लग्नाआधी जुळवा आरोग्यकुंडली

लेखक : डॉ. अविनाश भोंडवे

विवाह हे आयुष्यातील महत्त्वाचे वळण असते. वैवाहिक जीवनातील स्थैर्य हे दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाचे ठरते. नवदाम्पत्याच्या आनंदासाठी आणि पुढील आयुष्यात येऊ शकणाऱ्या समस्या टाळण्यासाठी काही आजारांसंबधित तपासण्यांची ‘आरोग्यकुंडली’ जुळवणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक ठरावे.

भारतीय समाजात कुंडलीचे महत्त्व पूर्वापार आहे. रास, काळ, जन्मस्थान आदींच्या आधारे एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली मांडली जाते. लग्नानंतर वधू-वर एकमेकांसोबत आनंदी जीवन जगतील का? एकाच्या कुंडलीतल्या ग्रहाचा दुसऱ्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? त्यांना संतती होईल का? त्यांचे एकत्रित आयुष्य कसे जाईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या हेतूने परंपरेनुसार उपवर मुलीची आणि मुलाची कुंडली पाहिली जाते. दोघांच्या कुंडलीतील काही मुद्द्यांवर वधू-वरांचे गुण जुळवले जातात आणि त्यावर विवाह करणे योग्य की नाही असे ठरवले जाते.

आजच्या संगणकीय युगात पत्रिका, कुंडली अशा मध्ययुगीन कल्पना बऱ्याच तरुण मुलामुलींना भावत नाहीत; अनेकांसाठी तो चर्चेचाही विषय ठरतो. मात्र विवाहोत्तर भविष्याबाबत वैद्यकीय दृष्टीने भावी पती-पत्नीच्या शारीरिक आणि इतर तपासण्या करून त्या दोघांच्या आरोग्यकुंडली जुळवणे हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरेल.

आरोग्यकुंडलीचा उद्देश
आरोग्यकुंडली म्हणजे उपवर मुलामुलींच्या विवाहपूर्व शारीरिक तपासणीतून आणि त्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासातून त्या दोघांच्या लग्नानंतर त्यांच्या आरोग्याबाबत आणि त्यांना होणाऱ्या संततीबाबत काही चांगले-वाईट संकेत मिळतात का? हे पाहणे.

आरोग्यकुंडलीत पाच महत्त्वाच्या गोष्टी पाहणे जरुरीचे असते आणि त्यानुसार त्यांच्या तपासण्या करून घेणे अगत्याचे ठरते. या गोष्टी म्हणजे –

  • लग्नाची गाठ बांधणाऱ्या दोघांच्याही भावी आयुष्यावर आणि आयुर्मानावर काही परिणाम होतील असे काही आजार दोघांमध्ये आहेत का?
  • दोघांपैकी एकाला काही संसर्गजन्य आजार आहे का, जो संसर्गाने दुसऱ्याला होऊ शकेल?
  • असे काही आजार आहेत का, की ज्यांमुळे त्यांना संतती होणे जिकिरीचे होईल किंवा झालेल्या संततीमध्ये काही गंभीर आजार उद्‌भवतील?
  • वधू-वरांपैकी एखाद्याच्या कुटुंबात काही मानसिक आजारांचा इतिहास आहे का?
  • वधू-वरांचे एकमेकांशी काही जवळचे नाते आहे का?

यानुसार आरोग्यकुंडलीमध्ये खालील तपासण्या जरुरीच्या वाटतात- दोघांमधील आजार…

  • सिकल सेल अॅनिमियाः निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. पण सिकल सेल विळ्याच्या आकाराच्या असतात. त्यातल्या ‘हिमोग्लोबिन’ला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ म्हणतात. अशा हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते व त्या लवकर फुटतात, त्यामुळे रक्त कमी होऊन ‘सिकल सेल अॅनिमिया’ होतो. पूर्णतः आनुवंशिक असलेला हा आजार, कोणत्याही सूक्ष्म जंतू किंवा विषाणूंमुळे अथवा पोषक आहाराच्या अभावामुळे होत नाही. भारतात या आजाराचे सुमारे दहा लाखांहून अधिक, तर महाराष्ट्रात सुमारे अडीच लाख रुग्ण आहेत. जनुकीय दोषामुळे हा आजार होतो. आई-वडिलांकडून तो अपत्यांमध्ये येतो. यात ‘सिकल सेल वाहक’ (कॅरिअर) आणि ‘सिकल सेल पीडित’ (सफरर) असे दोन प्रकार असतात. वाहक व्यक्तीत आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.

