लेखक : एकनाथ आव्हाड
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज एक पदार्थ खायचा तो म्हणजे ‘आइस्क्रीम’. पण हे नेहमीचं आइस्क्रीम नाही. ‘आ’ म्हणजे आत्मविश्वास, ‘इ’ म्हणजे इच्छाशक्ती, ‘स’ म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, ‘क्री’ म्हणजे क्रियाशीलता आणि ‘म’ म्हणजे महत्त्वाकांक्षा!
रिया आठवीच्या वर्गात शिरली ती भीत भीतच. सगळा वर्ग या नवीन विद्यार्थिनीकडे निरखून पाहत होता. दोन लांबसडक वेण्या आणि उजळ कपाळ. डोळे बोलके पण त्या डोळ्यांत प्रचंड भीती. तिच्यासाठी हे सारंच नवं होतं… ही मुंबई, मुंबईतील ही महानगरपालिकेची शाळा, या शाळेतील विद्यार्थी आणि इथले शिक्षक. शाळेच्या पायऱ्या चढताना केवढ्या तरी प्रश्नांचं मोहोळ तिच्या मनात उठलं होतं.
घरातल्यांच्या वादातून रियाच्या आई वडिलांनी गाव सोडलं आणि मुंबई गाठली. सिन्नर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातून रिया आणि तिचा लहान भाऊ परशुराम एकदम मुंबईच्या या उपनगरात आले होते. रियाच्या आईबाबांनी नातेवाइकांच्या मदतीने एक घर भाड्याने घेतले, आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करून ते गुजराण करू लागले. घराजवळच्याच महानगरपालिकेच्या शाळेत रियाचे नाव आठवीत आणि परशुरामचे पाचवीत दाखल केले होते.
रियाचा शाळेचा आजचा पहिला दिवस. शेवटचा रिकामा बाक दिसला. ती तिथे जाऊन बसली. अजूनही वर्गातील काही मुलं अधूनमधून रियाकडे पाहत होती. पण तिच्याशी कुणी बोलायला आले नाही आणि तिचीही कुणाशी आपणहून बोलायला जायची हिंमत झाली नाही.
सरोदे सर कॅटलॉग आणि नवीन पाठ्यपुस्तकांचा गठ्ठा घेऊन वर्गात आले. ते या आठवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक. गोष्टी सांगणारे सर म्हणून अख्ख्या शाळेत ते प्रसिद्ध होते. गोष्ट छान रंगवून सांगायचे ते. मुलंही जिवाचा कान करून त्यांची गोष्ट ऐकायचे. मराठी विषय तर सर फारच छान शिकवायचे.
सर वर्गात आले. हजेरी घेताना वर्गात दाखल झालेल्या नव्या विद्यार्थिनीला, रियाला, त्यांनी त्यांच्या टेबलाकडे बोलावले. आस्थेने तिची विचारपूस केली. रिया फार काही बोललीच नाही. तिच्या बोलण्यात गावची बोलीभाषाच अधिक. कमी आत्मविश्वासामुळे ती गप्प गप्पच होती. सरांनी तिच्यासाठी आणलेला नवीन पाठ्यपुस्तकांचा गठ्ठा तिच्या हाती दिला आणि ते म्हणाले, ‘आता छान अभ्यास करायचा.’
सर मुलांना उद्देशून म्हणाले, ‘मुलांनो, आपल्या वर्गात रिया दराडे ही नवीन विद्यार्थिनी आली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत करूया.’ मुलांनी टाळ्या वाजवल्या. रिया जागेवर जाऊन बसली.
दिवसामागून दिवस जात होते. रिया फारशी कुणाशी बोलायचीच नाही. निमूट आपला आपण अभ्यास करायची. एकटीच बसायची, एकटीच जेवायची. रिकाम्या तासाला पुस्तक वाचायची.
