सुंदर ती दुसरी दुनिया..!

लेखक : प्रवीण टोकेकर

डिस्नेविश्वाच्या निर्मितीच्या प्रारंभीच्या क्षणांना यंदा शंभर वर्षं पूर्ण होतील. ‘इमॅजिनिअरिंग’ – इमॅजिनेशन आणि इंजिनिअरिंगचा एक कल्पक मिलाफ डिस्नेनं जगासमोर ठेवला. ‘डिस्ने रेनेसाँ’ उभा करताना तंत्रज्ञानाबरोबर फरफटत न जाता डिस्नेच्या कलावंतांनी आशयाला मात्र ढका लागू दिला नाही.

घराच्या परसदारातल्या बागेत झुडपात खसखस झाली म्हणून ॲलिसनं बघितलं तर – ससा! अबदुल-गबदुल ससा, ससा स.. ससा की कापूस जसा!

ससोबा धावला. मागोमाग ॲलिस… पळापळ करून ससोबा एका बिळात गडप झाले. बिळात वाकूनवाकून ॲलिस बघू लागली

नि काय! काहीतरी झालं आणि धाडकन ती बिळातच पडली. गडगडत, भेलकांडत, आरडतओरडत ॲलिस थेट तळात… तळात काय होतं?

तिथं होती एक नवलनगरी… वंडरलँड!

या सुविख्यात परीकथेप्रमाणेच पुढे घडलं. परीकथा खोट्या नसतात. खऱ्याच असतात. आपण त्यांना उगाचच खोट्या समजतो. नवलनगरीतल्या ॲलिसला जशी पळणारी झाडं, जादूची मांजर्डी नि बोलणारे बेडूक भेटले, तसंच काहीसं गेल्या शतकात सुरूवातीला घडलं. महायुद्धाचे जीवघेणे खेळ खेळणाऱ्या माणसाच्या दुनियेशेजारीच एक नवलनगरी होती.

अवघं जग जणू त्या ससोबाच्या बिळात ॲलिससारखं कोसळलं, आणि नवलनगरीत पोचलं. त्या नवलनगरीचं नाव होतं- डिस्नेलँड. आणि तिचा निर्माता होता, वॉल्टर इलियास डिस्ने.

त्या नवलनगरीला आता शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. यंदाचं वर्ष तिच्या जन्मशताब्दीचं.

गेल्या शतकाच्या सुरुवातीलाच पहिल्या महायुद्धाचे ढग जमत होते, त्याकाळात अमेिरकेतल्या मिसुरीजवळच्या एका शेतावर वॉल्ट आणि त्याचा भाऊ रॉय आपल्या काकांची गुरं राखायचे. शेतावर मज्जा करायचे. घोडे, बैल, बदकं, कुत्री, मांजरी… शेतघरावर धमाल होती. तिथं छोट्या वॉल्टला वृत्तपत्रातली व्यंग्यचित्रं भुरळ घालायची. तोही मग कागद-पेन्सिल घेऊन बसायचा. पानं, फुलं, प्राणी गमतीदार पद्धतीनं काढून बघायचा. तेव्हा त्याचं वय साताठ वर्षांचं असणार. पुढे तो मिसुरीतच राहायला आला. वडिलांची परिस्थिती फार काही ग्रेट नव्हती. ग्रेट कसली, बेकारच होती. वॉल्ट आणि रॉय ही दोघंही भावंडं सकाळ-संध्याकाळ पेपरची लाइन टाकायला जात. मधल्या काळात शाळा आणि संध्याकाळी उशिरा आर्टस्कूलच्या मास्तरांची शिकवणी. असं सहा वर्षं चाललं.

ज्याचं बालपण असं जगण्याच्या संघर्षात गेलं, त्यानं पुढे कित्येक लाख मुलामुलींची बालपणं सोनेरी करून टाकली. सलाम त्या वॉल्ट डिस्नेला. एवढ्या कामगिरीकरता त्याचे आभार मानलेच पाहिजेत. संघर्षात तो रडत बसला नाही. किंबहुना मोठा झाल्यावरही त्यानं आपलं बालपण किती कष्टाचं होतं, याची फार चर्चा होऊ दिली नाही. त्याच्या चरित्रांमध्ये काही प्रमाणात उल्लेख येतो, तेवढाच.

