ग्रहमान ः २५ ते ३१ मार्च २०२३

अनिता केळकर

मेष
अडीअडचणी अडथळे यांवर मात करून प्रगती साधाल. जिद्द व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर यश मिळवाल. व्यवसायात कामांना गती द्याल. रेंगाळलेली कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याचा चंग बांधाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची साथ मिळेल. जादा कामाची तयारी असेल तर अर्थप्राप्ती चांगली होईल.

वृषभ
कर्तृत्वाला यशाची झालर मिळेल, त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दगदग, धावपळ वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत महिलांना त्यांचे कार्यक्षेत्र व घर या दोन्हीकडे लक्ष देणे जड जाईल. पण वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून त्या यशस्वी होतील. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

मिथुन
नशीब व प्रयत्न यांची सांगड योग्य प्रकारे घालून यश संपादन कराल, त्याला पूरक वातावरणाचीही साथ मिळेल. व्यवसायात अशक्यप्राय कामात यश मिळेल. तुमची कामाची उमेद दांडगी राहील. नवीन कामे सतर्क ठेवतील. नोकरीत आवश्यक असलेल्या गुणांची कदर वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून होईल, त्यामुळे मुठभर मांस चढेल. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल.

कर्क
कामात चोखंदळ राहून कामे योग्य पद्धतीने हातावेगळी करा. व्यवसायात मनोधैर्य उत्तम राखलेत तर बाजी माराल. सकारात्मक दृष्टिकोन उपयोगी पडेल. भरपूर काम करूनही म्हणावे तसे पैसे हाती न मिळाल्याने निराश व्हाल. पण मिळालेल्या संधीचे सोने करा.

सिंह
तुमच्या मनाला पटेल, रूचेल त्याप्रमाणेच वागा. केलेल्या कृतीचे समर्थन करा. व्यवसायात पैशासाठी कोणतेही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. मात्र कुसंगत टाळा. सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. कार्यतत्पर राहून कामे करा.

कन्या
कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नये. व्यवसायात आवक जावक समसमान राहील. खर्चाचे गणित कोलमडेल तरी महत्त्वाच्या खर्चांना प्राधान्य द्या. तात्पुरती पैशाची सोय होईल. नोकरीत हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. अतिविश्‍वास टाळा. कामातील बेत गुप्त ठेवा.

तूळ
अंथरूण पाहून पाय पसरा. व्यवसायात यश मिळालेच पाहिजे हा अट्टाहास धरू नका. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कृती करा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीत स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. पैशाचा अपव्यय टाळावा. घरात स्वतःचा हट्टी स्वभाव नडेल. वैचारिक मतभेद मन कलुषित करेल.

वृश्‍चिक
‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी तुमची स्थिती असेल. घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन ध्येयधोरणे स्वीकाराल. कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कृती कराल. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करा. कोणतीही गोष्ट करताना गोंधळून न जाता शांत चित्ताने करतील.

धनू
दिलेला शब्द पाळा व कृती आणि विचार यांच्यात एकवाक्यता ठेवा. व्यवसायात सभोवतालच्या परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. कामात लवचिकता आणून त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील. अतिविश्‍वास टाळा. पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेऊ नका. नुकसान तुमचेच होईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग.

मकर
योग्य वेळी योग्य व्यक्तींचा उपयोग करून घेऊन कामे मार्गी लावण्यात तुमचा हातखंडा असतो. परंतु या सप्ताहात माणसांची पारख करण्यात तुमची चूक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास ठेवू नये. पैशाच्या मोहमयी पाशापासून दूरच राहावे. जुनी येणी वसूल करण्याकडे लक्ष द्यावे.

कुंभ
जीवनपद्धती आहे अशीच टिकवण्यासाठी थोडी जास्त धावपळ दगदग करावी लागेल. पैसे मिळवण्यासाठी दुप्पट काम करणे गरजेचे होईल. व्यवसायात नवीन योजना उपक्रम हाती घेऊन ज्याप्रमाणे कृती करावी. मात्र त्यातील अटी नियमांचा आधीच विचार करून ठेवा.

मीन
‘अति सर्व वर्ज्यते’ असा अनुभव येईल. व्यवसायात हातातील कामे आधी संपवा मगच नवीन कामांकडे वळा. अडथळ्यांची शर्यत पार करून यश मिळेल. पैशाची स्थिती चांगली राहील. नोकरीत मौनव्रत बाळगा. हितशत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवा. जोडधंद्यातून विशेष लाभ व्हावा.

0
0
error: Content is protected !!