सुहास किर्लोस्कर
चित्रपटातले एखादे पात्र काही विचार करत आहे, हे दिग्दर्शक संवादाशिवाय कसे दाखवू शकतो? बऱ्याच चित्रपटात अशा प्रसंगावेळी ते पात्र आरशात बघत आहे, असे दाखवले जाते. आरशाचा एवढा एकच वापर होईल? वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी आरसा कोणकोणत्या अभिनव पद्धतीने वापरला आहे?
‘डक सोप’ या १९३३ साली रिलीज झालेल्या लिओ मॅकारे दिग्दर्शित चित्रपटात मार्क्स बंधूनी आरशाचा एक धमाल प्रसंग सादर केला होता. आजही तीन मिनिटांचा तो प्रसंग यूट्यूबवर बघताना आपण लोटपोट होतो. हार्पो आणि ल्युसी बॉल यांनी ‘आय लव्ह ल्युसी’ या टिव्ही शोमध्ये असाच प्रसंग साकारला आहे. ‘कोहिनूर’ (१९६०) चित्रपटामध्ये हाच प्रसंग ती कल्पना काहीशी वाढवून दिलीपकुमार आणि जीवन यांनी साकारला आहे. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘मर्द’ (१९८५) चित्रपटात ‘कोहिनूर’ सारखाच पेरलेला प्रसंग अमिताभ आणि प्रेम चोप्रा यांनी अभिनित केला आहे. परंतु यापैकी कोणत्याच प्रसंगामध्ये आरसा नव्हता. मनमोहन देसाई यांच्याच ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटात अमिताभ आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिमेशी संवाद साधतो असा प्रसंग आहे.
‘सर्कस’ (१९२८) चित्रपटात पोलिस चार्ली चॅप्लिनचा पाठलाग करत आहेत, पोलिसांना चुकवत पळता पळता तो आरशाच्या चक्रव्यूहात जातो. समोर आपल्यासारखीच तीन माणसे आणि सहा पाठमोरी माणसे बघून तो घाबरून वळणार एवढ्यात त्याच्या लक्षात येते की या सगळ्या आरशातल्या प्रतिमा आहेत. यामधून बाहेर कसे पडायचे याचा विचार करताना तो त्या आरशावरच डोकं आपटून घेतो. त्यानंतर चॅप्लिनचा पाठलाग करणारा पोलिस आणि दुसरा एक माणूस यांची आरशांच्या त्या महालात जी काही धमाल दाखवली आहे, तो चार्ली चॅप्लिनच्या कल्पकतेचा आणखी एक नमुना आहे. १९२८ साली चार्लीने हा प्रसंग कसा शूट केला असेल याची कल्पना केल्यास आपण त्याला आणखी एक कुर्निसात करतो. ‘एन्टर द ड्रॅगन’ (१९७३) चित्रपटातील ब्रूस लीचा खलनायकाबरोबर फाइट सीन एका आरसे महालामध्ये आहे. अनेक आरशांतून खरी प्रतिमा शोधण्यासाठी ब्रूस ली कसा विचार करतो, हे सुद्धा चित्रपटात प्रभावीपणे दाखवले आहे.
‘छुप ना सकेगा इश्क़ हमारा, चारो तरफ़ है उनका नजारा’ असे ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटात अनारकली म्हणते त्यावेळी सम्राट अकबर आणि शहजादा सलीम यांना अनेक आरशांत तिच्या प्रतिमा दिसतात आणि कोरसमध्ये गायलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या मुखड्याला वेगळा आयाम मिळतो. दिग्दर्शक के. आसिफ यांचे स्वप्न असणारा तो शॉट सत्यात उतरवण्यासाठी सिनेमॅटोग्राफर आर.डी. माथुर यांनी त्या शुटींगसाठी खास बेल्जियमवरून मागवलेल्या आरशांत इतक्या मधुबाला दाखवताना त्याचे ‘रिफ्लेक्शन’ पडण्यावर उपाय म्हणून त्या आरशांवर हलकेच एक मेणाचा थर लावला होता.
