लेखक : अंजली कुलकर्णी
कवी हेमंत जोगळेकर यांचे कवितेच्या आस्वादनाची प्रक्रिया सहजसुंदर पद्धतीने उलगडणारे ‘अगा कवितांनो’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातून जोगळेकर एकाचवेळी चिकित्सक अभ्यासकाच्या डोळ्यांनी कवितेकडे बघतात आणि कवितेला एक अत्यंत सचेतन, सजीव गोष्ट समजून सर्जकपणे तिचा गाभा समजावून देतात.
हेमंत जोगळेकर स्वतः मराठीतील एक महत्त्वाचे कवी आहेत. गेली जवळजवळ चाळीस वर्षे एका निष्ठेने ते कवितेची आराधना करत आहेत. परंतु, स्वतःची अत्यंत कसदार कविता लिहून जोगळेकर थांबलेले नाहीत. आपल्या पूर्वसुरींनी कवितेत काय उत्तम काम करून ठेवले आहे, समकाळामध्ये आपल्या सभोवताली कोणती आणि कशी कविता लिहिली जात आहे, त्या कवितेची रूपरसात्मक वैशिष्ट्ये कोणती आहेत, आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने ती किती विविध परींनी प्रकट होते आहे, कवितेची भाषा कशी असते; तिचे विविध घाट, बाज, वळणे कशी असतात या साऱ्या संदर्भात एक जाणते तरीही स्वागतोत्सुक कुतूहल घेऊन हेमंत जोगळेकर विविध कवींच्या कवितांकडे बघतात.
अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी लेखकाची कविताविषयक विचारांची बैठक तयार असावी लागते. स्वतःचा एक दृष्टिकोन विकसित झालेला असावा लागतो. हेमंत जोगळेकर यांनी अशी बैठक, असा दृष्टिकोन अनेक वर्षांच्या साधनेतून निश्चितपणे पक्का केलेला आहे. परंतु, एकदा तयार केलेल्या चष्म्यातूनच कुठल्याही कवितेकडे पाहण्याचा हट्टाग्रह मात्र ते धरत नाहीत, हे विशेष. एक निखळ, निर्मळ कुतूहल जोपासत इतर कवींच्या कवितेकडे निरोगी दृष्टीने पाहण्याची नजर त्यांनी जपली आहे.
मराठीतील निरनिराळ्या कवितांचे विविध रंग आणि ढंग, त्यांची सौंदर्यस्थळे, वैशिष्ट्ये, त्यांनी सूचित केलेल्या आकलनाच्या विविध वाटा इत्यादी बाबींचा एक सुंदर धांडोळा जोगळेकर यांनी या पुस्तकात घेतला आहे. कविता कशी समजून घ्यावी याचे प्रात्यक्षिकच या पुस्तकात दिले आहे. या पुस्तकातील विविध लेख म्हणजे कवितेची रूढ पारिभाषिक समीक्षा नव्हे किंवा हे निव्वळ आस्वादपर लेखनही नाही. आधीच निश्चित केलेल्या निकषांनुसार कवितांना जोखणारे वा कवितांचे मूल्यमापन करून त्यांना एक दर्जात्मक विशिष्ट स्थान बहाल करणारे हे मूल्यमापनात्मक लेखन नाही. या लेखनासाठी जोगळेकर यांनी स्वतःला पूर्णपणे मोकळे सोडून, कवितांच्या मागे जात जात, कवितांनीच दाखवलेल्या वाटेचा शोध घेत जे गवसले ते शब्दबद्ध करण्याची भूमिका घेतली आहे. या लेखनाला एक सुंदर नेटकेपण आणि बांधेसूद सौंदर्य लाभले आहे.
‘अगा कवितांनो’ या पुस्तकात एकूण तेवीस लेख समाविष्ट आहेत आणि त्यातून विविध कवितांच्या विविध वैशिष्ट्यांची चर्चा जोगळेकर यांनी केली आहे. या लेखांची शीर्षके पाहिली तरी पुस्तकाचे स्वरूप लक्षात येते. उदा. ‘कवितेची सुरुवात’, ‘कवितेची ओळ ः किती लांब? किती छोटी?’, ‘कविता ‘दिसते’ कशी?’, ‘कवितेतील चित्र’, ‘कविता ऐकू कशी येते?’, ‘कवितेतील स्पर्श संवेदना’, ‘कवितेतील रसगंध’ अशा विविध प्रकरणांमधून कवितेच्या रूपबंधाविषयी, तिच्या आकृतिबंधाविषयी, तिच्यातील रूपरसगंधस्पर्शात्मक अनुभूतींविषयी सांगितले आहे. हे करताना त्यांनी मराठीतील विविध कवींच्या कविता उद्धृत करून उदाहरणांसहित त्यांची वैशिष्ट्ये उलगडली आहेत. त्याचबरोबर ‘कवितेतील विचार’, ‘कथात्म कविता’, ‘कवितेतील अद्भुत’, ‘कवितेतील इतर कलाकृतींचे संदर्भ’, ‘विडंबन कविता’, ‘गीताआड दडलेली कविता’, ‘कवितेपलीकडच्या कविता’, ‘अतर्क्य कविता’, ‘कवितेची भाषा ः काल’, ‘कवितेची भाषा : आज’, अशा अनेक लेखांमधून अभिव्यक्तीच्या विविध प्रकारांवर त्यांनी भाष्य केले आहे.
