लेखक – प्रा. डॉ. अनंता कस्तुरे
अनेक वेळा चरित्रात विभूतिपूजक जिव्हाळा हा आंधळा, बोधवादी आणि प्रायः बहिर्मुख असतो. त्याच्या निवेदनशैलीत एक प्रकारचा भावुक गोडवाही असतो; पण एकंदरीत तो चरित्रनायकाकडे निःपक्षपातीपणे पाहू शकत नाही. तो त्याला सद्गुणांचा पुतळा बनवतो; परंतु डॉ. राजेंद्र मगर लिखित दामोदर सावळाराम यंदे यांचे चरित्र यास अपवाद आहे. यंदे यांच्या कार्याचा गौरव करताना चरित्रलेखकाने काही त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. त्यांनी नायकाचे दैवीकरण केलेले नाही किंवा दानवीकरण केले नाही. त्यांना ‘मानवी’ ठेवण्याची दृष्टी संपूर्ण चरित्रात जपलेली दिसते.
काही व्यक्ती मोठे समाजाभिमुख कार्य करूनही अपरिचित राहतात. त्यांच्या कार्याची इतिहासातही पुसटशीच नोंद असते. त्यांच्या लौकिक कार्यास साजेशी प्रसिद्धी मिळत नाही. अशा प्रसिद्धीविन्मुख व्यक्तीचे कार्य कालांतराने विस्मृतीत जाते. अशी काही उदाहरणे आपल्याकडे आढळतात. यापैकीच दामोदर सावळाराम यंदे ही एक व्यक्ती आहे. त्यांनी संपादक, वृत्तपत्रमालक, समाजसेवक, लेखक आणि प्रकाशक अशा नानाविध क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. साहित्यविश्वात मौलिक कार्य केलेल्या यंदे यांचे चरित्र आजपर्यंत पडद्याआड होते. त्यांचे चरित्र डॉ. राजेंद्र मगर यांनी अलीकडेच लिहिले आहे.
दामोदर यंदे यांचा संपूर्ण कालखंड अव्वल इंग्रज काळातील (१८६१ ते १९४४) आहे. त्यांचा जन्म पारनेर (जि. अहमदनगर) येथील सामान्य कुटुंबात झाला. रोजीरोटीसाठी वडिलांबरोबर मुंबईला स्थलांतर केले. शालेय वयातच महात्मा फुले आणि दयानंद सरस्वतींच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांच्या क्रांतिकारी विचारांतून यंदे यांनी प्रेरणा घेतली. त्यांना समाजप्रबोधनाची तळमळ होती. साधनांची आणि आर्थिक कमतरता असताना त्यांनी ‘सृष्टीदर्पण’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या वृत्तपत्रीय कार्याची कीर्ती बडोदा नरेश सयाजीराव महाराजांपर्यंत गेली. महाराजांचा राजाश्रय मिळाल्याने तेथे जाऊन ‘बडोदा वत्सल’ आणि ‘श्रीसयाजीविजय’ वृत्तपत्रे सुरू केली. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रेरणेने पुन्हा मुंबईला येऊन गौरवशाली ‘इंदुप्रकाश’ सक्षमपणे चालवला. पुढे ‘श्रीशिवाजी’ आणि ‘ज्ञानमंदिर’ वृत्तपत्रे सुरू केली. ‘दीनबंधु’ आणि ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ वृत्तपत्रांची संपादकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. ‘दीनबंधु’ आणि ‘नवा मनू’ वृत्तपत्रांच्या पुनर्जीवनास मदत केली. शिष्यवृत्तीपासून ब्राह्मणेतर चळवळीपर्यंत सक्रिय सहभाग नोंदवला. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, नारायण मेघाजी लोखंडे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, कृ.अ. केळूसकर, चिं.वि. वैद्य, महाराजा सयाजीराव, रियासतकार सरदेसाई, कवी चंद्रशेखर गोऱ्हे, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीनानाथ मंगेशकर अशा अनेक मान्यवरांशी त्यांनी घनिष्ठ स्नेह ठेवला. ग्रंथ प्रकाशनासाठी सयाजीराव महाराजांच्या प्रेरणेने बडोद्यात ग्रंथसंपादक आणि प्रसारक मंडळीची स्थापना केली. मराठीत चारशे मौलिक ग्रंथांचे प्रकाशन केले. आयुष्यात अनेक चढ-उतार आणि यश-अपयशाचा सामना करत अद्वितीय कार्य केले.
