
सुधीर फाकटकर
सत्तरीच्या दशकात अवकाश संशोधनाचे पर्व सुरू होत असताना सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत छायाप्रतिमा प्रक्रियेसंदर्भात ‘फोटो इंटरप्रिटेशन इन्स्टिट्यूट’ स्थापन झाली. ‘इस्रो’ आकाराला आल्यानंतर ही संस्था ‘भारतीय सुदूर संवेदन संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग -आयआयआरएस) म्हणून इस्रोशी संलग्न ठेवण्यात आली. इस्रोकडून कृत्रीम उपग्रह प्रणालीचा विकास होत असताना कक्षीय भ्रमणातून विविध वर्णांच्या (स्पेक्ट्रम) माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणाचे तसेच पृष्ठभागाचे चित्रण हा महत्त्वाचा भाग असणार होता. याच अनुषंगाने आगामी कालखंडाचा विचार करत सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) आणि भूमाहिती (जीओइन्फॉर्मेटीक्स) विषयातील उच्च शिक्षण आणि संशोधनात उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्याचे ध्येय भारतीय सुदूर संवेदन संस्थेने बाळगले आहे.
या संस्थेत भौगोलिक विज्ञान, भौगोलिक तंत्रज्ञान. कृषी आणि वन, जलविज्ञान आणि मानवी वस्ती व समुद्री आणि वातावरणीय विज्ञान असे प्रमुख विभाग आहेत. या विभागांअंतर्गत अद्ययावत उपकरणांनी समृद्ध स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. यामध्ये भूशास्त्रविषयक अभियांत्रिकी अर्थात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणारी प्रयोगशाळा तसेच वातावरणातील विविध घटकांचे अवलोकन आणि मोजमाप करण्यासाठी स्पेक्ट्रोफोटोमीटर, सिंटीलोमीटर अशा विविध यंत्रणांचा समावेश असलेल्या प्रयोगशाळा आहेत. सुदूर संवेदन आणि भूमाहितीच्या अनुषंगाने मिळत गेलेली माहिती तसेच त्या माहितीचे विश्लेषण संगणकीय माध्यमातून होत असल्यामुळे विशेष व्याप्ती असलेली ‘महासंगणकीय’ आणि माहिती सुविधा येथे आहे. याखेरीज वातावरणीय निरीक्षण आणि अवलोकनाकरिता डेहराडूनसहीत नैनीताल (उत्तराखंड), गडंकी (आंध्रप्रदेश) आणि माऊंट अबू (राजस्थान) येथे वातावरणीय वेधशाळा उभारलेल्या आहेत.
उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या अनुषंगाने संस्थेत सुदूर संवेदन आणि भूमाहिती क्षेत्रातील आठ विषयांमध्ये विशेष पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. विज्ञान-अभियांत्रिकीच्या पदवी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना इथे संधी मिळू शकते. याशिवाय भूमाहिती विज्ञान, सुदूर संवेदन आणि भू निरीक्षण विषयातील पदव्युत्तर पदवी शिक्षणाचीही सुविधा आहे. त्यानंतर पीएच.डी. करण्याचीही संधी उपलब्ध आहे. याखेरीज इस्रोच्या सहकार्याने लघु मुदतीचे प्रशिक्षण मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे सुदूर संवेदन आणि भूमाहिती क्षेत्रातील वाढत जाणारी व्याप्ती लक्षात घेऊन विविध विषयांच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ शिक्षण प्रणालीच्या माध्यमातूनही या संस्थेचे विविध अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. शिक्षणासंदर्भात इस्रोसहीत भारतातील कृषी विद्यापीठे तसेच संगणकीय संशोधन संस्थांशी आयआयआरएसने सहकार्य प्रस्थापित केले आहे.
पूर्वपरवानगी घेऊन सर्वसामान्य व्यक्तींनाही संस्थेला भेट देता येते.
विसाव्या शतकाच्या मध्यानंतर कृत्रीम उपग्रह प्रणालीच्या वापरातून माणसाने सहज आवाक्यात आणलेले पृथ्वी निरीक्षण हा मानवी वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हवामान, पर्यावरण, कृषी अशा काही विषयांसाठी पृथ्वी निरीक्षण अविभाज्य घटक झालेला आहे. यासाठी बदलत्या काळानुसार या तंत्रविज्ञानासाठी तितकेच कुशल मनुष्यबळ गरजेचे असणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भारतासहीत बाह्य जगातही कार्यक्षेत्र उपलब्ध करून देणारी ही खास महत्त्वाची संस्था आहे.
भारतीय सुदूर संवेदन संस्था (आयआयआरएस)
@ 4, कालिदास मार्ग, डेहराडून 248001
@ संकेतस्थळः https://www.iirs.gov.in