धर्मप्रवाहांच्या संगमावर…

लेखक : डॉ. राहुल हांडे

मध्ययुगीन भक्ती आंदोलनात संतांनी व्यक्तिगत आचरणापासून प्रारंभ करत अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याला महत्त्व दिले. त्याचबरोबर वेद-उपनिषदे-गीता, बौद्ध, जैन, सूफी इत्यादी सर्व प्रवाहांचा संगम या भक्ती आंदोलनांमध्ये झालेला दिसून येतो.

मानवी सभ्यतेच्या विकासातील प्रत्येक टप्प्यावर धर्म हा तिचा निसंदिग्ध व अविभाज्य अवयव राहिला आहे. आदिम काळापासून मानवी जीवनात धर्म संकल्पनेचे अस्तित्व असलेले दिसून येते. मानवी समाजासंदर्भात होत असलेले नवनवीन संशोधन आणि समकालीन घटनांच्या परिप्रेक्ष्यात धर्माला टाळून मानवी इतिहासाचा विचार करण्याचा काळ आता मागे पडलेला दिसतो. पूर्वी धर्माला किंवा धर्मभावनेला एक अत्यंत महत्त्वहीन घटक किंवा सामाजिक पर्यावरणाचे केवळ प्रतिबिंब म्हणून इतिहासात स्थान दिले जात असे. कार्ल मार्क्स यांच्या सैद्धांतिक मांडणीने जगाला धर्मासह सर्वच गोष्टींना आर्थिक हितसंबधांच्या आणि आर्थिक घडामोडींच्या कसोटीवर तपासून पाहण्याची नवी दृष्टी दिली. हे मार्क्सवादाचे मौलिक योगदान कदापि नाकारता येत नाही. भांडवलशाहीच्या अतिरेकानंतर जग पुन्हा मार्क्सच्या नजरेतून जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करेल, यातदेखील शंका नाही. असे असले तरी धर्माच्या मानसिक पक्षाबाबत मार्क्सच्या दृष्टिकोनातून केलेला विचार पर्याप्त ठरत नाही. मानवी जीवनातील प्रत्येक घटनेमागील कारण म्हणजे अर्थकारण या मार्क्सप्रणीत सिद्धांताच्या पुढे जाऊन त्याचा विचार करावा लागतो.

आदिम काळापासून माणसाला जगण्यासाठी मानसिक आधाराची आवश्यकता होती. आजही ती आहेच. एवढेच नव्हे तर ती अधिक निर्माण झालेली दिसते. शुद्ध विवेकवादी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी किंवा आत्मविश्वास दांडगा असलेले लोक असल्या मानसिक आधाराच्या गरजेची ‘खुळचटपणा’ म्हणून संभावना करू शकतात. मात्र प्रत्येक माणसाची मानसिक जडण-घडण अथवा पिंड कणखर असू शकत नाही. काही मोजके लोक सोडले तर बहुसंख्य लोक मानसिक आधाराची गरज असणारे दिसतात. त्यांच्या मानसिक दुर्बलतेचा लाभ धर्माच्या नावाखाली आजवर कशा पद्धतीने उठवण्यात आला किंवा उठवला जात आहे, हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. तो येथे प्रस्तुत नाही. एवढे मात्र खरे की मानसिक आधाराच्या आदिम गरजेतून धर्मभावनेचा उदय मानवी जीवनात झाला. मानवी विचार, पूर्वग्रह, अंधविश्वास, निसर्ग-नियतीसमोरील हतबलता इत्यादी सर्व मानवी मनातील घडामोडी धर्माचा मानसिक पक्ष निर्मित करत असतात. त्यामुळे मानवी जीवनातील धर्मभावना म्हणजे केवळ एखाद्या विशिष्ट आर्थिक परिस्थितीचा वा आर्थिक हितसंबंधांचा परिपाक असतो, हे मान्य करता येत नाही. उलटपक्षी ती बहुसंख्य लोकांची मानसिक गरज असते.