त्या तसल्या संघर्षाच्या काळात वॉल्ट आणि रॉय डिस्नेच्या डोळ्यांत फक्त स्वप्नं होती. तिथंच त्यांच्या मनात बहुधा नवलनगरीचं बीज पडलं असणार. वॉल्ट तर भलताच कलाकार पिंडाचा होता. स्वस्थ बसणं त्याला माहीतच नव्हतं. सतत काही ना काही उद्योगात तो गुंतलेला असायचा. जेमतेम अठरा वर्षांचाही नव्हता, तेव्हा कागदपत्रात तिकडम् करून त्यानं चक्क फौजेत घुसण्याचा खटाटोप केला. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून घुसलाही! त्याला फ्रान्सच्या आघाडीवर धाडण्यात आलं. पण तो तिथं पोहोचेपर्यंत युद्धविरामच झाला. मग काय! तिथं त्यानं रिकाम्या वेळेत आपली रुग्णवाहिकाच रंगवून काढली. मस्तमस्त चित्रं होती, त्या गाडीवर…

ही नुसती सुरुवात होती.

पुढे घरी परतल्यावर त्यानं एका स्थानिक स्टुडिओत शिरकाव करून कार्टून कशी करतात हे शिकून घेतलं. त्याकाळी अॅनिमेशनचं तंत्र फारच बेसिक अवस्थेत होतं. भरमसाठ चित्रं काढावी लागत. त्यातल्या युक्त्याप्रयुक्त्या वॉल्टनं शिकून घेतल्या. मग स्वतःच केली सुरुवात.

त्याकाळी स्थानिक सिनेमागृहात सुरुवातीला छोटीशी कार्टून फिल्म दाखवण्याची पद्धत होती. ती डिस्नेचा स्टुडिओ बनवत असे. त्याचवेळी त्यानं ‘ओस्वाल्ड द रॅबिट’ नावाचं एक कार्टून जन्माला घातलं होतं. हे वॉल्ट डिस्नेचं पहिलंवहिलं कार्टून. पण त्याचे हक्क काही त्याच्याकडे राहिले नाहीत. युनिव्हर्सल स्टुडिओकडून नव्या कार्टून फिल्मची ऑफर तर आली होती. मग वॉल्टनं एक दिवस बसल्याबसल्या एक कार्टून व्यक्तिरेखा कागदावर उतरवली.

मोठ्या कानांचा, मोठ्या डोळ्यांचा हसरा, बोलका मॉर्टिमर माऊस!

मॉर्टिमर हे नाव अगदीच जुनाट आणि खेडवळ आहे, असं वॉल्टची पत्नी लिलियन म्हणाली. तीही स्वतः चांगली चित्रकार होतीच. मग मॉर्टिमरचा झाला ‘मिकी माऊस’. डिस्नेच्या नवलनगरीचा हा खऱ्या अर्थानं प्रारंभ होता, असं म्हटलं जातं.

डिस्नेविश्वाच्या निर्मितीच्या या प्रारंभीच्या क्षणांना यंदा शंभर वर्षं पूर्ण होतील. कारण१९२३च्या ऑक्टोबरातच वॉल्ट डिस्नेच्या मेंदूनं नवं सुंदर स्वप्न घडवलं होतं. हो, आपल्याला स्वप्न ‘पडतात’, वॉल्ट डिस्ने ती ‘घडवत’ असे.

डिस्नेच्या चाहत्यांनी याच निर्मितीच्या सोहळ्याची जन्मशताब्दी यंदा वर्षभर साजरी करण्याचं ठरवलं आहे. डिस्नेच्या कार्टूननं वेडावलं नाही, असं पोर या जगात नसेल. पोराटोरांचं सोडा, पोक्त म्हणवणारे गंभीर चेहऱ्याचे काकालोकही टीव्हीच्या पडद्यावर डोनल्ड डक किंवा मिकी माऊस दिसला की हमखास रेंगाळतात. ही जादू डिस्नेच्या प्रतिभेची. त्याच्या स्वप्न घडवण्याच्या अफलातून क्षमतेची. त्याला एक कुर्निसात तो बनता है!

***

मनोरंजन ही काही गमतीची गोष्ट नाही. म्हणजे तुम्हाआम्हासारख्या सामान्यांसाठी ती गमतीचीच गोष्ट आहे, पण ज्यांना मनोरंजन करायचं असतं, त्यांना ते फार गंभीरपणानं करावं लागतं. एखाद्याला हसवणं, आनंदित करणं ही काही खायची गोष्ट नाही. त्याला प्रतिभेचं देणं असावं लागतं. वॉल्ट डिस्ने तर प्रतिभावंतांचा शिरोमणी होता.

