अंदाज अपना अपना

भूषण महाजन

अर्थसंकल्प कितीही चांगला मांडला असला तरी बाजारावर अदानी संबंधित बातम्या व परदेशी संस्थांच्या धडकून विक्रीचे सावट आहे. ते जाण्यास काही दिवस लागतील. एकदम उल्हसित होऊन किंवा अंगात येऊन खरेदी करण्याचे दिवस नाहीत. हेरलेल्या शेअरच्या बाबतीत आपली किंमत व वेळ नक्की येणार ह्याची खात्री बाळगावी.

अर्थसंकल्पाच्या आधी ‘अदानी -हिंडेनबर्ग’ नावाची वावटळ शेअर बाजारात येऊन गेल्यामुळे म्हणा, किंवा इतर कुठल्या कारणामुळे म्हणा यावेळचा अर्थसंकल्प एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. गेल्या लेखात (सकाळ साप्ताहिक, प्रसिद्धीः ४ फेब्रुवारी) आपण म्हटले होते की देव करो आणि अर्थसंकल्पात शेअर बाजारातील दीर्घमुदतीच्या नफ्याच्या कराचे गणित न बदलो. यावेळी तिकडे अर्थमंत्र्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. दुसरे म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर असताना कुठलीही खिरापत कुठल्याही गटासाठी वाटलेली नाही. तिसरे म्हणजे देशातील जनता, शेतकरी वर्ग, उद्योगपती, नवउद्योजक, निर्यातदार, ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वच घटकांचा विचार करून अर्थसंकल्प मांडला आहे. प्रत्येकासाठी त्यात काहीतरी आहे.

त्याचबरोबर पायाभूत सुविधा व त्या अनुषंगाने रोजगारवाढीला चालना देण्यासाठी भांडवली खर्च तीन लाख कोटींनी वाढवून दहा लाख कोटींवर न्यायची योजना आहे. माजी अर्थमंत्र्यांनी त्यात एक खुसपट काढले आहे, की मागील अर्थसंकल्पात साडेसात लाख कोटींची तरतूद केली होती पण त्यातील सात लाख अठ्ठावीस हजार कोटीच खर्च झाले. तो फरक जेमतेम चार टक्के आहे व तो क्षम्य आहे. खासगी उद्योग पुढे येत नाहीत तर आपणच हे शिवधनुष्य उचलू असे सरकारने ठरवले तर बिघडले कुठे? भांडवली व पायाभूत सुविधांवर एवढा खर्च वाढवताना अर्थसंकल्पातील तूटही सरकारने कमी करून दाखवली आहे. मुख्य रोख व निधी रेल्वे व रस्तेबांधणी यासाठी आहे. गेल्या साठ वर्षात देशात जितके रस्ते बांधले गेले, त्याच्या दुप्पट गेल्या आठ वर्षात बांधले आहेत.

