हसता हसता डोळा पाणी

लेखक : अदिती पटवर्धन

ज्याला माणूस खऱ्या अर्थानं कळलाय, असा लेखकच खरीखुरी, जिवंत पात्रं उभी करू शकतो, त्यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचू शकतो. एकीकडे आजच्या काळातले संदर्भ वापरून, आपापल्या मातीत घट्ट पाय रोवून उभं राहतानाच, लेखक जेव्हा काळाच्या, सीमांच्या, भाषांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाणाऱ्या गोष्टी सांगतात, तेव्हाच ते देशोदेशीच्या लोकांना आपले वाटतात. फ्रेडरिक बॅकमन हे आजच्या काळातले असेच एक लेखक!

नुकताच टॉम हँक्स यांनी अभिनय केलेला ‘अ मॅन कॉल्ड ओट्टो’ या नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. जगभरात, अगदी भारतातसुद्धा या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. फणसासारख्या आतून गोड, पण वरून खरबरीत माणसाची ही गोड गोष्ट ज्या मूळ पुस्तकावर आधारलेली आहे ते म्हणजे स्वीडिश लेखक फ्रेडरिक बॅकमन यांचं ‘अ मॅन कॉल्ड ऊवं’ (A Man Called Ove).

फ्रेडरिक बॅकमन हे स्वीडिश लेखक असले, तरी त्यांच्या पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादांच्या माध्यमातून ते जगभर पोहोचले आहेत. या लेखकाला एका जॉनरमध्ये बसवणं अवघड आहे. कधी तो विक्षिप्त, पण गोड माणसांच्या गोष्टी हळुवार, खुसखुशीत शैलीत सांगतो; तर कधी एका जुनाट विचारांच्या आडगावातल्या घटनांची गंभीर, रहस्यमय गोष्ट सांगतो. त्यांची पुस्तकं वेगवेगळ्या धाटणीची असली, तरी त्यांच्या लिखाणातला समान धागा म्हणजे त्यांच्या पुस्तकातून डोकावणारी कमालीची भन्नाट पात्रं आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यातून प्रवास करत अगदी अनपेक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवणारी त्यांची गोष्ट सांगण्याची शैली!

‘अ मॅन कॉल्ड ऊवं’ हे अगदी असंच एक पुस्तक. गेल्या वर्षात मी नव्या, सध्या ॲक्टिव्हली लिहीत असणाऱ्या एखाद्या लेखकाचं पुस्तक शोधत होते आणि हे पुस्तक किंडलनं सुचवलं. लेखकाविषयी, पुस्तकाविषयी फार काही माहीत नसतानाही सारांश आवडला म्हणून मी ते डाउनलोड केलं आणि रोज थोडी थोडी पानं वाचत, कधी खुदुखुदू हसत, तर कधी ढसाढसा रडत ते पुस्तक मी पूर्ण केलं. ऊवं नावाचा साठीतला एक खडूस माणूस घरात एकटाच राहतो. वरकरणी पाहता हा माणूस जरा तुसडाच आहे. तत्त्वाला चिकटून राहणारा, लहानसहान गोष्टींवरून वाद घालणारा, जगातल्या बऱ्याचशा गोष्टी न आवडणारा हा ऊवं. त्याचे शेजारीसुद्धा त्याच्या वाटेला फारसे जात नाहीत. पण अशातच त्याच्या आयुष्यात दोन मोठे बदल घडतात. त्याच्या समोरच्या घरात एका अरब देशातून आलेली परवाने आणि तिचं कुटुंब – स्वीडिश नवरा आणि दोन गोंडस मुली – राहायला येतं आणि एक भटकं मांजर जबरदस्तीनं स्वतःला ऊवंकडे पाळून घेतं! हळूहळू आपल्यालाही ऊवंच्या आयुष्यात थोडं डोकावता येतं, त्याचं आयुष्य आपल्यापुढे उलगडायला लागतं. हळूहळू एका मोठ्या धक्क्यामुळे जगायचं विसरलेला हा रफ आणि टफ माणूस परवानेच्या मायेनं, पोरींच्या प्रेमानं पाघळतो आणि पुन्हा जगायला शिकतो. हे गोड पुस्तक वाचल्यावर मला हा लेखक कोण आहे, यानं अजून काय लिहिलं आहे याची उत्सुकता लागून राहिली, हे साहजिकच!