जगभरातल्या बच्चेकंपनीला त्यानं कायमचे सवंगडी मिळवून दिले. सुंदर सुंदर परीकथा आणि गोष्टी अक्षरशः ‘रंगवून’ सांगितल्या. त्याचे कार्टूनपट रंगीतसंगीत झाले, आणि दुनियाच बदलली. त्याच्या चंदेरी दुनियेतल्या कारकिर्दीकडे नजर टाकली तरी डोळे दीपतात. त्यानं निर्माण केलेल्या असंख्य चित्रपटांना लोकांनी डोक्यावर घेतलं. ऑस्करची तर त्याला एकंदर ५९ नामांकनं मिळाली. एवढंच नाही, तर त्यातल्या बावीस बाहुल्या आज वॉल्ट डिस्ने म्युझियममध्ये दिमाखात ठेवलेल्या दिसतात. मिकी माऊस, डोनाल्ड डक, गूफी, बॅम्बी हरिण यांचा निर्माता बाप एवढीच त्याची ख्याती नाही. तेवढीच असती तरी भागलं असतं.

पण या कार्टून व्यक्तिरेखांमध्ये अडकून न पडता त्यानं आणखी मोठी स्वप्नं घडवणं चालू ठेवलं. कार्टूनपटांच्याबरोबरीनं नॉर्मल चित्रपट पेश केले. त्यातही भरीव कामगिरी केली. ‘ॲलिस इन वंडरलँड’, ‘पीटर पॅन’, ‘पिनोकिओ’, ‘स्नो व्हाइट आणि सात बुटके’, ‘ब्यूटी अॅण्ड द बीस्ट’ अशा गाजलेल्या परीकथा त्यानं पेश केल्याच, पण जोडीला ‘मेरी पॉपिन्स’ सादर केला. ‘जंगल बुक’, ‘द लायन किंग’ हेही ओघानं आले, पण तोवर वॉल्ट डिस्ने तुमचं आमचं जग सोडून गेला होता…

गोष्ट सांगणंही मुळात अवघड बाब. ती मस्तपैकी सांगणं त्याहून अवघड, आणि आयुष्यभर लक्षात राहील अशारितीनं सांगणं म्हणजे तर अशक्यच. पण ते वॉल्ट डिस्नेनं हसत हसवत करून दाखवलं. पी.एल. ट्रॅवर्स नावाच्या लेखकाची ‘मेरी पॉपिन्स’ ही कहाणी १९४०च्या सुमारासच वॉल्ट डिस्नेच्या वाचनात आली होती. तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं. ही कहाणी पडद्यावर आणायचीच असा त्यानं चंग बांधला. आपल्या नातवंडांना ही कहाणी ‘बघता’ आली पाहिजे, हा त्याचा हेतू होता. पण मेरी पॉपिन्स लिहिणारी व्यक्ती, म्हणजे पी.एल. ट्रॅवर्स हा लेखक नसून लेखिका आहे, त्यातही ती अत्यंत विक्षिप्त लेखिका आहे, हे त्याला कळलं. ट्रॅवर्सनं त्याची ऑफर क्षणात धुडकावून लावली, पण डिस्नेनं हट्ट सोडला नाही. चिकाटीनं प्रयत्न सुरू ठेवले, अखेर दहाएक वर्षं झुलवल्यानंतर ट्रॅवर्सनं सत्राशेसाठ अटी घालून आपल्या कथेचे हक्क डिस्नेला विकले. चित्रपट पूर्ण झाला. लोकांनी डोक्यावर घेतला, अगदी ऑस्कर पुरस्कारानं पायघड्या घातल्या. पण लेखिका ट्रॅवर्सबाईनं वॉल्ट डिस्नेच्या चित्रपटाला अतोनात नावं ठेवली. ‘‘मेल्यानं माझ्या गोष्टीची पार वाट लावलीन! घाणेरडं संगीत, दळिद्री, खोट्या व्यक्तिरेखा आणि त्यात त्याची ती भिकार कार्टून्स… शी:! कुठून दुर्बुद्धी झाली, आणि त्याला हक्क विकले, असं झालंय मला…’’ इति ट्रॅवर्सबाई! तरीही वॉल्ट डिस्नेनं त्यांना चुकूनही दुरुत्तर केलं नाही. उलट त्यांना भेटून वैयक्तिक संबंध चांगलेच ठेवले.

असं कित्येकांच्या बाबतीत घडलं. याला कारण वॉल्ट डिस्नेला आपल्या दुनियेतले हे ताणेबाणे मंजूरच नव्हते. त्याला स्वप्न पडू लागली होती, डिस्नेनगरीची. अशी नगरी जिथं भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ एकत्र नांदतील. जिथं दु:खाला थारा नसेल.