शेअर बाजार व रोखेबाजाराला मोठी काळजी असते सरकारच्या डोईवरचे कर्ज वाढणार का, याची. ते जेमतेम ९ टक्के वाढणार आहे. त्यामुळे रोखेबाजारही स्थिर राहिला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रस्तावित आकडेवारी विश्वसनीय आहे. प्रत्यक्ष कर महसुलात १० टक्के वाढ ,जीडीपी व महागाई दराचा विचार केल्यास नक्की होऊ शकते. जीएसटीचे संकलन दरमहा नवा उच्चांक करीत आहे. ते धरून अप्रत्यक्ष करसंकलनात १२ टक्के वृद्धी शक्य आहे. एकच दुखरी नस आहे. ती म्हणजे निर्गुंतवणूक. आजपर्यंत ते उद्दिष्ट कधीच साध्य झाले नाही. ह्या वर्षीही होण्याची शक्यता कमी. गेल्या अनेक वर्षांचा कुठल्याही सरकारचा अनुभव असा की ते लक्ष्य जेमतेम ५० टक्के साध्य होते. यावर्षी ५१ हजार कोटींची निर्गुंतवणूक ठरवली आहे. जेवढे कमी पडतील, तेवढा भांडवली खर्च कमी होईल असे समजू. खतांचे अनुदान कमी केले आहे व त्यावर टीकाही होत आहे. तसेच शेतीविषयक तरतूद कमी केली आहे. व त्यात कृषी पतपुरवठ्याचे लक्ष्य वीस लाख कोटींचे आहे. पण त्यात पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मस्यव्यवसायावर अग्रक्रमाने कर्जवाटप होणार आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ड्रोन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वगैरे योजना प्रस्तावित आहेत. या आधीही नल से जल, उज्ज्वला, घर घर बिजली, स्वच्छ भारत, लाभार्थींच्या खात्यात जन धन योजनेतर्फे अनुदान थेट जमा होणे आदी उपक्रम सरकारने केले आहेत व ते बव्हंशी यशस्वी झाले आहेत. तेच धोरण पुढे चालवल्याचे दिसते. आधार, यूपीआय, डीजीयात्रा, डीजी लॉकर आदी डिजिटल पद्धतीचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. ह्या कामगिरीत आपण विकसित देशांच्या पुढे आहोत ह्याचीही नोंद घेतली पाहिजे. डिजिटल योजनांद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा व त्याचे भले करण्याचा हा प्रयत्न देशाचे दरडोई उत्पन्न नक्कीच वाढवणार आहे.

अर्थमंत्र्यांच्या निवेदनानुसार भारताचे दरडोई उत्पन्न १ कोटी ९७ हजार रुपये आहे. म्हणजेच ते २४०० डॉलरच्या दरम्यान आहे. या आधीचा चीन, द. कोरिया आदी देशांचा अनुभव सांगतो की यापुढे हे उत्पन्न घातांकीय (एक्सपोनेन्शिअल) पद्धतीने वाढते. पुढील पाच वर्षांत अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरचे जवळ जाईल असा अंदाज बांधला जातो तो यामुळे. या वर्षी सरकारने भरड धान्यावर भर देऊन भारताला त्याचे जागतिक केंद्र बनवण्याचे ठरवले आहे. मिलेट, किंवा तृणधान्यात राजगिरा, नाचणी व भगर ह्यावर भर आहे. बाजरी, ज्वारी हेही जरा मोठे मिलेटच आहेत. त्यातून आहारात कॅल्शिअम, आयर्न व फायबर वाढेल व कुपोषण कमी होईल. तृणधान्याचे भारताचे उत्पादन जगाच्या ४१ टक्के आहे आणि त्यावर भर दिल्यास उत्तम निर्यातक्षम कमोडिटी निर्माण होईल. देशांतर्गत उठाव तर आहेच पण ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे विकसित देशात या धान्यास मोठी मागणी आहे. युद्धामुळे पुढील वर्षी रासायनिक खते महाग होतील आणि धान्ये महाग होतील असा अंदाज आहे, जगाला धान्याचा तुटवडा भासेल. ह्या पार्श्वभूमीवर उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे.

नव्या व जुन्या करप्रणालीबद्दल बरेच लिहिले गेले आहे, त्याची पुनरावृत्ती करीत नाही.

अदानी गदारोळात सिमेन्स, एबीबी, कमिन्स, टीमकेन तसेच इन्फ्रा उद्योगातील अग्रणी कंपन्या, आपला लाडका वाहन उद्योग याकडे लक्ष द्यायला हवे. खासगी बँकांनी अदानी समूहाला दिलेले कर्ज अत्यल्प आहे. त्याकडेही मोर्चा वळवायला हवा. संरक्षण व इन्शुरन्स क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये उत्साहवर्धक फारसे काही नाही.

