लेखक ः डॉ. नितीन हांडे
‘डीप थिंकिंग’चा अनुवाद करताना मला ‘कृत्रिम प्रज्ञा’ या विषयाकडे पाहण्याचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. तंत्रज्ञानावर भाष्य करणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद करताना मीदेखील तंत्रज्ञानाचा शक्य तेवढा वापर केलेला आहे. व्हॉइस टायपिंगचा उपयोग करून या संपूर्ण पुस्तकाचे लिखाण झालेले आहे. सुरुवातीला हे तंत्रज्ञान वापरताना थोडे जड गेले आणि अनेक वेळा दुरुस्त्या करायला लागल्या. परंतु नंतर या तंत्रज्ञानाशी असे सूर जुळले की आता ते माझ्या मनातील शब्ददेखील वाचत आहे की काय असा भास व्हायला लागला.
तंत्रज्ञान आणि मानवता यांच्यामध्ये वेगळेच नाते आहे. मानवतेच्या मदतीला धावून आलेले तंत्रज्ञान हे अनेकदा मानवतेचा शत्रू समजले जाते. तंत्रज्ञान वाढले की स्वयंचलन वाढणार आणि त्यातून बेकारी वाढणार, असा ढोबळ संबंध त्यामागे लावलेला असतो. मात्र आजवर केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच मानवाने स्वतःची प्रचंड श्रमापासून मुक्तता केलेली आहे. आधुनिक बी-बियाणांचा वापर करून उत्पादन वाढवले आहे आणि भूकेचे कोडेदेखील सोडवले आहे; आजवर अशक्य वाटलेल्या अनेक गोष्टी मानवाला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य करता आल्या आहेत. तंत्रज्ञानाची लाट आपण थांबू शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून चालणे हेच मानवासाठी हितकर राहते. गॅरी कास्पारोव्हने ‘डीप थिंकिंग’ या पुस्तकात यावर सखोल चिंतन केले आहे. मनोविकास प्रकाशनसाठी ह्या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद करायची संधी मला मिळाली. अनुवाद करताना माझ्यादेखील अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या. अनुवादाचा हा प्रवास खूपच प्रेरणादायक होता.
माजी बुद्धिबळ विश्वविजेता म्हणून गॅरी जगप्रसिद्ध आहेच. मात्र त्याच्या आत अफाट तत्त्वचिंतक दडलेला आहे, हे त्याचे सामने पाहताना जाणवत नाही. निवृत्तीनंतर त्याने मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून जगभर हजारो व्याख्याने दिली आहेत; ती ऐकताना असा प्रश्न पडतो की बुद्धिबळ खेळताना प्रचंड चंचल, प्रचंड आक्रमक असलेला गॅरी हाच का? सामना खेळताना नेहमी त्याच्या तीव्र भावनांचे प्रदर्शन घडायचेच. त्यामधून पराभव पचवू न शकणारा हा खेळाडू असावा असा त्याच्याबद्दल समज होणे स्वाभाविक आहे. आधी माझादेखील असा समज होता. मात्र या पुस्तकाची प्रस्तावना वाचली आणि माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हे पाणी खूप वेगळे आहे याचा अंदाज आला, आणि मग अनुवाद करताना या चांगल्या लिखाणाला तितकाच चांगला न्याय देण्याची जबाबदारी वाढली.
प्रस्तावनेमध्येच समजून जाते की गॅरी खूप महत्त्वाचे आणि शाश्वत असे काही सांगत आहे. अनुवाद करताना केवळ शब्दानुवाद न करता मला त्या प्रसंगाच्या गाभ्यापर्यंत जायचे होते. त्याच्या अनेक सामन्यांचे ध्वनीचित्रमुद्रण झालेले असल्यामुळे ते इंटरनेटवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहेत. ते पाहत असताना गॅरीची अस्वस्थता आणि मानसिकता समजून घेता आली. त्याच्यावर उपलब्ध असलेले साहित्य वाचून काढले. केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता पुस्तकाबाहेरचा गॅरी मला समजावून घेता आला. सुमारे सहा महिने या अनुवादाचे काम चालले. तोवर इतर दुसऱ्या कोणताही विषय डोक्यात घ्यायचा नाही, असे मी ठरवले होते. त्यामुळे इतर सर्व लिखाण बंद केले. समाजमाध्यमे आणि सर्व कार्यक्रमांपासून सहा महिने सुटी घेतली, आणि पूर्ण तयारीने या खोल डोहात उतरलो.
डीप थिंकिंगमध्ये गॅरी आपल्याला तंत्रज्ञान सांगतोय की तत्त्वज्ञान सांगतोय, हे समजतदेखील नाही. आपल्या नकळत आपली अनोख्या विचारविश्वामध्ये सफर झालेली असते. त्याने संगणकासोबत खेळलेल्या लढती ही जरी पुस्तकाची मुख्य थीम असली, तरी अनेक सामन्यांचा, त्यातील प्रसंगांचा उल्लेख त्यात येतो, आणि एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगी अशी प्रतिक्रिया कशी देऊ शकते? हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि या प्रसंगामागचे न दिसणारे प्रसंग आपल्याला समजतात, तेव्हा आपण थक्क होऊन जातो. कोणाच्या लक्षात येणार नाहीत, कोणी महत्त्व देणार नाही अशा छोट्या घटना एवढा मोठा परिणाम करत असतील असे आपल्याला कधी वाटत नसते. मात्र गॅरीने तो पडदा बाजूला केला की आपण चकित होऊन जातो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अशा छोट्या घटनांकडे कसे पाहिले पाहिजे, आपण मनाला किती कणखर केले पाहिजे याची आपल्याला कल्पना येते.