मानवाच्या धर्मभावनेला स्वतःचे एक जीवन आणि गती असलेली दिसते. या धर्मभावनेत आणि मानवी जीवनाच्या समग्र संरचनेत सतत क्रिया-प्रतिक्रिया सुरू असते. त्यामुळे मानवी समाजाचा इतिहास केवळ आपल्या सोयीनुसार आणि सुविधेनुसार निर्माण करण्यात आलेल्या मापदंडांच्या आधारे मांडता येत नाही. मानवाच्या आजवरच्या मार्गक्रमणाचा इतिहास हा अत्यंत जटिल असल्यामुळे त्याचे एकरेषिय मूल्यमापनदेखील करता येत नाही. त्यामुळे मानवी जीवनातील धर्मभावनेची गरज लक्षात घेता, केवळ वर्गसंघर्ष हे एकमेव परिमाण वापरणे योग्य ठरत नाही. असे केल्याने इतिहासाची वर्गसंघर्षाधारित मांडणी स्वतःची संपन्नता आणि सार्थकता हरवून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवी धर्मभावनेची उपेक्षा करून करण्यात आलेल्या अशा मांडणीला बळजबरीनेच एका अंध व कृत्रिम संरचनेत बसविण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागतो. यासाठीच वर्गसंघर्षाधारित मांडणी करताना मानवाची ही मानसिक गरज लक्षात घेतल्यास ही मांडणी अधिक प्रभावी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवाच्या ह्या मानसिक गरजेचा लाभ उठवत आर्थिक हितसंबधांना, स्वार्थांना कशा पद्धतीने बळकटी देण्यात आली, हे अधिक नेमकेपणाने अधोरेखित करता येते. आपल्या शोषणाची व्यवस्था समजून सांगत असताना आपल्या मानसिक गरजेचा आदर होत आहे, हे जाणवल्यावरच सर्वसामान्य माणूस अशा मांडणीचा स्वीकार करू शकतो.

मानवाच्या मनातील ह्या संवेदनशील व नाजूक अंगाचा विचार भगवान बुद्धांनी नेमका केला होता. बुद्धांनी परमेश्वर व आत्मा ह्या दोन्ही संकल्पनांना आपल्या वचनांमध्ये महत्त्व दिले नाही. तसेच त्यांच्याविषयी अनुद्गार काढले नाही आणि अनादरदेखील व्यक्त केला नाही. स्वतः शोध घेत जा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील हे सांगण्यावरच त्यांनी भर दिला. बुद्धांना जगातील पहिले धर्म वैज्ञानिक म्हणावे लागते. माणसाची मानसिक गरज अथवा दुर्बलता ही धर्मभावनेची जननी आहे. यातूनच मानव पारलौकिक व अज्ञात शक्तीच्या भयाने किंवा आधाराने जगण्याचा प्रयत्न करतो, याची नेमकी जाणीव बुद्धांना होती. हे लक्षात घेऊनच बुद्ध स्वतःचा शोध घेण्यास सांगतात, ज्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम होत गेलेल्या माणसाचा स्वतःवरचा विश्वास दृढ होत जातो आणि त्याला धर्माच्या बाह्य अवडंबराची आवश्यकता भासत नाही. याचाच अर्थ त्याला धर्माचे मर्म नेमकेपणाने कळू शकते. असे असताना बुद्धांना आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला नास्तिक म्हणून आरोपित करण्यात आले. उलटपक्षी, स्वतःवरचा विश्वास दृढ केल्यास तूच परमेश्वर आहेस याची खात्री होईल, अशी ग्वाही देणारे बुद्ध हे खरे आस्तिक होते. वेद-उपनिषदातील ‘सोहम्’चे प्रात्यक्षिकच बुद्ध देत होते. बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर माणसाला स्वतःला प्रयत्न करावे लागणार होते. तेथे चमत्कार होणार नव्हता. त्यामुळे बुद्ध पचवता आला नाही. तसेच त्यांना नास्तिक म्हणून बदनाम करणेही सोपे गेले.

जैन तत्त्वज्ञानासंदर्भातदेखील अशीच भूमिका घेण्यात आली. आत्मशुद्धी करत स्वतःतला परमेश्वर शोधण्याचा मार्ग सांगणारे जैन तत्त्वज्ञानदेखील नास्तिक म्हणून गणले गेले. जैन तीर्थंकरांच्या संकल्पनेत भवसागराच्या लौकिक एेलतीरावरील घाटावरून म्हणजेच तीर्थावरून पैलतीरावर घेऊन जाणाऱ्या नावाड्याची भूमिका अपेक्षित आहे. पैलतीरावर गेल्यावर परमेश्वर आहे की नाही अथवा आपणच परमेश्वर आहोत, हा संभ्रम दूर होऊ शकतो. असे असले तरी जैन तत्त्वज्ञानाला बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे नास्तिक संकल्पनेत बसवण्यात आले. खरेतर ही दोन्ही तत्त्वज्ञाने वेद-उपनिषदातील अंतिम सत्य ‘सोहम्’ सांगताना दिसतात. त्याचबरोबर सैद्धांतिक पक्षापेक्षा प्रात्यक्षिक करण्यावर भर देतात. कारण या दोन्ही तत्त्वज्ञानांमध्ये सिद्धांत किंवा त्यांचे खंडन-मंडन यापेक्षा स्वतःपासून आचरण महत्त्वाचे मानले जाते.

