लेखक : भूषण महाजन
अर्थव्यवस्थेचा आढावा गेल्या मंगळवारी (ता. ३१ जानेवारी) संसदेत मांडला गेला. ते चित्र अत्यंत आशादायक आहे. कोविडमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ व झालेली पिछाडी देशाने भरून काढली आहे.
गेल्या सप्ताहातील ‘पालवी की पानगळ’ या लेखात (सकाळ साप्ताहिकः प्रसिद्धी २८ जानेवारी) शेअर बाजारात पानगळ येईल की काय असे सूचित केले होते. त्याची कारणे अनेक होती. मुख्य म्हणजे निफ्टीला वर जाण्यासाठी /चढाई करण्यासाठी नेतृत्वच उरले नव्हते. मुख्य मदार असलेली बँक निफ्टी थकली होती, तिला थोडा विसावा घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. बाजाराचा नेहमीचा तारणहार असलेल्या रिलायन्सचा ‘मूड’ उदासीन होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे पाठीराखे द्विधा मन:स्थितीत होते. त्यात अर्थसंकल्प जवळ आला होता. सालाबादप्रमाणे बाजार नर्व्हस होता. त्यामुळे जागतिक बाजाराचे वेध जरी चढे असले तरी निफ्टीने १७८०० ही आधारपातळी तोडलीच.
निमित्त झाले अदानी समूहाचा २० हजार कोटी रुपयांचा मेगा एफपीओ. नेमकी हीच वेळ साधून अमेरिकास्थित हिंडेनबर्ग ह्या संस्थेने अनेक आरोप करून अदानी समूहाला कोंडीत पकडले. हिंडेनबर्ग रिसर्च ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते व त्यातून मोठ्या कंपन्यांचा गडबडघोटाळा उघडकीस आणते. या संस्थेने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा असा पर्दाफाश केला आहे. मात्र प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की हिंडेनबर्ग ही पूर्णतः नफ्याच्या उद्दिष्टाने काम करणारी संस्था आहे. आपल्या रिसर्चचा स्वतःला भरपूर फायदा करून घेण्यासाठी ही संस्था प्रथम संशोधन केलेल्या कंपनीचे शेअर अथवा बॉण्ड शॉर्ट करते आणि नंतर आपला अहवाल प्रसिद्ध करते. अहवाल प्रसिद्ध झाल्यावर जी चिखलफेक होईल किंवा जो गदारोळ उडेल, त्याने बाजाराचे सेंटीमेंट नकारात्मक होईल आणि त्यामुळे जर तो शेअर खाली आला तर तो पुन्हा विकत घेऊन संस्था नफा मिळवते. त्यांनी केलेले आरोप, त्याला अदानींनी दिलेले उत्तर वगैरे तमाम तपशील वृत्तपत्रात सतत आलेला आहे. त्यालाच फोडणी म्हणून ‘व्हॉट्सअॅप विद्यापीठा’ने अनेक कपोलकल्पित कथा व्हायरल केल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती न करता इतकेच लिहितो की भारतीय उद्योगविश्व, परदेशातील चाहतावर्ग व स्थानिक गुंतवणूकदार पाठीशी उभे राहिल्यामुळे अदानीच्या भागविक्रीचा भरणा पूर्ण झाला आणि अनेक स्टेक होल्डरचे जीव भांड्यात पडले. अदानी ह्यांच्यावर आरोप असलेला कथित शेअर घोटाळा आता सेबीप्रविष्ट आहे; लवकरच त्यांचा निकाल व भाष्य हाती येईल. मात्र हे प्रकरण बरेच चिघळणार आहे हे नक्की. हिंडेनबर्ग आणि अदानी समूह ह्यांना व त्या अनुषंगाने आपल्या शेअर बाजारातील तेजी-मंदीवाल्यांना मात्र रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग… असे म्हणत त्यासाठी तयार राहावे लागेल.
इश्यूची नैय्या जरी पार झाली असली तरी आजतरी मंदीवाल्यांचे पारडे थोडेसे जड आहे. मागच्या आठवड्यात शुक्रवारी (ता. २७ जानेवारी) मोठी व त्यापाठोपाठ ३० जानेवारीला निफ्टीत छोटी घसरण झाली असली तरी तेजीच्या धारणेत खंड पडल्यामुळे, परदेशी संस्थांची विक्री जर अशीच चालू राहिली तर निफ्टी १७००० पर्यंत खाली येऊ शकते. (येईलच असे नाही. ता. २५ डिसेंबर पासून मंगळवारी जानेवारी अखेरपर्यंत, परदेशी संस्थांनी ५०००० कोटी रुपयांची विक्री केलेली आहे). निफ्टीच्या घसरणीची तयारी जर ठेवली, तर असे लक्षात येईल की आजमितीला जोखीम /परतावा हे गुणोत्तर आकर्षक झाले आहे. जेमतेम पाचशे ते सातशे अंशाची मंदी आणि हजार ते पंधराशे अंशाची तेजी असे हे समीकरण आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, खरेदीच्या भावात जेमतेम चार टक्के घसरण सोसायची तयारी असली तर किमान दहा ते पंधरा टक्के उतारा/ नफा मिळू शकतो. आजपर्यंत शेअर बाजाराला बिचकत असणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात चंचूप्रवेश करण्याची चांगली संधी चालून आली आहे. तिचा यथाशक्ती लाभ घेतला पाहिजे.
