विक्षिप्त नि अभागी प्रतिभावंत

लेखक : डॉ. सुहास भास्कर जोशी

बरोक शैली आणि कायरोस्क्यूरो तंत्र याचं सर्वोत्तम उदाहरण असणारे ‘बीहेडिंग ऑफ सेंट जॉन द बॅप्टिस्ट’ हे चित्र युरोपियन कलाविश्वातील एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती तर आहेच, पण जोनाथन जोन्स या कलासमीक्षकाच्या म्हणण्यानुसार जगातील सार्वकालिक दहा महान कलाकृतींमध्ये समावेश करण्याच्या योग्यतेचे आहे. आयुष्याची शेवटची वर्षं कायम मृत्यूच्या सावटाखाली काढणाऱ्या कॅराव्हॅजिओची अखेरची काही महत्त्वाची चित्रं शिरच्छेदाचीच असावीत, हा काही योगायोग नव्हता, हे नक्की!

हे व्यक्तिचित्र पहा-

चित्रकलेच्या इतिहासातील तो आहे एक असाधारण, एकमेवाद्वितीय कलावंत. सतराव्या शतकातील बरोक शैलीत काम करणारा महान इटालियन चित्रकार. रियालीस्टिक म्हणजे वास्तववादी पद्धतीने काम करणाऱ्या या चित्रकाराने फळा-फुलांची ‘स्टील लाइफ’ रंगवताना उत्कृष्ट यथार्थदर्शनाची परमसीमा गाठली. बायबलमधील प्रसंग रंगवताना तैलचित्रात छाया-प्रकाशाचा विलक्षण नाट्यमय खेळ दाखवणाऱ्या त्याच्या ब्रशस्ट्रोक्सनी युरोपखंडातील रेंब्रा, व्हर्मीर, अर्तेमिसिया जेंतीलीशी यांसारख्या अनेक चित्रकारांवर पुढील अनेक वर्षं जबरदस्त प्रभाव पाडला. त्याच्या काही चित्रांवर भलेही काही धर्मगुरू आणि तथाकथित उच्चभ्रू नाराज झाले असतीलही, पण सर्वसामान्य माणसांच्या हृदयात या चित्रांनी स्थान प्राप्त केले. मिलान आणि रोमच्या श्रीमंत आश्रयदात्यांकडून त्याला भरपूर धनलाभ झाला. रोमच्या पोपकडून खूप कौतुक, मानसन्मान मिळाला. माल्टाच्या शिलेदार प्रमुखाकडून ‘नाइट’ ही बहुमानाची पदवी प्राप्त झाली. अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्याने काढलेल्या शंभरच्या आसपास तैलचित्रांनी त्याचं नाव सार्वकालिक महान प्रतिभावंतांमध्ये सामील झालं.

आता हे चित्र पहा-

आई-वडिलांचं छत्र लहानपणीच हरपल्यानंतर कोणाचाच धाक न राहिलेला एक निशाचर तरुण मिलान आणि रोमच्या रस्त्यांवर रात्री-बेरात्री वेश्यालयं आणि मदिरालयं यांच्यामध्ये भिरभिरत राहिला. गुंड-मवाली लोकांबरोबर सतत राहिल्याने त्यांची गुन्हेगारी वृत्ती त्या तरुणाच्या रक्तात भिनली. सणकू डोक्याचा हा तापट तरुण कायमच कमरेला लटकावलेल्या तलवारीने समोरच्या माणसावर वार करायच्या तयारीत असायचा. धर्मगुरूंबरोबर वादावादी, पोलिसांबरोबर भांडणं आणि मग तुरुंगवास या त्याच्यासाठी नित्याच्या गोष्टी होत्या. लग्न-मुलंबाळं-घरसंसार हे त्याला कधी लाभले नाही. एके दिवशी बेकायदा द्वंद्वात त्याच्या तलवारीचा वर्मी घाव लागून प्रतिस्पर्धी मरण पावला. खुनाच्या आरोपामुळे मृत्युदंडाची भीती बाळगत हा तरुण रोममधून पळाला. फरार घोषित झालेला हा निर्वासित भटका नेपल्स, सिरॅकस, माल्टा अशा अनेक ठिकाणी मारामाऱ्या करत, तुरुंगवास भोगत भटकत राहिला. आणि अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी देवाच्या दयेवाचून आणि माणसाच्या मदतीवाचून हा आजारी गुन्हेगार एकाकी अवस्थेत एका बेटावर मरण पावला.

तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही दोन्ही व्यक्तिचित्रं एकाच माणसाची आहेत. आणि त्या अभागी प्रतिभावंताचं नाव आहे – मायकेलअँजेलो मेरिसी कॅराव्हॅजिओ (Michelangelo Merisi Da Caravaggio). डॉ. जेकिल आणि मि. हाईड या कथेप्रमाणे दिवसा विलक्षण प्रतिभेचा मेहनती चित्रकार, आणि रात्री उच्छृंखल वर्तनाचा कुप्रसिद्ध शीघ्रकोपी गुन्हेगार या त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.

