लेखक: एकनाथ आव्हाड
‘‘माझी आई म्हणते, फुकट काही घेणं हे पाप आहे.
तुमचे पैसे खरंच नकोत मला,’’ दत्तू पटकन म्हणाला.
‘‘ए आई, भर ना गं माझ्या स्विमिंग क्लासची फी? आठच दिवस राहिलेत बाकी फी भरायचे.’’ दत्तू पुन्हा एकदा आईला आर्जवाने म्हणाला.
‘‘अरे, गेल्यावर्षी भरली ना फी. आता छान तर येतंय तुला पोहायला. बस झालं आता हे स्विमिंगबिमिंग. अभ्यासाकडे लक्ष दे जरा.’’
‘‘अगं, अभ्यास तर करतोच मी. गेल्या वर्षी आठवीच्या वार्षिक परीक्षेत पहिला नंबर काढलाच ना. मग स्विमिंग केलं तर त्यात काय बिघडलं. अगं, स्विमिंग आवडतं मला. कुठून कुठून मुलं दादरला येतात स्विमिंगला. आपण दादरमध्येच राहत असल्यामुळे आपल्याला जाण्यायेण्याचा खर्च नाही. शिवाय शाळेतल्या मुलांना फीमध्ये सवलतसुद्धा आहे. मी थोडे पैसे साठवलेत. त्यात फीला कमी पडतील तेवढेच दे तू मला. मग तर झालं.’’
‘‘हे बघ तुझं फीपुराण आता बंद कर. अरे, पैसे नाहीत माझ्याजवळ. तुझ्या बाबांची कंपनी बंद पडलीय. काम सुटलंय. आता नवीन काम कधी मिळेल ते माहीत नाही. आहेत ते पैसे जपून नको का वापरायला? ’’
आईचं बोलणं दत्तूला पटलं. पण आठ दिवसानंतर आपलं स्विमिंग बंद होणार या विचाराने तो काहीसा हिरमुसला.
दुसऱ्या दिवशी दत्तू स्विमिंगला गेला. सर म्हणाले, ’’काय रे दत्तू. भरलीस का फी? अरे पुढच्या महिन्यात शंभर मीटर फ्री स्टाइल पोहण्याची स्पर्धा आहे. आपल्या स्विमिंगपूलतर्फे तुला स्पर्धेत उतरवण्याचा विचार आहे आमचा. तू फ्री स्टाइल छान पोहतोस. पण स्पर्धेत उतरण्यासाठी तू आपल्या स्विमिंगपूलचा सभासद असायला हवास. त्यामुळे लवकरात लवकर तू फी भरून टाक बरं.’’
‘‘सर, मला नाही जमणार फी भरायला. माझ्या बाबांची नोकरी गेलीय,’’ दत्तू हलकेच म्हणाला.
सर काहीसे विचारात पडले. ‘‘बरं ठीक आहे. आठ दिवस अजून बाकी आहेत ना तुझे. जा, तू प्रॅक्टिस कर. पुढचं पुढे बघू.’’
दत्तू पोहून घरी आला. भूक लागली म्हणून जेवला. तेवढ्यात आई म्हणाली, ‘‘दत्तू चल बरं माझ्यासोबत किराणा दुकानात. अरे, किराणा संपलाय घरातला. तू सोबत आलास तर सामानाच्या पिशव्या उचलायला तेवढीच मदत होईल मला.’’
दत्तू आईसोबत किराणा दुकानात गेला. आईने वाणसामान घेतले. दोन हजार आठशेचा किराणा झाला. सुट्टे पैसे नसल्याने आईने दुकानदाराला दोन हजाराच्या दोन नोटा दिल्या. दुकानदाराने एक हजार दोनशे रुपये परत द्यायचे होते. पण त्याने शंभराच्या दोन नोटा आणि पाचशेच्या दोन नोटा देण्याऐवजी चुकून तीन नोटा दिल्या. कदाचित नोटेला नोट चिकटली असल्याने दुकानदाराला कळले नसेल.
आईलाही वाटलं पाचशेच्या दोनच नोटा आहेत. दोघंही माय-लेक घरी आले. दत्तूने पिशवीतलं सर्व सामान बाहेर काढायला आणि ते सामान डब्यांमध्ये भरायला आईला मदत केली.
चहाची वेळ झाली, म्हणून आई तयारीला लागली. पण घरातलं दूधच संपल्याचं तिच्या लक्षात आले. आपण दुधाची पिशवी आणायलाच विसरलो. म्हणून तिने पैशाचं पाकीट उघडलं. दुकानदाराने दिलेले उरलेले पैसे वरच्यावरच होते. त्यातली शंभराची नोट दूध आणण्यासाठी दत्तूला देणार तेवढ्यात तिची नजर पाचशेच्या नोटांकडे गेली. तिच्या लक्षात आले की, दुकानदाराने पाचशेच्या दोन चुकून तीन नोटा दिल्यात. ती दत्तूला म्हणाली, ‘‘अरे दत्तू, हे बघ त्या दुकानदाराने पाचशेची एक नोट चुकून आपल्याला जास्त दिलीय रे. जा पटकन त्याला हे पाचशे रुपये देऊन ये.’’
दत्तू लगेच म्हणाला, ‘‘ए आई, त्या दुकानदाराच्या कुठून लक्षात येणार? राहू दे ते पाचशे रुपये आपल्याकडेच. माझी स्विमिंगची फी भरायला कमी पडतात ना तिथे वापरता येतील.’’