बजाज फायनान्स व बजाज फिन सर्व्हचे निकाल हाती आले आहेत. निकाल अप्रतिमच आहेत. त्यात नाव ठेवण्यासारखे काहीही नसले तरी शेअर बाजाराने त्याकडे तोंड फिरवून बघितलेदेखील नाही. मागील वर्षाच्या तुलनेत नफा ४० टक्के वाढला आहे. पण तरीही नफ्याचा गतीवेग कमी झाल्याचे बाजाराला वाटते. रिझर्व्ह बँकेने मायक्रो फायनान्स क्षेत्राच्या व्याजदरावरील निर्बंध सैल केल्यामुळे त्या क्षेत्रावरील लक्ष वाढवण्याची कंपनीची योजना आहे. बाजाराच्या तूर्त नापसंतीकडे दुर्लक्ष करून प्रत्येक घसरणीत जमवावा असा हा शेअर आहे. पुढील वर्षीच्या मिळकतीचा व पुस्तकी किमतीचा अंदाज बांधून पुस्तकी किमतीच्या सहापट भावाला हा शेअर वाजवी वाटू शकतो. त्या दृष्टीने ₹ ५००० ते ५५०० हा दर आकर्षक आहे. चालू भावातही भवानी करता येईल.
नुकतेच बजाज ऑटोचेही तिमाही निकाल हाती आले. हे निकाल हा आश्चर्याचा सुखद धक्काच होता. महागाईला धरून नेमकी विक्री किमतीत वाढ करण्याची वेळ कंपनीने साधली आहे. त्याबरोबर खर्चातही एक टक्का कपात करून दाखवली आहे. निर्यात जरी कमी झाली असली तरी सणासुदीच्या विक्रीने वेळ मारून नेली आहे. अतिरेकी हल्ले वाढल्यामुळे नायजेरियात दुचाकी वाहनचालकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते. त्यामुळे आफ्रिकेतील निर्यात कमी झाली होती. ती पोकळी ब्राझीलने भरून काढली आहे. ‘डॉमीनर’ या नाममुद्रेखाली तेथे मोटरसायकल सादर झाली होती. ती मागणीही वाढती आहे. ढोबळ नफा ₹ १७७७ कोटी तर मार्जिन १५.५ टक्क्यांवरून १९.१ टक्क्यांवर पोहोचले आहेत. शेअरने जरी मान वर काढली असली, तरी शेवटच्या तिमाहीत हीच वृद्धी कायम दिसेल का? या शंकेने शेअर खाली आला. बजाजने नुकतीच चाकण येथे तयार झालेली, दहा लाखावी केटीएम दुचाकी विकली. मारुती सुझुकीच्या निकालांचा उल्लेख गेल्या अंकात (सकाळ साप्ताहिकः प्रसिद्धी २८ जानेवारी) झालाच आहे. ह्या साऱ्यांच्या जोडीला टाटा मोटरही चांगले निकाल नोंदवून आपणही दखलपात्र आहोत हे सांगून गेली. गेली उणीपुरी नऊ महिने आपण वाहनउद्योगाचा पाठपुरावा करीत आहोत. तो उद्योग गुंतवणूकदाराच्या ओंजळीत भरपूर माप टाकेल, हा कयास खरा ठरला. येथे आपपरभाव न ठेवता ऑटो इंडेक्स फंड अथवा ईटीएफ कडे लक्ष द्यायला हवे. त्यात महिंद्र, मारुती, टाटा मोटर आदी सारेच शेअर अंतर्भूत आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाचे बिगुल वाजत आहेत. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत अर्थसंकल्प व त्यावरील विश्लेषण आपल्या हाती असेल. नेहमीप्रमाणेच हा आशा निराशेचा खेळ असू शकेल. अर्थसंकल्पपूर्व अर्थव्यवस्थेचा आढावा गेल्या मंगळवारी (ता. ३१ जानेवारी) संसदेत मांडला गेला. ते चित्र अत्यंत आशादायक आहे. कोविडमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ व झालेली पिछाडी देशाने भरून काढली आहे. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न किमान सात टक्के वाढेल अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षीही ६.६ ते ६.८ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. जानेवारी महिन्याचा जीएसटी महसूल पुन्हा एक लाख छपन्न हजार कोटीला पोहोचला आहे. हे पाहता पुढील वर्षीचा संकलनाचा अंदाज वाढीवच असेल. त्याबरोबर प्राप्तिकर संकलनाचे उद्दिष्टही पुरे झालेले दिसते.
युरोपमधील हिवाळा फार कडक नसल्यामुळे नैसर्गिक वायूची मागणी कमी झाली आहे. किमती सतत खाली येत आहेत. सिरॅमिक टाईल्सच्या उत्पादनामध्ये वापर होत असल्यामुळे त्या उद्योगाचे वाईट दिवस आता संपावे. त्या निमित्ताने सेरा व कजारिया टाईल्सकडे नजर टाकता येईल.
अर्थसंकल्पामधील नावीन्य, वैविध्य व वस्तूवरील करबदलामुळे भावात होणारे चढउतार आता फारसे दिसणार नाहीत. त्यामुळे स्थितप्रज्ञाच्या नजरेने अर्थसंकल्पाकडे पाहणे योग्य.
(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)