लेखक : भूषण महाजन
संयम ठेवा. अपना टाइम आयेगा.. आ रहा है…
एकेक दिवस जातो पण शेअर बाजाराला दिशा सापडत नाही. गेल्या आठवड्यात १५ फेब्रुवारी रोजी बाजारात चांगली तेजी होती. निफ्टीने १८०००ची प्रतिकार पातळी ओलांडली, दुसऱ्या दिवशी तर ती १८१३४ अंशाला जाऊन धडकली. एकतर्फी प्रेमात, उसने अवसान आणून; प्रेमवीराने प्रेयसीला प्रपोज करायला जावे अन समोर तिचे तीर्थरूप दिसताच सारे अवसान गळून पडावे तसे तेजीवाले वागताहेत. फेब्रुवारीच्या १६ तारखेला १८१०० अंशाच्या आसपास उघडलेली निफ्टी, दिवस अखेर खाली मान घालून १८०३५ वर बंद झाली, १७ व २० फेब्रुवारी रोजी तीच तऱ्हा! अमेरिकी बाजाराच्या मूड स्विंगप्रमाणे आपला शेअर बाजार हिंदकळतोय. कदाचित मार्च महिनाही असाच जाईल असे दिसते. परंतु गुंतवणूकदार हा नेहमीच तेजीत असतो आणि स्वतःचे शेअर संयमाने सांभाळत असतो. एकच विचार त्याला डिप्रेशनपासून वाचवू शकतो. तो म्हणजे, ‘गली बॉय’मधल्या रॅप सिंगर रणवीरसारखा विचार – ‘अपना टाइम आयेगा …’ असो.
अमेरिकी अर्थव्यवस्थेत ‘फेड’ची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. बेरोजगारी कमी होते आहे (जवळजवळ तीन टक्क्यावर आली आहे.) १९६९पासूनचा हा निचांक आहे. त्याच बरोबर महागाई दरदेखील कमी होतोय. पण थोर अर्थतज्ज्ञ विल्यम फिलिप्स म्हणतो की असं नसतं! त्याने शोधलेला एक आलेख आहे. त्याचे नाव फिलिप्सची वक्ररेषा. त्याच्या सिद्धांतानुसार बेरोजगारी आणि महागाई एकमेकाविरुद्ध चालतात. रोजगार वाढणे म्हणजे कामगारांच्या हातात पैसा खुळखुळतोय. म्हणजेच महागाई वाढायला हवी. मग आधीच व्याजदर वाढवून कारखानदारांना आपले खर्च कमी करायला भाग पाडले पाहिजे. जर फेडने फिलिप्सच्या वक्र रेषेप्रमाणे धोरण आखले तर व्याजदर वाढवले पाहिजेत. पण फार मर्यादेबाहेर वाढवले तर मंदीचा राक्षस उभा राहील. महागाईचा राक्षस वाईट की मंदीचा? ह्या द्विधा मनःस्थितीत, मध्यममार्ग घेत, फेडने पाव टक्क्याने व्याजदर वाढवले. तरी शेअर बाजाराने फार शेफारून जाऊ नये म्हणून आपले भाष्य मात्र कठोर ठेवले. अमेरिकेत पांढरपेशा वर्गात ले ऑफची भीती आहे, पण कामगारवर्गात नवी रोजगारनिर्मिती होत आहे. शेवटी फेड केव्हा कंटाळतो ह्याची फक्त वाट बघणे आपल्या हातात आहे. कदाचित ह्या महिन्यातही पाव टक्का वाढ व्हावी.
आता आपली काय अवस्था झालीय ते बघू. डोळे मिटून फेडचा पाठलाग करताना रिझर्व्ह बँकही आपले व्याजदर वाढवीत होती. गृहकर्जाचा; वाहनकर्जाचा हप्ता वाढला तरी पर्वा नाही, असे म्हणत महागाईला आळा घालण्याचा प्रयास सुरू होता. त्याचा परिणाम काय झाला ते नुकतेच कळते आहे. उत्पादन क्षेत्रात किंबहुना बँकिंग वगळता उर्वरित साऱ्याच उद्योगांची विक्री गेल्या तिमाहीत सतरा टक्के कमी झाली आहे. कच्चा माल वाजवी दरात मिळून झालेली बचत, वाढीव व्याजाने खाऊन टाकली. निर्देशांकाच्या बाहेरील २,७९० कंपन्यांचा गेल्या तिमाहीतील नफा १४.२ टक्क्याने उतरला आहे. त्यात पुढील दोन महिने बँकांना रोकडटंचाई जाणवेल असे दिसते. २०२० साली कोविडमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना बराच पतपुरवठा केला होता, जवळपास ७३ हजार कोटी पुढील दोन महिन्यात बँकिंग सिस्टीममधून बाहेर जातील, त्याचबरोबर १५ मार्चला आयकराचा अंतिम भरणा कॉर्पोरेट जगतातून होईल, त्याचाही विचार करायला हवा. गुंतवणूकदाराच्या दृष्टीने या संधीचा उपयोग इतकाच की ठेव बाजार किंवा जी सेक फंड या दरम्यान अधिक आकर्षक होतील. त्याचा जरूर लाभ घेतला पाहिजे.