फ्रेडरिक बॅकमन स्वीडनमध्येच राहतात, स्वीडिश भाषेतच लिहितात. एका मुलाखतीत त्यांनी लेखन करायला कधी आणि कशी सुरुवात केली याचं उत्तर देताना त्यांनी त्यांची मजेशीर गोष्ट सांगितली आहे. या लेखकानं लेखन करण्याआधी मिळेल ती कामं केली. पेस्ट कंट्रोल, पेंटिंगपासून हॉटेलमध्ये भांडी घासण्यापर्यंत ते थेट फोर्कलिफ्ट चालवण्यापर्यंत सगळं करून पाहिलं. लिहिणं आवडायचं; पण ते करता येईल असं ध्यानीमनी नसताना त्यांना एका वर्तमानपत्रासाठी लेखन (फुकटात हं!) करायची संधी मिळाली आणि पुढे जाऊन त्याच अनुभवाच्या आधारावर एका मासिकात नोकरीही मिळाली. लेखनासाठी महिन्याचा पगार देणारी ही त्यांची पहिलीच नोकरी. हा काळ २००६-२००७च्या आसपासचा. इंटरनेटचा पसारा हळूहळू वाढत होता आणि ब्लॉग हे एक नवं प्रकरण उदयास येत होतं. ब्लॉगच्या जन्माच्या वेळच्या या काळात बॅकमन यांनी स्वतःचा, स्वतःसाठी असा एक ब्लॉग लिहायला सुरुवात केली. या ब्लॉगला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळायला लागला आणि पाचशे-हजार नियमित वाचकांच्या प्रतिक्रियासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू लागल्या. या ब्लॉगलेखनाचा आपल्याला खूप उपयोग झाल्याचं बॅकमन सांगतात. बॅकमन यांच्या लेखनाची जातकुळी विनोदाची आहे. डार्क कॉमेडी, सटायर, निखळ विनोद, अशा वेगवेगळ्या रूपात विनोद त्यांच्या लेखनातून डोकावत राहतो. या सर्वच प्रकारच्या लिखाणाची नेमकी नाडी पकडणं त्यांना या ब्लॉगमुळे, तिथे मिळालेल्या कॉमेंट्समुळे जमायला लागलं.

सन २०१२मध्ये त्यांची ‘अ मॅन कॉल्ड ऊवं’ प्रकाशित झाली आणि वाचकांच्या पसंतीला उतरली! काहीच काळात या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला आणि बॅकमन यांचं पुस्तक इंटरनॅशनल बेस्टसेलरच्या पंक्तीत जाऊन बसलं. आजपर्यंत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि आजच्या काळातल्या उत्कृष्ट ‘स्टोरीटेलर’पैकी एक म्हणून ते नावाजले जातात. स्वतःविषयी बोलताना त्यांना स्वतःलासुद्धा ‘ऑथर’पेक्षा ‘स्टोरीटेलर’ हा शब्द वापरायला जास्त आवडतं.

‘‘खरं तर मी काही ग्रेट लेखक नाही. मी गोष्टी सांगणारा एक स्टोरीटेलर आहे. मला गोष्टी सांगायला आवडतात आणि त्या सांगायला म्हणून मी लेखक झालो, एवढंच. आता हेच पहा, एखादी गोष्ट लिहिताना माझ्यासमोर पाच शब्द आले, तर मी अगदी स्वाभाविकपणे त्यातला सगळ्यात सोपा शब्द निवडतो! म्हणूनच कदाचित अनुवादकांना माझी पुस्तकं भाषांतरित करणं सोपं जात असावं. तसं पाहायला गेलं तर लेखक म्हणून माझ्यापेक्षा उजवे असे कितीतरी लेखक फक्त स्वीडनमध्ये आहेत!’’

