बोलून, एकूण सगळं योग्य आहे असं वाटल्यावरच लग्न ठरलं होतं. मी आईला अनेकदा विचारलंही की त्यादिवशी आलेल्या त्या दुसऱ्या मुलाला नकार देताना तू नेमकं काय कॅल्क्युलेट केलं होतं. तिचं उत्तरं अगदी सोपं होतं- तिच्या अपेक्षा आणि तिच्या आई-बाबांचं मत. आजच्या भाषेत बोलायचं झालं, तर त्या दुसऱ्या मुलासोबत तिच्या ‘व्हाइब्स मॅच’ झाल्या नव्हत्या.
आता विचार केला तर मला आई- बाबांच्या पिढीचा उगाच हेवा वगैरे वाटतो. किती सरळसोपं होतं आयुष्य. व्यवस्थित शिका, नोकरी करा आणि स्वतःच्या आई-बाबांच्या पसंतीनं, स्वतःला योग्य वाटणारा जोडीदार निवडा. लग्न ठरल्यावर अगदी चुकूनमाकून, तेही कोणीतरी सोबत असताना होणाऱ्या भेटीगाठी, लग्नापर्यंत एकमेकांना लिहिलेल्या पत्रांतून उलगडत जाणारी एकमेकांची व्यक्तिमत्त्वं आणि त्यातून वाढणारं प्रेम, हे सगळं किती गोड, अगदी परीकथेसारखं वाटतं. खरंतर त्यांच्या पिढीतही प्रेम करून लग्न करणारे, काही कारणानं लग्न न जुळणारे किंवा फसवणूक होणारे अपवाद असतीलच, पण तरीही ‘चहा आणि कांदेपोहे’ हे कॉम्बिनेशन भन्नाट आहे.
याच्या अगदी उलट म्हणजे आताचे आम्ही लोक. स्वतःच्या सर्कलमध्ये असणाऱ्या कोणासोबत किंवा कोणत्यातरी डेटिंग अॅपवर सहज ‘राइट स्वाइप’ करून झालेली ओळख रोजच्या चॅट्स आणि कॉल्समध्ये बदलते. मग भेटून, व्हाइब्स ‘मॅच’ झाल्या की सहा महिने- वर्षभर एकमेकांसोबत घालवून हे नातं किती स्टेबल आहे आणि एकमेकांच्या आयुष्यात किती पॉझिटिव्ह काँट्रिब्युशन करतंय हे बघितलं जातं. यात तुमच्या प्रोफेशनल आणि पर्सनल अँबिशन, एकमेकांकडून ‘पार्टनर’ म्हणून असणाऱ्या अपेक्षा; फायनान्शियल, इमोशनल, फिजिकल आणि मेंटल कम्पॅटिबिलिटी या सगळ्याचा विचार केला जातो. सगळं जुळून आलं, तर मग आई-बाबाना सांगणं, त्यांना एकमेकांना भेटवणं, आणि फायनली लग्नाचा निर्णय घेणं, असं हे ‘लव्ह कम अरेंज्ड’चं ‘हॅप्पी एंडिंग’ असतं.
हल्ली माझ्या आसपास असणाऱ्या कोणालाही ‘लव्ह की अरेंज्ड’ असा प्रश्न विचारला तर मिळणारं उत्तर हे अनेकदा दोन्हीही बाजूनं झुकणारं असतं. प्रेमात पडून लग्न करायला कोणाची जशी हरकत नाहीये तसंच ‘अरेंज्ड मॅरेज’ हाही प्रकार काही अगदीच कालबाह्य झालेला नाहीये. फक्त बदल म्हणून सोयरीक किंवा नातेवाइकाच्या ओळखीनं येणारी स्थळं हा इतकाच परीघ असणाऱ्या लग्नाच्या गाठीभेटींना आता डिजिटल लुक मिळालाय. डेटिंग अॅप, मॅट्रिमोनियल साइट यामुळे ‘होतकरू लग्नाळू’ ऑप्शन वाढलेत. पण तरीही फिल्मी स्टाइलनं पळून वगैरे जाऊन लग्न करण्यापेक्षा; दोन्ही कुटुंबांना सोबत घेऊन, शक्य तिथं तडजोड करून, पण एकमेकांचा आदर ठेवून लग्न जुळवण्याकडे आजच्या पिढीचा कल जास्त आहे, असं माझं निरीक्षण आहे.