हा हा म्हणता नवीन वर्ष आले. जानेवारी महिना सुरू झाला. त्याबरोबर एक सूचनाही प्रत्येक वर्गात फिरली. आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेची. ज्या मुलांना नाटकात सहभागी व्हायचे आहे त्यांनी सरोदे सरांकडे नावे द्यावीत. उत्साही मुलांनी सरांकडे नावे दिली. रिया मात्र यात कशातच नव्हती. सरोदे सरांनी स्पर्धेसाठी एक छान नवीन नाटक लिहिले ‘कमलची जिद्द’ शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे नाटक. अडचणींचे डोंगर फोडून शिक्षणाच्या वाटेवर येणाऱ्या खेडेगावातील कमलच्या जिद्दीची कहाणी या नाटकात होती. नाटकाच्या तालमी सुरू झाल्या.
स्पर्धा आता अवघी एका आठवड्यावर येऊन ठेपली आणि नेमकी कमलचं पात्र साकारणारी सोनाली आजारी पडली. तिची तब्येत फारच खालावली. आता मोठीच पंचाईत झाली. सर कमलच्या पात्रासाठी नवीन विद्यार्थिनी शोधत होते. पण कोणीच तयार होईना.
दुसऱ्या दिवशी सकाळीच नेहमीप्रमाणे शाळा भरली. मुलं परिपाठाला रांगेत उभी राहिली. राष्ट्रगीत, प्रार्थना झाल्यावर सरोदे सर म्हणाले, “आजचा सुविचार, ‘यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो.’ मुलांनो, आज बारा जानेवारी. आजचा दिनविशेष कुणी मला सांगू शकेल का? सगळेच गप्प. तेव्हा सर म्हणाले, “अरे, आज स्वामी विवेकानंद यांची जयंती. स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो.
मुलांनो, एकदा स्वामी विवेकानंद इंग्लंडमध्ये असताना एका नदीकाठी बसले होते. तेव्हा तिथे दोन मुले नदीच्या पाण्यावर तरंगणारे अंड्यांचे कवच खेळण्यातल्या बंदुकीने नेम धरून उडवण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यांचा प्रत्येक प्रयत्न फसत होता. स्वामी विवेकानंद हे सारं पाहत होते. तेव्हा ती मुलं स्वामीजींकडे आली. स्वामीजींकडे खेळण्यातली बंदूक देत ती म्हणाली, ‘तुम्ही उडवून दाखवा बरं ते कवच. तुम्ही ते कवच उडवलं तर मानू मग आम्ही तुमच्या हुशारीला.’
स्वामीजींनी कवचावर नेम धरून बंदुकीचा चाप ओढला आणि एका क्षणात कवच उडवले. मुलांनी विचारले, ‘तुम्हांला हे कसं शक्य झालं. आम्ही तर केव्हाचा प्रयत्न करतोय पण आम्हाला जमतच नाही. सारखं अपयशच येतंय यश काही मिळत नाही.’
स्वामीजी म्हणाले, ‘मी तुम्हाला यशाचे गणित सांगतो. मी आधी ध्येयाने कवचावर लक्ष केंद्रित केले. मग मी माझा आत्मविश्वास जागवला आणि मग योग्य दिशेने प्रयत्न करून मी माझे ध्येय साध्य केले. एकाग्रता, आत्मविश्वास आणि प्रयत्न यांची बेरीज केली की त्याचं उत्तर यश असंच असतं.’ मुलांनो, तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती. त्यामुळे तुम्ही कशाचीच भीती बाळगू नका.”
मुलांना काय कळायचे ते कळले. सर पुढे म्हणाले, “मुलांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज एक पदार्थ खायचा तो म्हणजे ‘आइस्क्रीम’.” मुलांना कळेना सर काय म्हणतात ते. मग सरच म्हणाले, “अरे, आइस्क्रीम म्हणजे जे विरघळून जातं ते नाही बरं. हे आइस्क्रीम वेगळं आहे. यातील ‘आ’ म्हणजे आत्मविश्वास, ‘इ’ म्हणजे इच्छाशक्ती, ‘स’ म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, ‘क्री’ म्हणजे क्रियाशीलता आणि ‘म’ म्हणजे महत्त्वाकांक्षा. हे तर वेगळंच आइस्क्रीम!” मुलांनी टाळ्या वाजवल्या. परिपाठ संपला. मुलं आपापल्या वर्गात गेली.
