लेखक : भूषण महाजन
दर वर्षीच अंदाजपत्रक जवळ आले की दलाल स्ट्रीटवर चलबिचल सुरू होते. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी येणारे हे पूर्ण अंदाजपत्रक आहे. त्यामुळे फार मोठे बदल अपेक्षित नाहीत.
कैलाशपती नावाचे एक झाड आहे. त्याला कॅननबॉल ट्री असेही म्हणतात. या झाडाला तोफगोळ्यासारखी फळे येतात, पण त्याआधी अत्यंत सुगंधी फुले आसमंत दरवळून टाकतात. या फुलांत, नागाच्या फण्याच्या आकाराचे पुंकेसर असतात. या झाडाचे किंवा वृक्षाचे एक वैशिष्ट आहे. हिवाळ्यात त्याची पाने झडतात. दोन तीन दिवस पानगळ होते, झाड अगदी निष्पान होते. आणि दुसऱ्याच दिवशी एक एक इंची पाने दिसू लागतात. दोन दिवसातच जोमाने वाढून पाने दोन-तीन इंची होतात. अगदी पाहता पाहता झाड पुन्हा पहिल्यासारखे होते! पानगळ झाली हे लक्षात येत नाही तोच, झाड नवं वस्त्र नेसावं तसे मोहरून निघतं. पाहणाऱ्याला कळत नाही, पानगळ संपून पालवी केव्हा आली ते! हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे सध्या शेअर बाजाराची अवस्था अशीच आहे. खाली येतोय म्हणावं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा जोमाने वर जातांना दिसतो. एकदा का चांगला तीन चारशे अंश खाली गेला की पानगळ झाल्यासारखी वाटेल आणि मग चांगली पालवी फुटेल.
जानेवारीच्या १३ तारखेला सरलेल्या सप्ताहात निफ्टी शंभर अंश वर आली खरी (१७९५६), पण त्यात जोर नव्हता. एक आठवड्यानंतर म्हणजे २० जानेवारीचा बंद १८०२७ होता. पुढेही तळ्यातमळ्यात चालूच आहे. निफ्टी कितीही वर उघडली तरी लागलीच जोर ओसरतो आणि खाली येते. जणू वर गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा बंद आहे हे पाहून माघारी वळावे तसे काहीतरी होते. गेले पंधरा/ वीस दिवस निफ्टी खाली १७८००ची पातळी तुटू देत नाहीय, आणि वरच्या बाजूला १८२००च्या पातळीवर जाऊ शकत नाही. २३ व २६ डिसेंबर, त्या पाठोपाठ ६, १२ आणि १३ जानेवारी या प्रत्येक सेशनमध्ये दिवसभरात निफ्टी भले १७८००च्या खाली गेली असेल, पण तेथे खरेदी होऊन पुन्हा बंद मात्र १७८००च्या वरच लागला. तेजीवाले एक एक पाऊल मागे घेत आहेत, असे वाटते. १७८००च्या खाली १७७०२ ही तीस आठवड्यांची चल सरासरी आहे (30 WEMA). अशा प्रकारच्या रणधुमाळीत ही पातळीसुद्धा निसटू शकते. सध्यातरी शेअर बाजार ती पातळी राखून आहे. मंगळवारी २४ जानेवारी रोजी मात्र निफ्टीने १८११८चा बंद दिला. लागोपाठ १६-१७ दिवस विक्री केल्यावरदेखील परदेशी संस्था फारशा थकलेल्या दिसत नव्हत्या. देशी संस्थांनी तर रोजच खरेदीचा सपाटाच चालवला आहे. बाजारचे ग्रहण सुटले की काय? असे वाटण्यातील प्रमुख अडसर, जोपर्यंत १७८००-१८२०० या रेंजमधून निफ्टी बाहेर पडत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. ही जर अंदाजपत्रकाच्या आधीची रॅली असेल, तर अंदाजपत्रकानंतर अपेक्षाभंग होण्याची शक्यता अधिकच वाढते. असो.
