लेखक – इरावती बारसोडे
इंटरनेटवर कुठेतरी कसलीतरी शोधाशोध करताना एक बातमी नजरेस पडली. ओडिशामधल्या एका व्यक्तीनं रागीपासून चहा तयार केला आहे… एका भरडधान्यापासून केलेला चहा चवीला कसा बरं लागेल? मुळात असा चहा कसा काय तयार केला असेल…? उत्सुकता चाळवल्यामुळं बातमी जरा सविस्तर वाचली.
जगन्नाथ चिनेरी यांचं ओडिशामधल्या कोरापुट जिल्ह्यातील जेपुरे गावामध्ये जगन्नाथ मिलेट हब आहे. इथं ते भरडधान्यापासून केलेले विविध पदार्थ विकतात. साधारण २०२१मध्ये त्यांना भरडधान्याचा आणखी एक नवीन पदार्थ त्यांच्या हबमध्ये इंट्रोड्युस करायची इच्छा झाली, आणि त्यातून तयार झाला ‘रागी टी’. हा चहा कसा करायचा हेसुद्धा चिनेरी यांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे; रागी भाजून, उन्हामध्ये वाळवून केलेल्या पुडीमध्ये तुळस आणि अर्जुन चल (एक प्रकारचं हर्ब) घातलं जातं. ही पूड पाण्यात गुळासह एक-दोन मिनिटं उकळायची, नंतर त्यात किंचित काळं मीठ आणि दोन थेंब लिंबाचा रस घातला की चहा तयार! हा रागी टी तिथल्या लोकांना खूपच आवडला.
मला हा रागी चहा प्यायची संधी मिळेल की नाही माहीत नाही; पण साधा चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी, मसाला टी, आईस टी अशा चहाच्या असंख्य प्रकारांमध्ये आणखी एका चहाची भर पडलीये एवढं मात्र नक्की. पण खरं सांगू का, या सगळ्या चहांना ‘त्या’ क्लासिक चहाची गंमत नाहीच मुळी!
‘तो’ चहा म्हणजे एक सुख… उकळत्या पाण्यात चहापूड किंवा पत्ती घालायची. (साखर घालायची की नाही किंवा घालायची तर किती, हे ज्यानं-त्यानं आपली रक्तशर्करा काय सांगते त्यानुसार ठरवावं.) हवं तर त्यात आलं, गवतीचहा वगैरे घालावा. मग तो चहा मुरवायचा… चहा मुरल्यानंतर येणारा तो ठरावीक रंग डोळ्यांना सुखावतो. मग त्यात दूध घालायचं. सरतेशेवटी वाफाळता चहा कपात ओतताना नाकपुड्यांमध्ये घुसणारा वास एक आत्मिक आनंद देऊन जातो. मग तो कप घेऊन एखाद्या आरामखुर्चीमध्ये पाय पसरून बसावं, आवडतं पुस्तक हातात घ्यावं किंवा टीव्हीवर डोक्याला ताप न देणारं काहीतरी बघावं किंवा नुसतंच खिडकीतून बाहेर बघत बसावं… बाहेर पाऊसबिऊस पडत असेल तर उत्तमच!
चहाची तल्लफ कॉफी किंवा इतर कशानंच जात नाही, आणि ही तल्लफ यायला काही काळवेळ लागत नाही. हे तुम्हालाही लागू होत असेल तर तुम्हीही पक्के चहाबाज आहात. ‘चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच’, अशी नवी म्हण आलीय ती उगाच नाही. सकाळी उठल्या उठल्या चहा घशाखाली उतरला नाही तर दिवस सुरू होत नाही. ‘बास खूप काम झालं, आता चहा पाहिजे’ याबरोबरच ‘अजून खूप काम शिल्लक आहे, चहा पिऊन मगच सुरुवात करावी’, हेही असतं. ‘काय थंडी आहे/काय पाऊस आहे… मस्त चहा प्यायला की बरं वाटेल.’ ‘अरे, किती दिवसांनी भेटलो… चहा घ्यायचा का?’ ‘कंटाळा आलाय, काय करावं सुचत नाहीये… चहा पिऊया का?’ ‘भूक लागलीय, पण जेवायला वेळ आहे… अर्धा-अर्धा कप चहा घेऊया?’ ‘उगाच चिडचिड करू नकोस, चहा हवाय का तुला?’ …पक्क्या चहाबाजाला चहा पिण्यासाठी असं कोणतंही कारण पुरतं.
कॉलेज लाइफच्या कितीतरी आठवणी चहाच्या कपाभोवती तयार झालेल्या असतात. गप्पांचे फड चहाभोवतीच रंगतात. चर्चाही ‘ओव्हर द कप ऑफ टी’च झडतात; अगदी आजही! कितीतरी नवीन विषय चहा पितानाच सुचतात.
कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी माझ्या घरच्यांना नेहमी म्हणायचे, ‘किती चहा पिता तुम्ही…?’ कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र लेक्चर बंक करून अमृततुल्यमध्ये चहाचे कप रिचवायची सवय कधी लागली ते कळलंही नाही.
आत्ता हा लेख लिहिता लिहिता एवढ्या वेळा चहा… चहा… केलंय, की अब एक कटिंग तो बनता है।