लेखक – डॉ. वीरेंद्र ताटके
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढल्याचे दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत होत गेला तशी चीन, जपान, रशियातील मध्यवर्ती बॅंकांकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार सोने खरेदी सुरू झाली. त्याचे पडसाद भारतीय बाजारपेठेतही उमटले असून येथील सोन्याचा भाव वाढत आहेत.
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वर्ष २०२३च्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी आली, ती म्हणजे भारतीय बाजारपेठेत सोन्याचा भाव आजवरच्या इतिहासात सर्वोच्च पातळीला पोचला. मुळात सोन्यातील गुंतवणूक हा भारतीयांसाठी अगदी ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून सोन्यातील गुंतवणूक आपल्याकडे प्रतिष्ठेची मानली गेली आहे. अर्थात यामागील कारणेदेखील तशीच आहेत. त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे सोन्यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. दीर्घकाळात सोन्यातील गुंतवणुकीत कधीही तोटा सहन करावा लागलेला दिसत नाही, असे आत्तापर्यंतची आकडेवारी पहिली तर हे लक्षात येते.
भारतामध्ये सोन्याला सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे; तसेच सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित मानली गेल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांसाठी सोन्याचे आकर्षण कायम राहिले आहे. पृथ्वीवरील सोन्याचा साठा मर्यादित आहे आणि आपल्या गरजेनुसार त्याचा पुरवठा वाढवण्याचे तंत्र निदान आत्तातरी उपलब्ध नाही आणि भविष्यातही असे तंत्र शोधून काढले जाईल अशीही काही शक्यता दिसत नाही. या कारणामुळे सोन्याचे भाव वर्षानुवर्षे वाढतच आले आहेत. गुंतवणूक, रंगरूप खुलवणारे दागिने वगैरेंशिवाय सोन्याचा उपयोग अनेक प्रकारच्या औषधनिर्मितीतदेखील होत असल्यामुळेसुद्धा त्याचे एक वेगळे स्थान आहे. सोने गंजरोधक व जीवाणूरोधक असते त्यामुळे त्याचा वापर अनेक औषधात केला जातो. सुवर्ण भस्म हे आयुर्वेदात वापरले जाणारे महत्त्वाचे औषध आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातल्या वाढत्या वापरामुळंसुद्धा सोन्याचे महत्त्व टिकून आहे.
थोडक्यात, सोन्याचे लाभ-जोखीम गुणोत्तर (कमी जोखीम आणि फायद्याची शक्यता अधिक) आकर्षक असल्यामुळे आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी काही टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये दीर्घकाळासाठी करत राहणे योग्य ठरते.
सोन्याचे भाव एकदम का वाढले?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव अचानकपणे वाढल्याचे दिसत आहे. विशेषतः गेल्या काही दिवसात डॉलर कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे बऱ्याच देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनी सोने खरेदी सुरू केली, आणि त्याचा परिणाम सोन्याचे भाव वाढण्यात झाला . जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत होत गेला तशी चीन, जपान, रशियाकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार सोने खरेदी सुरू झाली. त्याचे पडसाद भारतीय बाजारपेठेतही उमटले असून येथील सोन्याचा भाव वाढत आहेत.
भारतीय शेअर बाजारही गेल्या काही दिवसांपासून दोलायमान स्थितीतून जात आहे. २०२१ आणि २०२२ वर्षाच्या पूर्वार्धात शेअर बाजाराने चांगला परतावा दिला असला तरी गेले काही दिवस तो एकाच परिघात फिरत आहे. अशावेळी गुंतवणूकदारांना सोन्यातील गुंतवणूक आकर्षक वाटत आहे. सोन्याच्या भावातील ही तेजी येणाऱ्या काळातही अशीच सुरू राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात काही कारणांनी त्यात पडझड जरी झाली तरी ती गुंतवणुकीची संधी मानून सोन्यातील गुंतवणूक वाढवली पाहिजे .
सोने कसे खरेदी करावे ?
प्रत्यक्ष सोने खरेदी
पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्ष सराफी पेढ्यांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात आजही खरेदी केली जाते. हा पर्याय अत्यंत सोपा असला तरी आपण जर गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असू तर सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्याची नाणी, बिस्किटे किंवा वेढणी या सोने-रूपांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण या पद्धतीने गुंतवणूक केल्यास त्यात घट लागत नाही आणि भविष्यातील परताव्यातून घट वजा केली जात नाही .