त्यांच्या स्टोरीटेलिंगच्या याच हातोटीचा प्रत्यय त्यांचं ‘अॅन्क्शस पीपल’ हे पुस्तक वाचताना येतो. एका अपार्टमेंटमध्ये ‘अपार्टमेंट व्ह्यूइंग’ सुरू असताना एक बँक दरोडेखोर तिथं येतो (की येते? – यातही मिस्ट्री आहे!) आणि तिथं असलेल्या सगळ्या माणसांना ओलीस धरतो/ते, अशी या पुस्तकाची कथा साधारण सांगता येईल. अपार्टमेंट व्ह्यूइंग म्हणजे कोणतंही घर विकताना ते विकत घ्यायला इच्छुक असणाऱ्या सगळ्या व्यक्ती ठरावीक वेळी त्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यांना ते घर बघणं, काही प्रश्न असतील तर ते विचारणं इत्यादी गोष्टी करता येतात. अर्थातच यावेळी या ठिकाणी बरीच अनोळखी मंडळी एकत्र जमतात आणि अशा वेळी एखाद्या गुन्हेगारानं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून ओलीस धरलं, तर काय होईल याची आपण कल्पनाच करू शकतो! अशाच एका प्रसंगात काय घडतं, ते बॅकमन आपल्याला उलगडून, रंगवून सांगतात. खरंतर ही एका गुन्ह्याची कथा आहे म्हटल्यावर ती कॉमेडी कशी काय असं आपल्याला वाटतं; पण हळूहळू जसजसं आपण हे पुस्तक वाचत पुढे सरकत जातो, तसं आपल्याला लक्षात येतं, की ही गोष्ट ना दरोड्याची आहे, ना ओलिसांची आहे, ना पोलिसांची आहे, ना या सगळ्यातल्या नाट्याची आहे – या कथेत हे सगळं आहेच – पण त्या पलीकडे जाऊन ही कथा यातल्या माणसांची आहे. ज्या पद्धतीनं या कादंबरीतलं प्रत्येक पात्र लेखकानं रंगवलं आहे, ते वाचताना आपण त्या प्रत्येकात गुंतून पडतो.

मला आवडणाऱ्या सगळ्या लेखकांच्या लिखाणातला सामान धागा शोधायचा प्रयत्न जेव्हा जेव्हा मी करते, तेव्हा जाणवतं की ज्याला माणूस खऱ्या अर्थानं कळलाय, असा लेखकच खरीखुरी, जिवंत पात्रं उभी करू शकतो, त्यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचू शकतो. एखादा माणूस त्याच्या विलक्षण वैयक्तिक क्षणी काय अनुभवत असेल, हे एखाद्या लेखकाला जेव्हा अचूक पकडता येतं, तेव्हा त्याचं लिखाण ‘युनिव्हर्सल’ होतं, त्याला देशांच्या सीमांचं बंधन राहत नाही. एकीकडे आजच्या काळातले संदर्भ वापरून, आपापल्या मातीत घट्ट पाय रोवून उभं राहतानाच, लेखक जेव्हा काळाच्या, सीमांच्या, भाषांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाणाऱ्या गोष्टी सांगतात, तेव्हाच ते देशोदेशीच्या लोकांना आपले वाटतात. बॅकमन हे आजच्या काळातले असेच एक लेखक!

  • फ्रेडरिक बॅकमन यांची उल्लेखनीय पुस्तकं:
  • १. A Man Called Ove
  • २. Anxious People
  • ३. Things My Son Needs to Know About the World
  • ४. The Beartown Trilogy
0
0
error: Content is protected !!