तुझसे नाराज नही, हैरान हूँ मै…

लेखक : भूषण महाजन

येणारे दिवस तेजीला पोषक नाहीत असे दिसते. जेव्हा सत्य मुकाट्याने स्वीकारावे लागते, तेव्हाच ओठावर ओळी येतात : तुझसे नाराज नही…

अमेरिकेत बेरोजगारी कमी झाली की ‘फेड’चे टाळके सटकते. लागलीच महागाई, दरवाढीची स्वप्ने पडायला लागतात आणि व्याजदर वाढीची चर्चा सुरू होते. तसे झाले की अमेरिकी शेअर बाजार सपशेल शरणागती पत्करून पाच-सहाशे अंशांनी पडून दाखवतात. कुठलाही देश बेरोजगारी वाढल्याने आनंदी होतो, हे आपल्यासारख्या विकसनशील देशाला पटणे जरा जडच जाते. परंतु मागील लेखात (सकाळ साप्ताहिक ः प्रसिद्धी २५ फेब्रुवारी) म्हटल्याप्रमाणे, रोजगार वाढला की कामगारांच्या हातात पैसे येतात आणि ते त्यांनी खर्च केले तर महागाई वाढते, या विल्यम फिलिप्सच्या सिद्धांतानुसार फेडची वाटचाल सुरू आहे. (सोबतचा आलेख पहा.) जूनच्या २२ तारखेनंतर महागाई दर ९.१ टक्क्यांवरून ६.४ टक्क्यांवर घसरला आहे. जानेवारीत त्यात किरकोळ वाढ झाली आहे हे निश्चित. पण थोडी वाट पाहायची तयारी असेल तर कदाचित तो पुढील दोन महिन्यात सहा टक्क्यांखाली येईलदेखील. पण फेड वाट पाहायला तयार नाही. आत्ताची सबब अशी की –

  • महागाई दर कमी झाला असला तरी तो पाहिजे त्या वेगाने कमी होत नाही.
  • रोजगारनिर्मिती वाढतेच आहे.
  • कदाचित पाव टक्क्याने व्याजदर दोनदा वाढवावे लागतील.

गाढव आणि घोडा ह्यांच्या संकरातून निर्माण होतं खेचर! या खेचराची शेपूट घट्ट पकडून कठीण चढण पार करायची डोंगराळ भागात पद्धत आहे. त्याच्या शेपटीत प्रचंड ताकद असते, पण ती हातातून सुटू देता कामा नये. प्रसंगी खेचराच्या दुगाण्याही खाव्या लागतात. इतरही वास सहन करत डोंगर पार करावा लागतो. सध्या फेडचे हे असे चालले आहे. व्याजदर वाढीचे शेपूट धरून महागाई वर मात करण्याचा प्रयत्न चालू आहे. फेडच्या हातून शेपूट हातातून सुटले तर मंदी ठरलेलीच.

फेडच्या या धोरणाचा परिणाम जगाला भोगावा लागणार आहे. मंदी किंवा महामंदीची नांदीच या घोषणेत दिसत आहे.

‘टरबूजे का रंग, बदलते देख; खरबूजा भी रंग बदलता है’ अशी हिंदी भाषेत एक म्हण आहे. त्याला अनुसरून भारतातच काय, जगभर व्याजदर वाढणार हे सत्य आता पचवावे लागेल. त्याचेच प्रतिबिंब गेल्या सप्ताहात शेअर बाजारात दिसून आले. गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत (ता. २४ फेब्रुवारी) सलग सहा दिवस निर्देशांक मंदीतच होते. गतीवेग (मुमेंटम) आता खालच्या बाजूस आहे. आपण आजपावेतो १७२००-३०० हा बाजाराचा तळ समजून चाललो होतो. कदाचित त्याखालीही बाजार जाऊ इच्छितो. अर्थात खाली जातांना भारतीय शेअर बाजार, मूल्यांकनाच्या दृष्टीने अधिकच आकर्षक होत चालले आहेत, हे नक्की. सोमवारीदेखील (ता. २७ फेब्रुवारी) बाजार खालीच उघडला आणि जेमतेम १७३९२ अंशावर निफ्टी बंद झाली. (दोनशे दिवसांच्या साध्या चलसरासरीच्या-१७३६८- थोडीशीच वर) येथे थोडासा बाऊन्स येऊ शकतो, पण आलाच तर कदाचित तेथेही विक्री होऊ शकेल असे वाटते.

त्यात आता ‘एल निनो’चे भूत उभे राहिले आहे. दर तीन चार वर्षांनी हा एल निनो व त्याचा परिणाम राज्यकर्त्यांना दचकवत असतो. पावसाने ओढ देणे, पाऊस आलाच तर तो चुकीच्या वेळेस व सरासरीपेक्षा कमी पडणे ह्या एल निनोच्या परिणामांचा आधीच अंदाज घेऊन सरकारची पावले उचलणे चालू आहे. पुरेसा पाऊस झाला नाही तर भाजीपाला, फळे महागतील. महागाई तर वाढेलच!