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड
हादेखील अत्यंत चांगला पर्याय आहे. केंद्र सरकार ठरावीक कालावधीने सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड बाजारात आणत असते. यात काही वर्षांच्या कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीसाठी लॉकइन कालावधीसुद्धा असतो. गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे आपली गुंतवणुकीची रक्कम परत मिळते. अर्थात दीर्घकालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करावयाची असल्यास हा पर्याय चांगला आहे.
गोल्ड ईटीएफ
सोन्याची प्रत्यक्ष खरेदी करण्याऐवजी गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड ईटीएफ हा एक चांगला पर्याय आहे. याला डिजिटल स्वरूपातील सोन्यातील गुंतवणूक असे म्हणतात. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची किमान रक्कम ठरलेली असते. त्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास प्रत्यक्ष सोने न मिळता गुंतवणुकीच्या रकमेएवढ्या स्वरूपात सोने आपल्या खात्यात जमा होते. आपण जेव्हा गुंतवणूक काढून घेतो त्यावेळेस बाजारभावाप्रमाणे सोन्याचे मूल्य आपल्याला मिळते. अल्प कालावधीसाठी आपल्याला सोन्यात ट्रेडिंग करायचे असेल तर, तसेच दीर्घकालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर या गोल्ड ईटीएफ हा चांगला पर्याय आहे. या पर्यायात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे आवश्यक असते .
गोल्ड म्युच्युअल फंड
सोने खरेदीसाठी गोल्ड म्युच्युअल फंड हादेखील आणखी एक डिजिटल पर्याय आहे. बाजारात विविध गोल्ड फंड उपलब्ध आहेत. अशा गोल्ड म्युच्युअल फंडात एकरकमी किंवा एसआयपीद्वारेदेखील गुंतवणूक करता येते. दोन्ही पर्यायांचे वेगवेगळे फायदे आहेत. ईटीएफप्रमाणे गोल्ड म्युच्युअल फंडातही प्रत्यक्ष सोने न मिळता गुंतवणुकीएवढे सोन्याचे युनिट आपल्याला खात्यात जमा होतात. यातदेखील हवी तेव्हा गुंतवणूक काढून घेण्याचे स्वातंत्र्य असते. या पर्यायात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते अनिवार्य नसते. या पर्यायात गुंतवणूक करून सोन्याच्या भावात ट्रेडिंग करता येत नाही. त्यामुळे दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी हा पर्याय योग्य ठरतो.
वरवर पाहता गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड सेव्हिंग्ज फंड हे दोन्ही पर्याय एकसारखे दिसत असले, तरी त्यामध्ये मूलभूत फरक आहे. ज्याप्रमाणे शेअर बाजारात एखादा गुंतवणूकदार शेअरची खरेदी-विक्री करतो, त्याप्रमाणे गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोन्याची खरेदी-विक्री करता येते. अर्थातच त्यासाठी डिमॅट खात्याची आवश्यकता असते. एकाच वेळी कमीत कमी एक ग्रॅम सोन्याची खरेदी-विक्री करणे आवश्यक असते. आपण खरेदी केलेले सोने आपल्या डिमॅट खात्यात पूर्णपणे सुरक्षितरित्या साठवले जाते. याउलट गोल्ड सेव्हिंग्ज फंडांचे व्यवस्थापन म्युच्युअल फंड करत असतात आणि त्यांची गुंतवणूक प्रामुख्याने गोल्ड ईटीएफमध्ये असते. गोल्ड फंडातल्या गुंतवणुकीसाठी डिमॅट खात्याची आवश्यक नसते. ज्या गुंतवणूकदाराला दरमहा ठरावीक रक्कम सोन्यात गुंतवायची आहे, त्याला गोल्ड सेव्हिंग्ज फंडांत सेव्हिंग्ज सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी ) सुरू करता येतो. याद्वारे, दर महिन्यामध्ये ठरावीक तारखेला ठरावीक रकमेची सोन्याची खरेदी होऊन युनिट आपल्या म्युच्युअल फंड खात्यात जमा होत राहतात. गोल्ड सेव्हिंग्ज फंडात एकरकमी गुंतवणूक करायची असेल, तर साधारणतः किमान पाच हजार रुपये आवश्यक असतात, तर एसआयपी दरमहा साधारणतः किमान पाचशे रुपयांपासून सुरू करता येते.
