लेखक : भूषण महाजन
नव्या वर्षी युरोपियन बाजाराचे निर्देशांक जोरात आहेत, ब्रिटिश फुटसी निर्देशांक नव्या उच्चांकाजवळ आहे, अमेरिकी बाजारही सावरले आहेत; चीनबद्दल तर बोलायलाच नको. पण आपले बाजार त्या तुलनेत फारच मागे पडले आहेत.
कधी कधी घाटातून जाताना ढग जणू खाली आल्यासारखे वाटतात. कधीकधी इतके धुके असते की पुढची वाट दिसत नाही, बाजूने कोण जातंय कळत नाही, रस्त्यावरच्या वळणांचा अंदाज न येऊन एखाद्या कडेच्या झाडावर गाडी आदळून अपघात होण्याची शक्यता मोठी. अशावेळी चांगले ऊन पडून रस्ता स्वच्छ दिसेपर्यंत थांबणे योग्य. आजकाल शेअर बाजाराचे हे असेच चालले आहे. कधी पाश्चिमात्त्य बाजारांच्या तालावर तो वर जातो तर कधी खाली येतो, नक्की दिशा उमगत नाही. शेअर बाजारात भीतीचा अतिरेक झाला की दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी ती एक मोठी संधी असते. इतके सगळे रामायण घडूनही इंडिया विक्स (या भीतीचा निर्देशांक) वीसच्या खालीच आहे. तात्पर्य असे की शेअर बाजाराला काय करायचे आहे याचा अंदाज आल्यावरच पाऊल उचलावे.
गेले वर्षभर भारताचा शेअर बाजार वाघाच्या चालीने चालत होता. नव्या वर्षी मात्र युरोपियन बाजाराचे निर्देशांक जोरात आहेत, ब्रिटिश फुटसी निर्देशांक नव्या उच्चांकाजवळ आहे, अमेरिकी बाजारही सावरले आहेत; चीनबद्दल तर बोलायलाच नको. पण आपले बाजार त्या तुलनेत फारच मागे पडले आहेत. जवळचे शेअर विकायला जावे तर नेमकी तेजी येते आणि वाट पहावीशी वाटते. याच लेखमालिकेत आम्ही म्हटले होते की निफ्टीने १७८००ची पातळी ओलांडल्याशिवाय तेजीचा विचार करू नका. (सकाळ साप्ताहिक -प्रसिद्धी ११ फेब्रुवारी) नेमकी, गेल्या मंगळवारी (ता. १४ फेब्रुवारी) निफ्टीने ती ओलांडून दाखवली. १७९२९ निफ्टी आणि ६१०३२ सेन्सेक्सचा बंद चांगला असला तरी उर्वरित बाजाराने काही साथ दिली नाही. परदेशी व देशी संस्था खरेदी करत होत्या पण स्थानिक गुंतवणूकदार मात्र उदासीन होते.
आमचे म्हणणे असे की अदानी प्रकरणाचे सावट दूर होईपर्यंत बाजाराला दिशा मिळणार नाही. तोपर्यंत १७५०० हा आधार धरून टप्प्याटप्प्याने खरेदी करता येईल. ह्या त्सुनामीत खासगी बँका घसरल्या आहेत. ती संधीच आहे असे समजून त्यात हात घातला पाहिजे. असो.
मागील लेखात निर्देशिलेला अपार इंडस्ट्रीज चांगला चालला आहे. चालत्या गाडीत बसायचे की एखादे स्टेशन येईपर्यंत थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मागील सप्ताहाच्या १५ टक्के तेजीत मंगळवारी आणखी सात टक्क्याची भर पडली.
पत्नीसाठी हौसेने सोन्याचा दागिना आणावा आणि तिने हिऱ्याचा का आणला नाही म्हणून रुसून बसावे तसे कधीकधी शेअर बाजार करतो. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे तिमाही निकाल अत्यंत समाधानकारक आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत विक्री ३० टक्के वाढून ₹ ३०,६२० कोटींवर पोहोचली. निव्वळ नफा २० टक्के वाढला, प्रती शेअर मिळकत १५.९९ रुपयांवरून २१.५३ रुपये झाली. ‘एसयूव्ही’ श्रेणीतील वाहनांमध्ये कंपनीचे स्थान एक नंबरचे आहे, ते कायम ठेवून वाहन विक्रीचा उच्चांक या तिमाहीत केला आहे. शेतीअवजारे विक्रीतही कंपनी एक नंबरला आहे. वर्ष २०२४मध्ये २०१९ सालची विक्री व तेजी दिसेल, असा निष्कर्ष व्यवस्थापनाच्या भाष्यावरून काढता येतो. त्याचबरोबर मार्जिन कसे वाढेल याकडे व्यवस्थापनाचे पूर्ण लक्ष आहे. गेल्या चार तिमाहीत ती एक टक्का वाढली आहे. याखेरीज समूहातील इतर उपकंपन्यांची, आपापल्या क्षेत्रात वाटचालही उत्तम आहे. गुंतवलेले भांडवल सत्कारणी लागलेले दिसतेय. पण बाजाराने निकालाचे थोडेसे नाक मुरडूनच स्वागत केले. हीच संधी समजून महिंद्राच्या ‘एसयूव्ही ७००’ ऐवजी शेअरच आपल्या रडारवर ठेवणे चांगले.
