लेखक: सुशील सोनार
‘श्रीमंत कसं व्हावं याचे एक हजार एक मार्ग सांगणारी पुस्तकं कमी आहेत का? आणि जर हेच माहिती करून घ्यायचं असेल तर आम्ही लोकप्रिय अनुवाद घेऊ की, त्यात काय एवढं? आणि काय असणार आहे असून असून या पुस्तकात की जे आजवर वाचलेलं नाही?’… प्रफुल्ल वानखेडे लिखित ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट होत असणाऱ्या कॉमेंट वाचून मनात कदाचित हे प्रश्न उमटणे स्वाभाविक आहे. हे पुस्तक श्रीमंत कसे व्हावे सांगणारे खचितच नाही. हा उद्देश मनाशी बाळगून वाचायला गेल्यास १०० टक्के अपेक्षाभंग ठरलेलाच.
अर्थसाक्षरता हा महत्त्वाचा विषय आहे खूप सोप्या पद्धतीने तो वाचनाच्या पहिल्या पायरीवर असलेल्या साहित्यात मांडला जाणे गरजेचे होते. महत्त्व पटल्याशिवाय माणूस कुठल्याही विषयाच्या खोलात जात नाही हे सूत्र प्रफुल्ल वानखेडे यांनी हेरलेले आहे. एखाद्या मित्राने खांद्यावर हात टाकून गोष्ट सांगावी अशा तऱ्हेने ‘गोष्ट पैशापाण्याची’ पुस्तकातील प्रत्येक प्रकरण मांडले गेले आहे. इंग्रजीत या विषयावर जी पुस्तके लिहिली गेली त्यात टिपिकल भारतीय, त्यातल्या त्यात मराठी समाजमन मध्यभागी नसते, पाश्चात्त्य समाज आणि तिथली आर्थिक मूल्ये ही नेहमी आपल्याला लागू असतीलच असे नाही.
समृद्धी आणि श्रीमंतीचा माईंडसेट कसा असावा या शिक्षणाची पाहिली पायरी म्हणून या पुस्तकाकडे पाहावे लागेल. मराठीपण काहीवेळा श्रीमंती आणि पैसा या बाबींकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकवते. आपल्या काही म्हणींतही याचे प्रतिबिंब आहे. पण पुस्तकात अशा गोष्टी आहेत की ज्या संपूर्णपणे नव्या नाहीत, पण या पद्धतीने गुंफण करून गोष्टी आणि अनुभव कथन स्वरूपात कधीही सांगितल्या गेलेल्या नाहीत.
आदर्श आणि यशस्वी व्यक्तिमत्वांची आपल्याकडे वानवा नाही. त्यांना बोलते करणारी व्यासपीठेही मुबलक आहेत. पण सक्सेस स्टोरीच्या पलीकडे आपल्या हाती काय लागते? हे आपल्याला जमणार नाही, असामान्य असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही, हा समज जरा जास्तच ठळक होत असतो. कुठल्याही क्षेत्रात अभ्यासपूर्ण पद्धतीने पावले टाकत आर्थिक पथ्ये पाळल्यास बऱ्याच गोष्टी सामान्यांच्याही आवाक्यात येऊ शकतात, याची ग्वाही उदाहरणासहित उपलब्ध असणे गरजेचे होते.
मराठीत उद्योजक अजिबात मागे नाहीत आणि त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिलेली आहेत. पण या पुस्तकाचे वेगळेपण हे चुकांच्या प्रामाणिक अनुभवात आहे. चुका होत असतात आणि मोजून मापून धोके पत्करणे चांगले असते, हे फार महत्त्वाचे मूल्य रुजविण्याचे श्रेय या पुस्तकाचे आहे. महाराष्ट्राने नेहमी देशाला विचार दिला आहे, पण अर्थविचार फार मर्यादित लोकांपर्यंत राहिला.
या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चा होत आहेत. अनेक लोकांनी हे पुस्तक वाचून त्यांचे अविचारी आर्थिक निर्णय बदलले आहेत. वारेमाप खर्चिक सोहळ्यांना कात्री लावली. अर्थात एक दोन घटनांनी फार मोठा फरक पडणार नाही, परंतु ही रुजवात आहे. पुस्तकाच्या विक्रीच्या आकड्यांतून नुकत्याच कमवायला लागलेल्या मंडळींना जे हवे आहे ते मिळाल्याची खात्री पटते.
पैसा आणि श्रीमंतीबाबत गोंधळलेली, करिअरच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर असलेल्या निमशहरी भागातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. समाज माध्यमांतून माहितीचा पाऊस पडत असतो. त्यात फायनान्शिअल प्रॉडक्ट विकणारे भंडावून सोडत असतात. नोकरी करावी की व्यवसाय/स्टार्टअप? हा एक यक्षप्रश्न असतो. आणि या प्रश्नांना सोपी उत्तरे नाहीत. प्रफुल्ल वानखेडेंनी त्यांचे अनुभव सांगून या गोंधळलेल्या प्रत्येकाला एक छोटा विचार दिला आहे.