बँक ऑफ महाराष्ट्रने पुन्हा एकदा चांगले निकाल नोंदवले आहेत. उत्पन्न २२ टक्के वाढले पण नक्त नफा दुप्पट झाला. हे प्रातिनिधिक समजायला हवे. पुढे किमान एक हजार कोटी रुपयांची संस्थात्मक क्यूआयपीद्वारे समभाग विक्री होईल. ती हे शेअर घेण्याची संधीच असेल व कमी भावाचे पण चांगले शेअर शोधणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांनी ती जरूर अभ्यासावी. परंतु त्यापाठोपाठ आलेल्या बँक ऑफ इंडियाच्या तिमाही निकालांनी निराशा केली. नेट इंटरेस्ट मार्जिन वाढली नाही. सरकारी बँकांनी कात टाकून ग्राहकाभिमुख व्हावे व तंत्रज्ञानाची कास धरावी हे दिवास्वप्नच ठरू नये म्हणजे मिळवले. हे निकाल तात्कालिकरित्या कितीही निराशाजनक वाटले तरी सरकारी बँकांचे शेअर खात्यात जोडण्याची ही संधी आहे हे लक्षात घ्यावे.
अदानी एन्टरप्रायझेसने नुकतीच २०,००० कोटी रुपयांची समभाग विक्री जाहीर केली आहे. त्याला ‘एफपीओ’ असे नाव आहे. हा लेख प्रसिद्ध होत असतानाच तो इश्यू खुला होईल. अत्यंत धोरणीपणे ‘पार्टली पेड शेअर’चा हा इश्यू आला आहे. किंमत पट्टा ₹ ३११२-३२७६ असा आहे. छोट्या गुंतवणूकदाराला ६४ रुपयांची सवलतही मिळणार आहे. ही शेअर विक्री जाहीर झाल्याबरोबर अदानी समूहातील सर्वच शेअरचे भाव मात्र उतरले.
अदानी समूह भांडवली खर्चाच्या गरजांसाठी एफपीओचे पैसे वापरेल तसेच तिच्या काही उपकंपन्यांचे कर्जही फेडेल. वीस हजार कोटी रुपयांपैकी १०,८६९ कोटी रुपयांचा निधी ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, विमानतळ सुविधा आणि ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवेसाठी वापरणार असल्याचे कंपनीने आपल्या प्रॉस्पेक्ट्समध्ये म्हटले आहे. तसेच, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड, अदानी रोड ट्रान्स्पोर्ट लिमिटेड आणि मुंद्रा सोलर लिमिटेड या तीन युनिटच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी ₹ ४.१६५ कोटीदेखील वापरेल.
दोन किंवा अधिक हप्त्यात ३,११२ रुपये भरायचे असल्यामुळे इश्यूचा भरणा व्हायला अडचण येऊ नये. रिलायन्सच्या धर्तीवर हे पार्टली पेड शेअर सूचीबद्ध होतील. जेमतेम दीड हजार रुपयांच्या आतबाहेर अदानीचे शेअर घेता येतील व ते सूचीबद्ध झाल्यावर विकताही येतील. या नावाभोवती असलेले वलय लक्षात घेता, तज्ज्ञांचा सल्ला बाजूला ठेवून गुंतवणूक होईल, असे वाटते. हा शेअर फक्त दोनच वर्षापूर्वी ५०० रुपये होता आणि गेल्या मंगळवारी (ता. २४ जानेवारी) ३,४४२ रुपये आहे हे बघितल्यावर आपण काय जोखीम घेत आहोत ह्याची कल्पना यावी. कंपनीच्या भरमसाठ कर्जाची अंशतः परतफेड, इक्विटी भांडवलाच्या मिळालेल्या प्रीमियम मधून करणे ही जुनीच चाल आहे व धोरणी कंपन्या ती पुन्हा पुन्हा वापरणारच!
अर्थात पायाभूत सुविधा उभ्या करताना भरपूर भांडवल लागते व संपूर्ण प्रकल्प नेटाने व जिद्दीने पूर्ण करावा लागतो. रिलायन्सचा संपूर्ण उद्योगसमूह असाच मोठा झाला. तो बुडबुडा आहे, कधीही फुटेल असे म्हणणाऱ्यांना शेवटी कबूल करावे लागले की हा बुडबुडा असलाच तर तो प्लास्टिकचा आहे, फुटणार नाही. देशभरातील बंदरे, (इतर अनेकांना न जमलेले) विमानतळ सुविधा व व्यवस्थापन व ऊर्जा निर्मिती अशा अनेक उद्योगांमध्ये सिंहाचा वाटा असलेला अदानी समूह हे शिवधनुष्य पेलू शकला तर त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे हे नक्की.