इटलीतील मिलान शहराजवळच्या कॅराव्हॅजिओ या गावी २९ सप्टेंबर, १५७१ रोजी मायकेलअँजेलो मेरिसीचा जन्म झाला. आपल्या कॅराव्हॅजिओ गावावरून त्याने ‘कॅराव्हॅजिओ’ हे आपले कलाविश्वातील नाव घेतले. दिवसा मिलानमधील आर्चबिशप कार्लो बोरोमिओ यांनी केलेले येशूच्या आयुष्याचे वर्णन ऐकत, आणि रात्री गुंड मवाल्यांच्या संगतीत फिरत या अनाथ चित्रकाराचं बालपण गेलं. मिलानमध्ये कलाशिक्षण घेतल्यानंतर निर्धन अवस्थेत कॅराव्हॅजिओ रोममध्ये पोहोचला. चित्रं काढून उपजीविकेचा प्रयत्न करणाऱ्या कॅराव्हॅजिओला लवकरच कार्डिनल डेल मॉन्टेकडे आश्रय मिळाला. डेल मॉन्टेसाठी त्याने काही अप्रतिम स्टील लाइफ, तसेच किशोरवयीन मुलांची (काहीशी उत्तेजक) चित्रं काढली. यामध्ये ‘बॉय विथ बास्केट ऑफ फ्रूटस’, ‘यंग व्हिक्टोरीयस क्युपीड’ ही चित्रं विशेष प्रसिद्ध आहेत. याच काळात त्याने डेल मॉन्टेसाठी ‘ कार्ड शार्प्स’ हे श्रीमंत भोळ्या तरुणाला पत्त्यांमध्ये फसवणाऱ्या दोन ठकांचं, तसेच जुस्तिनियानीसाठी ‘फॉर्च्युन टेलर’ या भविष्य सांगणाऱ्या लबाड जिप्सी तरुणीचं तैलचित्र रंगवलं. कॅराव्हॅजिओच्या या सुरुवातीच्या चित्रांमध्येसुद्धा त्याच्या पुढे विकसित झालेल्या ‘बरोक’ (Baroque) शैलीची आणि ‘कायरोस्क्यूरो’ (Chiaroscuro) तंत्राची चाहूल आपल्याला दिसते.

बरोक शैली म्हणजे घटना /प्रसंगातील नाट्यमय क्षण निवडून, गडद-फिकट रंगात, छाया-प्रकाशाचा खेळ दाखवत; ‘डेकोरेटिव्ह’ प्रकारे कलाकुसर मांडत, वास्तववादी प्रकारे चित्रं सादर करणारी शैली होय. ‘कायरोस्क्यूरो’ तंत्रात अंधाऱ्या पार्श्वभूमीवर चित्रातील व्यक्तिरेखांवर अथवा त्यांच्या काही अवयवांवर नेमका प्रकाशझोत टाकून, गडद-फिक्या रंगांचे विलक्षण प्रत्ययकारी दर्शन घडवलेले असते. कॅराव्हॅजिओने या दोन्हींवर जबरदस्त प्रभुत्व मिळवून अनेक महान कलाकृती आपल्या कारकिर्दीत सादर केल्या.

प्रबोधन आणि नंतरच्या काळात ख्रिश्चन धर्माकडे लोक आकर्षित व्हावेत म्हणून कॅथॉलिक चर्चच्या धर्मगुरूंनी चित्रकार-शिल्पकार यांच्याद्वारे चर्चचे सुशोभीकरण सुरू केले. लिओनार्दो, मायकेलअँजेलो, राफाएल अशा अनेकांनी, धार्मिक विषयांवरील चित्रकृतींमधून पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळत असल्याने, विविध चर्चेससाठी अनेक कलाकृती सादर केल्या. कॅराव्हॅजिओने देखील बायबलमधील नाट्यमय प्रसंग निवडून अनेक चित्रकृती तयार केल्या. पण त्याने धर्मगुरूंना अपेक्षित असलेले धर्माचे वैभव मात्र आपल्या चित्रात मांडले नाही. उलट या बंडखोर चित्रकाराने गरीब शेतकरी, कामगार, वेश्या यांना मॉडेल म्हणून घेऊन अत्यंत वास्तववादी चित्रं सादर केली. यामुळे धर्मगुरू, श्रीमंत आश्रयदाते नाराज झाले. पण सर्वसामान्य जनतेला त्याची चित्रं खूप आवडली.