ग्राहकहित व महागाई दर कमी करणे, ह्यांना सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे सरकार निर्यात बंदी, आयात खुली करणे आदी उपाय योजत आहे. त्यात उन्हाळाही आधीच सुरू झालाय. (व्होल्टास, ब्लू स्टार, सिम्फनी रडारवर हवेत.) गव्हाचे पीक भरघोस येईल अशी जरी अजूनही आशा असली तरी काही सांगता येत नाही. राज्य सरकारची धान्याची कोठारे कमी होताना पाहून सरकारने ५० लाख टन गहू खुला केला आहे. ह्याने मध्यमवर्गीय ग्राहक संतोषेल पण उत्पादक बळीराजा अडचणीत येईल. दोन्ही घटकांचे संतुलन साधणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. एकुणात येणारे दिवस तेजीला पोषक नाहीत असे दिसते. जेव्हा सत्य मुकाट्याने स्वीकारावे लागते, तेव्हाच ओठावर ओळी येतात : तुझसे नाराज नही, (नाराज होऊन सांगतो कुणाला ?) हैरान हूँ मैं (हे सगळं संपणार कधी ? ही अगतिकता!) असो.

पुढे येणारे दिवस दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदाराची सत्त्व परीक्षा बघणारे आहेत. पण त्यातून सहीसलामत (म्हणजे चुकीच्या किमतीला विकाविक न करता) सुटल्यास मिळणारे फळ अत्यंत गोड असेल. ही थांबण्याची तयारी असेल तर शेअर बाजार एखाद्या चांगल्या घटनेचा वापर करून कधीही विस्मयचकित उसळी मारू शकतो. जवळजवळ दीड वर्षाच्या दृढीकरणानंतर (कन्सॉलीडेशन) तेजी तितकीच जवळ येतेय. हे विश्लेषण कदाचित चुकीचेही असू शकते. दोनशे दिवसांच्या चलसरासरीचा आधार घेऊन मोठी संस्थात्मक खरेदी होऊ शकते. मार्च अखेर वाढलेल्या गंगाजळीमुळे विमा कंपन्या त्यात पुढाकार घेऊ शकतात. तसे जरी झाले नाही तरी आता जोखीम /परतावा हे गुणोत्तर अत्यंत आकर्षक झाले आहे. पाच टक्क्यांच्यावर मंदी नाही. येथे म्युच्युअल फंड वितरकांनी आपल्या गुंतवणूकदारांना हे समजावून सांगणे आवश्यक आहे. अशी संधी दोन चार वर्षात एकदा येते. तिचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. सीप किंवा टप्प्याटप्प्याने खरेदी करणे थांबवायचे नाही. आज केलेली सीप जरी तात्पुरती तोट्यात आहे, असे वाटले तरी दोन तीन वर्षात चित्र पूर्णपणे बदललेले दिसेल. तसेच आपले आवडते शेअर एपीएल अपोलो, सिमेन्स, एबीबी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, महिंद्रा, मारुती किंवा तुम्हाला आवडतील ते, असेच प्रत्येक पातळीवर उचलायला हवेत. ‘टप्प्याटप्प्याने’ हे फार महत्त्वाचे आहे. कारण बाजार किती खाली जाईल ते ठाऊक नाही. खाली येणार म्हणून वाट पाहणारे वाटच बघत राहतात, असो.

अदानी समूहाच्या शेअरचे इतके शिरकाण होऊनही त्यांचे पी/ई गुणोत्तर सेन्सेक्स शेअरपेक्षा जास्त आहे. आजही अदानी एन्टरप्रायझेस ६६च्या गुणोत्तराला मिळतो, ह्या समूहातील अदानी पोर्ट आता वाजवी मूल्यांकनाला आला आहे. पण तो रडारवर ठेवायला अत्यंत निधडी छाती लागेल. ह्या निमित्ताने इंडेक्स फंड्स बद्दल एक खुलासा करणे आवश्यक आहे. सहसा इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करणे सोयीचे व स्वस्त मानले जाते. ते खरेही आहे. परंतु निर्देशांकात अंतर्भाव होण्यास प्रमुख निकष तरलता व फ्री फ्लोट बाजार भांडवलाचे मूल्यांकन असते. म्हणजेच सोप्या शब्दात गुंतवणूकदारांचे पाठबळ व चांगल्या ट्रेडिंग व्हॉल्युम असल्या व बाजार भांडवल वाढले तर त्या शेअरचा निर्देशांकात समावेश होऊ शकतो. त्यात कंपनी किती नफा /तोटा करते, पी/ई गुणोत्तर काय आहे वगैरे विचारात घेत नाहीत. लोकप्रियता महत्त्वाची! हा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निर्देशांकात अदानी समूहाचे शेअर अंतर्भूत होते. हा निर्देशांक बराच लोकप्रिय आहे. (कारण त्यातील बरेच शेअर नंतर निफ्टीत समाविष्ट होतात) हा निर्देशांक एक जानेवारीपासून ११ टक्के पडला आहे. (निफ्टी साडेचार टक्के पडल्याच्या तुलनेत) निर्देशांकात डोळे मिटून गुंतवणूक करताना त्यातील शेअर कोणकोणते आहेत तेही बघायला हवे.

चालू घसरण ही संधी मानून संयमाने व चोखंदळपणे केलेली खरेदीच गुंतवणूकदाराला मदत करेल हे नक्की.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

0
0
error: Content is protected !!