एपीएल अपोलो ट्यूबचे डिसेंबर तिमाहीचे निकालही असेच उत्साहवर्धक होते. व्यवस्थापन सतत महत्त्वाकांक्षी भाष्य करीत आहे व तशी कामगिरीही करून दाखवत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विक्री ३३ टक्के, तर मागील तिमाहीच्या तुलनेत ९ टक्के वाढली आहे. वाढीव विक्रीवर मार्जिन कायम ठेवण्यात कंपनीला यश मिळाले आहे. नफा व प्रती शेअर मिळकत त्याच प्रमाणात वाढत आहे. आपला बाजारातील हिस्सा ५२ टक्क्यांच्या वर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न उपयोगी ठरले आहेत. विशेष म्हणजे रायपूर येथील कारखाना १० लाख टन उत्पादन करण्यास सक्षम झाला आहे. सध्या फक्त ३० टक्के क्षमता वापरली जात आहे. पुढे जसा वापर वाढेल तसा नफाही टनामागे ३ हजार रुपयांवरून ५ हजार रुपये होईल, असे व्यवस्थापन सांगते. टायगर श्रॉफची ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून केलेली निवड चोख आहे. वाढत्या डिजिटल अस्तित्वासाठी नवे अॅप व डिजिटल जाहिराती लोकप्रिय होत आहेत. पुढे जाऊन कमी झालेल्या पोलादाच्या किमतींचा लाभ कंपनीला मिळेल. गेल्या पाच वर्षात हा शेअर पाचपट झाला आहे. पुढेही घोडदौड चालू राहील असे दिसते. रोजच तो शेअर बाजारात नवे वार्षिक उच्चांक करीत आहे. अर्थात हा शेअर कुठल्याही मूल्यांकन पद्धतीने महागच आहे. चालू पी/इ ५६ आहे. त्या तुलनेत ह्याच क्षेत्रातील पण कमोडिटी उत्पादक टाटा स्टील ७.५५, सेल १०.६५ तर जिंदाल स्टेनलेस ८.९६ ह्या पी/इ गुणोत्तरात उपलब्ध आहेत. शेअर बाजाराने मात्र ह्या निकालांचे उत्साहात स्वागत केले.
रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्का वाढ केली. ह्या निमित्ताने वर्तुळ पूर्ण झाले आहे. गेल्या तीन चार वर्षातील रेपो दर पुन्हा ६.५ टक्क्यावर गेले आहेत. पण व्याजदर वाढीत कुठलाही विसावा दिसत नाही. २०२३ वर्षअखेर व्याजदर कमी व्हायला सुरुवात होईल असा अर्थतज्ज्ञांचा होरा होता, तो चुकेल की काय असे वाटते. ह्याच दरम्यान महागाई दरही पुन्हा वाढल्याने ही शिवाशिवी पुढे चालूच राहील असे दिसते. गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मुदत ठेव व डेट फंडमध्ये गुंतवणूक करण्यास ही सुवर्णसंधी आहे. किमान तीन ते पाच वर्षाच्या मुदतीचे टार्गेट मॅच्युरिटी फंड ह्या श्रेणीत योग्य वाटतात. त्यातील सर्व गुंतवणूक जी सेक व राज्य सरकारी बॉण्डमध्ये असून, ते अत्यंत सुरक्षित असल्याचा निर्वाळा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. तीन चार वर्षात दर साल दर शेकडा ७ टक्के व्याज व त्यात इंडेक्सेशनमुळे किरकोळ करदायित्व (जवळजवळ करमुक्त परतावा), ह्या योजनांना आकर्षक करतात. ह्याखेरीज कमी मुदतीचे बॉण्ड फंड ह्याच दरम्यान व्याज देतात. साध्या लिक्विड फंड योजनादेखील सहा ते साडेसहा टक्के उतारा देत आहेत. शेअर बाजार अनिश्चित असताना हा अॅसेट गुंतवणूकजन्य वाटतो.
अदानी समूहाने आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घालायचे ठरवले आहे. उद्योगातील वृद्धीचे उद्दिष्ट दरसाल ४० टक्क्यावरून २० टक्क्यांवर आणले आहे. कपाळावरचा डाग पुसण्यासाठी प्रथम शेअर तारण ठेवून घेतलेले कर्ज कमी करण्याची योजना आहे. तसेच ग्रांट थॉर्टन संस्थेकडे लेखा परीक्षण सोपवले आहे. ह्याच बरोबर समूहाची अग्रणी कंपनी अदानी एन्टरप्रायझेसने आपले तिमाही निकाल घोषित केले. महसूल ४२ टक्के वाढून ₹ २६,६१२ कोटी झाला आहे. मागील वर्षी झालेला तोटा पुसून टाकत ₹ ९०० कोटींवर निव्वळ नफा झाला आहे. अर्थात बाजाराला या निकालांचे फारसे सोयरसुतक नाही. हिंडेनबर्गने केलेल्या आरोपातून समूह किती लवकर सहीसलामत सुटतो ह्याकडे विश्लेषकांचे लक्ष आहे. तसे झाल्यास एकूणच सेंटीमेंट बदलेल, त्यानंतर मात्र निफ्टीचा नवा उच्चांक अवघड नाही.
मार्च अखेरपर्यंत गुंतवणूकदारांनी संयमाने चोखंदळपणे शेअर निवडावे हे नक्की.
(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)