डीप थिंकिंगचा अनुवाद करताना मला ‘कृत्रिम प्रज्ञा’ या विषयाकडे पाहण्याचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे. गॅरी म्हणतो, ‘आपण सर्व मैदानात आहोत, आपल्यापैकी सर्वजण खेळाडू आहेत, कोणीही प्रेक्षक नाही. आपण जेवढा मोठा आणि सखोल विचार करू, आपल्याला विजयाची संधी तेवढी जास्त असेल. आपल्याला केवळ तंत्रज्ञानाच्या पुढे दोन पावले चालण्याची महत्त्वाकांक्षा हवी.’ याच पुस्तकाचा समारोप करताना गॅरी म्हणतो, ‘मानवता ही सर्जनशीलतेपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. मानवाला लाभलेल्या इतर वैशिष्ट्यांची तुलना यंत्रमानव कधीच करू शकणार नाही. यंत्रमानवांना केवळ आदेशांचं पालन करायचं असतं, तर मानवासमोर उद्देश असतो. अगदी स्लीप मोडमध्ये असतील, तरीसुद्धा यंत्रांना स्वप्नं पडत नाहीत. मानव मोठमोठी स्वप्नं पाहू शकतो आणि आपली भव्य स्वप्नं साकार करण्यासाठी आपल्याला यंत्रांचा वापर करावा लागतो. जर आपण मोठमोठी स्वप्नं पाहायचं थांबवलं, मोठमोठ्या आव्हानांना गवसणी घालण्याचं थांबवलं, तर यंत्रं आणि आपल्यामध्ये काहीही फरक राहणार नाही.’
तंत्रज्ञानावर भाष्य करणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद करताना मीदेखील तंत्रज्ञानाचा शक्य तेवढा वापर केलेला आहे. व्हॉइस टायपिंगचा उपयोग करून या संपूर्ण पुस्तकाचे लिखाण झालेले आहे. सुरुवातीला हे तंत्रज्ञान वापरताना थोडे जड गेले आणि अनेक वेळा दुरुस्त्या करायला लागल्या. परंतु नंतर या तंत्रज्ञानाशी असे सूर जुळले की आता ते माझ्या मनातील शब्ददेखील वाचत आहे की काय असा भास व्हायला लागला. गॅरीने अलंकारिक भाषा वापरत अनेक वेळा स्थानिक म्हणीदेखील वापरल्या आहेत, या म्हणींचा आशय समजावून घेऊन त्याला मिळत्याजुळत्या मराठी म्हणी शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे त्याच आशयाच्या मराठी म्हणी मिळाल्यादेखील! आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे याची प्रचिती यातून येते.
काही महिन्यापूर्वी लाँच झालेले ‘चॅट जीपीटी’ आज जगभरात चर्चिला जाणारा विषय आहे. मानवी सर्जनशीलतेवर कृत्रिम प्रज्ञेचा हा हल्ला आहे असे काही चिंतातुर मंडळी ओरडत आहेत, तर बहुतेक टेक्नोसॅव्ही तिचे स्वागत करत आहेत. अर्थात नुकसान असते तसा तंत्रज्ञानाचा फायदादेखील असतोच की. कंटाळवाणी कामे आपण आता सहज टाळू शकतो. मात्र ही कृत्रिम प्रज्ञा लेखकांना संपवेल का, लेखनकला नामशेष होईल का…? मला तरी तसे वाटत नाही.
लेखकाची शैली जर अभिनव असेल तर चॅट जीपीटी कितीही ज्ञानी झाले, तरी लेखकाची ती शैली मॅच करू शकणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी लहान मुलाचे निरागस हास्य यंत्रमानवाला कॉपी करता येणार नाही, तसेच आपल्याला लेखकाच्या स्वतःच्या शैलीबाबत म्हणता येईल.
एकेकाळी सर्व कामे मानवाला आपल्या हाताने करावी लागत होती. विहिरीतून पाणी उपसणे असो किंवा डोंगर फोडून रस्ते करणे असो. मात्र तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि ही सर्व कामे सोपी होत गेली. काही अभ्यासक असे म्हणतात, की अमेरिकेमध्ये गुलामगिरीची प्रथा नष्ट होऊ शकली कारण मधल्या काळात तंत्रज्ञान विकसित झाले होते. मनुष्यबळाची गरज कमी झाली नसती तर गुलामगिरीची अमानवी प्रथा मोडणे अधिक जड गेले असते.
तंत्रज्ञान मानवाला सांगते की तुझा जन्म अवजड काम करण्यासाठी नाही तर अधिक सर्जनशील कामासाठी झालेला आहे. तंत्रज्ञानाला सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे की नकारात्मक पद्धतीने, हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. मात्र इथे एक बाब नक्की आहे, तुम्ही कितीही नाकारले तरी अद्ययावत तंत्रज्ञानाचा, कृत्रिम प्रज्ञेचा प्रवेश कोणी थांबवू शकत नाही, लांबवू शकत नाही. गरज आहे बदलाशी मैत्री करायची. आपण जर डीप थिंकिंग केले असेल, तर आपण नक्कीच तंत्रज्ञानाकडे सकारात्मकने पाहू शकतो, हा गॅरीबरोबर शिकलेला धडा.
डीप थिंकिंग
लेखक ः गॅरी कास्पारोव्ह
प्रकाशन ः मनोविकास प्रकाशन, पुणे
किंमत ः ₹ ४५०/-
पाने ः ३०६