उपरोक्त संदर्भात प्रख्यात बौद्ध विद्वान नागार्जुन यांच्या संदर्भातील एक कथा पाहणे आवश्यक आहे. आपल्या भ्रमणात नागार्जुन एकदा एका गावाबाहेरील पडक्या बांधकामात थांबले होते. त्या गावाची जमीनदार असलेल्या स्त्रीने त्यांना भोजनास आमंत्रित केले. भिक्षा मागण्याचे एक पात्र एवढीच ऐहिक संपत्ती असलेले नागार्जुन तेथे पोहोचले, तेव्हा त्या जमीनदार स्त्रीला मोठे आश्चर्य वाटले. एवढा मोठा विद्वान आणि असले फडतूस भिक्षापात्र घेऊन फिरत आहे. निरोप देताना तिने नागार्जुनांना सोन्याचे एक रत्नजडित भिक्षापात्र भेट दिले. सर्वसंगपरित्याग केलेल्या नागार्जुन यांनी त्या मौल्यवान पात्राचा स्वीकार केला. कारण त्यांच्यासाठी ते केवळ एक पात्र होते. त्याच्यामुळे आपला धर्म भ्रष्ट होण्याची भीतीदेखील त्यांना वाटली नाही. त्यांनी त्या स्त्रीला एवढेच सांगितले, “माझे मूळचे भिक्षापात्र जपून ठेवा, कारण मला लवकरच त्याची गरज पडेल.” तेथून ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघाले. ह्या संन्याशाकडे एवढे मौल्यवान पात्र आहे हे एका चोराने पाहिले. चोराने ते चोरण्याचा विचार पक्का केला. तो त्यांच्या मागे जाऊ लागला. नागार्जुनांना त्याची जाणीव होती. ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. चोर त्यांच्या मागे जाऊन तेथील झाडा-झुडपांमध्ये लपून बसला. नागार्जुनांनी विचार केला की याला खूप काळ तिष्ठत ठेवण्यात अर्थ नाही. आपल्यालाही वामकुक्षी घ्यायची आहे. त्यांनी ते मौल्यवान पात्र खिडकीतून बाहेर फेकून दिले. चोराला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात ह्या संन्याशाची भेट घेण्याची इच्छा प्रबळ झाली. तो हळूच पडक्या इमारतीत आला आणि त्याने आत येण्याची अनुमती घेतली. तेव्हा नागार्जुन म्हणाले, “तू आत येणार होतास; परंतु मी पात्र फेकले नसते तर शुद्धीमध्ये आत आला नसतास. बेशुद्धीत येऊन चोरी करून गेला असतास.” चोराला आपल्या कर्माचा तिटकारा आला होता. त्याने चोऱ्या सोडण्यासाठी काय उपाय करावा यासाठी नागार्जुनांकडे उपदेश मागितला. त्यावेळी नागार्जुन फक्त एवढे म्हणाले, “आयुष्यात काहीही कर मात्र संपूर्ण शुद्धीत अथवा जागृत अवस्थेत कर.” दोन दिवसांनंतर चोर त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, “महाराज! आपण मला कोणता मंत्र दिला. त्यामुळे माझी अवस्था वाईट झाली आहे. मी एका घरात चोरी करायला गेलो. तेथील तिजोरी उघडली. माझ्यासमोर धनसंपत्ती होती. त्याचवेळी मला आपले शब्द आठवले. मी त्यापैकी काहीच न घेता परतलो.” यावर नागार्जुन म्हणाले, “याचा अर्थ चोरी करताना तू शुद्धीवर आलास किंवा आपल्या कर्माच्या योग्य-अयोग्यतेबद्दल जागरूक झालास.” एका अर्थाने नागार्जुनांनी त्या चोराला चित्तशुद्धीचे प्रात्यक्षिकच करायला सांगितले होते. आस्तिकता ही संकल्पना यापेक्षा वेगळी असू शकत नाही. असे असताना वेद-उपनिषद ही आस्तिक दर्शने आणि बौद्ध-जैन ही नास्तिक दर्शने असा भेद करणे अयोग्य वाटते.

भारताच्या मातीत निर्माण झालेली सर्व धर्मदर्शने ही एका अर्थाने आस्तिकच म्हणावी लागतील. मानवी मनात व आचरणात शुद्धता हा त्यांचा पाया होता. त्यापैकी काहींनी अंतिम सत्यापासून सुरुवात करून व्यक्तिगत आचरणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर काहींनी व्यक्तिगत आचरणापासून सुरुवात करून अंतिम सत्यापर्यंत पोहोण्याचा प्रयत्न केला. मध्ययुगीन भक्ती आंदोलनात संतांनी व्यक्तिगत आचरणापासून प्रारंभ करत अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याला महत्त्व दिले. त्याचबरोबर वेद-उपनिषदे-गीता, बौद्ध, जैन, सूफी इत्यादी सर्व प्रवाहांचा संगम या भक्ती आंदोलनांमध्ये झालेला दिसून येतो. मध्ययुगीन भक्ती आंदोलनांच्या अशा सर्वव्यापकतेमुळे संतांचा संदेश समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकला.

0
0
error: Content is protected !!