सुधीर फाकटकर
क्षयरोग हा जीवाणुजन्य आजार आता पूर्णपणे बरा होतो. सन १८८२मध्ये पहिल्यांदा माहिती झालेला क्षयरोग विशेषतः अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आपल्या देशात अजूनही दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त व्यक्ती या आजाराच्या बळी ठरतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने १९५६मध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि ब्रिटिश वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने तत्कालीन मद्रासमध्ये पाच वर्षांसाठी क्षयरोग उपचारविषयक केंद्र स्थापन केले होते. पाच वर्षांचा कार्यकाल संपत आल्यानंतर भविष्यकालीन गरज ओळखून उपचारांबरोबरच अभ्यास केंद्र म्हणूनही ते सुरू ठेवण्यात आले. पुढे एकविसाव्या शतकातही या केंद्राचा संशोधनाच्या अनुषंगाने विस्तार होत राहिला व २०११मध्ये हे केंद्र, क्षयरोग क्षेत्रातील सर्वंकष संशोधन, शिक्षण तसेच व्यापक पातळीवर उपचार प्रणालीचा विकास आणि प्रशिक्षणाचा उद्देश ठेवून ‘राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थे’त (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलॉसिस) रूपांतरीत करण्यात आले.
संस्थेत जीवाणुशास्त्र, विषाणुशास्त्र, जैवरसायनविज्ञान, रोगप्रतिकार विज्ञान, साथरोगशास्त्र, चिकित्साविज्ञान, एड्स व औषधनिर्मिती असे अद्ययावत प्रयोगशाळा व उपकरण प्रणालींची जोड असलेले विभाग आहेत. त्या विभागांबरोबरच संख्याविज्ञान, सामाजिक वर्तन आणि इलेक्ट्रॉनिक माहिती प्रक्रिया असे आणखी काही साहाय्यकारी विभाग आहेत. तसेच क्षयरोग संशोधन-अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र दालन आहे. भारताबरोबरच श्रीलंकेतील आरोग्य संस्थांशी जोडलेल्या या संस्थेच्या प्रत्येक विभागाने त्यांच्या विषयात केलेले संशोधन तसेच प्रगती जाणून घेतल्यानंतर क्षयरोगाचे आव्हान लक्षात येते.
सन १९५६मध्ये क्षयरोगविषयक कार्य सुरू झाल्यानंतर ‘मद्रास स्टडी’ म्हणून पहिला उपचारविषयक अभ्यास अहवाल सादर करण्यात आला. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे याबाबत या अहवालामध्ये खात्री देण्यात आली होती. हेच या संस्थेचे मोठे यश म्हणता येईल. त्यानंतर १९७०च्या दशकात क्षयरोगाविरोधात संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने दक्षिण अफ्रिका खंडातील देशांमधील रूग्णांवर उपचारादरम्यान ‘डॉट्स’ उपचारपद्धत विकसित केली. रुग्णापर्यंत पोहोचून कमी कालावधीत क्षयरोग निर्मूलन करणारी ही वैशिष्ट्यपूर्ण उपचारपद्धती आहे. ‘डॉट्स’ उपचारपद्धतीच्या भारतातील चाचण्या यशस्वी करत या संस्थेने भारतात ‘डॉट्स’ अंमलात आणण्यास सुरुवात केली. क्षयरोगविषयक विविध प्रकारचे संशोधन साध्य करत या संस्थेकडून आत्तापर्यंत अकराशे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत.
या संस्थेत सूक्ष्मजीवशास्त्र, जैवमाहिती तंत्रज्ञान, रेण्वीय जीवशास्त्र तसेच क्षयरोगासंबंधीत वैद्यकीय विषयांमध्ये पीएच.डी. तसेच त्यापुढेही संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या विषयातील अभ्यासू व्यक्तींसाठी इथले संशोधन पुस्तिका, शोधनिबंध तसेच अहवालांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच आरोग्याच्याही नवनवीन समस्या निर्माण होत असताना आपल्या देशासाठी क्षयरोग उपचार आणि निर्मूलनाचे आव्हान अद्यापही टिकून आहे. याचाच विचार करत या संस्थेने मागील दशकात तब्बल पाच हजार व्यक्तींना थेट व्यक्तिगत पातळीवर जाऊन क्षयरोग उपचार करण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.
- राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था
- क्रमांक 1, मेयर साथियामुर्ती मार्ग,
- चेटपेट, चेन्नई 600031
- संकेतस्थळः https://www.nirt.res.in