‘तिसरी मंजिल’ चित्रपटात एका रात्री खून बघितल्यामुळे रूपा कार वेगाने चालवत असताना एक जीप तिचा पाठलाग करत असल्याचे आपल्याला दिसते. पाठीमागून येणाऱ्या जीपच्या दिव्यांचे अंधारात कार चालवणाऱ्या रूपाच्या डोळ्यांवर पडणारे ‘रिफ्लेक्शन’ घाबरलेल्या रूपाच्या चेहऱ्यावर आपण बघतो, ही दिग्दर्शक विजय आनंदची कमाल आहे. वाहनचालकासाठी वाहनामध्ये असणाऱ्या आरशांचा वापर अनेक चित्रपटात खुबीने केला आहे. ‘ड्युएल’ (१९७१) या स्टीव्हन स्पिलबर्गच्या पहिल्या चित्रपटात नायक हायवेवरून कार चालवत असताना एक उद्दाम ट्रक ड्रायव्हर अडवणूक करतो, त्यामधून पुढील नाट्य उद््भवते. एक साधी कथा कॅमेऱ्याचा प्रभावी वापर करून दिग्दर्शक कशा पद्धतीने मांडू शकतो आणि एका ट्रकची दहशत प्रेक्षकांना कशी जाणवू शकते, याचे उत्तम उदाहरण या चित्रपटात बघावयास मिळते. कार ड्रायव्हर नायक समोरच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये पाठीमागून येणारा दांडगा ट्रक बघतो. कॅमेऱ्यात आपल्याला कारचे दोन्ही बाजूचे आरसेही दिसतात, त्यामध्ये वेगवेगळ्या अँगलमधून जवळ येणारा ट्रक बघून नायकासारखेच प्रेक्षकही दडपणाखाली येतात. स्पिलबर्गच्याच ‘ज्युरॅसिक पार्क’ चित्रपटात मागून येणाऱ्या डायनोसॉरच्या भीतीने कार पुढे पळवत असताना कारच्या बाजूच्या बहिर्गोल आरशावर लिहिलेली अक्षरे आपण वाचतो, ‘ऑब्जेक्टस् इन द मिरर आर क्लोझर दॅन दे अॅपियर’. आपण यापूर्वी गाड्यांच्या आरशावर वाचलेल्या वाक्याचा वेगळाच अर्थ स्पिलबर्गने दाखवला आहे.
एका पात्राची दोन व्यक्तिमत्वे, दोन स्वभाव किंवा नेमका कोणता निर्णय घ्यावा हा संभ्रम दाखवण्यासाठी आरशांचा वापर अनेक चित्रपटांत केला आहे. ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात दागिन्यांच्या शो रूममध्ये नायक देव आनंदला नोकरी मिळालेली आहे. त्याच शो रूममध्ये तनुजा येते. ज्या क्षणी जगदीश राज शोरूममध्ये प्रवेश करतो, त्याचवेळी देव आनंदची प्रतिमा आरशात दिसते. चित्रपटात पुढे दोन देव आनंद (विनय आणि प्रिन्स अमर) दिसणार आहेत याचे सूतोवाच दिग्दर्शक विजय आनंद यांनी या प्रसंगामध्ये केले आहे. रजत कपूर दिग्दर्शित ‘आंखों देखी’ चित्रपटात नायक संजय मिश्रा एक निर्णय घेतो, ‘जिस सच को मै नही देखुंगा, उसे स्वीकार नही करूंगा’. हा प्रसंग एका सलूनमध्ये चित्रित झाला आहे. परमेश्वरावर विश्वास आहे की नाही, याबद्दल नायक एका पुजाऱ्याबरोबर चर्चा करीत असताना नायकासमोर असलेला पुजारी आपल्याला आरशात दिसतो. ‘सिटीझन केन’ चित्रपटातील आरशांचा वापरही असाच अर्थपूर्ण आहे.
‘दंगल’ चित्रपटात नायक (महावीर- आमीर खान) आपल्या मुलीला (गीता- फातिमा) कुस्ती शिकवतो, ती एकेक स्पर्धा जिंकून राष्ट्रीय पातळीवर जाते. तिथला कोच तिला वडिलांकडून शिकलेले सर्व विसरून जा, असे सांगतो आणि त्यावर तिचा विश्वास बसतो. ती शहरातून ट्रेनिंग घेऊन आपल्या गावातल्या घरी येते त्यावेळी वडिलांना सांगते, ‘तुमचे डावपेच आणि कुस्तीचे तंत्र जुने झाले आहे’. त्यामुळे त्या दोघांमध्ये एक दुरावा निर्माण होतो. नायकाच्या दुसऱ्या मुलीला (बबिता- सान्या मल्होत्रा) मात्र आपले वडील बरोबर आहेत, असे वाटत असते. दुभंगलेल्या घराच्या पार्श्वभूमीवर ‘नैना’ हे गाणे आपण ऐकतो त्यावेळी दोन बहिणी, वडील-मुलगी यांच्यातील ताणलेली नाती दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सत्यजित पांडे यांच्या सिनेमॅटोग्राफीमधून अप्रतिमरीत्या चित्रित केली आहेत. मुलीची आई आणि नायकाची पत्नी अशा द्विधा मनोवस्थेत सापडलेली दया कौर (साक्षी तन्वर) आरशासमोर दिसते त्यावेळी तो संभ्रम प्रेक्षकापर्यंत पोहोचतो.
स्टॅनले क्युबिर्क दिग्दर्शित ‘द शायनिंग’ चित्रपटात नायक जॅक निकोल्सनची दोन व्यक्तिमत्वे दाखवण्यासाठी आरशाचा उत्तम वापर केला आहे. ‘REDRUM’चा खरा अर्थ आरशामध्ये आपल्याला दिसतो आणि होणाऱ्या ‘MURDER’ची दहशत त्या मुलाप्रमाणे आपल्याही मनात ठाण मांडून बसते. अनेक हॉरर चित्रपटात आरशातील प्रतिमा, आरशातून बाहेर येणारी दृश्ये प्रेक्षक ‘आ’ वासून बघतात. मीडियाच्या या जगात अन्य कोणीतरी आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव टाकते आहे; त्यामुळे आपण आपले स्वत्व गमावून बसतो, याचाच विचार ‘ट्रूमन शो’ (१९९८) चित्रपटाचा नायक आरशात बघून करतो. मार्टिन स्को05/28/22र्सेसी दिग्दर्शित ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (१९७६) चित्रपटात नायकाच्या (रॉबर्ट डी निरो) मनात बदला घेण्याचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी आरशाचा वापर केला आहे.