व्यक्ती वाहक आहे की पीडित, हे ओळखण्यासाठी रक्ताची ‘इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट’ करतात. सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये सिकल सेल रक्तदोष तपासणी सुविधा उपलब्ध असते. सिकल सेल गुणधर्म असलेल्या (वाहक किंवा पीडित) व्यक्तीने सिकल सेल गुणधर्म असलेल्या (वाहक किंवा पीडित) व्यक्तीशी विवाह केल्यास त्यांच्या होणाऱ्या अपत्यातही सिकल सेल गुणधर्म आढळू शकतो. त्यामुळे सिकल सेलच्या स्त्री-पुरुषांचा विवाह करण्याचे टाळावे.

  • थॅलसेमिया ः थॅलसेमिया या आनुवंशिक आजारात हिमोग्लोबिनची निर्मिती होण्याचे प्रमाण कमी होते किंवा ती अजिबातच होत नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नाही. या विकाराचे थॅलसेमिया मायनर आणि थॅलसेमिया मेजर हे दोन मुख्य प्रकार आहेत. थॅलसेमिया मायनर सौम्य असतो. लोहाची कमतरता असलेल्या अॅनिमिया आजाराशी त्याची गल्लत होते. थॅलसेमिया मायनर असलेल्या मुलांमधील रक्ताचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असूनही त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण आजार आयुष्यभर राहतो.

जर विवाह करू इच्छिणारा मुलगा आणि मुलगी दोघांनाही थॅलसेमिया असेल तर त्यांच्या मुलांमध्ये चारापैकी एकाला थॅलसेमिया मेजर होण्याची शक्यता असते. थॅलसेमिया मायनरसाठी उपचारांची आवश्यकता नसते, हिमोग्लोबिन कमी असूनही रुग्णांचे आरोग्य आयुष्यभर ठीक राहते.

थोडक्यात, थॅलसेमिया मायनर असलेल्या मुलाचे लग्न तो आजार असलेल्या मुलीशी (किंवा उलट) करू नये. थॅलसेमिया मेजर असलेल्या व्यक्तीचे लग्न फक्त थॅलसेमिया मेजर असलेल्याच व्यक्तीशी करावे. एचपीएलसीसारख्या साध्या रक्तचाचणीतून या आजाराचे निदान होऊ शकते.

आनुवंशिक आजारांच्या जनुकीय चाचण्या ः लग्न करण्यापूर्वी मुलामुलीला एकमेकांचा जनुकीय इतिहास माहिती असणे आवश्यक असते. आनुवंशिक रोग तपासण्यासाठी केलेल्या चाचण्यांमुळे उभयतांना नंतर उद्‌भवणाऱ्या जनुकीय समस्यांची कल्पना येऊ शकते.

भावी आयुष्यात आजार होऊन तो वाढण्याआधी वैद्यकीय उपचार घेता येतात. याव्यतिरिक्त मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल समस्या, कोरोनरी स्थिती, मूत्रपिंडाची स्थिती असे कुटुंबामध्ये प्रचलित राहणाऱ्या आजारांच्या तपासण्या व्हाव्यात. संततीमधील आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी त्यांना कोणत्या आनुवंशिक परिस्थितीचा त्रास होऊ शकेल हे भावी वधू-वरांना माहीत असल्यास प्रतिबंधात्मक उपाय करणे सोपे जाते.

