लेखक : एकनाथ आव्हाड
“शाळेत मिळवलेल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा रोजच्या जीवनात उपयोग करणे, हेसुद्धा बाळा शिक्षणच. ज्ञानाचे उपयोजन यालाच तर म्हणतात,” आई म्हणाली…
बाळू संध्याकाळी पाच वाजता शाळेतून घरी आला तो मोठ्या उत्साहातच. घरात पाय टाकताच तो आपल्या धाकट्या बहिणीला, शमीला म्हणाला, “शमू, तुला जादू दाखवू?”
“दादा, तू शाळेत अभ्यास करायला जातोस की जादू शिकायला रे?”
शमीचं तिरकस बोलणं बाळूला कळलं. तो म्हणाला, “तसं काही नाही?”
“मग कसं रे?”
“अगं, आज विज्ञानाच्या तासाला साळुंखे सरांनी एक जादू दाखवली आम्हाला. म्हणाले घरी करून बघा ही जादू. तीच जादू आता तुला दाखवतो. अगं, चकितच होशील तू जादू पाहून.”
तेवढ्यात आई तिथे आली. “बाळू, शमी; तुमची जादूबिदू नंतर हं. बाळू, आधी तू शाळेचे कपडे बदल. हातपाय तोंड धुऊन ये. आत्ताच शिरा केलाय. गरमगरम आहे तोवर खा. आणि शमे तूसुद्धा खाऊन घे गं. गार झालेला शिरा खायला नेहमी नाक मुरडतेस. तुमचे बाबाही येतीलच आता. मग बसा जादू दाखवत…”
“हो, एकदम करेक्ट बोलतेस तू आई. बाबा आले की मगच सुरू करतो माझा जादूचा खेळ. तेवढाच माझा एक प्रेक्षक आणखी वाढेल,” बाळू चुटकी वाजवत म्हणाला.
बाळूने कपडे बदलले, हातपाय तोंड धुतले. त्याचा आणि शमीचा मिटक्या मारत शिरासुद्धा खाऊन झाला. पण बाबा अजून काही घरी आले नाही. बाळू बाबांची आतुरतेने वाट पाहत बसला.
बरोबर सातच्या ठोक्याला बाबांनी घरात पाऊल टाकले. बाळू उत्सुकतेने म्हणाला, “बाबा, आज मी ना तुम्हाला सगळ्यांना एक जादू दाखवणार आहे. तुम्ही पटपट आवरून या हॉलमध्ये.”
बाबा हसून म्हणाले, “बरं बरं, आलोच मी. थांबा हं जादूगार, मी आल्याशिवाय तुझी जादू सुरू करू नका.”
मोजून दहा मिनिटांत बाबा कपडे बदलून, हातपाय तोंड धुऊन आले. आईने त्यांना चहा आणून दिला. त्यांनी आधी चहा घेतला. मग बाळूला म्हणाले, “बाळू, चल कर सुरू तुझी जादू. पाहू दे मला, जादू आहे की हातचलाखी ते.”
बाळूने आईला विचारले, “आई, आपल्याकडे चुना आहे का?”
शमी पटकन हसून म्हणाली, “चुना? दादा, आपल्याकडे कुणी पान खातं का? पानाला चुना लावायला.”
बाबाही पटकन गमतीने म्हणाले, “बाळू, जादूच्या नावाखाली आम्हाला चुना लावू नकोस बरं.”
“चुना लावणे म्हणजे हो काय बाबा?” बाळूने विचारले.
“अरे, फसवाफसवी करण्याला चुना लावणं असंही म्हणतात. बरं तू असं कर, शेजारच्या संपत काकांकडे जा. त्यांच्याकडे चुना असणार. पान खातात ना ते. त्यांच्याकडून चुना आण. मी मागितलाय म्हणून सांग.”
बाळूने पुन्हा आईला विचारले, “बरं आई, हळद आणि लिंबू तरी आहे का घरात?”
“हो, हो.. आहे, आधी जा तू चुना तर घेऊन ये काकांकडून.”
बाळू पटकन जाऊन शेजारच्या काकांकडून चुना घेऊन आला. आईने एका वाटीत दोन छोटे चमचे हळद दिली. एक लिंबू दिले. बाळूने ग्लासभरून पाणी घेतले. एक चाकू घेतला. सगळे जिन्नस घेऊन तो जमिनीवर ठाण मांडून बसला.
मग हवेत हातवारे करून, “खुल जा सिम सिम, गिली गिली छू, आबरा का डाबरा..” असं बरंच काहीबाही बोलायला लागला.
शमी लगेच हसायला लागली. आईसुद्धा तोंडाला पदर लावून हसू दाबत होती. बाबाही गालातल्या गालात हसलेच. बाळूने लिंबाचे आधी चार तुकडे करून घेतले. मग चिमूटभर हळदीची पूड त्याने आपल्या तळहातावर घेतली आणि मग तळहात एकमेकांना घासले. त्याचे हात आता हळदीने पिवळे झाले होते. त्याने पिवळे झालेले हात घरात सर्वांना दाखवले.
शमी डोळे मिचकावत म्हणाली, “त्यात काय नवल..!”
