वळवाचा पाऊस…

लेखक : भूषण महाजन

अत्यंत संयमाने शेअर बाजारात पाऊल ठेवा, मंदीचा फायदा करून चोख मालच विकत घ्या आणि सजगपणे सांभाळा, हाच संपत्ती निर्मितीचा राजमार्ग आहे.

भर उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना अचानक वळवाचा पाऊस येतो. आणि ओठावर ओळी येतात :

अवचित यावे मेघ भरूनी, नभी लखलख वीज दिसे
धोधो धारा कोसळती पण, बळीराजाला तोष नसे

वळवाच्या पावसाचा शेतकऱ्याला फारसा उपयोग नाही, कारण पेरणी काही करता येत नाही. झाले तर नुकसानच होते, पण धगधगत्या उन्हात होणारी जिवाची काहिली कमी करायला वळवाचा पाऊस मदत करतो. तसेच मंदीत येणारी तेजीची झुळूक (झुळूक नव्हे, ती वावटळच) गुंतवणूकदाराला फारशी मदत करत नाही. कदाचित काही चुकीच्या गुंतवणुकीतून बाहेर पडण्यास मदत होत असेल, बाजार वर गेल्याने बरे वाटत असेल तेवढेच. गेल्या शुक्रवारी (ता. ३ मार्च) झालेली ९०० अंशांची सेन्सेक्सची तेजी असाच वळवाच्या पावसाचा आभास देऊन गेली. सोमवारी ६ मार्च रोजी पुन्हा बाजार तेजीतच होता. पण १७८००ची लक्ष्मण रेषा काही ओलांडायला तयार नव्हता. मागील लेखात (सकाळ साप्ताहिक : प्रसिद्धी ४ मार्च) आम्ही सूचित केले होतेच की दोनशे दिवसांच्या चलसरासरीजवळ बाजाराला बाऊन्स येऊ शकतो. हा बाऊन्स, ही तेजी, किती दिवस टिकते ते बघायला हवे. सहसा मंदीवाले आपली पकड इतक्या लवकर सोडत नाहीत. त्यासाठी खरेच चांगली बातमी लागते. उदाहरणार्थ, रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा विचार केला, अदानी समूहाने आपली कर्जे परतफेडीचा कार्यक्रम जाहीर केला किंवा आपल्या महत्त्वाकांक्षा आवरत्या घेतल्या अथवा रशियाने युद्धबंदी जाहीर केली वगैरे वगैरे. आज जरी हा कल्पनाविलास वाटला तरी असे होणे अगदीच अशक्य नाही. पण असे काही घडले नाही तर ही तेजी औट घटकेची ठरण्याचीच शक्यता वाढते. म्हणूनच पुनश्च येरे माझ्या मागल्या करीत शेअर बाजार (पक्षी निफ्टी) परत एकदा १७०००-१७२००ला स्पर्श करू शकतो. दीर्घ पल्ल्याच्या निवेशाला लागणाऱ्या संयमाची त्यानिमित्ताने परीक्षा होते, इतकेच!

मित्रहो, हे युद्ध आहे. अदानी- हिंडेनबर्ग युद्धात पहिली फेरी हिंडेनबर्गने जिंकली आहे, हे नक्की. पण त्यांना किंवा त्यांच्या पाठीराख्यांना आपली मंदी कधीतरी कापावी लागेलच; नाहीतर कागदावरचा नफा खिशात कसा येणार? त्या दृष्टीने दुसऱ्या फेरीत अदानी पुढे आहेत. अचानक अदानी समूहाकडे ‘जीक्यूजी पार्टनर्स’ नावाच्या एएमसीचे (मालमत्ता व्यवस्थापन कंपनी) लक्ष गेले. या एएमसीचे अध्वर्यू आहेत राजीव जैन, एक भारतीय अमेरिकी. त्यांना त्या शेअरचे मूल्यांकन आकर्षक वाटले. जीक्यूजी विकसनशील देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करते. यापुढेही हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस आहे. अदानी समूहातील चार कंपन्यांचे शेअर त्यांनी (चक्क १५५५६ कोटी रुपयांचे) एका ब्लॉक डीलमध्ये एक्स्चेंजमधून विकत घेतले. रोजच खालचे सर्किट लागून धापा टाकणाऱ्या अदानीच्या शेअरसाठी ही संजीवनीच ठरली. दोन दिवसांत अदानी एन्टरप्रायझेस ३२ टक्के वाढला, तर अदानी पोर्ट १८ टक्के. (शेअर बाजाराला सट्टाबाजार का म्हणतात, याचा वस्तुपाठच या निमित्ताने मिळाला.) यापुढेही हे शेअर असेच वाढतील का? याचे उत्तर कुणाकडेच नाही. म्हणूनच आम्ही वाचकांना शक्यतो अतिमहाग शेअरपासून दूरच राहा, असे सुचवीत असतो. मुख्य मुद्दा असा की अदानी आता शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. त्यांचे पाठीराखे जर सक्रिय झाले, तर मंदीवाल्यांना पळता भुई थोडी होऊ शकते. काहीही झाले तरी कुठेतरी या समूहाच्या शेअरना आधारपातळी आहे, हे बाजाराला कळले. त्यानिमित्ताने सेंटीमेंट सुधारले. आयुर्विमा महामंडळाचा जीवही भांड्यात पडला असेल.