  • ल्युकोडर्मा किंवा श्वेतकोड ः हा आजार कुटुंबात कोणाला असेल तर त्या कुटुंबाशी लग्नाचे नाते जुळवणे टाळले जाते. श्वेतकोडाचे काही प्रकार आनुवंशिक असतात, पण मानसिक ताणतणाव, अतिविचार करण्याची सवय, त्वचेला झालेल्या काही जखमा, सनबर्न, भाजल्यानंतर निर्माण होणारे व्रण, पोटाचे दीर्घकालीन आजार, कावीळ अशा त्रासात त्वचेवर सफेद डाग पडू शकतात, पण ते कोड नसते. सबब अशा प्रसंगात ऐकीव माहिती किंवा चुकीची कल्पना करून घेण्याऐवजी मोकळेपणाने सफेद डागांबाबत विचारून घ्यावे.
  • रक्तगटाची भ्रामक समस्या ः काही पालक लग्नाआधी मुलींचा रक्तगट तपासण्याचा आग्रह धरतात. “कुंडली पाहण्यावर आमचा विश्वास नाही, पण रक्तगट मात्र तपासलाच पाहिजे,” असा त्यांचा खाक्या असतो. मुलामुलीचा रक्तगट एकाच असल्यास मुलीला नकार दिला जातो. पण हे संपूर्णपणे चुकीचे आहे. मुलामुलींमध्ये कोणताही रक्तगट असला तरी लग्न व्हायला हरकत नसते. मात्र मुलाचा रक्तगट ए/ बी/ ओ/ एबी यापैकी एक, पण आरएच रक्तगट पॉझिटिव्ह असेल आणि मुलीचा रक्तगट ए/ बी/ ओ/ एबी एक, पण आरएच रक्तगट निगेटिव्ह असेल, तर त्याच्या पहिल्या संततीला जन्मजात कावीळ होण्याची शक्यता असते. परंतु, अशा प्रसंगी मुलीला प्रत्येक वेळेस गर्भधारणा झाल्यावर ‘अँटि-डी’ इंजेक्शन दिल्यास हा त्रास टळू शकतो.
  • संसर्गजन्य आजार : एचआयव्ही एड्स, हिपॅटायटिस ‘बी’ आणि ‘सी’, सिफिलीस, गोनोरिया, क्लॅमिडिया, जनायटल हर्पीस, मायकोप्लाझ्मा जनायटालियम, ट्रायकोमोनासिस, एचपीव्ही,शँकरॉईड, लिम्फोग्रॅन्यूला व्हेनेरियम, मूत्रमार्गाचे काही संसर्गजन्य आजार शरीरसंबंधातून पसरू शकतात. यातले एचआयव्ही एड्स, हिपॅटायटिस ‘बी’ आणि ‘सी’ हे आजार हे कधीही पूर्ण बरे होत नाहीत, एचपीव्ही संसर्गातून गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो, इतर आजार हे लैंगिक संबंधातून पसरतात (सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस). त्यातले बरेच उपचारांनी बरे होतात, पण जननक्षमतेवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. या सर्व आजारांचे निदान प्रयोगशाळेतील तपासण्यांत किंवा डॉक्टरांनी केलेल्या शारीरिक तपासणीत होऊ शकते. साहजिकच या आजारांच्या चाचण्या आणि शारीरिक तपासण्या आजच्या पिढीतल्या मुलामुलींना आवश्यक आहेत. या तपासण्यात, एचआयव्ही I आणि II टेस्ट, व्हीडीआरएल टेस्ट, रॅपिड प्लाझ्मा रीअॅजीन टेस्ट, पीसीआर टेस्ट्स, हिपॅटायटिस ‘बी’ आणि ‘सी’साठी अँटिबॉडीज टेस्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांकडून शारीरिक चाचणी करणे योग्य ठरते.

संततीमध्ये होणारे आजार
सिस्टीक फायब्रोसिस, टाय-सॅश डिसीज, हिमोफिलिया (रक्त न गोठण्याचा आजार), हटिंगटन्स डिसीज, ड्युशेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी असे आजार जनुकीय कारणांमुळे कुटुंबात आई-वडिलांना असल्यास मुलांना होऊ शकतात. त्यासाठी असे आजार ज्या कुटुंबात आहेत अशांची जनुकीय तपासणी करणे इष्ट ठरते. आईवडिलांना असलेला प्रत्येक जनुकीय आजार सर्व मुलांना होतोच असे नाही, पण तरीही शक्यता असल्याने जनुकीय तपासणीत काही आजारांची शक्यता कळली, तर तशी मनाची तयारी ठेवता येते.

