पुन्हा वाहतूक कोंडी

उत्तर माहिती असलेले प्रश्न सुटत नाहीत तेव्हा काय करावे? उत्तर माहिती नसणारा हा आणखी एक प्रश्न. न सुटणाऱ्या प्रश्नांच्या या माहिती असणाऱ्या उत्तरांचे एक सार्वकालिक वैशिष्ट्य म्हणजे हातातल्या उत्तरांनी प्रश्न सुटत नसला तरी त्या उत्तरांबाबत सर्वसाधारणपणे एकमत असते. प्रश्नाला तोंड देणाऱ्या, न देणाऱ्या, लांबूनच प्रश्नाकडे पाहणाऱ्या, प्रश्न सुटत नसल्याने हताश झालेल्या, हातातल्या उत्तरांचे करायचे काय हे न समजणाऱ्या अशा सगळ्यांना हातातली उत्तरे मात्र बव्हंशी मान्य असतात. जगभरातले अब्जावधी लोक रोज अशाच एका प्रश्नाला तोंड देतात. साठा उत्तरांची कहाणी अजून पाचा उत्तरीसुद्धा सुफळ संप्रूण होऊ न शकलेला (आणि कधी काळी होईल का, याचा अंदाजही नसलेला) हा प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा.

‘टॉमटॉम’ या डच कंपनीने यंदा (पुन्हा) आपला वार्षिक वाहतूक कोंडी निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. जगातल्या ५६ देशांतील ३८९ शहरांमधली वाहतूक कोंडी, आणि रोजच्यारोज वाहतुकीचा हा चक्रव्यूह भेदण्याचा तणाव सहन करणाऱ्या असंख्यांच्या वेळेचा अपव्यव, खिशाला बसणारी झळ आणि त्याच्याबरोबरीने इंधनाची नासाडी, त्यातून होणारे प्रदूषण आणि त्याचे परिणाम याचा काजळकोपरा या अहवालाने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.

टॉमटॉमच्या सर्वेक्षणातले निष्कर्ष चिंताजनक आहेत. नागरीकरणाच्या झपाट्याला तोंड देणाऱ्या जगभरातल्या शहरांमधल्या पेट्रोल वापरणाऱ्या वाहनांचा वाहतुकीवरचा खर्च २०२१च्या तुलनेत सत्तावीस टक्क्यांनी आणि प्रवासाचा वेळ सरासरी ६२ टक्क्यांनी वाढल्याचे हा निर्देशांक सांगतो.

शहरांच्या मध्यवर्ती भागांतल्या वाहतुकीचा विचार करता लंडन हे जगातले सर्वात मंदगामी शहर आहे. या निर्देशांकानुसार सहा मैलांच्या (जवळजवळ दहा किलोमीटर) प्रवासाला लंडन शहरात ३६.२० मिनिटे लागतात. ‘सिलिकॉन सिटी’ असे बिरुद मिरवणारे बंगळूर जगातले दुसऱ्या क्रमांकाचे मंदगामी शहर आहे. आणि त्यापाठोपाठ आहेत आयर्लंडची राजधानी डब्लिन, स्नो फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध असणारे जपानमधील सापोरो आणि इटलीतील महत्त्वाचे व्यापारी केंद्र मिलान.

निर्देशांकात विद्येचे माहेरघर असणारे पुणे सहाव्या, राजधानी दिल्ली चौतिसाव्या आणि स्वप्ननगरी मुंबई सत्तेचाळीसाव्या स्थानावर आहेत.

कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने काही काळ रुतून बसलेल्या उद्योगचक्राला गती देताना जगभरात घरातून काम करण्याचा पर्याय स्वीकारला गेला. कोरोनोत्तर जगातही घरून काम, फ्लेक्झिबल वर्क अवर्स सुरूच असले तरी त्यामुळे जगभरातल्या रस्त्यांवरच्या वाहतूक कोंडीत काहीही फरक पडलेला नाही, असेही निरीक्षण टॉमटॉमचे अभ्यासक नोंदवतात.

वाहतूक कोंडीचे बिघडत जाणारे वास्तव पुन्हा नव्याने मांडणारा हा निर्देशांक भारतासह जगभरातली संपत्तीनिर्मितीची महत्त्वाची केंद्रे उपायांची चर्चा होऊनही उपाययोजना न होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मोठी किंमत मोजत आहेत, असे चित्र समोर ठेवतो. वाहतुकीबरोबर ही सगळी शहरे आरोग्य, पाणीपुरवठा, सांडपाण्याचे व कचऱ्याचे व्यवस्थापन, शिक्षण अशा मूलभूत सुविधांवरचे असह्य ताण सहन करीत आहेतच. औद्योगिकरणाचा वेग, गगनचुंबी इमारती, चकचकीत बाजारपेठा ही सारी विकासाठी प्रतीके समजली जात असताना; त्या शहरांतल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडणारे निर्मितीक्षम मनुष्यतास, इंधनाच्या अपव्ययामुळे वाढत जाणाऱ्या खर्चाचा ताण, हवेत मिसळले जाणारे घातक वायू, प्रदूषणामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न आणि वाहतूक कोंडीला रोज सामोरे जाण्याचा मानसिक तणाव नजरेआड करून चालणार नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे वाहतूक कोंडीवरचे उपाय माहिती नाहीत, किंवा त्यावर कधीच, कुठेच चर्चा झालेल्या नाहीत असे नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणे, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने वाढणारी वाहनसंख्या, अपुरी पार्किंग सुविधा आणि त्यापायी वाहने रस्त्याकडेला आल्याने आक्रसणारी रस्त्यांची रुंदी, वाहतूकविषयक नियमांची पायमल्ली अशा कितीतरी कारणांनी वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडत असतो.

सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा तर आपल्याकडे असंख्यवेळा बोलला गेलेला विषय आहे. वाहतूक कोंडीवर अक्सिर इलाज म्हणून तो समस्तांस मान्यही असतो, पण…. !

सध्या अस्तित्वात असणाऱ्या व्यवस्थांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता या मुद्द्यांना पटणारी उत्तरे आणि बस, रेल्वे, मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक पर्यायांची परिणामकारक सांगड घालताना लास्ट माइल कनेक्टीव्हिटीसारख्या उपाययोजना प्रत्यक्षात मिळाल्यास हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वीकारणाऱ्या शहरवासीयांची संख्या वाढू शकेल; अन्यथा उत्तर माहिती असलेले प्रश्न का सुटत नाहीत तेव्हा काय करावे, यावर नुसत्याच चर्चा करण्याखेरीज आपल्या हातात फारसे काही राहणार नाही.

0
0
error: Content is protected !!