छोटेसे बहीण भाऊ

लेखक : एकनाथ आव्हाड

राधामावशी आश्चर्यानं सारं ऐकत होत्या. मग त्या जागच्या उठून ठामपणे म्हणाल्या, “ताई, तुम्ही तर माझे डोळेच उघडलेत. आता तुम्ही बघाच. मी माझ्या नवऱ्यालाच काय पण कुणालाही माझ्या मुलांमध्ये बिलकूल भेदभाव करू देणार नाही. मग इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल.”

सकाळी दहाची वेळ असेल. दारावरची बेल वाजली. आई पुटपुटली, “ राधा आली असेल…”

बाळूने पटकन जाऊन दार उघडले तर दारात राधामावशीच होत्या. राधामावशी लगबगीने घरात आल्या. कुणाशी काही न बोलता आधी बाथरूममध्ये जाऊन त्यांनी हातपाय धुतले. मग पदराला हात पुसून त्या स्वयंपाकखोलीत बेसीनमध्ये असलेली खरकटी भांडी घासायला लागल्या. आई म्हणाली, “अगं राधा, आधी चहा तर घे.” खरंतर, राधामावशी आल्या आल्या कधीच कामाला लागत नाहीत. कधी त्या इकडच्यातिकडच्या गप्पा मारणार. कधी त्या त्यांची सहा वर्षांची जुळी मुलं श्रावणी आणि श्रावण यांच्या गमतीजमती सांगणार. आईने दिलेला गरमगरम चहा घेणार आणि मग त्या त्यांच्या कामाला सुरुवात करणार. हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता. राधामावशी कामाला अतिशय चोख, प्रामाणिक आणि कष्टाळू. राधामावशी विनाकारण कधी सुट्टी घेणाऱ्यातल्या नव्हत्या, म्हणूनच आईच्या त्या फार लाडक्या होत्या. आठ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यावर सासरच्या लोकांबरोबर त्या गावावरून मुंबईत आल्या. त्यांचे पती एका खासगी कंपनीत शिपाई होते. पगार तुटपुंजा. एकाच्या पगारात घर चालेना. म्हणून मग सात वर्षांपासून त्या धुणंभांड्यांची कामं करतात. आता तर त्या या घरातल्या एक सदस्यच झाल्या आहेत.

आज मात्र बोलक्या स्वभावाच्या राधामावशी गप्पगप्प होत्या. चहा न घेता त्या कामाला लागल्या. आईला कळून चुकलं, काहीतरी बिनसलं असणार. म्हणून आईनं काळजीनं विचारलं, ‘‘राधा, काय झालं गं? आधी बस इथं आणि हा चहा घे.” राधामावशींनी नळाखाली हात धुतले. आणि चहा घेण्यासाठी त्या स्वयंपाकखोलीतच एका बाजूला बसल्या. आई चहा देत म्हणाली, “काय गं , काय झालंय? तू अशी गप्पगप्प का आहेस?’’

‘‘काही नाही ताई…’’ राधामावशी चाचरत म्हणाल्या.

‘‘काही नाही कसं? काय झालंय ते सांग बरं.’’

‘‘अहो ताई; श्रावण, श्रावणी आता सहा वर्षाचे झालेत. शाळेत घालायचंय त्यांना. पण…’’ राधामावशी पुढचं काहीच बोलल्या नाहीत.

‘‘हो, मग काय अडचण आहे?’’

‘‘अहो, घरात पैसे नाहीत फी भरायला.’’

‘‘अगं, प्राथमिक शिक्षणासाठी पैसे लागतात, हे कुणी सांगितलं तुला? मुलांना शाळेत घालण्यासाठी तुला काही अडचण येत असेल तर मला सांग. मी येते तुझ्याबरोबर.’’

‘‘तसं नाही ताई?’’

‘‘अगं मग कसं?’’

‘‘श्रावण-श्रावणीचे बाबा म्हणतात, श्रावणला इंग्लिश मिडीयमच्या शाळेत घालायचं.’’

‘‘आणि श्रावणीला?’’… आईने जरा चढ्या आवाजातच विचारलं. आईच्या आवाजाने बाहेरच्या खोलीत अभ्यास करत बसलेले बाळू, शमी स्वयंपाकघरात आले.

