डाॅ. सदानंद मोरे
संपूर्ण जग पहिल्या महायुद्धाच्या सावटातून बाहेर पडण्याच्या धडपडीच्या व महामंदीच्या पेचप्रसंगात असताना आणि बहुतेक विचारवंत वर्तमानाचाच विचार करण्यात मग्न असताना जॉन केन्स नातवंडांचा विचार करतो हे विशेष.
आधुनिक काळात झपाट्याने विकसित झालेल्या अर्थशास्त्र (Economics) या ज्ञानशाखेतील अत्यंत प्रभावशाली अर्थशास्त्रज्ञांची नावे सांगायची झाल्यास अॅडम स्मिथ व कार्ल मार्क्स यांच्या बरोबरीने तिसरे नाव घ्यावे लागते ते जॉन मेनार्ड केन्सचेच. १९३० ते १९७० हा कालखंड केन्सच्या प्रभावाचा कालखंड मानला जातो. या कालखंडात जगातील अनेक राष्ट्रांनी किनीशियन विचारांना अनुसरत आपापली आर्थिक धोरणे ठरवली व राबवली असे म्हणता येते. तपशिलात न जाता या ठिकाणी एवढे सांगणे पुरेसे होईल की या धोरणांत देशाच्या सरकारला आर्थिक व्यवहारांवर केवळ नियंत्रण ठेवण्यासच वाव होता असे नव्हे तर या खेळातील एक खेळाडू म्हणून भागही घेता येत होता. मात्र हे नियंत्रण वा हस्तक्षेप किंवा सहभाग कम्युनिस्ट राष्ट्रांच्याप्रमाणे सर्वंकष नव्हता. त्यामुळे या व्यवस्थेला भांडवलशाहीचाच एक प्रकार समजून १९५१-१९७३ या कालखंडास भांडवलशाहीचे सुवर्णयुग मानले जाते.
केन्सला अनुसरल्यामुळे जगातील अनेक राष्ट्रांना या काळात सोव्हिएत रशियाप्रणित कम्युनिस्ट पद्धतीपासून स्वतःला दूर ठेवता आले. या दृष्टिकोनातून पाहिले तर केन्सला भांडवलशाहीचा त्राता किंवा तारणहार म्हणावे लागते. ज्या प्रकारची अरिष्टे भांडवलशाहीचा अंगभूत भाग आहेत व ज्यांनी वारंवार पोखरल्यामुळेच भांडवलशाहीचा नाश अटळ आहे, अशी मार्क्सवादी विचारवंतांची अटकळ होती; त्यांना कसे टाळता येईल, त्यांच्यावर कशी मात करता येईल, निदान कसे लांबणीवर टाकता येईल याच्या क्लृप्त्या तेव्हा केन्सकडूनच प्राप्त झाल्या होत्या. या बाजूने पाहिले तर केन्स भांडवलशाहीचा पुरस्कर्ता वाटतो. पण सरकारी सहभाग व नियंत्रण हे घटक विचारात घेतले तर तो शत्रूच वाटावा. खरे तर पेलेरिन परिषदेतील बहुतेकांचा कल त्याला शत्रू मानण्याकडेच होता, हे आपण पाहिले आहे. केन्सने सुचवलेल्या उपायांमुळे म्हणजेच त्या हस्तक्षेपवादी अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक अरिष्टांवर मात केल्यासारखे वाटेल पण ते तेवढ्यापुरतेच. तो काही खरा उपाय नाही. इतकेच नव्हे तर रोग बरा करण्याच्या एखाद्या औषधाचे दुष्परिणाम अधिक तीव्र असावेत तसे पुढील अरिष्ट अधिक धोकादायक ठरेल, असे हाइकसारखे पेलेरिन विचारवंत वारंवार सांगत असत. थोडक्यात केन्सला एक कोडेच म्हणावे लागते.
