लेखिका : आरती पागे

केल चिकन
साहित्य – (३-४ व्यक्तींसाठी) २५० ग्रॅम बेबी केल, चिकनचे ६ बोनलेस टेंडर, बारीक चिरलेला मोठा अर्धा कांदा, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची (आवडीनुसार), १ मोठा चमचा दही, १ चमचा धने पूड, मीठ, तिखट (काश्मिरी लाल आणि तिखट), हळद, १ चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला, चिमूटभर साखर, तेल, जिरे.
कृती – चिकन टेंडरचे १-१ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. बेबी केल नीट धुऊन घ्यावे. पाने खूप मोठी असतील तर थोडी चिरून घ्यावीत. एका भांड्यात तेल गरम करावे. तेल गरम झाले की त्यात जिऱ्याची फोडणी करावी. त्यात कांदा परतून घ्यावा. कांदा थोडा गुलाबी झाला की त्यात हिरवी मिरची आणि आले-लसूण घालावे. हे सगळे चांगले परतले गेले की त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटो शिजला की त्यात धने पूड, मीठ, तिखट, हळद आणि मसाला घालून नीट परतावे. मसाला शिजत आला की त्यात दही घालावे. दही परतून तेल वेगळे होत आले की त्यात चिकन घालावे. चिकन थोडे परतून घेतले की गॅस कमी करावा आणि झाकण ठेवावे. झाकण ठेवून १० मिनिटे चिकन शिजवावे. बोनलेस चिकन असल्याने ते लवकर शिजते. चिकन शिजत आले की त्यात केल घालावे. आपल्याला केल जास्त शिजवायची नाही, त्यामुळे केल घातल्यावर अगदी थोडावेळ शिजवावे. नंतर झाकण काढून रस आटवावा. सगळे शिजले की शेवटी मीठ आणि साखर प्रमाणात आहे ना ते बघावे.

स्वीट ॲण्ड सोअर ब्रसेल स्प्राउट
साहित्य – (३-४ व्यक्तींसाठी) एक पाकीट ब्रसेल स्प्राउट, पातीच्या कांद्याची १ जुडी, २-३ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टेबलस्पून तीळ, प्रत्येकी २-३ चमचे सोया सॉस, चिली सॉस, स्वीट चिली सॉस, ऑलिव्ह ऑईल, फोडणीचे तेल, अर्धा चमचा साखर, मीठ.
कृती – ब्रसेल स्प्राउट धुऊन देठे काढून एकाचे दोन भाग असे चिरून घ्यावेत. लसूण, आले दोन्हीच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. दोन्ही वेगवेगळे ठेवावे. पातीच्या कांद्याची पात फक्त चिरून घ्यावी. कढईत तेल कडकडीत तापवून त्यात लसूण घालावा. लसूण जरा पारदर्शक झाला की ब्रसेल स्प्राउटच्या फोडी घालून साखर घालावी.
फोडी परतत असताना सॉस तयार करायला घ्यावा. एका वाटीत ऑलिव्ह ऑईल, तीळ, सोया सॉस, चिली सॉस, स्वीट चिली सॉस, आले सगळे एकत्र करून नीट हलवून घ्यावे. ब्रसेल स्प्राउटच्या फोडी चांगल्या सोनेरी झाल्या की तयार केलेला सॉस घालावा. पातीचा कांदा, मीठ घालून नीट हलवून घ्यावे. हे सगळं मिश्रण खदखदायला लागले की गॅस बंद करून झाकण घालून जरा मुरू द्यावे. स्वीट ॲॅण्ड सोअर ब्रसेल स्प्राउट तयार आहेत. गरम-गरम भाताबरोबर खावेत.

स्वीट पोटॅटो कॅसरोल
साहित्य – (४ व्यक्तींसाठी) २ रताळी, २ टेबलस्पून अनसॉल्टेड बटर, २ टेबलस्पून क्रीम/दूध, १ चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार ब्राऊन शुगर, १ चमचा मेपल सीरप, अगदी चिमूटभर मीठ (सॉल्टेड बटर वापरणार असाल तर मीठ नाही घातले तरी चालेल), दालचिनी पूड, जायफळ पूड, सजावटीकरता कॅन्ड पेकन (अक्रोड वापरले तरी चालतील).
कृती – रताळ्यांची साले काढून, धुऊन उकडून घ्यावीत. ती गरम असतानाच मॅश करायला सुरुवात करावी. हे करतानाच त्यात बटर घालून मॅश करावे. नीट मॅश होऊन गुठळ्या आणि रेषा गेल्या की मग त्याच्यात दूध आणि ब्राऊन शुगर घालून हलवावे. त्याच वेळेस मेपल सीरपही घालावे. थोडे सैलसर मिश्रण झाले की त्यात मीठ, दालचिनी आणि जायफळ पूड घालावी. हे सगळे मिश्रण एका ओव्हन सेफ भांड्यात घालावे. त्यावर कॅन्ड पेकन किंवा अक्रोडने सजवावे. मग ४०० फॅरेनहाइटवर २५-३० मिनिटे बेक करावे. थोडे सेट झाले की खायला द्यावे.