अर्थसंकल्प कितीही चांगला मांडला असला तरी बाजारावर अदानी संबंधित बातम्या व परदेशी संस्थांच्या धडकून विक्रीचे सावट आहे. ते जाण्यास काही दिवस लागतील. गेल्या शुक्रवारी, ३ फेब्रुवारी रोजी, बाजारात झालेली तेजी शॉर्ट कव्हरिंग धर्तीची होती असे वाटते. कारण सेन्सेक्स जरी ९०९ अंश वर गेला तरी उर्वरित बाजाराने त्यास साथ दिली नाही. बँक निफ्टी पुन्हा रंगात आली इतकेच. सोमवारी पुन्हा बाजाराची रडकथा चालूच राहिली. मंगळवारीही परदेशी संस्थांच्या विक्रीत कुठलाही खंड पडलेला नाही. मंगळवारी तर अदानी पोर्ट व एन्टरप्रायझेसमध्ये थोडी मंदी कापली गेली, पण निफ्टीचा १७७२१ आणि सेन्सेक्सचा ४१४९० बंद फारसा आश्वासक नव्हता. जोपर्यंत निफ्टी १७८००ची सीमारेषा ओलांडत नाही तोपर्यंत शेकोटीतून अधूनमधून ठिणग्या उडाव्या अशीच तेजी होईल असे वाटते.

तात्पर्य असे की रात्र वैऱ्याची आहे. एकदम उल्हसित होऊन किंवा अंगात येऊन खरेदी करण्याचे दिवस नाहीत. हेरलेल्या शेअरच्या बाबतीत आपली किंमत व वेळ नक्की येणार ह्याची खात्री बाळगावी. अपार इंडस्ट्रीजचे डिसेंबर अखेरचे निकाल नुकतेच हाती आले. मागील तिमाहीच्या तुलनेत विक्री २४ टक्के वाढली, तर ढोबळ व निव्वळ नफा अनुक्रमे ४३ व ४१ टक्के वाढला. अपार हा ट्रान्सफॉर्मर ऑइलचा जगाचा तीन नंबरचा उत्पादक व अॅल्युमिनियम व तांब्यापासून तयार होणाऱ्या कंडक्टरचा जगातील एक नंबरचा कारखानदार असून, इतर या श्रेणीतील व कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअरमध्ये हा शेअर सर्वात वाजवी भावात उपलब्ध आहे. पी/इ फक्त १७ आहे. उत्कृष्ट निकालामुळे तो मंगळवारी १५ टक्के वाढला. तरीही भाव ठीक वाटतो. यास नजरेच्या टप्प्यात ठेवलाच पाहिजे.

मिसेस बेक्टर फुड्सचे निकालही पाठोपाठ हाती आले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या रजनी बेक्टर अनेक लोकप्रिय उत्पादने तयार करतात. क्रेमिका व इंग्लिश ओव्हन हे त्यांचे ब्रॅण्ड आहेत. निकाल जबरदस्त आहेत. विक्री व नफा वाढता आहे. निकालाचे बाजाराने स्वागत केले आहे. शेअरचा भाव नवा उच्चांक करीत पाचशे रुपयांवर गेला आहे. हा मायक्रोकॅप शेअर असल्यामुळे याच प्रमाणात वाढू शकतो. पण भावही काही फार स्वस्त नाही. नव्यानेच सूचीबद्ध झालेल्या बिकाजी फुड्स किंवा प्रताप स्नॅक्सच्या तुलनेत मात्र उजवा आहे. एखाद्या घसरणीत विचार करता येईल.

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर धोरण समितीच्या बैठकीकडे डोळे लागले होते. बुधवारी (ता. ८ फेब्रुवारी) बैठक होऊन तज्ज्ञांच्या अपेक्षेप्रमाणे २५ पैशांची व्याजदरवाढ झाली. ही व्याजदरवाढ शेवटचीच ठरली तर शेअर बाजारास हायसे वाटेल.

या महिनाभरात अनेक संधी शेअर बाजार देणार आहे. चाणाक्ष व जागरूक गुंतवणूकदारालाच त्या मिळतील.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

0
0
error: Content is protected !!