कामाची पोचपावती

लेखका : एकनाथ आव्हाड

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आपल्या मुलाचे कौतुक पाहून आई बाबांचा ऊर आता अभिमानाने भरून आला होता. आणि राधा आपल्या छोट्या भावाचे कौतुक डोळे भरून हृदयात साठवत होती.

“ए  आई, माझं पैसे गोळा करण्याचं कार्ड तुला दिसलं का? अगं, इथेच पुस्तकांच्या रॅकवर ठेवलं होतं चार दिवसांपूर्वी. पण आता सापडतच नाही. शाळेत ते कार्ड जमा नाही केलं तर भागवत सर ओरडतील.” मंगेश काहीसा काळजीनेच बोलला. 

“अरे, कसलं कार्ड? कसले पैसे?” आईला काहीच कळेना.

“अगं, शाळेने मला सशस्त्र सेना ध्वज निधी गोळा करण्यासाठी ते कार्ड दिलं होतं.”

बाबा आणि मंगेशची मोठी बहीण राधाही मंगेशची चाललेली धावपळ, शोधाशोध पाहात होते.

बाबांनी मंगेशला हटकले. म्हणाले, “अरे मंगेश, तू आम्हाला सांगितलं नाहीस की शाळेनं तुला निधी संकलन करायला सांगितलंय ते.”

राधासुद्धा म्हणाली, “हो ना, मंगेश तू घरात बोलला असतास तर आम्हीही तुला निधी संकलन करायला मदत केली असती अरे.” 

मंगेश म्हणाला, “राधाताई, अगं सर म्हणाले कार्ड हरवू नका की खराब करू नका. एकवेळ पैसे कमी जमा झाले तरी चालतील. पण कार्डाला जपा. कार्ड शाळेत जमा करावं लागेल. म्हणूनच मी कार्ड हाताळून खराब होऊ नये म्हणून जपून ठेवलं होतं.”

आई म्हणाली, “मंगेश, सरांच्या बोलण्याचा तू वेगळाच अर्थ घेतलास बाळा. सरांचं म्हणणं बरोबर आहे कार्ड हरवू नका. खराब करू नका. पण मला सांग तू पैसे जमा करण्याचा प्रयत्न केलास का? आपण घरातूनसुद्धा काही पैसे सशस्त्र सेना निधीसाठी दिले असते अरे.”

तेवढ्यात मंगेशच्याच वर्गातले रमाकांत, शंतनू, विश्वनाथ आणि शैलेश हे त्याचे मित्र आले. प्रत्येकाच्या हातात निधी संकलन करण्याचे कार्ड होते. वडिलांनी आधी त्यांना घरात बोलावले आणि मग विचारले, हे निधी संकलन तुम्ही कशासाठी करीत आहात? पण कुणालाच नीट सांगता येईना.

आई म्हणाली,“अरे , तुम्हालाच जर निधी संकलनाचे महत्त्व व्यवस्थित माहीत नसेल तर लोकांना याचे महत्त्व तुम्ही कसे पटवून द्याल?”

बाबा म्हणाले, “मुलांनो, सशस्त्र दल ध्वज निधी हा भारत सरकारने माजी सैनिकांचे कल्याण आणि पुनर्वसन करण्यासाठी स्थापन केला आहे. हा निधी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी तसेच युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी, वृद्ध, निवृत्तिवेतन नसलेल्या सैनिकांच्या विधवा आणि अनाथ मुलांच्या कल्याणासाठी वापरला जातो.”

मंगेशच्या आणि त्याच्या मित्रांच्या डोक्यात आता कुठे प्रकाश पडल्यासारखा झाला. मंगेश म्हणाला, “आई, बाबा; माझी चूक माझ्या लक्षात आली. सॉरी. खरंच, ऊन-वारा-पावसात सैनिक देशाचं रक्षण करतात. आपल्याला सुरक्षित ठेवतात. त्यांच्यासाठी आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो.”

तेवढ्यात राधाला काय आठवलं कुणास ठाऊक. ती उठली आणि पुस्तकांच्या रॅकच्या मागच्या भिंतीकडच्या बाजूला तिने काळजीपूर्वक पाहिलं तर मंगेशचं निधी संकलनाचं कार्ड तिथं पडलेलं तिला दिसलं. रॅकच्या पाठीमागे हात घालून तिनं ते कार्ड काढलं. मंगेशच्या हातात ते कार्ड देत ती म्हणाली, “हे बघ, रॅकच्या मागच्या बाजूला पडलं होतं हे कार्ड आणि तू घरभर शोधत बसलास. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. असं झालं तुझं.”

कार्ड मिळताच मंगेशला हायसं वाटलं.

बाबा म्हणाले, “मुलांनो, आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सैनिक फार मोठं काम करीत असतात. तुम्हाला माहीतच असेल, आपला देश दीडशे वर्षं इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली होता. पण अनेक भारतीयांनी आपले सर्वस्व पणाला लावून देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून  मुक्त केले. तुम्हाला माहीत आहेत का रे त्यांची काही नावं?”

मुलं काही बोलली नाहीत तसे बाबाच म्हणाले, “आपण असं करू. मी तुम्हाला काही थोर भारतीय व्यक्तींचं कार्य सांगेन. त्यांच्या कार्यावरून तुम्ही ती व्यक्ती ओळखायची. चालेल?” 

“हो, हो चालेल.” मुलं एका सुरात म्हणाली.