नुकतेच छोट्या व संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या लाडक्या मारुती सुझुकीचे निकाल हाती आले. मागील तिमाहीच्या तुलनेत कमी गाड्या विकल्या गेल्या असल्या तरी ते अपेक्षितच होते. विक्री, मार्जिन व नफा ₹ २७,६०८ कोटी अपेक्षित असताना ₹ २९,०४४ कोटी, ढोबळ नफा ₹ २,६०८ कोटी अपेक्षेच्या ऐवजी ₹ २,८३३ कोटी आणि ०.४ टक्क्यांनी वाढलेली मार्जिन बाजाराला सुखावून गेली. आजतरी निकालाचे स्वागत चांगले झाले आहे. व्यवस्थापनाचे निकालानंतरचे भाष्य शेअरची पुढील दिशा ठरवेल. पुढील वर्षी येणारी नवी मॉडेल, तसेच कमी होत असलेल्या कच्च्या मालाच्या किमती (ह्या आता पुन्हा वाढू लागल्या आहेत), तसेच ‘जिप्सी’च्या जागी येणाऱ्या ‘जिमी’बद्दलचे औसुक्य व मागणी, ग्रामीण भागातून ४५ टक्क्यांवर होत असलेली आगाऊ नोंदणी ह्यांचा विचार करता आज ३४-३५ पी /ईला मिळत असलेला हा शेअर आकर्षक आहे. कारच्या बाजारपेठेचा प्रमुख हिस्सा (जवळपास पन्नास टक्के), वाढत असलेली मार्जिन, आता एसयूव्ही श्रेणीच्या गाड्यांकडे असणारे ग्राहकांचे प्राधान्य हे बघून त्या श्रेणीत नवे मॉडेल आणण्याची धडपड पाहता हा शेअर आजच्या किमतीवर मोठा दीर्घकालीन लाभ देऊ शकतो. हे आमचे मत आहे. ही खरेदीची शिफारस नव्हे, गुंतवणूकदाराने जरूर अभ्यासायला हवा .
दर वर्षीच अंदाजपत्रक जवळ आले की दलाल स्ट्रीटवर चलबिचल सुरू होते. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी येणारे हे पूर्ण अंदाजपत्रक आहे. ह्यापुढील अंदाजपत्रक कदाचित व्होट ऑन अकाउंट असेल. मतदाराला मोहित करण्याची ही शेवटची संधी असेल. त्यामुळे फार मोठे बदल अपेक्षित नाहीत. पायाभूत सुविधांवर प्राधान्यक्रमाने खर्च, उत्पादन निगडित अनुदान योजनेचे विस्तारीकरण, संरक्षणावरील खर्चात माफक वाढ, द्विपक्षीय व्यापारामध्ये रुपया चलन म्हणून वापरणे इत्यादी दैनंदिन स्वरूपाच्या बाबी त्यात येतील. महागाई वाढल्यामुळे व्याजदर वाढले आहेत. पुन्हा एकदा खरे व्याजदर आभासी व्याजदरांपेक्षा अधिक आहेत. म्हणजे महागाई दर ५.७७ टक्के व मुदत ठेवीचे व्याज ७.७५ टक्के म्हणजे साधारण दोन टक्के खरे व्याज झाले, त्या अर्थाने!
प्राप्तिकरातील ‘८० सी’ची वजावट दीड लाखांवरून किमान दोन लाख करावी ही प्रलंबित मागणी आहे. ती पूर्ण झाल्यास मध्यमवर्ग सुखावेल. दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावरील करदायित्व प्रत्येक मत्ते प्रमाणे निरनिराळे आहेत. उदाहरणार्थ शेअर व इक्विटी म्युच्युअल फंड एक वर्षानंतर १० टक्के (₹ एक लाख माफ केल्यावर), बांधकाम क्षेत्रात २० टक्के -दोन वर्षानंतर, डेट म्युच्युअल फंड व सोने आदि व्यवहारावर २० टक्के, तीन वर्षांनी वगैरे वगैरे! ते समसमान करण्याचे चर्चिले जात आहे. म्हणजे ते सरसकट दोन वर्षे होऊ शकते. असे झाल्यास बाजारावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.
तसेच नवी करप्रणाली बहुतांशी करदात्यांना पसंत पडलेली नाही. त्यात कुठलीही सवलत वापरता येत नाही. या नवकर प्रणालीतील स्लॅब वाढू शकतात. जीएसटी व प्रत्यक्ष करामध्ये झालेली भरघोस वाढ अर्थसंकल्पातील मोठी जमेची बाजू आहे. तिचा वापर किती कल्पकतेने होतो यावर अर्थसंकल्पाचे यश अवलंबून आहे.
(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)