लेखक : केतकी जोशी
विवाह समारंभांतील संगीताच्या कार्यक्रमामध्ये फॅमिली डान्ससाठीची गाणी बऱ्याचदा ठरावीक असतात. ‘डान्स इज अ लँग्वेज ऑफ हॅपिनेस’ असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. दोन कुटुंबं जोडली जातात, त्यावेळेसचा हा आनंद एकमेकांबरोबर शेअर करणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही.
‘लो चली मैं..अपने देवर की बारात लेके…’, असं म्हणत होणाऱ्या नवऱ्याची वहिनी नाचतीय, ‘नवराई माझी नवसाची’वर मावशा-माम्या नाचतायेत, ‘दिलबरो…’ म्हणत डोळ्यांतून आलेलं पाणी लपवत मुलीचे बाबा स्टेजवर हजेरी लावतात… करवल्यांचा धमाकेदार आयटम नंबर आणि शेवटी नवरा नवरीची लव्ह स्टोरी किंवा त्यांचं प्रेमात पडणं सांगणारा धमाकेदार परफॉर्मन्स… आणि हे सगळं कौतुकानं बघणारे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी. एरवी एखाद्या हिंदी चित्रपटात दिसणारं हे दृश्यं आता बहुतेक लग्नांमध्ये दिसू लागलंय. कधीकाळी गुजराती, मारवाडी, पंजाबी लग्नांमध्ये असलेलं ‘संगीत’ आता मराठी लग्नांमध्येही अलगदपणे स्थिरावलं आहे. परदेशांमधल्या लग्नांमध्येही संगीतची ही प्रथा तशी गेल्या काही वर्षांपासून आहे. पण आता मात्र अगदी मुंबई-पुण्यापासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शहरी-निमशहरी भागांपर्यंत संगीत हा लग्नाचा एक अनिवार्य भाग झालेला आहे.
हल्ली लग्नाच्या विधींबरोबरच संगीतासाठीही खास एक संध्याकाळ किंवा बरेचदा आदल्या दिवशीची रात्र राखून ठेवली जाते. आणि ह्या कार्यक्रमालाही शिस्त असते बरं! लग्नघरातल्यांना वाटेल त्या गाण्यावर या ‘संगीत’मध्ये डान्स केलेला चालत नाही! त्यासाठी व्यवस्थित ट्रेनिंग घ्यावं लागतं… हे प्रशिक्षण देणारे कोरिओग्राफरही असतात. हे कोरिओग्राफर अगदी मस्तपैकी तुम्हाला हवा तसा तुमचा कार्यक्रम बसवून देतात. अर्थात संगीतमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी गाणी निवडून त्यावर त्यांना जमतील तशा स्टेप्स शिकवणं हे काही सोपं काम नाही. त्यात करवल्या किंवा मित्र मैत्रिणींचा उत्साह, लहान मुलांची एनर्जी हे जरा तरी सोपं जातं. पण कधीही न नाचलेले बाबा किंवा आज्यांना नाच करायला लावणं हे कितीतरी अवघड काम आहे. आपल्या मुलाच्या-मुलीच्या, भाचीच्या, पुतणीच्या लग्नात नाचणारी ही मंडळी बहुतेक वेळा नर्तकांच्या ‘हौशी’ या कॅटेगरीतही मोडत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कलानं घेणं महत्त्वाचं असतं. मात्र कोरिओग्राफर हे काम अगदी व्यावसायिकपणे तरीही त्या सगळ्यांना प्रेमाने चुचकारून करून घेतात. एरवी डान्स शिकवणाऱ्या किंवा डान्सची आवड असणाऱ्या अनेक कोरिओग्राफरसाठी या संगीतमुळे खरंतर करिअरचा एक नवा मार्गही खुला झाला आहे.
लग्नातल्या संगीतसाठी कोरिओग्राफी करणारी किंजल पारेख गेल्या पंधरा वर्षांपासून डान्स क्षेत्रात आहे. “गुजराती-मारवाडी लग्नांमध्ये खूप आधीपासूनच संगीत हा एक वेगळा विधीच आहे. पण सोशल मीडिया, विशेषतः इन्स्टाग्रामवरचे रील्स किंवा छोटे व्हिडिओ पॉप्युलर होऊ लागले. यामध्ये डान्सचे व्हिडिओ सगळ्यांत जास्त आकर्षक आणि लोकप्रिय, पटकन मनाचा ठाव घेणारे असतात, असं लक्षात आलं. हा व्हिडिओ म्हणजे जणू काही आपल्यावरच चित्रित झालेलं गाणं आहे असा फील सर्वसामान्यांना येतो,” असं किंजल सांगते.
किंजलच्या मते संगीतमधले डान्स आधी बसवलेले असले तरी ते नैसर्गिक असतात हे महत्त्वाचं. तिच्या म्हणण्यानुसार, आता ज्या मुलांची लग्न होत आहेत ते मोठे होत असताना ‘डीडीएलजे’, ‘कुछ कुछ होता हैं’, ‘हम साथ साथ हैं’ वगैरे पडद्यावरचा रोमान्स होता. प्रत्येक मुलीच्या मनात हा रोमान्स ठसलेला असतो, त्यामुळे आजही संगीत कार्यक्रमातले बहुतेक डान्स हे जुन्या किंवा ९०च्या दशकातील किंवा साधारण २००० साली आलेल्या सिनेमांतील गाण्यांवरच बसवले जातात. संगीतच्या कार्यक्रमामध्ये फॅमिली डान्ससाठीची गाणी बऱ्याचदा ठरावीक असतात. ‘डान्स इज अ लँग्वेज ऑफ हॅपिनेस’ असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. दोन कुटुंबं जोडली जातात, त्यावेळेसचा हा आनंद एकमेकांबरोबर शेअर करणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही. लग्नसमारंभातल्या धार्मिक विधींमध्ये वधू-वर आणि त्यांचे आई-वडील वगळता बाकी सगळेजण एकाचवेळी सहभागी होऊ शकत नाहीत. पण संगीतच्या कार्यक्रमात अगदी लहानमोठे सगळेजण सहभागी होऊ शकतात, त्यामुळे हा कार्यक्रम सगळ्यांच्या आवडीचा असतो. तरुणाई तर लग्न एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असते, आणि पालकांना आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा असतो. त्यामुळे संगीतचा कार्यक्रम करण्याला आता ज्येष्ठांचाही विरोध नसतो.