रिया आपल्या जागेवर बसून सरांच्या परिपाठातील बोलण्याचाच विचार करू लागली. आपणही आपली भीती घालवली पाहिजे. संकटांना, अडचणींना कशाला भ्यायचं . उलट संकटांना संधी मानून त्यावर मात करायची आपण.
तेवढ्यात सरोदे सर वर्गात आले आणि तिची विचारांची शृंखला तुटली. सर म्हणाले, “अरे, आपल्या कमलची जिद्द नाटकात काम करणाऱ्या सोनालीची तब्येत खूप बिघडलीय. ग्रामीण बोलीभाषेतलं नाटक आहे. दुसरी कोणती मुलगी कमलची भूमिका करण्यासाठी येईल का? सगळा वर्ग गप्प. शेवटच्या बाकातून रिया हळूच उभी राहिली. तिच्यात कुठून बळ आलं कुणास ठाऊक. ती म्हणाली, ” सर, म्या करील नाटकात काम. गावाकडं साळत म्या केलंय नाटकात काम.” तिचं बोलणं ऐकून वर्ग हसला. सर पटकन मुलांना म्हणाले, “काय रे, हसायला काय झालं तुम्हाला?” वर्ग एकदम गप्प झाला.
मग सर रियाला म्हणाले, “रिया…! मला तुझं खूप कौतुक वाटतं. स्वतःहून नाटकात काम करायला तयार झालीस तू. शाब्बास…! लक्षात ठेव बाळा, कोणी कौतुक करो वा टीका, दोन्ही आपल्या फायद्याचेच असते. कारण कौतुक प्रेरणा देते आणि टीका आपल्याला सुधारण्याची आणखी एक संधी. त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार करू नकोस. घाबरू नकोस.”
बालनाट्य स्पर्धेला दिवस कमी उरले होते आणि नाटकाची तयारी तर अजून बरीच बाकी होती. रियाने दिवसरात्र एक करून संवाद आधी पाठ केले. नाटकाच्या तालमीला ती खूप वेळ देऊ लागली. तिचा लहान भाऊ परशुराम तिच्या सोबतच असायचा.
अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. रियाच्या मनात धाकधूक होतीच. पण तिने आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. नाटक सादर झाले. रियाने आपले काम चोखपणे पार पाडले. एकूण दहा शाळांची दहा नाटकं स्पर्धेसाठी होती. दिवसभर स्पर्धा चालल्या. लगेच संध्याकाळी विजयी नाटकाचे नंबर सांगितले जाणार होते. सगळेजण आपापल्या मनात नाटकाच्या नंबरांविषयी आडाखे बांधत होते. शेवटी स्पर्धेच्या निकालाची वेळ आली. ‘कमलची जिद्द’ नाटकाचा तिसरा नंबर आला. उत्कृष्ट अभिनयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मात्र रियाला जाहीर झालं. नाव जाहीर होताच रियाचे डोळे भरून आले. तिला व्यासपीठावर जाऊन बक्षीस घ्यायचे सुचेना. मुलांनी जल्लोष केला. शेवटी सरोदे सरच तिला व्यासपीठावर घेऊन आले. परीक्षकांनी तिच्या हातात बक्षीस दिलं आणि तिला बोलण्यासाठी माईकही दिला. तिने सरांकडे पाहिले. सरांनी मानेनेच खुणावलं, ‘घाबरू नकोस बोल.’
रिया म्हणाली, “मला हे बक्षीस घेऊन आभाळाएवढा आनंद झालाय. माझ्या सरांनीच माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. यशाकडं जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळंच उघडतो. हे या बक्षिसानं आज सिद्ध करून दाखवलं. सर्वांचे खूप खूप आभार!” रियाने बक्षीस सरोदे सरांच्या हाती दिलं.
का कुणास ठाऊक, सरोदे सरांचेही डोळे नकळत आता भरून आले होते.