आ चल के तुझे मैं ले के चलूं,

इक ऐसे गगन के तले,

जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो,

बस, प्यारही प्यार पले…

इक ऐसी गगन के तले…

या किशोर कुमारच्या गाजलेल्या गाण्याच्या ओळी वॉल्ट डिस्नेचं बहुधा जन्माचं ब्रीद होतं. त्यानं असं दु:खविरहित गगन स्वतः तयार केलं. डिस्नेलँड!

***

डिस्ने एंटरप्रायझेसचा पसारा आता जगभर पसरला आहे. शेकडो कर्मचारी तिथं काम करतात. काही अॅनिमेशन स्टुडिओ चालवतात, काही सिनेमे काढतात. काही कर्मचारी इव्हेंटमध्ये आहेत, तर काही डिस्नेलँडचे कर्मचारी आहेत. डिस्नेलँमधल्या कल्पक राइड हा जगभरातील जनसामान्यांच्या मर्मबंधातली ठेव झाली आहे. अशा राइडची संकल्पना तयार करायची, आणि इंजिनिअरिंगमधलं ज्ञान पणाला लावून त्या प्रत्यक्षात आणायच्या. या कामाला डिस्नेनं ‘इमॅजिनिअरिंग’ असं नाव दिलं होतं. इमॅजिनेशन आणि इंजिनिअरिंगचा मिलाफ होता तो. आज या डिस्ने इमॅजिनिअरिंगनं मानवी दुनियेतल्या मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. मनोरंजनाच्या दुनियेतलं डिस्ने हे आजही अखेरचं नाव आहे. रुपेरी पडद्यावरचं हे जादुई नाव आहेच, पण अनेक देशांमध्ये खऱ्याखुऱ्या नवलनगरी निर्माण करणारी ही जगविख्यात कंपनी आहे. ‘डिस्ने वर्ल्ड’ नावाची अशी नवलनगरी आपण निर्माण करावी, हे वॉल्ट डिस्नेचं फार जुनं स्वप्न होतं. मनातले प्लॅन्स तयार होते. पण ते साकारण्यासाठी अफाट पैसा लागणार होता. ते जमा कसे करायचे?

इथं वॉल्ट डिस्नेची प्रतिभा पणाला लागली. अॅनिमेशन आणि सिनेमात मिळालेला पैसा त्यानं कल्पनाविस्ताराच्या कामात गुंतवला. आपल्या कर्मचाऱ्यांना देशोदेशीचे दौरे करायला लावून आयडिया गोळा करायला लावल्या. त्यातल्या काही निवडक कल्पना त्यानं फुलवल्या… आजही अमेरिका, युरोपातच नव्हे, तर सौदी अरेबिया, सिंगापूर, हाँगकाँग, जपान वगैरेही ठिकाणी डिस्नेलँड उभ्या राहिल्या आहेत, आणि त्या त्या देशाला एक उत्तम पर्यटनस्थळ उपलब्ध झाल्यानं व्यापारउदीमही वाढला आहे. अर्थात डिस्नेलँडची सफर ही काही स्वस्तातली चीज नाही. बख्खळ पैका मोजल्याशिवाय तिथं प्रवेश नाही. खिशात पैसा असेल तर मात्र तुमचं यथाशक्य मनोरंजन करायला तिथली हरेक यंत्रणा सज्ज आहे. आजमितीस डिस्ने विश्वाचा व्यापार सुमारे सव्वादोनशे अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. एखाद्या छोट्याशा देशाची अर्थव्यवस्थाही इतकी मोठी नसेल!

हे सगळं वॉल्ट डिस्नेच्या सुपीक मेंदूत उगवलं होतं. डिस्नेलँडसारख्या मालमत्ता उभ्या करण्याचं त्याचं स्वप्न साकार झालं खरं, पण ते ऐन भरात आलं तेव्हा त्यानं हे जग सोडलं होतं. त्याच्या पश्चात त्याचा भाऊ रॉय यानं ते पुढे रेटलं. ऐंशीच्या दशकात माइक आइस्नर नावाचा एक अॅनिमेशन अधिकारी डिस्नेचा कारभार सांभाळू लागला. त्यानं काळाची पावलं ओळखत कंपनीत आमूलाग्र बदल केले, आणि तिथून पुढे १९८९ साली डिस्ने कंपनीचं पुनरुत्थान झालं. ‘द लिटल मरमेड’ या अॅनिमेशनपटानं डिस्ने कंपनीला नवसंजीवनी दिली. तिथून पुढे कंपनीनं नव्वदीचं दशक गाजवलं.