ते काहीही असो, कोणत्या का कारणामुळे होईना, एकोणीसशे सत्तरच्या दशकात केन्सप्रणीत म्हणजेच ब्रेट्टन वूड्स परिषदेत निष्पन्न झालेल्या आर्थिक धोरणाची सद्दी संपली. सरकार आणि बाजार यांच्यातील स्पर्धेत बाजार वरचढ ठरू लागला. आर्थिक व्यवहार हे नैतिकतेला धरून न करता गणिती मॉडेलबरहुकूम करायची प्रवृत्ती वाढली. व्यक्तींच्या संदर्भात सांगायचे झाल्यास केन्सची जागा मिल्टन फ्रीडमनने घेतली. या प्रक्रियेचे अंतिम पर्यवसान म्हणजेच जागतिकीकरण, उदारीकरण व मुक्त अर्थव्यवस्था. पण म्हणजे केन्सने जी व्यवस्था अंताकडे चालली आहे, असे भाकीत केले; तिचे पुनरुज्जीवन झाले असे म्हणायचे की काय? अर्थात या व्यवस्थेचे प्रचलित नाव ‘लेसे फेअर’ नसून तिला ‘निओलिबरल’ म्हणून ओळखले जाते. त्याचा संबंध वॉशिंग्टन कन्सेन्ससशीही लावला जातो.
ही अर्थव्यवस्था व तिचे जणू जुळे भावंडं मानता येईल, अशी उदारमतवादी लोकशाही नावाची राज्यव्यवस्था आणि बरोबरीने अर्थातच पाश्चात्य व्यक्तिवादी समाजव्यवस्था यांनी मिळून सिद्ध झालेल्या महाव्यवस्थेचा विजयोत्सव सुरू असतानाच, तिच्यात सर्व काही आलबेल नाही याचे प्रत्यय येऊ लागले आणि यापूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे २००८-०९च्या दरम्यान आलेल्या अरिष्टाने नव्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्हच टाकायची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी स्वतः इंग्लंडच्या महाराणीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंग्लंडमधील रॉयल सोसायटीचे विद्वान पुढे सरसावले व त्यांनी काही एक निदान चिकित्सा केले. त्याचीही चर्चा आपण केली आहे.
हा मोका साधून केन्सचा विचार कालबाह्य झाला नसून तोच पुढे नेण्याची गरज आहे असे प्रतिपादन करणारे रॉबर्ट स्कायडेल्स्कीचे (Robert Skidelsky) ‘केन्सः द रिटर्न ऑफ द मास्टर’ (Keynes : The Return of the Master) हे पुस्तक बाजारात आले.
याचा अर्थ असा होतो की ‘विश्वाचे आर्त’मध्ये केन्सविषयीची चर्चा आणखी पुढे न्यावी लागेल.
खरे तर नवउदारमतवादी व्यवस्था जोमात येत असतानाच स्कायडेल्स्कीने केन्सचे चरित्र लिहिण्याचे धाडस केले होते. २००९ साली तर या व्यवस्थेला हादरे बसू लागले होते. त्यामुळे ही संधी न साधणे हीच एक चूक ठरली असती. ती त्याने केली नाही.
स्कायडेल्स्की आणि इतर काही अभ्यासक यांनी एक महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधले आहे. १९५१ ते १९7३ या सुवर्णयुगात भांडवलशाहीने केन्सच्या विचारांचा आधार घेत आर्थिक धोरण राबवले हे खरे असले तरी त्यांचा तिने एक हत्यार, एक साधन म्हणून उपयोग केला. केन्सने केलेला भांडवलशाहीचा पुरस्कार हा निरपेक्ष (Absolute) नव्हताच. भांडवलशाहीकडे तो नैतिक दृष्टिकोनातून पाहत असल्यामुळे त्याच्यासाठी भांडवलशाही ही अंतिम आणि आदर्श व्यवस्था नव्हती. ते मानव समाजाच्या उत्क्रांतीचे उद्दिष्ट नव्हते. केन्स हा फुकीयामाचा साथीदार कधीच असू शकत नाही. त्याच्या लेखी भांडवलशाही ही एक साधनमात्र व्यवस्था आहे. खरे सांगायचे झाल्यास जागतिक कीर्ती लाभलेला हा अर्थशास्त्रज्ञ मुळात अर्थशास्त्रालाच स्वायत्त शास्त्र मानायला तयार नाही. अर्थशास्त्र हे दंतवैद्यकासारखे आहे. बस्स!
याचाच अर्थ असा होतो की केन्सचा विचार करताना तो केवळ अर्थशास्त्राच्या चौकटीत करून चालणार नाही. अर्थशास्त्राच्या बाहेर जाऊन तर्कशास्त्र, प्रमाणमीमांसा, तत्त्वज्ञान आणि विशेषतः नीतिशास्त्र इ. ज्ञानशाखांची योग्य ती दखल घेतच आपल्याला हा विचार करावा लागतो.