युद्धाची पुढची फेरी शिल्लक आहे. घोडा मैदान दूर नाही. आता तर गुंतवणूकदारांचा विश्वास टिकावा व वाढावा यासाठी अदानी समूह हॉंगकॉंग, सिंगापूरच्या पाठोपाठ अमेरिकेतील काही शहरांत आणि लंडनमध्येही रोड शो करीत आहे. तसेच शेअर तारणातून घेतलेल्या कर्जापैकी, ७,३७४ कोटी रुपयांचे कर्जही समूहाने फेडले आहे. शेअरचे भाव कृत्रिमरित्या फुगवल्याच्या आरोपाची सेबी चौकशी करेलच, त्यात सुप्रिम कोर्टानेही याच प्रकरणी, आदेश देऊन सहा उच्चपदस्थांची चौकशी समिती नेमली आहे.आमची अपेक्षा एवढीच की शेअर बाजाराची धारणा सुधारावी. एक अदानी समूह म्हणजे संपूर्ण भारतीय शेअर बाजार नव्हे. जसे टेस्ला कंपनीचे शेअर चार महिन्यात ३०० डॉलरवरून १०० डॉलरवर घसरले तरी अमेरिकी बँका बुडाल्या नाहीत, तशीच गुंतवणूकदारांनी भारतीय बँकांची काळजी करू नये. किंबहुना ह्या संधीचा फायदाच करून घ्यावा. सरकारी बँकांच्या शेअरकडे या मंदीत लक्ष द्यावे, असे आम्ही सुचवले होते. तेव्हापासून बँक ऑफ बडोदा १५ टक्के वाढला, या क्षेत्रातील इतर शेअरही तेजीत आले.

सेबीच्या अजून एका कार्याची दाखल घ्यायलाच हवी. सध्या समाजमाध्यमे अत्यंत लोकप्रिय झाल्यामुळे यूट्यूब माध्यमाचा वापर करून नादावलेल्या पण निष्पाप गुंतवणूकदारांना फसविण्याचा एक वेगळाच पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याला ‘फुगा फुगवा आणि टाचणी मारा’ असे म्हणतात. (पम्प आणि डम्प) सहसा छोटा गुंतवणूकदार पेनी स्टॉकमध्ये पैसे टाकतो. दोन रुपयात घेतलेला शेअर चटकन पाच दहा पट होऊ शकतो हे त्यांचे लॉजिक! पाच पट झाला की नफा काढून घेईन ही मनीषा. मात्र शेअर प्रत्यक्षात पाचपट झाल्यावर मोह वाढतो. नेमक्या याच दुबळेपणाचा फायदा घेतला गेला. साधना ब्रॉडकास्टचा शेअर पाच महिन्यात वाढला, ८ मार्च रोजी ₹ १.८५ तर १२ ऑगस्टला ३३ रुपये झाला, आणि आज पाच रुपये आहे. वरच्या भावात हे यूट्यूब सल्लागार शेअर विकून मोकळे झाले आणि कधीतरी आयुष्यात हा शेअर वाढेल अशी आशा ठेवीत गुंतवणूकदार अडकले. सेबीने ह्या प्रकरणी त्वरित हालचाल केली व सकृतदर्शनी यात सहभागी असलेल्या ३१ व्यक्तींना शेअर बाजारात काम करण्यास बंदी केली, तसेच त्यांची मालमत्ता फ्रिज केली आहे. सेबीला विचारल्याशिवाय मालमत्तेची विल्हेवाट लावता येणार नाही. या स्वयंघोषित सल्लागारांनी किमान ₹ ५२ कोटींचा नफा मिळवला असे दिसते. असे प्रसंग वारंवार घडतात. आपली फसगत होऊ नये म्हणून छोट्या गुंतवणूकदाराने काय काळजी घ्यावी?

उत्तर देण्याचा एक प्रयत्न!

  • सेबीची रास्त इच्छा अशी आहे की छोट्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडात पाचशे रुपयापासून सुरुवात करता येते व आपले भांडवल; तज्ज्ञ मंडळी सांभाळत असल्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी असते.
  • स्वतः बाजारात व्यवहार करायची हौसच असेल तर त्यासाठी काही वेळ खर्च करायची तयारी हवी (तो वेळ यूट्यूब पाहण्यात घालवू नये.) विशेषतः जिथे लाखो फॉलोअर असतानाही कुठलीही टिप्पणी करायला मनाई असते अशा यूट्यूब चॅनेलच्या कुठल्याही प्रकारे नादी लागू नये.
  • बीएसई, एनएसईच्या संकेतस्थळावर प्रत्येक सूचीबद्ध कंपनीचा इतिहास उपलब्ध असतो. वेळ काढून तो वाचावा. कंपनीच्या घोषणा तर वाचल्याच पाहिजेत.
  • शक्यतो पेनी स्टॉकच्या नादी लागूच नये. छप्पर फाडून पैसे मिळणे शक्य आहे व ते चांगल्या व्यवस्थापनाच्या शेअरमध्येही शक्य आहे. राकेश झुनझुनवाला ह्यांचा अनेकपट परतावा देणारा टायटन सर्वांनाच माहीत आहे. असे अनेक चांगले शेअर आहेत. इन्फोसिस, टीसीएस, मारुती तितकेच विश्वासार्ह! असो.

    जगात अजूनही नाते जपणारे चांगले शेअर दलाल तसेच सल्लागार आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा; प्रसंगी फी देऊनही.

  • शेअरचे टार्गेट अनेक पट दर्शविल्यास विश्वास ठेवू नये. साधना ब्रॉडकास्टचा भाव १९ रुपये असताना टार्गेट ३४० रुपये देण्यात आले होते.
  • कंपनीचे शेअर कोण घेत आहे आणि कोण विकत आहे हेदेखील एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर कळते. विशेषतः प्रवर्तकांनी केलेली विक्री कळतेच.
  • शेवटी स्वतःचे तारतम्य वापरणे अत्युत्तम!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

0
0
error: Content is protected !!