नव्वदीच्या दशकामध्ये संगणक तंत्रज्ञानाची पाळेमुळे पसरू लागली होती. स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून, जॉर्ज ल्यूकस आदी दिग्गज दिग्दर्शकांनी संगणकाची महती ओळखून ‘ज्युरासिक पार्क’ ते ‘टायटॅनिक’ असे असंख्य महाचित्रपट याच दशकात निर्माण केले. डिस्ने कंपनीनंही संगणक तंत्रज्ञानाशी दोस्ती करून कथाकथनाच्या तंत्रात आधुनिक आणले, त्यासाठी अपरंपार पैसा ओतला. अल्पावधीतच डिस्ने कंपनीला त्याची मधुर फळे चाखायला मिळाली. या यशोगाथेलाच मनोरंजन उद्योगविश्वात ‘डिस्ने रेनेसाँ’ असं संबोधन लाभलं आहे. ते व्यवस्थापन-स्कुलांमध्ये आजही शिकवलंही जातं. त्यावर अनेक पुस्तकं लिहून झाली आहेत.

या सगळ्या प्रवासात तंत्रज्ञानाबरोबर फरफटत न जाता डिस्नेच्या कलावंतांनी आशयाला ढका लागू दिला नाही. आशय नेहमीच कालसुसंगत आणि तंत्रज्ञानाच्या वर राहिला.

व्यवस्थापन, अर्थशास्त्र, व्यापार हे सगळं ठीक आहे. ते परीघावरचं म्हणावं लागेल. कारण डिस्नेच्या उद्योगात एक चीज नायाब मानली जाते. ती म्हणजे कल्पकता! मनोरंजन हा कल्पनेचा खेळ असतो. या कल्पनेभोवती तर सारा डोलारा फिरत असतो. तिला केंद्रीभूत मानून आज डिस्नेनं इतका मोठा पल्ला मारला. मनोरंजन हे स्वस्त नसतं, हेही अधोरेखित करून ठेवलं.

अर्थात हा शंभर वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. चिक्कार चढउतार बघावे लागले आहेत त्यासाठी. बाळगोपाळांसाठी गमतीदार गोष्टी सांगणाऱ्या कंपनीनं शेवटी अमेरिकी छापाचा भांडवलवादी व्यापारच केला, अशीही टीका डिस्ने कंपनीवर केली जाते. त्यात तथ्य असेलही. पण तरीही डिस्नेच्या कल्पकतेचं कौतुक आणि गुणवत्तापूर्ण कलाकृती यांना दाद दिल्याशिवाय राहता येणार नाही. डिस्नेच्या प्रवासाचं यथार्थ चित्रण करणारं एक ‘द डिस्ने स्टोरी : 100 इयर्स ऑफ वंडर’ नावाचं एक पुस्तकही बाजारात आलंय. ते आवर्जून वाचावं-बघावं असं आहे.

यंदाचं शताब्दी वर्ष झोकात साजरं करायचं, असं ठरलंय. त्यासाठी डिस्ने कंपनीनं नवनवे उपक्रम जाहीर केले आहेत. फिरतं प्रदर्शन, टूर्स, पर्यटनाचे कार्यक्रम, दुकानांमधली डिस्ने उत्पादनं यांची रेलचेल या वर्षी होणार आहे. नवं ‘टूनटाऊन’ उघडलं गेलंय. डिस्ने कंपनीची पाच आलिशान जहाजं सातासमुद्रात फिरत असतात. त्यात आणखी तीन जहाजांची भर पडणार असून ‘डिस्ने रिसॉर्ट्‌स आणि टूर्स’ नव्या दमानं पर्यटनाच्या क्षेत्रात उतरणार आहे. असं बरंच काही घडेल यंदाच्या वर्षी.

पिढ्यानपिढ्या या कंपनीनं बच्चेकंपनीला रिझवलं. छानदार जगण्याचे धडेच जणू चॉकलेटच्या चांदीत गुंडाळून दिले. चित्रं काढून गोष्टी सांगणाऱ्या माणसाची ही गोष्ट. ‘या बाळांनो, सारे या, लवकर भरभर सारे या…’ असे सांगणाऱ्या डिस्नेनं नवभूमी खरोखर उभी केली, आणि दाखवली. ‘या नगराला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया’ अक्षरश: वसवली…

वॉल्ट डिस्ने नावाचा तरुण परीकथा सांगता सांगता स्वतःच एक परीकथा बनून गेला, त्याची ही गोष्ट आहे.

0
0
error: Content is protected !!