डिसीज एक्स

सर्दीपडशावर औषध घेत असाल तर सर्दी आठवड्याभरात बरी होते, आणि औषध घेत नसाल तर सात दिवसांत…

सर्दीपडशाने हैराण झालेल्या प्रत्येकाला हा एक विनोद हमखास ऐकावा लागतो, किंवा काहीवेळा आपण भोगत असलेला त्रास सुसह्य व्हावा यासाठी सर्दीपडशाने हैराण झालेले बरेचजण हा विनोद बाकीच्या सर्दीपडसं न झालेल्यांना ऐकवत असतात.

सध्याच्या काळात मात्र हा विनोद कालबाह्य होतो आहे, सर्दीपडसे-खोकला-ताप यातले काहीही झाले असेल तर दुर्लक्ष करू नका, आजारपण अंगावर काढू नका, वेळेत वैद्यकीय उपचार घ्या, असाच सल्ला सर्व वैद्यकशास्त्री सध्या देत आहेत. हा सल्ला घ्यावासा वाटला कारण गेल्या काही आठवड्यांपासून देशाच्या अनेक भागांतून येणाऱ्या फ्लूसदृश लक्षणे असलेल्या आजाराच्या बातम्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केल्यानुसार एच३एन२ या विषाणूमुळे फ्लूचाच एक उपप्रकार असणारा हा आजार होतो आहे. या आजारात तापाबरोबर येणारा खोकला लांबतो आहे, असे या संदर्भात झालेल्या पाहण्यांमध्ये दिसून आले आहे.

माणसाच्या विजिगीषू वृत्तीची कसोटी पाहणाऱ्या सार्स-कोव्ह-२ नावाच्या न दिसणाऱ्या विषाणूने अनिश्चिततेचे एक आव्हान आपल्या सगळ्यांसमोर उभे केले त्याला आणखी काही दिवसांनी तीन वर्षे होतील. जग कोविड-१९च्या साथीच्या विळख्यात सापडलेले असतानाच जगभरातले संशोधक आपल्याला यापुढच्या काळात सावध राहण्याविषयी सांगत होते. ही आपल्या आयुष्यातली शेवटची महासाथ नसणार, असे सांगतानाच येणाऱ्या काळात झुनोटिक म्हणजे प्राण्यांच्या संपर्कातून माणसांमध्येही पसरणारे आजार वाढत जातील आणि भविष्यात माणसासाठी तो एक मोठा धोका ठरू शकतो, यावर या संशोधकांचा भर होता. उंदरांच्या शरीरावरील संसर्गित पिसवांमुळे प्लेग होतो हे आपल्याला सहाव्या शतकापासून माहीत होते. पण गेल्या वीस वर्षांमध्ये सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, एच१एन१, झिका अशी प्राणिजन्य आजारांची एक मालिकाच आपल्यासमोर उभी ठाकल्याचे लक्षात येते.

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठ वर्षांपासून नव्याने उद्‌भवणाऱ्या आणि सर्वाधिक घातक ठरू शकणाऱ्या किमान दहा संसर्गजन्य रोगांची –इमर्जिंग इन्फेक्शस डिसीजची –यादी करायला सुरुवात केली आहे. अज्ञाताविषयी सावधगिरी बाळगायची आणि आधीच्या अनुभवांतून शिकलेल्या धड्यांतून प्रतिकाराची काही किमान तयारी करण्याचा प्रयत्न करायचा, हा या यादीचा उद्देश. दरवर्षी या यादीवर नव्याने विचार होतो. सहा वर्षांपूर्वी आरोग्य संघटनेने या यादीत दहाव्या स्थानी ‘डिसीज एक्स’ म्हणजे ‘ज्ञात असण्याच्या रेषेवर रेंगाळणारा अज्ञात आजार’ समाविष्ट केला आहे. कोविडच्या महासाथीमुळे या प्रयत्नाची गरज नव्याने अधोरेखित झाली. आज जगभर असे आजार, त्या आजारांना कारणीभूत ठरणारे विषाणू, त्यांमध्ये होणारी उत्परिवर्तने अशा मुद्द्यांवर संशोधन सुरू आहे.

प्राण्यांच्या संपर्कातून माणसांमध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांसोबतच, जागतिक तापमानवाढीचाही आजाराच्या नव्या साथींना हातभार लागेल असे रॉयल सोसायटीच्या एका अलीकडच्या अभ्यासात म्हटले आहे. हिमनद्या आणि ध्रुवीय प्रदेशांचे कायमस्वरूपी गोठलेले भाग तापमानवाढीमुळे वितळताना त्यातले गोठलेले विषाणू बाहेर पडण्याच्या, तापमानवाढीमुळे स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांना त्यांचा संसर्ग होण्याच्या आणि त्यातून ते माणसांमध्ये संक्रमित होण्याच्या शक्यता रॉयल सोसायटीच्या संशोधकांनी व्यक्त केल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त होणारी चिंता, संशोधनांकडून सामोऱ्या येणाऱ्या शक्यता आणि रोजच्या जगण्यातले आपले अनुभव या सगळ्यांतून शिकता येणारा धडा फार काही अवघड नाही. संशोधकांच्या अथक प्रयत्नांमुळे एखादी महासाथ आटोक्यात आणली जाते आणि आपण त्यातून सहीसलामत बाहेर पडतो इथे ही कहाणी संपत नाही. अज्ञाताचा वेध घेण्याच्या आपल्या सहज प्रवृत्तीला आपल्या रोजच्या व्यवहारांचीही जोड आवश्यक ठरते. ज्ञात असण्याच्या रेषेवर रेंगाळणारा, पण तरीही अज्ञात असणारा डिसीज एक्स काय किंवा उत्प्रेरित होत जाणाऱ्या विषाणूंमुळे पसरणारे इमर्जिंग इन्फेक्शस डिसीजच्या यादीतील अन्य आजार काय; कोविडने आपल्याला शिकवलेले धडे आपण विसरलो नसू तर त्यांना हाताच्या अंतरावर ठेवणे शक्य आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

त्यांच्या सांगण्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे, उन्हाळा-हिवाळा-पावसाळा अशा तिन्ही ऋतूंची अनुभूती देणाऱ्या सध्याच्या काळात अगदी साध्या वाटणाऱ्या आजाराकडेही दुर्लक्ष करू नका, आजार अंगावर काढू नका, ‘मला काही होत नाही,’ हा हट्टाग्रह आपल्या हितासाठी आणि आपल्या आजूबाजूंच्याही हितासाठी दूर ठेवा. महासाथीच्या काळात आपणा सर्वांच्या पेहरावाचाच भाग झालेल्या मुखपट्टीचा वापर, नियमितपणे हात स्वच्छ धुणे, चेहरा आणि नाकाला वारंवार स्पर्श करण्याचे टाळणे, सार्वजनिक शिस्तीच्या मूलभूत नियमांचे पालन, योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच औषधे घेणे आणि आवश्यक ती विश्रांती न कंटाळता घेणे यांसारख्या काही सवयी आता यापुढच्या काळात अत्यावश्यक सवयींच्या यादीत ठेवणेच इष्ट असणार आहे.

0
0
error: Content is protected !!