जागतिक चर्चेचा विषय…

लेखक: सारंग खानापूरकर

या हिमवादळाकडे कोणीही केवळ ‘एक नैसर्गिक आपत्ती’ या दृष्टिकोनातून पाहिले नाही. हवामान बदलामुळे ज्या तीव्र नैसर्गिक घटना घडत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले गेले. बहुतेक प्रमुख वृत्तपत्रांनी, ‘अशी आपत्ती आपल्या देशातही येऊ शकते,’ याची जाणीव आपल्या वाचकांना करून देत पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ऐन नाताळच्या काळात हिमवादळाने अमेरिकी नागरिकांना घरात बसायला लावले. या हिमवादळाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. रस्त्यांवरून घसरणाऱ्या गाड्या, बर्फात गोठलेले प्राणी, बर्फाच्या चादरीखाली गेलेले रस्ते आणि घरे यांची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पसरली. जगातील प्रमुख वृत्तपत्रांनीही या वादळाची सविस्तर माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचविली. वादळ अमेरिकेत आले असले तरी सध्या जागतिक हवामान बदलाच्या समस्येबाबतचे लोकांचे भान वाढले असल्याने त्या दृष्टिकोनातूनच या घटनेकडे पाहिले गेले. या हिमवादळाचा जगभरातल्या विविध वृत्तपत्रांनी घेतलेला आढावा…

निसर्गाबरोबर युद्ध

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे वार्तांकन करण्यावर भर दिला. या वृत्तपत्रात, न्यू यॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी होशूल यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. ‘हे निसर्गाबरोबचे युद्ध आहे,’ असे त्यांनी आपल्या राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सांगितले. या युद्धात टिकून राहायचे असल्यास ‘आपापल्या घरातच शांत बसा,’ असा सल्लाही त्यांनी दिला होता. ‘रात्रीतून ३० ते ४० इंच पाऊस पडतो आहे. हा या शतकातील अत्यंत विचित्र प्रकार आहे,’ असे सांगत होशूल यांनी, हिमवादळामुळे बफेलो या शहराच्या झालेल्या अवस्थेमुळे धक्का बसला असल्याचे सांगितले.

‘बीबीसी’ने मांडली पर्यटकांची व्यथा

ब्रिटन आणि अमेरिकेतील नागरिकांचे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे, ‘बीबीसी’ने हिमवादळामुळे झालेल्या हानीचे वार्तांकन करतानाच नाताळच्या पर्यटनाच्या काळातच हजारो विमान उड्डाणे रद्द झाल्याने झालेल्या नुकसानीच्या वार्तांकनालाही चांगली प्रसिद्धी दिली. अनेक दिवसांपासून प्रवासाचे नियोजन करून विमानांची वाट पाहणारे, उड्डाणे रद्द झाल्याने हाल होणाऱ्या पर्यटकांची व्यथा ‘बीबीसी’ने मांडली. हा सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आणि नैराश्‍य आणणारा आहे, अशी प्रतिक्रिया तालिया जोन्स या प्रवासी महिलेने व्यक्त केली. ती आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जात होती. मात्र, विमानसेवा ठप्प झाल्याने या सुटीत वडिलांना भेटता येणार नसल्यामुळे ती फारच निराश झाली होती. तिच्यासारखीच परिस्थिती इतर हजारो प्रवाशांची होती. अमेरिकेतील सर्वांत मोठी विमान कंपनी मानल्या जाणाऱ्या ‘साऊथ वेस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब जॉर्डन यांना प्रवाशांचे हाल होत असल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली.

शेकडो बॅगा पडून

दीर्घ सुटीचे नियोजन करून विमानतळावर गेलेल्या प्रवाशांनी ‘चेक-इन’ करून आपल्या बॅगा विमान कंपनीच्या हवाली केल्या होत्या. मात्र, विमाने रद्द झाल्याने असे बॅगांचे ढीग विमान कंपनीकडे जमा झाले आहेत. अनेक तास वाट पाहून काहींना आपले सामान परत मिळाले, मात्र वैतागलेले अनेक जण तसेच घरी गेल्याने आता त्यांच्या बॅगांचे करायचे काय, हा प्रश्‍न विमानतळ प्रशासनाला पडला असल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.