‘‘श्रावणीचे बाबा म्हणतात, हवं तर श्रावणीला घालू म्युनिसिपालिटीच्या शाळेत. घरात पैसेही नाहीत. आणि मुलगी शिकून एवढं काय करणार आहे.’’

आई काकुळतीला येऊन म्हणाली, ‘‘अगं, असं नका म्हणू गं. मुलगा मुलगी असा भेदभाव नका करू. मुलगा-मुलगी आहे समान, दोघंही उंचावतील देशाची मान.’’

‘‘म्हणजे हो ताई?’’

‘‘अगं, आता तू मला सांग. घरची जबाबदारी तुझ्या नवऱ्याच्या बरोबरीने तूही सांभाळतेस की नाही? घरचं सारं सांभाळून घरासाठी चार पैसेसुद्धा तू कमावतेस की नाही? त्यात तू कुठे कमी पडतेस का? नाही ना? मग ? तुम्ही दोघेही एक समान. मग मुलगा मुलगी हा भेदभाव का? आणि कशाला?’’

‘‘अगं, मुलीला शिक्षणाची समान संधी मिळाली तर ती कुठल्याही क्षेत्रात प्रगती करून दाखवू शकते. आणि हे ज्यांना ज्यांना कळत नसेल, कळून वळत नसेल त्यांना त्यांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे.

आपल्या देशात अनेक स्त्रियांनी अतुलनीय अशी कामगिरी करून संपूर्ण जगात नाव कमावलं आहे. आपल्या देशाची मान अभिमानाने जगात उंचावली आहे. आजची महिला कुठेही कमी नाही. म्हणूनच म्हणते तुझा मुलगा ज्या शाळेत जाईल त्याच शाळेत तुझ्या मुलीला घाल. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नकोस आणि कुणाला भेदभाव करूनही देऊ नकोस.’’

राधामावशी आश्चर्यानं सारं ऐकत होत्या. मग त्या जागच्या उठून ठामपणे म्हणाल्या, ‘‘ताई, तुम्ही तर माझे डोळेच उघडलेत. आता तुम्ही बघाच. मी माझ्या नवऱ्यालाच काय पण कुणालाही माझ्या मुलांमध्ये बिलकूल भेदभाव करू देणार नाही. मग इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल.’’

बाळू लगेच म्हणाला, ‘‘होय राधामावशी, आमच्या शाळेत सांगतात; मुलगा मुलगी एकसमान. दोघांनाही शिकवा छान. तरच मिळेल मान सन्मान.’’

शमी कसली थांबतेय, तीही लगेच म्हणाली, ‘‘राधामावशी, मुलगी झाली म्हणून नका बाळगू भीती, गुणवान मुलगी तर देशाची संपत्ती.’’

आई म्हणाली, ‘‘आणखी एक गोष्ट तुला सांगायची आहे राधा?’’

‘‘कोणती?’’ राधामावशीनं काळजीनं विचारलं.

‘‘मला सांग, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच मुलांना कशाला घालायचं? अगं, मातृभाषेतून मिळणारं शिक्षण हे सर्वांत उत्तम शिक्षण. आम्ही सगळे मराठी भाषेतूनच शिकलो. कुठे अडलं आमचं? आमचा बाळू, शमी मराठी माध्यमाच्याच शाळेत शिकतात. पाहतेस ना तू?’’

‘‘होय. ते सगळं खरंय. पण श्रावण-श्रावणीचे बाबा ऐकत नाहीत हो. पण आता तुम्ही बघाच. त्यांनी ऐकायलाच पाहिजे, असं काहीतरी करते.’’

‘‘अगंबाई, भांडाभांड नको करूस बरं. नीट, शांतपणे तू त्यांना समजावून सांग. आणि तरीही त्यांनी नाहीच ऐकलं तर आमच्याकडे घेऊन ये. आम्ही समजावून सांगू.’’

राधामावशी हरखल्या, ‘‘मग तर ताई, देवच पावला. तुम्ही इतकं छान समजावून सांगितलंय की डोक्यावरचं टेंशनच गेलंय बघा… इंग्लिश शाळेत भरमसाट फी भरण्यापेक्षा आपली मराठी शाळा केव्हाही बरीच.

