लेखक : एकनाथ आव्हाड
रोजच नवीन व्हावे काही, सतत येत असे मनात
सर म्हणाले, ‘आधी माणूस हो, शोभून दिसशील जनांत!’
‘‘चला, काल भरून आणायला सांगितलेले बँकेचे फॉर्म आणा बरं पटापट. सोबत पालकांच्या आधार कार्डाची, पॅनकार्डाची झेरॉक्स द्या. आणि हो, तुमचे आणि पालकांचे पासपोर्ट साईजचे दोन दोन फोटोही द्या. उद्याचा शेवटचा दिवस आहे बँकेत फॉर्म जमा करण्याचा, हे माहीत आहे ना तुम्हाला?’’ आठवी ‘ब’चे वर्गशिक्षक शशिकांत जाधव सर मुलांशी बोलत होते. शिक्षण विभागाच्या आदेशामुळे मुलांचे शाळेकडूनच बँकेचे अकाउंट काढले जाणार होते. सरांनी सांगितलेल्या गोष्टी मुलांनी भरभर सरांकडे जमा केल्या. सोबत घरून भरून आणलेला बँकेचा फॉर्मही दिला.
राधिकाने मात्र फॉर्म भरून आणला नव्हता. त्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ झाली.
‘‘कोण राहिलंय फॉर्म भरून द्यायचं?’’ सरांच्या या प्रश्नावर राधिका काहीशी घाबरतच उभी राहिली.
‘‘राधिका, का नाही आणलास फॉर्म भरून? काल दिवसभरात तुझ्या पालकांना थोडाही वेळ नाही मिळाला का फॉर्म भरायला? तुमचे फॉर्म गोळा करणे एवढंच काम आहे का मला?’’ थोरात सर जरा रागावलेच.
राधिका सरांना म्हणाली, ‘‘सर, आईला बँकेचा इंग्रजी फॉर्म कसा भरायचा ते कळलं नाही. आणि काल तिला तसा वेळ पण मिळाला नाही.’’
‘‘का बरं वेळ मिळाला नाही?’’
‘‘तिला नवीन नोकरी लागलीय कालपासून,’’ राधिका बोलून बसली.
‘‘नोकरी …? कुठे जाते कामाला?’’
आता राधिका एकदम गप्प झाली. तिला वाटलं आपण उगाच सरांना आईच्या कामाबद्दल सांगितलं. आता वर्ग हसेल आपल्याला. कदाचित चिडवेलसुद्धा.
सर म्हणाले, ‘‘अगं बोल पटकन.’’
शेवटी आढेवेढे घेत ती म्हणाली, ‘‘सर, रस्त्यावर झाडू मारण्याचं काम करते आई…’’
राधिकाचे वडील गेल्याच वर्षी काविळीच्या आजाराने वारले होते. तिचे वडील म्युनिसिपालिटीत नोकरीला होते. रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करायचे ते. कालच वडिलांच्या जागी म्युनिसिपालिटीने राधिकाच्या आईला कामावर रुजू करून घेतले होते.
राधिकाच्या बोलण्यावर सगळा वर्ग कुजबुजू लागला. काही मुलं हसलीसुद्धा.
सर राधिकाला म्हणाले, ‘‘हरकत नाही राधिका. उद्या तू आईला घेऊन शाळेत ये. मी फॉर्म भरून द्यायला मदत करेन.’’
सर मग मुलांना दटावून म्हणाले, ‘‘काय रे, काय झालं तुम्हाला हसायला आणि कुजबूज करायला? राधिकाची आई रस्त्यावर झाडू मारण्याचं काम करते. त्याबद्दल आपसात बोलताय का तुम्ही?
आणि तुम्हाला काय वाटतं, रस्त्यावर झाडू मारणं हे काम हलक्या दर्जाचं, कमीपणाचं आहे? लक्षात ठेवा, प्रत्येक काम हे त्या त्या जागी श्रेष्ठच असते. उद्या रस्त्यावर कुणीच झाडू मारला नाही. तर या रस्त्यावरून आपण चालू तरी शकतो का? रस्त्यावरचा कचरा कोणी उचललाच नाही तर तो कचरा साचून सगळीकडे किती दुर्गंधी पसरेल. रोगराई वाढेल. आपलं आरोग्य धोक्यात येईल. हे कळतंय का तुम्हाला? अरे, उलट राधिकाची आई जे काम करते ना, ते काम आपल्यासाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, गांधीजी तुरूंगात असताना संडास साफ करण्याचे काम करायचे. त्यांना कधीच ते काम कमीपणाचे वाटले नाही. प्रामाणिकपणे आपले काम ते चोखपणे करीत राहिले.’’
‘‘अरे, आपल्या देशाला डॉक्टर, इंजिनिअरची जशी गरज आहे तशीच सफाई कामगारांचीसुद्धा गरज आहे. भाजीवाले, वायरमन, ड्रायव्हर, मजूर… किती किती माणसांची पदोपदी गरज पडते आपल्याला.’’
सरांचे म्हणणे मुलांना पटले. ‘‘सॉरी सर…! चुकलं आमचं.’’ मुले म्हणाली.