डॉ. मगर यांनी यंदे यांच्या चरित्रलेखनामागची भूमिका प्रस्तावनेत स्पष्ट केली आहे. त्यानुसार चरित्रनायकाविषयी आत्मीयतेची, कृतज्ञतेची त्यांची भावना बलवत्तर आहे. पूर्वी धर्म, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, संशोधन इ. क्षेत्रांतील अलौकिक व्यक्तीच बहुधा चरित्रविषय बनत. हळूहळू ही गोष्ट बदलत गेली. अलीकडे एखाद्या सामान्य व्यक्तीने केलेले असामान्य कार्यही चरित्रलेखकाला आकर्षित करू लागले. अगदी त्याच न्यायाने हे चरित्रलेखन केले आहे. केवळ यंदे यांची प्रसिद्धीविन्मुखता हेच एकमेव कारण नाही, तर यंदे यांचे प्रेरणादायी आणि समाजाभिमुख कार्यही कारणीभूत आहे.
चरित्रनायक यंदे यांचा मृत्यू ऐंशी वर्षांपूर्वी झाला. त्यांचे चरित्र आधुनिक काळात लिहिणे म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत होती. कारण साधनसामग्रीची अनुपलब्धता आणि अस्सल माहितीचा अभाव. हाती आलेल्या साधनसामग्रीच्या आधारे चरित्रनायकाचे व्यक्तित्व वाचकांसमोर उभे करणे आवश्यक असते. कारण चरित्रकाराने इतिहासलेखन आणि कल्पित या दोन्ही बाबी वगळणे महत्त्वाचे होते. दामोदर यंदे यांच्या साधनसामग्रीचे डॉ. मगर यांनी प्रामाणिकपणे संशोधन केले. त्यातून मिळालेली माहिती वस्तुनिष्ठरित्या दिली आहे. तसेच चरित्रात पार्श्वभूमीसाठी तत्कालीन काळाचा वापर केलेला आहे. कादंबरीकाराप्रमाणे अंतर्विश्वाचा ठाव घेणारी सहभावना व कल्पकता याचे काटेकोरपणे पालन केले आहे. या सर्वांच्या मिलाफातून यंदे यांचे व्यक्तिदर्शन घडवले आहे.
फक्त साधनसामग्री हाती आली म्हणजे काम संपत नाही. विविध प्रकारच्या साधनांच्या चबुतऱ्यावर डॉ. मगर यांनी चरित्रनायकाची हाडामांसाची जिवंत मूर्ती साकार केलेली दिसते. त्यांनी विशुद्ध संशोधनदृष्टी, निवडीचे तारतम्य व कल्पक सहभावना यांचा समन्वय साधलेला दिसतो. त्यांनी यंदे यांचे यथार्थ व्यक्तिदर्शन घडवले आहे. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये नायकाचे व्यक्तिमत्त्व कसे परिणत होत गेले, याचे शक्य तितके प्रत्ययकारी जीवनचरित्र रेखाटले आहे; परंतु कौटुंबिक आणि वैयक्तिक साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे चरित्रलेखनासही मर्यादा आलेल्या दिसतात. त्यावर कुटुंबातील काही महत्त्वाचे भावनिक घटना-प्रसंग देऊन मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक वेळा चरित्रात विभूतिपूजक जिव्हाळा हा आंधळा, बोधवादी आणि प्रायः बहिर्मुख असतो. त्याच्या निवेदनशैलीत एक प्रकारचा भावुक गोडवाही असतो; पण एकंदरीत तो चरित्रनायकाकडे निःपक्षपातीपणे पाहू शकत नाही. तो त्याला सद्गुणांचा पुतळा बनवतो; परंतु हे चरित्र यास अपवाद आहे. यंदे यांच्या कार्याचा गौरव करताना चरित्रलेखकाने काही त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. ‘भागीदारांवर अतिविश्वास ठेवण्याची सवय’, ‘खर्चाचा ताळमेळ न ठेवणे’, ‘ग्रंथ प्रकाशित करताना फायदा तोटा यांचा विचार न करणे’ आणि ‘उभारलेला व्यवसाय सांभाळण्यास सक्षम वारस निर्माण न करणे’ अशा बाबी योग्य जागी नमूद केल्या आहेत. थोडक्यात, नायकाचे दैवीकरण केलेले नाही किंवा दानवीकरण केले नाही. त्यांना ‘मानवी’ ठेवण्याची दृष्टी संपूर्ण चरित्रात जपलेली दिसते.