सुरुवात केन्सच्या काळाच्या व कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भात करावी लागते. त्याचा जन्म व्हिक्टोरिया राणीच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात झाला. त्याचे वडील नेव्हिल केन्स हे स्वतः अर्थशास्त्राचे अभ्यासक व लेखक होते. त्यांना गणितात विशेष गती होती. विशेष म्हणजे तेव्हाचा ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ आल्फ्रेड मार्शलचे ते आवडते शिष्य होते. ‘द स्कोप अॅण्ड मेथड ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ (The Scope and Method of Political Economy) हा त्यांचा ग्रंथ. आपला मुलगा संस्कारित ज्ञानवंत व्हावा यासाठी त्यांनी जॉनच्या लहानपणापासूनच जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ज्या ज्या पब्लिक स्कूलमध्ये तो शिकला व जेथील क्रीडांगणावर नेपोलियनबरोबरचे युद्ध इंग्लंडने जिंकले ते इटन असे म्हणण्याची पद्धत आहे. एवढ्यावरून इटनच्या शाळेचे महत्त्व अधोरेखित होते. उच्च शिक्षण अर्थातच केंब्रिज विद्यापीठात.
केन्सच्या बुद्धिमत्तेच्या आणि वावदूकपणाच्या वावड्या केंब्रिजमध्ये पसरल्या होत्या. तेथील प्रसिद्ध अशा ‘अॅपोस्टल्स’ (Apostles) चर्चासमूहात त्याला प्रवेश मिळाला. (मॉरल क्लब या समूहाशी निगडित होता.) रसेल, मूर, सिग्विक, लॉरेन्स, विट्गेन्स्टाईन अशा प्रसिद्ध व्यक्तित्वांनी हा समूह संपन्न व समृद्ध झालेला होता. (क्लबमध्येच नंतर पॉपर आणि विट्गेन्स्टाईन यांच्यात हिंसक म्हणावा असा वाद झाला होता.)
केंब्रिजमध्ये केन्सवर जर सर्वात अधिक प्रभाव कोणाचा पडला असेल तर तो विख्यात तत्त्वज्ञ जी. ई. मूरचा. केन्सची उपयुक्ततावादाच्या विरुद्ध जी भूमिका सिद्ध झाली ती मूरच्या प्रयत्नातूनच. व्यवहारबुद्धीचा (Commonsense) किंवा शहाणपणाचा समर्थक असलेला मूर साहजिक सामान्य (Ordinary) भाषेलाही महत्त्व देत असे. मिल, बेन्थम प्रभृती उपयुक्ततावाद्यांनी ‘Good’ (चांगुलपणा/ शिव) या नैतिक संकल्पनेचे विश्लेषण करीत तिचा सुखाशी संबंध लावला, हे चूक असल्याचे मूरने दाखवून दिले. त्याच्या म्हणण्यानुसार ‘Good’ ही एक सरळ कल्पना (Simple Idea) असून विश्लेषणाने तिचे घटक शोधता येणार नाहीत. ती कल्पना अविश्लेष्य आहे. मूरचा भर ‘चांगले जीवन’ (Good Life) या कल्पनेवर होता. तिला केन्सने आपल्या अर्थशास्त्रात सामावून घेतले.