सर म्हणाले, ‘‘अरे, यावरून एक गोष्ट आठवली मला. माझ्या लहानपणी आमच्या घरी पाहुणे आले की मला हमखास एक प्रश्न विचाराचे. तू मोठा होऊन कोण होणार शशिकांत? माझे बाबा शिक्षक होते. त्यांचा प्रभाव होता माझ्यावर. मला कधी वाटायचं, बाबांसारखं आपण शिक्षक व्हावं. तर कधी वाटायचं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आईसारखा उत्तम स्वयंपाक करणारा शेफ व्हावं आपण. मुलांनो, तुम्हाला जर कोणी विचारलं की, तुम्ही मोठे होऊन कोण होणार? तर काय सांगाल? एकाएकाने सांगा बरं.’’
वर्गातल्या मुलांची चढाओढ सुरू झाली. आधी मी …आधी मी.
सर म्हणाले, ‘‘अरे, अशी घाई गडबड नको. एकाएकाने रांगेने मला सांगा बरं. सतीश तुझ्यापासून सुरुवात. चल, तू सांग आधी.’’
सतीश म्हणाला, ‘‘सर माझं पक्क असं काही ठरतच नाही.’’
कधी वाटे आग विझवणारा, व्हावा मी अग्निशामक
कधी वाटे शोध लावणारा, व्हावा मी संशोधक’’
‘‘आणि राम तुला रे काय व्हावसं वाटतं ?’’
राम म्हणाला,
‘‘कधी वाटे अभिनय करणारा, व्हावा मी अभिनेता
कधी वाटे सभेत बोलणारा, व्हावा मी उत्तम वक्ता’’
‘‘आणि वैष्णवी तुला काय व्हावसं वाटतं?’’
‘‘कधी वाटे मूर्ती घडवणारी, व्हावी मी शिल्पकार
कधी वाटे चित्र काढणारी, व्हावी मी चित्रकार’’
‘‘आणि राहुल तुला रे?’’
‘‘कधी वाटे बातम्या सांगणारा, व्हावा मी वृत्तनिवेदक
कधी वाटे शिक्षणसंस्था चालवणारा, व्हावा मी संस्थापक’’
‘‘राजू तुला काय व्हावसं वाटतं?’’
‘‘कधी वाटे लेख लिहिणारा, व्हावा मी मोठा लेखक
कधी वाटे संपादन करणारा, व्हावा मी एक संपादक’’
‘‘माधव तुला रे?’’
‘‘कधी वाटे कथा सांगणारा, व्हावा मी कथेकरी
कधी वाटे शेती पिकवणारा, व्हावा मी शेतकरी’’
‘‘गीता तुला काय व्हावसं वाटतं?’’
‘‘कधी वाटे विमान चालवणारी, व्हावी मी वैमानिक
आई म्हणते त्यासाठी आधी अभ्यास चांगला शीक’’
‘‘बरोबर आहे गीता तुझ्या आईचे. राघव तुला रे काय व्हावसं वाटतं?’’
‘‘सर, मी काहीही झालो तरी, एक गोष्ट पक्कीच करणार
देशाची सेवा करणारा, देशसेवक नक्कीच होणार..!’’
राघवच्या बोलण्याला सर्वांनीच टाळ्या वाजवल्या.
एक एक करून वर्गातील सर्वांनीच आपण मोठेपणी कोण होणार ते सांगितले.
सर म्हणाले, ‘‘व्वा ..! आजच्या गप्पांतून तुम्ही मोठे होऊन देशाची सेवा किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकाल ते आज कळले मला. पण तुम्हाला एक सांगू का? आपण अनेकदा खूप काही करायचे ठरवतो. पण नुसतेच ठरवतो. त्याप्रमाणे कृती करायची वेळ आली की मात्र टाळाटाळ करतो. सबबी सांगतो. तुम्ही असं करू नका आपल्याला ज्या क्षेत्रात काम करून मोठं व्हायचं आहे, त्या क्षेत्राची नीट माहिती घ्या. त्याच्यासाठी लागणारे शिक्षण, प्रशिक्षण मन लावून घ्या. मेहनत घ्या. अपयश आलं तरी खचू नका. चिकाटी ठेवा. यश हे चिकाटीला चिकटलेलं असतं हे ध्यानात राहू द्या. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला.’’
महत्त्वाची गोष्ट म्हटल्यावर सगळी मुलं कान टवकारून उत्सुकतेने ऐकू लागली. सर म्हणाले, ‘‘तुम्हाला जे काही व्हायचं आहे ना, ते तुम्ही खुशाल व्हा. पण दया, क्षमा, शांती, प्रेम आणि माणुसकी या सद्गुणांनी परिपूर्ण असे माणूस आधी व्हा. कारण माणूसपण जपणारा माणूसच जे काम हाती घेईल ते सुंदरपणे आणि उत्तमप्रकारे करू शकतो.’’
आता मात्र मुलांचे डोळे लकाकले. सरांनी आज खूप काही वेगळे, मनाला उभारी देणारे असे काहीतरी नवनीत आपल्याला दिलेय, असेच मुलांना वाटले.
राधिकाला तर आपल्या आईच्या कामाचा आता अभिमान वाटत होता. ‘प्रत्येक काम त्या त्या जागी श्रेष्ठच असतं…!’ या वाक्याने तिच्या मनात केव्हाच घर केलं होतं. आणि तिचं मन आता नकळत गुणगुणू लागलंय…
रोजच नवीन व्हावे काही, सतत येत असे मनात
सर म्हणाले, ‘आधी माणूस हो, शोभून दिसशील जनांत!’