बाळूने मग पिवळ्या झालेल्या तळहातांना आता थोडासा चुना घेऊन चोळला. आणि काय आश्चर्य….त्याचे दोन्ही तळहात आता क्षणात लाल झाले होते. लाल झालेले हात त्याने घरात सर्वांना दाखवले.
शमीला आता आश्चर्य वाटले. ती म्हणाली,
“आधी हात पिवळे, नंतर झाले लाल
सांग ना रे दादा, तू कशी केलीस कमाल?”
“अगं शमे, कमाल तर आता आणखी पुढे आहे, बघच तू…”
असं म्हणून बाळूने आपल्या लाल झालेल्या तळहातावर लिंबाच्या रसाचे पाच ते सात थेंब घेऊन ते तळवे एकमेकांवर घासले. आता पुन्हा आश्चर्य… लाल तळहात आता चक्क पिवळे झाले होते.
शमी म्हणाली,
“दादा, तुझी जादू, खूपच भारी
केलीस कशी? सांग तरी.”
बाळू म्हणाला, “अगं, जादूबिदू काही नाही. आमचे विज्ञानाचे साळुंखे सर नेहमी सांगतात. जादू वगैरे काही नसते. असते ते विज्ञान.”
“जादू..? विज्ञान..? कोड्यात नको बोलूस दादा. काय ते नीट सांग बरं.”
“अगं सोपं करून सांगतो. चुन्यामध्ये आम्लारी घटक असतो. हळदीचा रंग आम्लारी पदार्थामुळे लाल होतो. तर लिंबामध्ये आम्ल घटक असतो. त्यामुळे हळदीचा रंग पिवळा होतो.”
शमीने प्रश्न केला, “आम्ल कशाला म्हणतात रे दादा?”
“अगं, आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत जे भाग घेतात, त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात.”
बाबा म्हणाले, “बरोबर सांगतोय बाळू, शमू. आंबट चव देणाऱ्या संयुगांनाही आम्ल म्हणतात. खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल म्हणतात. ही आम्ले क्षीण प्रकृतीची असल्याने त्यांना सौम्य आम्लेसुद्धा म्हणतात. तर काही आम्ले ही तीव्र प्रकृतीची असतात. ती दाहक असतात. म्हणजे सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल या आम्लांना खनिज आम्ले म्हणतात.”
“बाबा, लिंबात कोणतं आम्ल असतं?” शमीचा पुढचा प्रश्न तयारच होता.
“लिंबात सायट्रिक आम्ल असते. आणि शमू, आम्लारी म्हणजे जे पदार्थ तुरट, कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात ते. उदाहरणार्थ चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, कॉस्टिक सोडा, साबण.”
“बाबा आम्लाचा उपयोग कुठे कुठे करतात?” शमीचे प्रश्न काही थांबेनात.
“अगं, रासायनिक शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये, क्लोराईड क्षार बनविण्यासाठी, विद्युत घटात, पाणी जंतुविरहित करण्यासाठी तसेच लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिताही आम्लाचा उपयोग होतो.”
बाळू म्हणाला, “बाबा, किती छान माहिती दिलीत आज. ज्ञानात आणखी भर पडली आमच्या.”
शमी म्हणाली, “होय बाबा, बाळूदादा म्हणतोय ते अगदी खरंय.”
घरातले कुंकू संपत आले होते. आई विकत आणणार होती. बाळू उत्साहाने म्हणाला, “आई, घरीच करूयात ना आपण हळदीचं कुंकू. तेही एकदम शुद्ध.”
शमी म्हणाली, “दादा, तू करणार कुंकू?”
बाबाही म्हणाले, “बाळू, तू करणार कुंकू?”
“होय तर… मीच करणार कुंकू.”
आई म्हणाली, “करूद्या हो त्याला. चुकत चुकत शिकेल.”
बाळूने सर्वात आधी तुरटी आणि टाकणखार घेऊन तो लिंबाच्या रसात मिसळला. मग त्यामध्ये हळद पावडर टाकून तीही त्यात मिसळली. मग ते मिश्रण तसेच ठेवले आणि दोन तीन दिवस वाळू दिले. आता हळदीचा रंग छान लाल झाला होता.
हे मिश्रण पूर्णपणे वाळल्यानंतर यामध्ये त्याने किंचित तिळाचे तेल टाकले. परंतु त्याची पेस्ट बनायला नको; याकडे बारीक लक्ष दिले. हे पावडरच्या रूपातच राहील याची काळजी घेतली. आणि काय आश्चर्य… कुंकू तयार… आणि तेही एकदम शुद्ध.
आईने बाळूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. म्हणाली, “बाळू, शाळेत मिळवलेल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा रोजच्या जीवनात उपयोग करणे, हेसुद्धा बाळा शिक्षणच. ज्ञानाचे उपयोजन यालाच तर म्हणतात. बघ ना, आज मला कुंकवाची गरज होती आणि तू प्रयत्न करून छान कुंकू तयार करून दिलंस. गरज ही शोधाची जननी आहे, हेच खरं.”
शमी लगेच म्हणाली, “आई, मला तर वाटतं, आपला दादा ना, मोठा होऊन शास्त्रज्ञच होणार बघ. सतत नवीन काहीतरी शोध लावत असतो…!”
बाबा हसून म्हणाले, “वाह! रघुनाथ माशेलकर… !!”
यावर घरातले सगळेच खळखळून हसले.