बरं चला, कामं खोळंबलीत माझी. पटापटा आवरते सारी. बाळू, शमू तुमच्याच मराठी शाळेत घालते बरं पोरांना.’’

काळजीने घरी आलेल्या राधामावशी उत्साहाने सारी कामं आवरून त्यांच्या घरी गेल्या.

शमी आईला म्हणाली, ‘‘आई, माणसं का गं अशी वागतात? मुलामुलीत भेदभाव का करतात?’’

बाळूही लगेच म्हणाला, ‘‘हो ना आई, का असं वागतात माणसं?’’

‘‘मुलांनो, प्रत्येक कुटुंबाने स्त्री पुरुष समानता मनापासून स्वीकारली तर ही वेळच येणार नाही. स्वयंपाक करणं, घर सांभाळणं हे मुलींचच काम आणि ऑफिसला जाणं, पैसे कमावणं हे फक्त पुरुषांचं काम असा भेदभाव करणं चुकीचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या भारतीय महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून जगात नाव कमावले आहे.’’

बाळू उत्साहाने म्हणाला, ‘‘आई, बोलता बोलता केवढी माहिती दिलीस तू.’’

शमी पटकन म्हणाली, ‘‘आणि आई, राधामावशीला तू किती छान समजावलंस गं. कमालच केलीस तू…!’’

आई म्हणाली, ‘‘बरं चला. आता अभ्यासाला बसा बघू.’’

संध्याकाळी बाबा घरी आल्यावर मुलांनी सकाळची सगळी हकिगत बाबांना सांगितली. आईने राधामावशीला मुलगा मुलगी एकसमान… हे कसं छानपणे समजावून सांगितलं, तेही मुलांनी बाबांना सांगितलं. बाबाही आईवर खूश झाले.

दुसऱ्या दिवशी राधामावशी घरी आल्या त्या उत्साहातच. बाळूनेच दार उघडलं. दारातूनच त्या ‘ताई ताई…’ करायला लागल्या. आई स्वयंपाकघरातून बाहेर आली.

‘‘काय गं, काय झालं?’’

‘‘अहो ताई, देवच पावला. श्रावण-श्रावणीच्या बाबांनी माझं ऐकलं.’’

़़‘‘काय म्हणतेस?’’ आई आनंदली.

‘‘होय, अहो मी ठणकावूनच म्हटलं त्यांना. माझ्या दोन्ही पोरांत मुलगा-मुलगी म्हणून भेदभाव करायचा नाही. तुम्ही सांगितलेलं सारंच त्यांना सांगितलं. आणि म्हटलं, जर तुम्हाला माझं ऐकायचं नसलं तर मी माझी मुलं घेऊन चालले माहेरला. मग बसा तुम्ही एकटेच. अहो, मी घर सोडून जाते म्हटल्यावर माझा नवरा घाबरलाच. म्हणाला, एकदम कडकलक्ष्मीचा अवतारच घेतलास की तू. चुकलो मी. आता आम्ही मुलगा-मुलगी असा भेदभाव कधीच करणार नाही. आणि आपल्या दोन्ही पोरांना आपण मराठी शाळेतच घालूया. ताई हे सारं तुमच्यामुळेच घडलं हो. तुम्ही मला वेळीच जागं केलं म्हणून बरं झालं.’’

शमी, बाळू हे सारं ऐकतच होते. शमीने तर आनंदाने टाळ्याच वाजवल्या. आणि ती पटकन म्हणाली, ‘‘आमच्यासाठी तुम्ही दोघीही खूप ग्रेट आहात.’’

बाळूला काय वाटलं कुणास ठाऊक. तो तर चक्क वसंत बापटांचं गाणंच गुणगुणायला लागला…

‘छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ,

उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ…’

आता शमीनेही बाळूच्या सुरात सूर मिसळायला सुरुवात केली. आणि त्यांच्या गाण्यावर राधामावशी आणि आई, दोघींच्याही माना आपसूक डोलायला लागल्या.

0
0
error: Content is protected !!