अपोस्टल्सप्रमाणे आणखी एका समूहाचा येथे उल्लेख करायला हवा. तो म्हणजे प्रसिद्ध ‘ब्लूम्सबरी ग्रूप’ (Bloomsbury Group). केन्स केंब्रिज विद्यापीठातील किंग्ज् कॉलेजमध्ये असताना हा समूह निर्माण झाला. क्लाईव्ह बेल, रॉजर फ्राय, ई. एम. फॉस्टर, लिटन स्ट्रॅची, लिओनार्ड व व्हर्जिनिया वुल्फ असे नंतर प्रसिद्धीस आलेले विविध क्षेत्रांमधील बंडखोर मातब्बर या क्लबचे सदस्य होते. ही सर्व मंडळी परस्परांवर प्रभाव टाकीत असणार हे स्पष्ट आहे. विचार आणि वर्तन यांमध्ये रूढ मार्गाची चाकोरी सोडून वावरणारी ही मंडळी एकप्रकारे व्हिक्टोरियन मोरॅलिटीला आव्हान देत होती. तिच्या विरोधातील ही एक प्रतिक्रियाच होती, असे म्हणायला हरकत नाही. ही प्रतिक्रिया साहित्य, कला, सामाजिक शास्त्रे व व्यावहारिक वर्तन अशा सर्व क्षेत्रांमध्ये उमटलेली दिसते. जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची दृष्टी हे या समूहाचे वैशिष्ट्य होते. हेही परत केन्सने अंगीकारलेल्या मूरीयन भूमिकेशी सुसंगतच आहे. स्वतः केन्सनेच म्हटल्याप्रमाणे, “I myself was always an advocate of the principle of organic unity through time, which still seems to me only sensible (the state of affairs on a whole which could not usually be analysed into parts).” याच संदर्भात केन्स बेन्थमच्या उपयुक्ततावादी नीतिशास्त्रीय भूमिकेवर टीका करतो. ही परंपरा म्हणजे “the worm which has been gnawing at the insides of modern civilization and is responsible for its present moral decay.”
अशा प्रकारच्या संस्कारात विकसित झालेली व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास घेऊन वावरली तरी ती इतर ज्ञानाच्या इतर प्रांतांशी स्वतःला जोडून घेऊनच कार्य करणार हे उघड आहे. स्वतः केन्सने बाप अर्थशास्त्रज्ञाविषयी जे म्हटले आहे ते अशा प्रकारच्या विकासाच्या संदर्भातच समजून घेता येते. “The master economist must possess a rare combination of gifts. He must reach a high standard in several different directions and must combine talents not often found together. He must be mathematician, historian, statesman, philosopher in some degree. He must understand symbols and speak in words. He must contemplate the particular in terms of the general and touch abstract and concrete in same flight of thought. He must study the past for the purpose of the future. No part of man’s nature or his institutions must lie entirely outside his regard. He must be purposeful and disinterested in simultaneous mood; as aloof and incorruptible as an artist, yet sometimes as near the earth as a politician.”
या परिच्छेदातील शेवटच्या वाक्यात भगवद्गीतेचे तत्त्वज्ञानच जणू साररूपाने अवतरले आहे, असे वाटते. आणि मुख्य म्हणजे स्वतः कृष्णाचे आयुष्यही याच प्रकारचे होते. हे सर्व मुद्दे यथावकाश चर्चेत येणार आहेतच.
परत केन्सच्या जडणघडणीकडे वळताना असे म्हणता येते, की त्याची तर्कशास्त्र व गणित या विषयात गती होती तिला धरूनच त्याने संभाव्यतेच्या (Probability) संकल्पनेवर संशोधन केले. ‘अ ट्रिटीज ऑन प्रोबॅबिलिटी’ मध्येही (A Treatise on Probability) मूरचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. खरे तर संभाव्यता आणि अनिश्चितता या दोन संकल्पना मानवी कृतीच्या एकूण क्षेत्रातच महत्त्वाच्या आहेत. अर्थशास्त्रात तर आहेतच आहेत.
स्वतः केन्सनेच ‘माय अर्ली बिलिफ्स’ (My Early Beliefs) या आठवणींच्या रचनेत स्वतःच्या जडणघडणीबद्दल बरेच काही सांगितले आहे. दरम्यान पहिले महायुद्ध सुरू झाले. या काळात केन्स लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कार्यरत होता. भारत देश इंग्लंडच्या सम्राट/ सम्राज्ञीच्या मुकुटातील मुगुटमणी मानला जायचा. भारतीय साम्राज्य हा ब्रिटिशांसाठी एक मानबिंदूच होता. या साम्राज्याच्या कारभारावर इंग्लंडमधून देखरेख ठेवली जायची. आर्थिक देखरेख हा तिचा महत्त्वाचा भाग होता. भारताविषयीची आर्थिक धोरणे, चलनव्यवस्था इ. बाबीही या देखरेखीच्या कक्षेत यायच्या. केन्सला या नोकरीतील प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा झाला असणार हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याचे हे काम पब्लिक सर्व्हिस खात्यात जमा आहे.