ग्रासिमनेही आपले डिसेंबर अखेरचे निकाल जाहीर केले. प्रथमदर्शनी नफा ४४ टक्के वाढलेला दिसतो, पण अतिरिक्त उत्पन्न वजा केल्यानंतर दर्शवलेला व्यवसायातील नफा २५१६ कोटी नसून १०२४ कोटी आहे हे लक्षात येते. रसायने, व्हीस्कोज फिलामेंट यार्न हे विभाग चांगले कामकाज करीत आहेत. नुकत्याच पदार्पण केलेल्या रंग व्यवसायात १८१७ कोटी रुपयांची लागत झाली आहे. निकाल फारसे उत्कंठावर्धक नाहीत. शेअर बाजारानेही त्याचे यथातथाच स्वागत केले आहे. अल्ट्राटेक ही तिची उपकंपनी सिमेंटची भारतातील एक नंबरची उत्पादक आहे. सिमेंटचे दर गोणीमागे १० ते २५ रुपयांनी वाढत आहेत. दुसरी उपकंपनी ए बी कॅपिटलचे कामकाजही सुधारत आहे. ग्रासिमला ₹ १४५०-१५०० च्या दरम्यान आधार आहे. हा समभाग आपल्या रडारवर हवाच.
‘एनएसई’ने दिलेल्या माहितीनुसार रोजच्या व्यवहारातील छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग सतत कमी होत आहे. गेली दीड वर्षे शेअर बाजाराची वाटचालही तेजीची नाही. त्यात छोट्या गुंतवणूकदारांचे लाडके स्मॉलकॅप शेअर जवळपास १० टक्के घसरले आहेत. जानेवारी २३मध्ये छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांचा सहा महिन्यातील, सहभाग ६६ टक्क्यांवरून ४४ टक्क्यांवर आला आहे. त्यातील एक मोठा वर्ग म्युच्युअल फंडाकडे वळल्याचे दिसते. तसेच व्हावे अशी श्रींची (पक्षी ‘सेबी’ची ) इच्छा आहे, व ते घडत आहे. याच गुंतवणूकदाराच्या संरक्षणासाठी सेबी सतत कंबर कसत असते. सेबीद्वारे प्रत्येक फंडाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची योजना आहे. हे होणार ह्याची काळजी अधिक मोलाची आहे. ९९ टक्के कामकाज जरी सेबी निर्देशित पद्धतीने होत असले तरी एक टक्का चुकारपणा असलाच तर तो दुरुस्त करायचा आहे. बोलता बोलता म्युच्युअल फंडाकडील देशाच्या गुंतवणूकदारांची मालमत्ता चाळीस लाख कोटी रुपयांवर पोहोचली यात सेबीचा मोलाचा वाटा आहे. अर्थात तितकाच महत्त्वाचा वाटा फंडांचे पारदर्शी, गुंतवणूकदारभिमुख कामकाज व अव्याहत गुंतवणूकदारांच्या हितासाठी धडपडणाऱ्या म्युच्युअल फंड वितरकांचा आहे. आपण सारे एकाच चमूचा हिस्सा आहोत ह्याची जाणीव सर्व घटकांनी ठेवावी एवढीच माफक अपेक्षा.
एचडीएफसी बँकेने नुकतेच २५ हजार कोटी रुपये, रोखे बाजारातून ७.९७ टक्के वार्षिक व्याजाने उभे केले. रोख्यांची मुदत दहा वर्षाची आहे व त्यांना चांगली मागणी होती. या नावाला व नाममुद्रेला आज किती किंमत आहे, हे त्यातून ध्वनित होते. ह्या आधी डिसेंबर २२मध्येही बँकेने १५ हजार कोटी रुपये टायर टू बॉण्डद्वारे उभे केले होते. एचडीएफसी सोबत विलीनीकरणाच्या आधीच हे भांडवल जमा केले आहे. पुढे येणारी रोकड टंचाई व व्यवसायासाठी लागणाऱ्या तरंगते भांडवलाची अशा प्रकारे व्यवस्था झाली आहे. ह्याचा दुसरा अर्थ असा की AA किंवा A क्रेडीट रेटिंग असलेल्या संस्थांना अधिक व्याज द्यावे लागेल. खासगी व्याजदरांची वाटचाल ९ ते १० टक्के दराकडे चालू झाल्याचे दिसते.
काश्मीरमध्ये लिथियम धातूचे मोठे साठे सापडल्याची बातमी व चर्चा आहे. उत्खनन करून, पर्यावरण आघात मूल्यांकन करून ते वापरण्याजोगे होण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षे जातील. ही एक मोठी सुदैवी घटना आहे, हे नक्की. देशाच्या वाहन व पर्यावरण धोरणात ई-बाईकना मोठे प्राधान्य दिलेले आहे. खरे तर चीन या बाबतीत जगाचे नेतृत्व करतो. किमान शंभर कारखाने तेथे ई-स्कूटर तयार करतात. बायीड नावाची चिनी कंपनी आपली उत्पादन क्षमता झपाट्याने वाढवीत आहे. चीन बरोबरच्या आपल्या व्यापारात मोठी तूट आहे. दहा हजार कोटी डॉलरची आयात आणि आपली जेमतेम १,७५० कोटी डॉलरची निर्यात असे हे प्रमाण आहे. बायीड अतिशय कार्यक्षम बॅटरी तयार करते. त्या कंपनीत वॉरेन बफे ह्यांची २५ टक्के गुंतवणूक आहे. भारतीय कंपन्यांच्या भागीदारीत हा व्यवसाय भारतात सुरू करण्यास भरपूर वाव आहे. तसे झाल्यास अॅपल सारखा अजून एक उत्पादनाचा स्रोत उपलब्ध होईल. या संबंधी योग्य ते सरकारी धोरण आखण्याची गरज व वाट आहे.
मित्रांनो संयम ठेवा. अपना टाइम आयेगा… आ रहा है…
(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)