मानवी स्वभाव अतार्किक व व्यामिश्र असतो. जागृत मनामागे अर्धजागृत आणि सुप्त मन असते, मुखवट्यामागे खरा चेहरा असतो, या मानसशास्त्रीय तथ्यांचे भान चरित्रकाराने जपलेले दिसते. शब्दांहून कृत्ये व महत्कृत्यांहून क्षुल्लक वाटणारे प्रसंगही कधीकधी अधिक बोलके ठरत असतात. अशा घटना-प्रसंगांना महत्त्वाचे स्थान चरित्रात आहे. व्यक्तिदर्शन घडवताना यंदे यांच्यावर झालेले आनुवंशिक संस्कार, परिस्थिती, कौटुंबिक जीवन यांचा विचार कोठेही टाळलेला दिसत नाही. अगदी बालवयात महात्मा फुले आणि दयानंद सरस्वती यांची व्याख्याने ऐकणे, बालवयात आई आणि शिक्षकांच्या आज्ञेत राहणे अशा प्रकारच्या घटना समाविष्ट केल्या आहेत. चरित्रात संथ किंवा सामान्य कालखंडापेक्षा संघर्षमय कालखंडावर, बाह्य घटनांपेक्षा त्यामागील मनःस्थितीवर व बहिरंगापेक्षा अंतरंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. घरातील आर्थिक ओढाताण पाहून यंदे यांनी बालवयातच नोकरी करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यावर आईची संतप्त प्रतिक्रिया ह्या प्रसंगाचे निवेदन करताना दोघांमध्ये झालेला संवाद दिला आहे. त्यामुळे हा प्रसंग आपल्यासमोर घडतोय असा भास होतो. वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमातून चरित्र जिवंत करण्याचा प्रयत्न चरित्रकारांनी केला आहे.
दामोदर यंदे यांनी मराठी भाषेमध्ये अद्वितीय प्रकाशन कार्य केले. फक्त ग्रंथ प्रकाशित करून व्यवसाय न करता त्यामाध्ये जपलेली समाजाभिमुखता महत्त्वाची आहे. समाजप्रबोधनाची गरज पाहून त्यांनी ग्रंथ प्रकाशित केले. धार्मिक ग्रंथ डोळस वृत्तीने प्रकाशित केले. चरित्रकाराने यंदे यांच्या ग्रंथप्रकाशनाची पार्श्वभूमी निश्चित आणि समतोलपणे मांडली आहे. प्रकाशन क्षेत्रातील कार्य दोन प्रकरणात दिले आहे. तरी त्यातून तत्कालीन प्रकाशन क्षेत्रात असणारी चढाओढ आणि यंदे यांची यशस्वीपणे पेललेली आव्हाने लक्षात येतात. साधनांची कमतरता असतानाही यंदे यांनी दाखवलेला संयम, निष्ठा आणि परिश्रम याचा परिचय होतो. तसेच त्यातून स्फूर्ती मिळते.
डॉ. मगर यांनी लिहिलेले चरित्र म्हणजे केवळ कालानुक्रमाने दिलेली घटनांची जंत्री नाही; तर निश्चित उद्दिष्ट, निखळ संशोधन, निवडीचे तारतम्य, कल्पक संरचना, जिवंत व्यक्तिदर्शन, आकर्षक शैली यांनी मंडित अशी ती एक एकसंध कलाकृती आहे. त्यामुळे संपादक, लेखक, प्रकाशक आणि समाजसुधारक ‘मुद्रणमहर्षी’चे हे रोमांचकारी चरित्र निश्चितच वेगळे आणि आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. त्यातून दामोदर सावळाराम यंदे यांच्या व्यक्तित्वाचे दर्शन होते.
मुद्रणमहर्षी दामोदर सावळाराम यंदे
लेखक : डॉ. राजेंद्र मगर
प्रकाशक : महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद
किंमत : ₹ ४००
पाने : २८०