सन १५९७मध्ये कॅराव्हॅजिओने मेडीची राजासाठी ग्रीक पुराणकथेतील मेडूसा या डोक्यावर विषारी साप असणाऱ्या भयंकर स्त्रीचे अतिशय प्रभावी चित्र ढालीवर तयार केले. याचवर्षी त्याने ‘ज्युडिथ आणि हॉलोफर्नेस’ हे जुलमी असिरियन सेनापती हॉलोफर्नेस याला ठार मारणाऱ्या ज्युडीथचे -एका ज्यू तरुणीचे नाट्यमय तैलचित्र सादर केले. यातील ज्युडीथसाठी त्याने फिलाडे या वेश्येचा वापर केला. यामुळे एकीकडे धर्मगुरू नाराज झाले, तर दुसरीकडे या वेश्येवर प्रेम असणाऱ्या रानूच्यो तोमासनीबरोबर कॅराव्हॅजिओने कायमचे वैर ओढवून घेतले. अर्थात तोमासनीशिवाय इतर अनेकांशी मारामाऱ्या, पोलिसांशी भांडणं, छोटे-मोठे तुरुंगवास वगैरे गोष्टी या काळात त्याच्या चालू होत्याच.

सन १६००मध्ये रोमच्या चर्चच्या सुशोभीकरणासाठी कॅराव्हॅजिओने ‘कॉलिंग ऑफ सेंट मॅथ्यू’ आणि ‘मॅथ्यूचा अंत’ ही अप्रतिम तैलचित्रं सादर केली. १६०१ सालच्या ‘सपर अॅट इमेस’ या येशूच्या पुनरुत्थानाशी संबंधित तैलचित्रात छाया-प्रकाशाचा अद्‌भुत खेळ दाखवत पवित्र वातावरण निर्माण केले होते. तर १६०२ साली त्याने पुनरुत्थानानंतर प्रकट होणाऱ्या येशूविषयी संशय घेणाऱ्या थॉमस या शिष्याचे चित्र ‘डाऊटिंग थॉमस’ या शीर्षकाने रंगवले.

अफाट पैसा आणि प्रसिद्धी मिळालेल्या कॅराव्हॅजिओला हळूहळू यशाची धुंदी चढायला लागली. त्याचा विक्षिप्तपणा, संतापी वृत्ती आणि बेभान वर्तनात वाढ होऊ लागली. पास्कॅलोन या नोटरीवर तलवारीने हल्ला, घरमालकिणीच्या घरावर दगडफेक, आणि मग तुरुंगवास हे चालूच होते. पण याचा कळस गाठला गेला तो २८ मे १६०६ रोजी. टेनिस कोर्टवरील भांडणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी कॅराव्हॅजिओने तोमासनीबरोबर बेकायदा द्वंद्व खेळले. यामध्ये त्याच्या तलवारीचा घाव वर्मी बसून तोमासनीचा मृत्यू झाला. रोमच्या पोपकडून मृत्युदंडाची शिक्षा झालेला कॅराव्हॅजिओ माल्टाला पळून गेला. तिथं त्याने ‘डेव्हिड अॅण्ड गोलीएथ’, ‘बीहेडिंग ऑफ सेंट जॉन’ अशी अप्रतिम चित्रं रंगवली. यापैकी शिरच्छेद झालेल्या गोलीएथला त्याने स्वतःचा चेहरा दिला होता. सेंट जॉनच्या चित्रावर खूश होऊन माल्टामध्ये त्याला ‘नाइट’ (Knight) ही मानाची पदवी देऊन सत्कार करण्यात आला. पण पुन्हा भांडणं, मारामाऱ्या, तुरुंगवास हे दुष्टचक्र आलेच. पदवी काढून घेतली गेली. वेगवेगळ्या बेटातून तो मारेकऱ्यांपासून लपतछपत फिरत राहिला. आणि शेवटी एकाकी, तापाने फणफणलेल्या, आजारी अवस्थेत मरण पावला. अर्थात त्याच्या मृत्यूचे कारण केवळ ताप हे नव्हते, तर तत्कालीन रंगांमध्ये असणारे विषारी शिसे आणि हिंगुळ त्याच्या रक्तात भिनल्याने त्याची प्रतिकारशक्तीच कमी झाली होती. त्यात पुन्हा तुफानी मद्यपान, चिंता आणि तापट स्वभाव या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याने त्याचा हा अकाली मृत्यू झाला.