कविता केवळ शब्दांच्या माध्यमातून प्रकट होत असली तरी ते शब्द वाचकाला दृक, श्रुती, स्पर्श, रस, गंध या सर्व इंद्रिय, सेंद्रिय संवेदनांचा प्रत्यय आणून देत असतात, या मुद्द्याचे विवेचन करताना त्यांनी कवितेतील या सर्व संवेदनांच्या प्रचितीची अलगद उलगड केली आहे. उदाहरणार्थ, ‘कवितेतील चित्र’ या लेखात दृक-संवेदनेसंदर्भात लिहिले आहे. कवितेतील चित्रमयता ही रंग, रेषा, आकृती यांच्या माध्यमातून प्रकट होत असते. कवितेतील रंग संवेदनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून बालकवींच्या ‘औदुंबर’ या कवितेकडे पाहिले आहे. त्याचप्रमाणे रेषांचे भान प्रकट करणाऱ्या काही कवितांचाही शोध जोगळेकर घेतात.
‘कविता ऐकू कशी येते?’ या लेखात जोगळेकर यांनी ग्रेस यांच्या कवितेतील नाद-लय संवेदनेचा ठाव घेतला आहे. कवितेतील नादमयता कवितेचा आशय कसा अधिक गडद करू शकते, याचे सुंदर उदाहरण जोगळेकर देतात. ‘अतर्क्य कविता’ या लेखातून जोगळेकर कवितेतील जाणीवपूर्वक योजलेल्या अतार्किकतेचा ऊहापोह करतात. शब्दांच्या करामतीपूर्ण योजनेतून सर्वसाधारण तर्काच्या, कॉमन सेन्सच्या पलीकडे जाणाऱ्या काही कवितांचा वेध त्यांनी घेतला आहे. या स्वरूपाच्या कवितांच्या ऊहापोहासाठी ते मुक्ताबाईंच्या ‘मुंगी उडाली आकाशी’ या अभंगापासून अनेक कवींच्या कवितांची उदाहरणे देतात.
‘कवितेची भाषा : काल’ या लेखात त्यांनी आशयपरत्वे, कालपरत्वे कवितेची भाषा कशी बदलत गेली याचे अचूक विश्लेषण केले आहे. केशवसुतांपासून कवितेतील युग बदलले. पूर्वी पंडित कवींची भाषा संस्कृतप्रचुर असे. संस्कृतप्रचुर भाषा कवीला जनसामान्यांपेक्षा उंच दर्जा बहाल करत असे. परंतु, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर या दोन युगांतील युगप्रवर्तक कवींनी कवितेत सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. त्यांना वेगळ्या प्रकारचे अनुभव व्यक्त करायचे होते, म्हणून त्यांनी वेगळी भाषा घडवली, ‘केशवसुतांना खडबडीत भाषा वापरतात म्हणून शब्द दरिद्री म्हटले गेले होते; पण हळूहळू ज्या प्रकारच्या पात्राच्या जाणिवा त्यांना व्यक्त करायच्या आहेत त्या पात्राचीच भाषा वापरली पाहिजे, हे भान अर्वाचिन कविता दाखवू लागली. नारायण सुर्वे यांची ‘मनी आडर’ ही कविता संपूर्णपणे वेश्येच्याच भाषेत अवतरली आहे. त्याचप्रमाणे मराठीत बोलीभाषांमधूनही कविता लिहिल्या जात आहेत. आज जी कविता लिहिली जाते, त्यात प्रामुख्याने उच्चारानुसार बोलीभाषा, संगणक, इंटरनेट, ईमेल, मॉल संस्कृतीच्या भाषेचा वापर दिसतो. हे नवे प्रवाहच आजच्या मराठी कवितेतील आधुनिकतेची परिभाषा झाले आहेत.’ हे त्यांचे महत्त्वपूर्ण मत त्यांनी येथे मांडले आहे.
एकूणच या पुस्तकातून जोगळेकर एकाचवेळी चिकित्सक अभ्यासकाच्या डोळ्यांनी कवितेकडे बघतात आणि कवितेला एक अत्यंत सचेतन, सजीव गोष्ट समजून सर्जकपणे तिचा गाभा समजावून देतात. कवितेच्या ओळींमधील रिकाम्या जागांमध्ये भरून राहिलेला व्यापक आशय कसा शोधून काढायचा आणि त्याचा सौंदर्यपूर्ण आस्वाद कसा घ्यायचा, हे ते फार रसमयतेने सांगतात. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचे फ्रेंच चित्रकार जीन होनोर फ्रॅगनार्ड यांनी काढलेले तैलचित्र अतीव सुंदर आहे. अत्यंत प्रसन्न मूडमधले अत्यंत तल्लीनतेने आणि कुतूहलाने कवितेचा आस्वाद घेणाऱ्या युवतीचे हे तैलचित्र वाचकांना प्रथमदर्शनीच पुस्तकाच्या प्रेमात पाडते. एक नितांतसुंदर पुस्तक वाचल्याचा आनंद हे पुस्तक देतेच, परंतु त्याचबरोबर वाचकांच्या कविताविषयक अभिरुचीची मशागत करण्याचे कामही करते.
- अगा कवितांनो
लेखक ः हेमंत गोविंद जोगळेकर
प्रकाशन ः पद्मगंधा प्रकाशन, पुणे
किंमत ः ₹ २६०/-
पाने ः १९६