मोटारीतच झाला असता अंत

‘द गार्डियन’ या वृत्तपत्रामध्ये वादळामुळे रस्त्यावरच मोटारीत अडकून पडलेल्या एका वडिलांची कहाणी प्रसिद्ध झाली. मेरीलँड येथे दितजाक इलूँगा हे आपल्या सहा आणि सोळा वर्षांच्या मुलींसह मोटारीतून नाताळनिमित्त आपल्या नातेवाइकांना भेटायला जात होते. मात्र, हिमवादळात त्यांची गाडी रस्त्यातच अडकली. अनेक तास तिथेच थांबावे लागल्याने त्यांची मोटार बर्फाखाली जवळपास गाडली गेली होती. बाहेर प्रचंड गार वारे असल्याने त्यांना मोटारीचे इंजिन सुरू ठेवून आतमध्ये ऊब निर्माण करावी लागत होती. अनेक तासांनंतर इंधन संपू लागले. आता आपल्या मुलींसह गाडीतच मृत्यू होणार, अशी इलूँगा यांना भीती वाटत होती. अखेरीस जिवावर उदार होत ते सर्वजण कसेबसे मोटारीबाहेर पडले आणि गार वाऱ्यांमध्येच, हिमवर्षाव होत असतानाच निवारा शोधू लागले. काही अंतर गेल्यावर एका कुटुंबाने त्यांची अवस्था पाहून आसरा दिला. आसरा मिळताच

इलूँगा यांच्या मनावरील दडपण दूर होऊन त्यांना रडूच फुटले.

जपानलाही तडाखा

अमेरिकेबरोबरच जपानलाही हिमवादळाने तडाखा दिला. ‘जपान टाइम्स’ने अमेरिकेबरोबरच स्वतःच्या देशातील नागरिकांचे वादळामुळे जे हाल झाले त्याचे वर्णन केले आहे. जपानमध्ये रस्ते बर्फाखाली गाडले गेल्याने नागरिकांना मदत पोहोचविण्यातही प्रशासनाला अडचण येत होती. घरातून बाहेर पडणे तर दूरच, पण घरांमध्येही लोकांना वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करावा लागत होता. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने घरात ऊब निर्माण करण्याचे अथवा ती टिकवून ठेवण्याचे आवाहन जपानी नागरिकांसमोर होते. घरासमोरील बर्फ हटविताना काही नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेकांचा मृत्यू निसरड्या रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये झाला. ‘जपान टाइम्स’ने या परिस्थितीचे वर्णन करतानाच हवामान बदलामुळेच हा प्रकार घडत असल्याचेही निरीक्षण नोंदविले. त्यांनी याबाबतचे तज्ज्ञांचे लेखही प्रसिद्ध केले आहेत.

गाड्या घसरून अपघात

बर्फामुळे रस्ते निसरडे झाल्याने अक्षरशः माणसे घसरून पडावीत, तशा रस्त्यांवरून घसरत मोटारी एकमेकींवर आदळत होत्या. यामुळे अनेक अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाला. गाड्यांची चाके रुतून बसत होती. महामार्गावर कडेला बंद पडलेल्या, आदळलेल्या, बर्फाखाली गेलेल्या शेकडो मोटारींचे सविस्तर वार्तांकन चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ने केले आहे.

याशिवाय, जवळपास सर्व भारतीय प्रसार माध्यमे, ‘अल जझिरा’, ‘द डॉन’, ‘तेहरान टाइम्स’ तसेच आफ्रिकेतील माध्यमांनी अमेरिकेतील हिमवादळाची तीव्रता त्यांच्या वाचकांपर्यंत पोहोचवली. सुमारे ८० जणांचा बळी घेतलेल्या, नायगारा धबधबा गोठवणाऱ्या, साठ टक्के अमेरिकी नागरिकांना नाताळच्या सुटीत घरातच कोंडून ठेवणाऱ्या, अनेक राज्यांत वीज पुरवठा खंडित करणाऱ्या या हिमवादळाकडे कोणीही केवळ ‘अमेरिकेवर आलेली एक नैसर्गिक आपत्ती’ या दृष्टिकोनातून पाहिले नाही. हवामान बदलामुळे ज्या तीव्र नैसर्गिक घटना घडत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले गेले. बहुतेक प्रमुख वृत्तपत्रांनी, ‘अशी आपत्ती आपल्या देशातही येऊ शकते,’ याची जाणीव आपल्या वाचकांना करून देत पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

0
0
error: Content is protected !!