या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च करण्याची क्षमता आणि बदललेली मानसिकता! पूर्वी फक्त ज्यांना नाचता येतं अशांनाच डान्स शिकवा असं म्हटलं जायचं. पण आता लग्नात इतका सगळा खर्च होतोय तर आणखी थोडासा खर्च करायला आणि आपणही सगळे एन्जॉय करायला काय हरकत आहे असा विचार केला जातो. त्यामुळे प्रोफेशनल कोरिओग्राफरला बोलावून नीट डान्स केला तर त्याचा परिणाम वेगळाच होतो आणि त्याचा माहोलही वेगळा बनतो, असा अनुभव आहे. या सगळ्याचे व्हिडिओ जेव्हा तयार होतात तेव्हा ते अगदी वेगळेच असतात, जे अर्थातच सगळ्यांना आवडतात.
लग्न समारंभांच्या निमित्ताने उत्साहाने डान्स करणाऱ्यांना ऑकवर्ड वाटायला नको ही कोरिओग्राफरवरची सगळ्यांत मोठी जबाबदारी असते, असं किंजलला वाटतं. सगळ्यांत पहिलं काम असतं ते लग्नाच्या संगीतमध्ये नाचणाऱ्या आया, मावशा, काकवा यांना कम्फर्टेबल करणं, त्यांना विश्वास देणं. त्यामुळे त्यानुसार डान्सच्या स्टेप्स बसवाव्या लागतात. ज्येष्ठांनाही सूट होणाऱ्या किंवा सोप्या पण तरीही डान्सचा ताल बिघडू न देणाऱ्या अशा स्टेप्स देण्याचा प्रयत्न असतो. त्यांना तो डान्स करताना आनंद वाटला पाहिजे, त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे हाच कोरिओग्राफरचा मूळ उद्देश असतो. त्यावेळच्या भावना नृत्यातून व्यक्त करणं हे महत्त्वाचं असतं. या प्रत्येक वेळेस डान्स करणाऱ्या व्यक्तीबरोबर कोरिओग्राफरही मनानं त्यात गुंततो असं किंजलला वाटतं. अनेक वेळेस काही स्टेप्स बदलाव्या लागतात, लग्नाच्या मूडला साजेशी गाणी निवडून ॲडजस्ट करावी लागतात. हे सगळं मेहनतीचं असलं तरी तितकंच आनंददायी काम असतं, असं तिचं म्हणणं आहे.
कोरिओग्राफरला फक्त गाणी आणि डान्सचाच नाही तर इतरही अनेक विचार करावे लागतात. स्टेज कसं असेल, स्टेजचं डेकोरेशन कसं असेल, सिक्वेन्स कसा असेल अशा अनेक गोष्टी असतात. त्याचबरोबर कपड्यांचाही विचार करावा लागतो. लग्नातला हा संगीताचा कार्यक्रम प्रत्येकाला जोडणारा असतो. आपल्या आईबाबांना असं नाचाबिचात भाग घेताना मुलांनी पाहिलेलं नसतं, सतत घाईत असणाऱ्या भावाचा बहिणीच्या लग्नातला सरप्राईजिंग परफॉमन्स बहिणीच्या डोळ्यांत पाणी उभं करतो. ही सरप्राईज नक्कीच आयुष्यभर लक्षात राहणारी असतात. पूर्वी लग्नाच्या आधी किमान दोन तीन दिवस सगळेजण एकत्र यायचे. पण त्या दोन दिवसांत कदाचित प्रॅक्टिस व्हायची नाही. कोरोनानंतर मात्र सगळं काही बदललं. लग्नासाठी येणाऱ्या आणि संगीतच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सगळ्यांची ऑनलाइन प्रॅक्टिस आता एकाचवेळी घेतली जाऊ शकते. अर्थातच यामुळे जरा वेळ मिळतो. पूर्वी फक्त टिपिकल पंजाबी आणि पेपी गाणी असायची, पण मराठी लग्नातलं संगीत ‘झिंगाट’वरच्या डान्सशिवाय पूर्ण होतच नाही. कोरोनानंतर ओटीटीमुळे साऊथ इंडियन गाणीही आता लोकप्रिय आहेत, असं किंजल सांगते.
कोविडनंतर आपल्या सगळ्यांच्या जीवन जगण्याच्या शैलीत फरक पडला आहे. जो क्षण आलाय तो आनंदाने जगून घ्या अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. पूर्वीसारखं लग्नसोहळ्यांमध्ये आठ दिवस एकत्र येणं होत नाही. पण जितका वेळ आहे त्यात सगळ्यांनी मिळून मजा करणं आणि तो सोहळा आनंददायी करणं असंच सगळ्यांना वाटतं. त्यामुळेच संगीत हा आता प्रत्येक लग्नातला एक आनंददायी सोहळा बनला आहे.
Too good