पुस्तकातील सर्वच गोष्टी प्रत्येकाला फारच आवडतील असे नाही. तरीही प्रत्येकासाठी काही ना काहीतरी त्यात आहे. अर्थसंस्कृती हा महत्त्वाचा विषय या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. छोट्या छोट्या गोष्टी मोठे धडे शिकवत असतात आणि अर्थविचार हा एकटा, एका रेषेत होणारी गोष्ट नसून चौफेर वाचन, लोक जोडत राहणे, बचत, व्यवहारज्ञान अशा सर्व गोष्टींसोबत पुढे जाणारे मिशन आहे, हे मूळ तत्त्व लेखकाने ३१ वेगवेगळ्या प्रसंगांतून, गोष्टींतून गुंफलेले आहे.
या पिढीतील नोकरी करणाऱ्या सर्वांना स्वतःचे काहीतरी सुरू करावे असे नेहमी वाटते. एका ठरावीक पठडीतील विचारांच्या पलीकडे कधी पोहोचता येत नाही. वाचन-माणसे-पैसा हे घटक परस्परपूरक आहेत, हे महत्त्वाचे सूत्र पुस्तकातून उमगते. एका रेषेत विचार करण्याच्या आपल्या सवयीला पुस्तकातील अनेक गोष्टी छेद देतात आणि अनेक नजरेआड झालेले प्रश्न नव्याने ऐरणीवर आणतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करणे म्हणजे रोज नव्या संकटाला तोंड द्यावे लागते. प्रफुल्ल वानखेडे त्यांच्या प्रवासातील अनुभव सांगताना काही गोष्टी ठळकपणे मांडतात. पाण्यात पडल्यावर पोहायला आपोआप जमते, असा सार्वत्रिक समज व्यवसायाला खचितच लागू होत नाही. सांगोपांग विचार आणि त्या क्षेत्राचा खोलात जाऊन अभ्यास केल्याशिवाय केलेले प्रयत्न फसण्याची दाट शक्यता असते. ‘यशस्वी’ आणि ‘अयशस्वी’ या दोन गटात मुख्य फरक बऱ्याचदा आर्थिक शहाणपणाचाही असतो; आणि आर्थिक शहाणपण ज्यांच्याकडे खरोखर असते ते सार्वजनिकरित्या प्रसार करण्याच्या फंदात पडत नाहीत, हा इतिहास आहे. इथे पुस्तके मदतीस येतात. पण पुस्तकांची कथाही अशी की बरीच पुस्तके आदर्शवादी असतात. लेखकाची आधी जगून झालेली व्यवहारवादी पुस्तके विरळाच. ‘गोष्ट पैशापाण्या’ची हे अशा मोजक्या पुस्तकांपैकी एक आहे.
आर्थिक क्षमता नवीन संसाधने उपलब्ध करून देतात आणि संसाधनांनी पैसा निर्माण होत असतो हे अव्याहतपणे सुरूच असते. यामध्ये शाश्वत आर्थिक मूल्ये खूप मोठी भूमिका पार पाडतात. त्या मूल्यांशी तोंडओळख करून देण्याचे काम हे पुस्तक करते आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागात असे साहित्य पोहोचण्याची गरज होतीच. काही अंशी ती पूर्ण होताना दिसते आहे.
२००० साली जन्मलेली पिढी आता देशाच्या वर्कफोर्समध्ये पदार्पण करते आहे. त्याच सोबत गिग इकॉनॉमीच्या दिशेने आपण घोडदौड करतो आहोत. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना हा बदल जाणवू लागला आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ कधीच सापडली नसती. सध्याच्या काळात पालक आणि पाल्य ‘करिअरचे काय करावे’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना चाचपडत आहेत. सेल्फ हेल्प या प्रवर्गातील पुस्तके काही प्रमाणात कालबाह्य होत आहेत. अशा वेळी संपूर्ण कुटुंबाला एकसमान विचार पटलावर आणणे गरजेचे होते.
समाज माध्यमांमुळे अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावते आहे, अशी सार्वत्रिक कुजबूज आपण नेहेमीच ऐकत असतो. पण याच समाज माध्यमांतून हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचते आहे. उच्च दर्जाचे निर्मितीमूल्य आणि सशक्त कन्टेन्ट असल्यास वाचक आपसूक मिळतात आणि उदंड प्रतिसाद देतात हे या पुस्तकाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
महत्त्वाचे विचार अधोरेखित करण्याचा नवीन प्रयोग या पुस्तकात आहे. तसेच फॉरमॅटदेखील नवीन वाचकाला आवडेल अशा पद्धतीचा आहे. एकूणच मराठी साहित्यात हे पुस्तक एक महत्त्वाचा टप्पा आहे, आणि येणारी अनेक वर्षे राहील यात शंका नाही. ‘त्यात काय एवढं’ म्हणून या पुस्तकास टाळणे परवडणारे नाही हेच खरे.
गोष्ट पैशापाण्याची
लेखक : प्रफुल्ल वानखेडे
प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे
किंमत : ₹ २५०/-
पाने : १८३