युद्ध संपल्यावर जेती राष्ट्रे आणि जीत जर्मनी यांच्यात व्हर्साइल्स येथे तहाची बोलणी होऊन तहनाम्यावर स्वाक्षऱ्याही झाला. या प्रक्रियेत केन्सचा समावेश होता. दोस्त राष्ट्रांनी जीत जर्मनीवर ज्या जुलमी आणि जाचक अटी लादल्या त्या केन्सला मुळीच पसंत नव्हत्या. त्याने नोकरीचा राजीनामा देत, ‘द इकॉनॉमिक कॉन्सिक्वन्सेस ऑफ पीस’ (The Economic Consequences of Peace) या छोटेखानी कृतीतून आपली नाराजी व्यक्त केली. केन्स हा किती क्रांतदर्शी होता हे थोड्याच वर्षांनंतर हिटलरने केलेल्या संहारक युद्धानेच सिद्ध केले.
दोन महायुद्धांमधील कालखंडात केन्स केंब्रिजमध्ये विद्यापीठात कार्यरत राहिला. याच दरम्यान विश्वावर महामंदीचे व बेरोजगारीचे एक मोठे संकट कोसळले. अनेकांना हा भांडवलशाही पद्धतीचा परिपाक वाटला. अशा मंडळींना सोव्हिएत रशिया खुणावत होताच. स्वतः केन्सनेही या दरम्यान रशियन बॅले नर्तिका लिडिया लोपाकोव्हा हिच्याशी विवाह केला. तिच्याबरोबर त्याची रशियातील एक सफरही झाली. तेव्हा स्टॅलिन राज्य सुरू झाले होते. तेथील कम्युनिस्ट राजवटीबद्दल व म्हणजेच कम्युनिझम या अर्थव्यवस्थेबद्दलचे त्याचे मत अनुकूल नव्हतेच. ही प्रतिकूलता तेथील वातावरण प्रत्यक्ष पाहिल्यामुळे अधिक दृढ झाली. त्यामुळे त्याने याच काळात लिहिलेल्या ‘द एण्ड ऑफ लेसे फेअर’ (The End of Laissez Fair) या पुस्तकात भांडवलशाहीच्या अंताचे भाकीत त्याने केले असले तरी त्याचा अर्थ तो कम्युनिझमकडे झुकला होता असा होत नाही.
या ठिकाणी मला केन्सच्या आणखी एक वैशिष्ट्याकडे लक्ष वेधायचे आहे. आर्थिक सिद्धांतन करताना अर्थशास्त्रज्ञ कोणाच्या आणि किती दूरच्या हिताचा विचार करतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो अलीकडील काळातील हरित (Green) किंवा पर्यावरणवादी (Environmentalist) अर्थशास्त्रामुळे प्रकर्षाने पुढे आला आहे. पृथ्वी व पृथ्वीवरील साधनसामग्री ही आपल्या पिढीने घडवली नसून ती आपल्याला वारशाच्या रूपाने मिळाली आहे. हा वारसा आपण आपल्या पुढील पिढ्यांना कोणत्या रूपात संक्रमित करणार आहोत? हा प्रश्न हरित अर्थशास्त्र उपस्थित करते. भांडवलशाही हे अमर्यादित व अनियंत्रित विकासाचे अर्थशास्त्र आहे. त्याच्यापुढे असा बांधिलकीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. १९३० साली केन्सने ‘इकॉनॉमिक पॉसिबिलिटीज् फॉर अवर ग्रॅण्डचिल्ड्रन’ (Economic Possibilities for Our Grandchildren) ही रचना केली. खरे तर हा काळ पहिल्या महायुद्धाच्या सावटातून बाहेर पडण्याच्या धडपडीच्या व महामंदीच्या पेचप्रसंगाचा होता. बहुतेक विचारवंत वर्तमानाचाच विचार करण्यात मग्न होते.
अशा परिस्थितीत केन्स नातवंडांचा विचार करतो हे विशेष. हा विचार त्याने १९२४-२६ या काळात केलेल्या मुक्त भांडवलशाही व्यवस्थेच्या अंताच्या भाकिताशी जोडून घेतला म्हणजे केन्सच्या अर्थशास्त्राचे तत्त्वज्ञान लक्षात येते व त्याला ‘तत्त्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ’ का म्हणावे हेही समजते.