बैठकीच्या खोलीत, समोर बसलेल्या पाहुण्यांसाठी आणि कदाचित ज्याच्यासोबत आयुष्य कायमचं जुळणार आहे अशा ‘पोटेन्शियल’ जोडीदारासाठी, हातात कांदेपोह्यांच्या बशांचा ट्रे घेऊन, आईची ठेवणीतली साडी नेसून, अदबीनं बोलणारी आणि हलकंसं हसणारी ‘ती’, आता होणाऱ्या सासू-सासऱ्यांना डायरेक्टली एखाद्या तारांकित कॉफीशॉपमध्ये भेटत असेलही, पण या सगळ्या प्रक्रियेत अनेकांसाठी ‘मोठ्यांचं मत’ हा फॅक्टर आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
तसं पाहायला गेलं, तर कांदेपोह्यांनी ‘बैठकीची खोली ते कॉफीशॉप’ असा बराच लांबचा पल्ला गाठलाय. आजूबाजूला वाढलेल्या स्पर्धेमुळे असेल किंवा शिक्षण आणि नोकरी यातून होणारी ‘स्व’त्वाची जाणीव असेल, पण कधीकाळी वयाच्या वीस-बाविसाव्या वर्षी सुरू होणारी जोडीदाराची शोधाशोध आता तिशीच्या टप्प्यावर येऊन पोचलीये. त्यामुळे आयुष्याकडून आणि साहजिकच जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षांची लिस्ट मोठी होतं चाललीय. मुला-मुलींची माहिती लिहून, सोबत पत्रिका जोडून एकमेकांना पाठवण्याची जागा आता लग्न जुळवण्याची हमखास खात्री देणारे व्हाॅट्सअॅप ग्रुप आणि #अमुकतमुकMatrimony सारख्या हॅशटॅगनं घ्यायला सुरुवात केलीय. आधी घरातल्याच कोण्या नातेवाइकाकडून केली जाणारी ‘मध्यस्थी’ आता मॅट्रिमोनी साइट आणि पर्सनल मॅचमेकर करत आहेत; नेटफ्लिक्सवर अपरिहार्य कारणांनी गाजलेला ‘इंडियन मॅचमेकिंग’ हा शो याच बदलांचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
लग्न जुळवण्याचा या प्रक्रियेत प्रत्येक पिढीनुसार वरवर बघता कितीही बदल झाले असले तरी या सगळ्यामध्ये ‘अजून लग्न नाही झालं तुझं?’ या एका प्रश्नाचा बागुलबुवा मात्र कॉमन आहे. एका ठरावीक वयानंतर नातेवाईक, आजूबाजूचे लोक यांच्याकडून कधी उघड उघड तर कधी इंडायरेक्टली विचारला जाणारा हा प्रश्न आजही तितकाच रिलेव्हन्ट आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून केलेलं लग्न असू दे, किंवा अगदी आजही आई-बाबांच्या पसंतीनं झालेला ‘कांदेपोह्यांचा’ कार्यक्रम असू दे, ‘योग्य जोडीदाराची निवड’ हा मुद्दा या लग्न जुळवण्याचा कोणत्याही प्रकारात महत्त्वाचा आहे. कारण ‘लग्न तर करायचंय’ असं डोक्यात ठेवून आयुष्याचं प्लॅनिंग करणाऱ्या कोणत्याही पिढीचा अट्टाहास असणार आहे तो ‘दे लिव्हड हॅप्पिली एव्हर आफ्टर’ अशा सुफळ संपूर्ण शेवटासाठीचाच!