आईला दत्तूच्या बोलण्याचा राग आला. ती मोठ्ठ्याने म्हणाली, ‘‘दत्तू…! याला लबाडी म्हणतात. अरे, नेहमी खऱ्याने वागावं. दुसऱ्यांच्या कष्टाचे पैसे फुकट वापरू नये आपण. पाप असतं ते.’’
आईच्या बोलण्याने दत्तू एकदम चपापला. त्याची त्यालाच लाज वाटली. ‘‘आई चुकलो मी. पुन्हा कधीच असा वाईट वाकडा विचार करणार नाही मी. शप्पथ…!’’
‘‘जा, पळत जा. पहिल्यांदा दुकानदाराचे हे पाचशे रुपये त्याचे त्याला परत दे आणि येताना दूध घेऊन ये.’’
दत्तू धावतच घराबाहेर पडला. दुकानदाराला पाचशे रुपये परत केले. सर्वकाही त्याला समजावून सांगितले. दुकानदाराने दत्तूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि बरणीचे झाकण उघडून दत्तूला तो चॉकलेट देऊ लागला. पण दत्तू म्हणाला, ‘‘खरंच नको काका.’’ आणि दत्तू तिथून पळाला. दूधकेंद्रावरून दूध घेऊन तो घरी आला.
नवीन दिवस उजाडला. दत्तू सकाळी शाळेत गेला. शाळेतून घरी आल्यावर साडेचार वाजता तो स्विमिंगला गेला. ते पोहत असताना अचानक एक घटना घडली. एका मुलीची सोन्याची महागडी अंगठीच स्विमिंगपूलमध्ये पडली. तिची आईसुद्धा त्या मुलीसोबत होती. मुलीची अंगठी पाण्यात पडली म्हटल्यावर तीही जोरजोरात ओरडायला लागली. कुणालाच सापडेना अंगठी. स्विमिंगपूलचे सरच शेवटी दत्तूला म्हणाले. ‘‘दत्तू तू चांगला दम धरू शकतोस. स्विमिंगपूलच्या तळाला शोधतोस का त्या मुलीची अंगठी?’’ दत्तूने लगेच पाण्यात उडी मारली आणि एका दमात तळ गाठला, अगदी कानाकोपरा शोधला. जेव्हा दम सुटायला लागला तसा तो वर आला. मोठ्ठा श्वास घेऊन पुन्हा पाण्यात शिरला. असे त्याने बऱ्याचदा केले. आणि शेवटी दत्तूला एकदाची ती अंगठी सापडली. त्या मुलीला तिची अंगठी दिल्यावर मुलीची आई दत्तूला खाऊसाठी पैसे द्यायला लागली. तेव्हा दत्तूने नम्रपणे नकार दिला. आणि तो घरी निघून आला. त्याने घडलेली गोष्ट आई-बाबांना सांगितली. दोघांनीही दत्तूचे कौतुकच केले.
पुन्हा नवीन दिवस उजाडला. दत्तू सकाळी शाळेत जाऊन आला. जेवला. आराम केला. घरचा अभ्यासही केला आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळी स्विमिंगला गेला. सर एक फॉर्म घेऊन दत्तूजवळ आले आणि म्हणाले, ‘‘दत्तू या स्पर्धेच्या फॉर्मवर सही कर.’’ ‘‘पण सर,’’, दत्तू म्हणाला, ‘‘मी स्विमिंग सोडणार आहे. फी नाही भरली मी.’’
‘‘अरे, तुझी फी भरलीय.’’ सर असे म्हणताच. दत्तू अवाक झाला. त्याने आश्चर्याने विचारले,‘‘माझी फी भरलीय? कोणी?’’
‘‘अरे, ज्या मुलीची सोन्याची अंगठी काल तू शोधून दिलीस ना; त्या मुलीच्या आईने तू गेल्यानंतर तुझी सर्व माहिती विचारली मला. त्या मायलेकी तुझ्या घरी येणार होत्या, तुला बक्षीस द्यायला. मी सांगितलं तुझ्या स्विमिंगच्या फीबद्दल. मग त्यांनीच तुझी स्विमिंगची फी भरली.’’ तेवढ्यात त्या दोघी दत्तूला भेटायला आल्याच. मुलीची आई दत्तूला म्हणाली, ‘‘तू आमची अंगठी शोधून दिलीस. दुसऱ्या एखाद्याला सापडली असती तर त्याने ती आम्हाला दिली असतीच असं नाही. कदाचित लपवूनही ठेवली असती.’’
दत्तू पटकन म्हणाला, ‘‘माझी आई म्हणते, दुसऱ्यांचं फुकट घेणं हे पाप आहे. तुमचे पैसे खरंच नकोत मला.’’
‘‘अरे पण, हे पैसे मी फुकट नाही दिले तुला. तू हे पैसे कष्टाने आणि खरेपणाने बक्षीस म्हणून मिळवले आहेस. प्लीज नाही नको म्हणूस. आम्हाला खूप वाईट वाटेल.’’
शेवटी दत्तू तयार झाला. त्या मायलेकींनी दत्तूचे अभिनंदन केले आणि आगामी पोहण्याच्या स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छाही दिल्या. पोहणं थांबून स्विमिंगपूलमधली इतर माणसं टाळ्यांचा कडकडाट करत होती, आणि दत्तूच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या होत्या.