‘ब्लॅक स्वान’(२०१०) चित्रपटात नायिकेची संभ्रमावस्था आरशातील अनेक प्रतिमांमधून दाखवली आहे. ख्रिस्तोफर नोलान या नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शकाने ‘इन्सेप्शन’ या चित्रपटात आरशाचा वापर अनोख्या पद्धतीने कसा केला आहे, हे चित्रपटातील प्रसंगाच्या अनुषंगाने बघण्यासारखे आहे. ‘मिरर’ हा हॉरर चित्रपट बघितल्यानंतर कदाचित काही रात्री आपण आरशात बघणारही नाही. ‘एअरप्लेन’ (१९८०) या चित्रपटातील आरशाचा प्रसंग आवर्जून बघावा आणि अचंबित व्हावे. ‘डबल जिओपार्डी’ (१९९९) या चित्रपटाच्या शेवटी खलनायकाला बंदुकीची गोळी लागते आणि तो जमिनीवर कोसळतो त्यावेळी त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या आरशात गोळी झाडणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसतो. खलनायकाचा मुखवटा काढून त्याचा खरा चेहरा आपल्याला दिसला आहे.
रोबर्ट झेमेकीस दिग्दर्शित ‘कॉन्टॅक्ट’ (१९९७) चित्रपटात औषधासाठी धावत येणारी मुलगी आपण बघतो, ती पळता पळता एका कपाटासमोर थांबते, आरसा असलेला दरवाजा उघडते आणि आपल्या लक्षात येते की आपण तिची प्रतिमा बघत होतो. पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर पळताना त्या मुलीची प्रतिमा आपण केव्हापासून बघण्यास सुरुवात केली याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर डॉन बर्गेस यांचे कौशल्य हेच आहे की त्यांनी त्या मुलीचा पळतानाचा प्रसंग दोन वेळा चित्रित केला. एक नेहमीचे दृश्य आणि एक आरशातील इमेज अशी दोन्ही दृश्ये चित्रित करून त्यांनी ती एकएकमेकांत बेमालूमपणे मिसळली.
आरसा असलेल्या प्रसंगाचे चित्रीकरण करणे हे कॅमेरामन आणि दिग्दर्शक यांच्या दृष्टीने एक आव्हान असते. आरशात बघणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा दिसावी परंतु कॅमेरा दिसू नये यासाठी आजवर अनेक क्लृप्त्या लढवण्यात आल्या आहेत. एखादी व्यक्ती आरशासमोर उभी असेल आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे गडद अंधार असेल तर तिथेच कॅमेरा ठेवला जातो, मग पोस्ट प्रॉडक्शन प्रोसेसिंगमध्ये कॅमेरा दिसणार नाही अशा पद्धतीने तो अंधार अधिक गडद केला जातो किंवा चित्रचौकटीत दिसणाऱ्या कॅमेऱ्यावर तंत्राच्या साहाय्याने पार्श्वभूमीवरील पडद्याचा/ भिंतीचा तुकडा दाखवला जातो. प्रगत तंत्राचा वापर सुरू होण्याआधीच्या काळात आरसा असलेल्या प्रसंगात कॅमेरा दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवला जायचा किंवा शूटिंग केलेले दृश्य आरशाच्या फ्रेममध्ये दाखवले जायचे परंतु आता तंत्राच्या साहाय्याने चित्रीकरण झाल्यानंतर दिसणारा कॅमेरा गायब केला जातो. अर्थात केवळ तंत्र उपलब्ध आहे म्हणून सगळे सोपे आहे, असे म्हणता येणार नाही.
दोन वर्षांपूर्वी ऑस्करपासून अनेक पारितोषिकांची लयलूट करणाऱ्या ‘जोकर’ चित्रपटात नायक आरशासमोर बसला आहे आणि वेगवेगळ्या भावमुद्रा करता करता विचार करतो आहे. त्या जोकरचे ते विचार करणे आपल्या अंगावर येते कारण आरशाचा चित्रीकरणासाठी केलेला वापर.
सौंदर्याच्या पलीकडे जाऊन आरशातल्या व्यक्तीशी संवाद साधताना ‘आपुलाची संवाद आपणाशी’ करून बघितल्यास आरशाचा वापर कसा करता येईल याबद्दल अनेक कल्पना सुचतील आणि चित्रपट बघताना आरसा दिसल्यावर त्याचे कारण उमजेल. कारण ‘तोरा मन दर्पण कहलाए’!