बाबा म्हणाले, “केसरी, मराठा वृत्तपत्रांतून, जनजागृती यांनी केली

सार्वजनिक गणेशोत्सवाची, सुरुवात करून दिली

स्वराज्याचा लढा त्यांनी, जहाल होऊनी दिला

‘गीतारहस्य’ ग्रंथ तुरुंगात, कुणी बरं लिहिला?”

राधा पटकन म्हणाली, “बाबा, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असं इंग्रजांना ठणकावून सांगणारे हे तर लोकमान्य टिळक.”

बाबा म्हणाले, “अगदी बरोबर. आता मंगेश तू सांग हं.

आझाद हिंद सेनेचे, नेतृत्व यांनी केले

‘फॉरवर्ड ब्लॉक’ संघटनेचे कामही पाहिले

‘चलो दिल्ली’च्या घोषणेने, देश जागा केला

‘जय हिंद’चा नारा, देशभर कुणी घुमविला?”

“बाबा, नेताजी सुभाषचंद्र बोस. बरोबर?” मंगेश चाचरतच म्हणाला.

बाबा म्हणाले, “अगदी बरोबर…! आता रमाकांतची पाळी.

मुलांच्या सहवासात, रमून ते जातात

गुलाबाचे फूल चक्क, कोटावर लावतात

त्यांचा जन्मदिवस,  ‘बालदिन’ आपला झाला

‘आराम हराम है!’, हा विचार कुणी दिला?”

रमाकांत म्हणाला, “काका, हे तर मुलांचे आवडते चाचा नेहरू. म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू.”

“अगदी बरोबर सांगितलंस रमाकांत. शाब्बास!  आता शंतनू उत्तर देईल.

सविनय कायदेभंगातून, आंदोलन उभे केले

मिठाच्या सत्याग्रहातून, इंग्रजांना उत्तर दिले

परदेशी मालावर, बहिष्कार यांनी केला

अहिंसेचा लढा सांगा, कोणी बरं दिला?”

शंतनू पटकन म्हणाला, “महात्मा गांधी. आपले बापूजी. म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी. बरोबर ना काका?”

बाबा म्हणाले, “अगदी बरोबर शंतनू. आता पाळी विश्वनाथची.

मूकनायक नावाचे, यांनी पाक्षिक सुरू केले

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगितले

‘वाचाल तर वाचाल’, हे जगास पटवून दिले

भारतीय घटनेचे सांगा, शिल्पकार कोण झाले?”

विश्वनाथ लगेच म्हणाला, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर.”

बाबा म्हणाले, “वाह..! एकदम बरोबर. आता पाळी शैलेशची.

भूदानाचा मंत्र यांनी, भारतीयांना दिला

‘सर्वोदय’ हा उन्नतीचा, मार्ग सांगितला

‘गीताई’तून भगवद््गीतेचा, अर्थ सोपा केला

‘सब है भूमी गोपालकी’, हा संदेश कोणी दिला?”

इथे शैलेशला पटकन उत्तर देता येईना. तो विचारात पडला. त्याचा पडलेला चेहरा पाहून आई म्हणाली, “मी शैलेशसोबत हं. मी  सांगू का उत्तर?”

बाबा म्हणाले, “हो सांग.”

आई म्हणाली “विनोबा भावे. त्यांचे पूर्ण नाव आहे… विनायक नरहरी भावे.”

बाबा म्हणाले, “वाह ..! छानच..!”

काव्यमय कोड्यांचा हा खेळ छानच रंगात आला होता. कोड्यांची उकल होताना मुलं आनंदून जायची. नकळत त्यांच्या ज्ञानात भरसुद्धा पडायची. यानिमित्ताने कितीतरी थोर भारतीय नेत्यांच्या कार्याची पुन्हा उजळणी झाल्यासारखी मुलांना वाटली.

किती वेळ झाला, मुलांच्या गप्पा संपता संपेना. शेवटी आईच मुलांना म्हणाली, “अरे उठा आता. पळा. निधी संकलन करायला जायचं आहे की नाही? आम्हीसुद्धा करू हो मदत.”

बाबांनी चौघांनाही प्रत्येकी शंभर रुपये दिले. कार्ड भरले. सही केली. मुलं आनंदाने पुढल्या घरी निघून गेली.

मंगेशने निधी संकलन करण्याचे कार्य आता खूपच मनावर घेतले होते. निधी संकलन करताना हे का गरजेचे आहे, ते तो लोकांना पटवून द्यायचा. रोज नित्यनियमाने दोन तास या कामासाठी तो राखून ठेवायचा. आठवडाभरातच त्याचे कार्ड संपूर्ण भरले. त्याने कार्ड आणि कार्डावर जमा केलेले सर्व पैसे सरांकडे सुपूर्द केले. तो ही गोष्ट विसरूनही गेला.

एके दिवशी शाळेत शासनाचे पत्र आले. त्यातून कळले की मंगेशने सर्वात जास्त निधी संकलन केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्याचा सत्कार होणार होता.

सत्काराच्यावेळी राज्यपाल म्हणाले, “आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक नेहमीच कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्यच आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग घेतला पाहिजे. छोटा जवान मंगेशने तर या कामी आपला खारीचा वाटा उचलून अनेक मुलांसाठी देशकार्याचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिलाय. यानिमित्ताने आपण मंगेशचे अभिनंदन करायला हवे.”

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आपल्या मुलाचे कौतुक पाहून आई बाबांचा ऊर आता अभिमानाने भरून आला होता. आणि राधा आपल्या छोट्या भावाचे कौतुक डोळे भरून हृदयात साठवत होती.

0
0
error: Content is protected !!