मात्र अनेक श्रेष्ठ चित्रांचा वारसा कॅराव्हॅजिओ चित्ररसिकांसाठी मागं ठेवून गेला. पण या सर्वांमध्ये ‘बीहेडिंग ऑफ सेंट जॉन द बॅप्टिस्ट’ (सेंट जॉनचा शिरच्छेद) हे माल्टामध्ये काढलेले चित्र सर्वोत्कृष्ट समजले जाते. माल्टाचा शिलेदार प्रमुख विन्याकुर याने तिथल्या सेंट जॉन कॅथेड्रलसाठी या विषयावर पेंटिंग करण्याचे काम कॅराव्हॅजिओला दिले. बायबलच्या ‘नव्या करार’ मधील कथेवर आधारित हे चित्र आहे. हेरोड राजाने हेरोडियस या स्त्रीबरोबर केलेल्या अनैतिक विवाहावर सेंट जॉन याने टीकेची झोड उठवली. हेरोडने जॉनला पकडून तुरुंगात टाकले. पण त्याच्या अनुयायांची संख्या मोठी असल्याने त्याचा वध करण्याचे धाडस त्याला होत नव्हते. पण एके दिवशी हेरोडियसची तरुण मुलगी सलोमी हिच्या नृत्यावर खूश झालेल्या राजाने तिच्या हट्टाखातर बक्षीस म्हणून जॉनचा वध करण्याची परवानगी दिली. या शिरच्छेदाचे विलक्षण करुण, भयंकर चित्र कॅराव्हॅजिओने रंगवले आहे.

बायबलमधील कथेवर आधारित असले तरी कॅराव्हॅजिओच्या या चित्रात पंख लावलेले देवदूत नाहीत, की आभाळातून आलेला दैवी प्रकाश किरण नाही. तर इथे आहे वास्तववादी प्रकारात सादर केलेले मृत्यू आणि मानवी क्रौर्य याचं जबरदस्त प्रत्ययकारी चित्रण. इथे तुरुंगातील अंधाऱ्या तळघरात मृत पावलेला पण शिर पूर्णपणे न तुटलेला सेंट जॉन दिसतो आहे. जमिनीवर पडलेल्या जॉनच्या मानेतून रक्ताचा ओघळ वाहतोय. जवळच शिर तबकात घ्यायला तयार सलोमी, किल्ल्यांचा जुडगा कमरेला लावलेला तुरुंगाधिकारी, हातात खंजीर घेतलेला मारेकरी आणि हे दृश्य न बघवणारी एक वृद्धा आहे. कोपऱ्यातील खिडकीतून हे सर्व बघणारे दोन कैदी आहेत. या नाट्यमय प्रसंगाचा अंतिम क्षण आता येणार असल्याने, तो पाहण्याची उत्सुकता सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसते आहे. शिरच्छेद झालेल्या सेंट जॉनच्या कॅराव्हॅजिओने रंगवलेल्या चेहऱ्यावरूनही कलासमीक्षकांमध्ये चर्चा झडत असतात. काही कलासमीक्षकांच्या मते शिरच्छेद झालेल्या जॉनचा चेहरा हा सतत मृत्यूची भीती बाळगणाऱ्या कॅराव्हॅजिओचाच आहे, तर काहींच्या मते तो चेहरा येशूच्या चेहऱ्याशी साधर्म्य दाखवणारा आहे.

काळ्या अंधाऱ्या पार्श्वभूमीवर चित्राच्या उजव्या कोपऱ्यातून आलेला प्रकाश,आणि भडक लाल, पिवळ्या रंगांचा केलेला वापर यातून कॅराव्हॅजिओने यामध्ये जबरदस्त परिणाम साधला आहे. चित्रातील मोठा मोकळा अवकाश, अंधाऱ्या वातावरणात मोजक्याच व्यक्तिरेखांवर (विशेषतः चेहऱ्यांवर) पडलेला उजेड, अत्यंत उच्च कोटीचे वास्तववादी यथार्थदर्शन यामुळे प्रेक्षक या प्रसंगाचा भाग होऊन जातो. १६०८ साली हे १२ फूट X १७ फूट इतक्या भव्य आकाराचे हे पेंटिंग पूर्ण झाले.आपण एक महान कलाकृती तयार केली आहे, याची जाणीव कॅराव्हॅजिओलादेखील झाली होती. कारण संपूर्ण कलाकारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने चित्राखाली जॉनच्या मानेतून ओघळलेल्या रक्ताच्या रंगात आपली स्वाक्षरी केली होती.

बरोक शैली आणि कायरोस्क्यूरो तंत्र याचं सर्वोत्तम उदाहरण असणारे हे चित्र युरोपियन कलाविश्वातील एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती तर आहेच, पण जोनाथन जोन्स या कलासमीक्षकाच्या म्हणण्यानुसार जगातील सार्वकालिक दहा महान कलाकृतींमध्ये समावेश करण्याच्या योग्यतेचे आहे. आयुष्याची शेवटची वर्षं कायम मृत्यूच्या सावटाखाली काढणाऱ्या कॅराव्हॅजिओची अखेरची काही महत्त्वाची चित्रं शिरच्छेदाचीच असावीत, हा काही योगायोग नव्हता, हे नक्की!

0
0
error: Content is protected !!