नव्या डिजिटल पद्धतीने उपलब्ध झालेल्या सोन्यातील गुंतवणूक प्रकारांमुळे प्रत्यक्ष सोने बाळगण्याच्या चिंतेतून गुंतवणूकदाराची सुटका होते. अर्थात प्रत्यक्ष सोने खरेदी की डिजिटल सोन्यातील गुंतवणूक हा निर्णय गुंतवणूकदाराने घ्यावयाचा आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गरजा आणि योजनेप्रमाणे हा निर्णय घेतला पाहिजे. मात्र सध्याच्या आर्थिक अस्थिरतेमुळे आगामी काळात सोन्याला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, त्यामुळे जर तुम्ही सोन्याचा समावेश आपल्या पोर्टफोलिओत केला नसेल तर तो करण्याचा विचार करायला हरकत नाही.
सोन्यात गुंतवणूक करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे दीर्घकाळात सोन्यातील गुंतवणुकीचा परतावा महागाईच्या दरापेक्षा कमी राहिला आहे. याचाच अर्थ असा होतो की गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला महागाईवर मात करायची असेल तर केवळ सोन्यातील गुंतवणूक पुरेशी ठरत नाही. म्हणूनच आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी काही हिस्सा सोन्यात गुंतवावा आणि उर्वरित गुंतवणूक म्युच्युअल फंड, शेअर बाजार यासारख्या अधिक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या गुंतवणूक पर्यायांत करावी .
गोल्ड बॉण्डच्या मागणीत घट
सोन्याच्या भावात जरी वाढ होत असली तरी गोल्ड बॉण्डच्या मागणीत मात्र घट होताना दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत या आर्थिक वर्षात गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीत घट झालेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रत्यक्ष सराफांच्या दुकानात जाऊन सोने खरेदी करण्यावर मर्यादा आल्यामुळे गुंतवणूकदारांनी गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले होते. आता मात्र अशी कोणतीही बंधने नसल्यामुळे गुंतवणूकदार सराफांच्या दुकानातून जाऊन सोने खरेदी करण्यावर भर देत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एकंदरीत ३२ टन सोने गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून विकले गेले तर वर्ष २०२१-२२ मध्ये हा आकडा २७ टन एवढा होता.
चालू आर्थिक वर्षात मात्र आत्तापर्यंत फक्त ८.७३ टन एवढेच सोने या माध्यमातून विकले गेले आहे. अर्थात गोल्ड बॉण्डच्या मागणीतील ही घट तात्पुरत्या स्वरूपाची असून येणाऱ्या काळातील गोल्ड बॉण्ड्सला गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा उत्तम प्रतिसाद मिळेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे . {{{
गोल्ड म्युच्युअल फंडांचा परतावा
कालावधी सरासरी वार्षिक परतावा (%)
१ वर्ष १७%
२ वर्षे ६%
३ वर्षे १२%
५ वर्षे १३%
(वरील कोष्टकात उदाहरणासाठी एसबीआय गोल्ड फंडाचा परतावा घेतला आहे . बाजारात इतर म्युच्युअल फंड कंपन्यांचे गोल्ड फंडदेखील उपलब्ध आहेत.)
गेल्या काही वर्षातील प्रति दहा ग्रॅम सोन्याचे भाव
वर्ष प्रति दहा ग्रॅम भाव ₹
१९७० १८४
१९८० १३३०
१९९० ३२००
२००० ४४००
२०१० १८५००
२०२० ४८६००
२०२१ ४८७२०
२०२२ ५२६००
१४ जानेवारी २०२३ ५६६००
(संदर्भ : https://www.bankbazaar.com/gold-rate)
येणाऱ्या काळात …
- आपल्या एकूण गुंतवणुकीच्या १० ते २० टक्के गुंतवणूक सोन्यात करत राहावी.
- एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. यासाठी गोल्ड म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणूक योग्य ठरते.
- सोन्याचे बाजारभाव अचानकपणे खूप कोसळले तर त्याच फंडात मोठी एकरकमी गुंतवणूक करावी.
- सोन्याच्या भावात दररोज होणाऱ्या चढउतारांचा फायदा करून घेण्यासाठी ईटीएफ निवडावेत.
- केवळ गुंतवणूक हा दृष्टिकोन असेल तर प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्याची नाणी, बिस्किटे किंवा वेढणी खरेदी करावी.
- सोन्यातील गुंतवणुकीची वैशिष्ट्ये
- अल्पकाळात परताव्यात चढउतार दिसले तरी दीर्घकाळात कायम सुरक्षित गुंतवणूक.
- शेअर बाजारातील गुंतवणुकीला हेजिंग म्हणून सोन्यातील गुंतवणुकीकडे पहिले जाते.
- सुरक्षितता, स्थिर मूल्य, तरलता ही सोन्यातील गुंतवणुकीची वैशिष्ठ्ये
- दीर्घकाळात महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा देण्यात मात्र सोन्यातील गुंतवणूक यशस्वी झाली नाही.