मधुमेह टाइप-१, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार, कोलेस्टेरॉल जास्त असणे, स्थूलत्व असे लाइफ स्टाइल आणि अन्य आजार आई-वडिलांकडून मुलांमध्ये ‘वारसा हक्का’ने पसरू शकतात. त्यामुळे अशा आजारांसाठीच्या तपासण्या करून घ्याव्यात. अशा आजारात लग्न टाळण्याची गरज नसते, पण या दोघांनी स्वतःसोबत पुढे होणाऱ्या मुलांनाही नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेण्याची सवय लावून वजन प्रमाणात राखले, तर त्यांना मधुमेह होण्याची शक्यता दुरावते. मुलांना मधुमेह झालाच तर वयाच्या साठी-सत्तरीत म्हणजे उशिरा होईल आणि त्यात कोणतीही गुंतागुंत कमी असेल. हीच शिस्त उच्च रक्तदाब, हृदयविकार असल्यासही पाळावी लागते.

लग्नाच्या आधी मुलामुलींनी लैंगिकदृष्ट्या शारीरिक तपासणी आपली आपणच करून घ्यावी. अनेकदा लैंगिक अवयवांमध्ये काही जन्मजात दोष असतात. मुलांमधील फायमोसिससारखे काही आजार पुढे बरेही करता येतात, परंतु अंडाशयामध्ये वृषणांचे अस्तित्व (अनडीसेन्डेड टेस्टीस) नसल्यास लग्नानंतर संतती होणे दुरापास्त असते. मुलांच्या वीर्यात शुक्राणूंचे अस्तित्व नसणे किंवा कमी असणे, मुलींबाबत मासिक पाळीच्या समस्या, गर्भाशयाचे किंवा इतर अवयवांचे आजार याकडे लक्ष द्यावे लागते. डॉक्टरांकडील साध्या तपासण्या, सोनोग्राफी, रक्त-लघवीच्या तपासण्या, वीर्य तपासणी अशा तपासण्यांमधून या गोष्टी कळू शकतात. लग्नाआधी मुलाने मुलीला किंवा मुलीने मुलाला अशा तपासण्या करायला सांगणे आपल्या सामाजिक रीतिरिवाजात बसणे अनेकदा कठीण असते, त्यामुळे मुला-मुलींनी अशा तपासण्या पालकांच्या संमतीने करून घ्याव्यात.

जवळचे नाते
वधू-वरांमध्ये काही जवळचे नाते असल्यास त्याला ‘कनसँग्विनस मॅरेज’ म्हणतात. अशा लग्नानंतर संततीमध्ये जनुकीय दोष निर्माण होण्याची दाट शक्यता असते. आपल्याकडची मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा यादृष्टीने तशी जोखमीची असू शकते. जगातील काही समाजात अगदी कौटुंबिक नात्यात लग्नेे होतात, अशांमध्ये थॅलसेमिया, सिस्टिक फायब्रोसिस, डाऊन्स सिंड्रोम, इन्फन्टाइल सेरेब्रल पाल्सी, डोळ्यांचे आणि कानाचे काही जनुकीय आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

मानसिक आरोग्य
मानसिक आजारांचे प्रमाण आजच्या युवक-युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे. त्यातील चिंता किंवा ताणतणावामुळे होणारे त्रास विशेष नसतात. पण विविध प्रकारचे नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, वर्तनदोष, स्किझोफ्रेनिया, मद्याचे अतिरेकी व्यसन, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, डिसोशियेटिव्ह आयडेन्टिटी डिसऑर्डर, मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर अशा अनेक मनोविकृती एकाला असल्या तरी त्यांना संसार करणे जड जाऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्षात आणणे थोडे अवघड असले, तरी आपली मानसिक आरोग्याची तपासणी मुलामुलींनी आपणच करून घ्यावी.

विवाह हे आयुष्यातील महत्त्वाचे वळण असते. त्यातील स्थैर्य हे दोघांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. नवदाम्पत्याच्या आनंदासाठी आणि पुढील आयुष्यात येऊ शकणाऱ्या समस्या टाळण्यासाठी या लेखात चर्चा केलेल्या आजारांसंबधित तपासण्यांची आरोग्यकुंडली जुळवणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक ठरावे.

1
0
error: Content is protected !!