कोरियन माजेकाग्वा (जिंजर कुकी)
साहित्य – (२-३ व्यक्तींसाठी) एक कप मैदा, दीड टेबलस्पून आले रस, चिमूटभर मीठ, अर्ध्या कपापेक्षा थोडे कमी पाणी, १ टीस्पून साखर (ऐच्छिक). पाकासाठी पाव कप साखर, पाव कप पाणी.
कृती – मैदा, आल्याचा रस, मीठ, साखर एकत्र करून पुऱ्यांच्या कणकेइतके घट्ट पीठ भिजवावे. एक मोठी पोळी करून त्यातून २ सेमी बाय ५ सेमीच्या पट्ट्या कापाव्यात. अंदाजपंचे कापू नये. आता प्रत्येक पट्टीला चंपाकळीला मारतो तशा तीन खाचा माराव्या. वरचे टोक मधल्या खाचेतून वळवून घेतले असता तिपेडी वेणीगत आकार येतो. आता या तिपेडी वेण्या तळून घ्याव्यात. साखर, पाणी एकत्र करून अगदी मंद आचेवर ७-१० मिनिटे ठेवून पाक करावा. पाक गार झाल्यावर वेण्या १०-१५ मिनिटे पाकात मुरू द्याव्यात आणि मग बाहेर काढून जरा खुटखुटीत होऊ द्याव्यात. वरून तीळ, बदाम भरड, पाईननट भरड जे असेल ते भुरभुरावे.

क्रॅनबेरी सॉस
साहित्य – एक पाकीट ताज्या क्रॅनबेरी, अर्धा कप तेल, २ टीस्पून लाल तिखट, १ कप ब्राऊन शुगर, १ टीस्पून मीठ, प्रत्येकी अर्धा टीस्पून मोहरी, मेथी, हिंग.
कृती – क्रॅनबेरी धुऊन निथळून घ्याव्यात. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी. निथळलेल्या क्रॅनबेरी फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत राहावे. क्रॅनबेरी लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश कराव्यात. उकळायला लागले की त्यात तिखट आणि मीठ घालावे. पाणी पूर्ण आळले की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये. हा सॉस फ्रीजमध्ये सहा महिनेसुद्धा टिकतो.

व्हेज ग्रीन थाई करी
साहित्य – (४ व्यक्तींसाठी)
वाटणासाठी : दोन पेरं ओली हळद, ४ पेरं गलांगल (थाई आले), २ काड्या लेमनग्रास, ५-६ हिरव्यागार मिरच्या, प्रत्येकी चमचाभर पांढरे मिरे, जिरे, धने, ७-८ कोथिंबिरीच्या काड्या, २-३ कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, एका पूर्ण केफिर लाईमची साल (पांढरा भाग न येऊ देता).
करीसाठी – एक लिटर नारळाचे दूध, मशरूम, मध्यम आकारात चिरलेली प्रत्येकी अर्धी वाटी लाल व हिरवी सिमला मिरची, ब्रोकोलीचे तुरे, गाजराच्या चकत्या, बेबी कॉर्न, ५-६ पाने थाई बेसिल.
कृती – वाटणाचे साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून ओल्या नारळाच्या चटणीप्रमाणे चटणी करावी. नारळाच्या दुधापैकी दोन वाट्या दूध मोठ्या कढईत घेऊन आटवावे. त्यात वाटण घालावे. वाटणाला तेल सुटेपर्यंत ते परतावे. मग उरलेले सगळे दूध कढईत घालून १० मिनिटे खळखळा उकळावे. त्यानंतर सगळ्या भाज्या घालाव्यात. भाज्या थोड्या शिजल्या की गॅस बंद करावा. एकीकडे भात शिजवून घ्यावा. भातावर करी वाढून थाई बेसिलने सजवावे व सर्व्ह करावे.

व्हेजिटेबल राईस नूडल सूप
साहित्य – (२ व्यक्तींसाठी) आले- लसूण, १ छोटा कांदा, गाजराचा १ तुकडा, मूठभर बीन्स, ५-६ बेबी कॉर्न, ४-५ मशरूम, मूठभर पालकाची पाने, कांद्याची पात, १०० ग्रॅम पनीर, सोया सॉस, स्वीट चिली सॉस/चिली सॉस, व्हेजिटेबल स्टॉक, फ्लॅट राईस नूडल.
कृती – थोड्या तेलावर बारीक चिरलेले आले-लसूण आणि कांदा परतावे. त्यात बारीक चिरलेल्या भाज्या घालून आणखी थोडे परतावे. नंतर दीड ते दोन ग्लास व्हेजिटेबल स्टॉक घालावा. सूप उकळत आल्यावर त्यात थोडा सोया सॉस आणि थोडा चिली सॉस घालावा. वरून चिरलेले पनीर, कांद्याची पात आणि राईस नूडल घालावेत. गरमागरम सर्व्ह करावे.

टर्किश अदाना कबाब
साहित्य – (४ व्यक्तींसाठी) साधारण अर्धा किलो खीमा/ग्राऊंड चिकन, १२-१३ लसूण पाकळ्या, २ इंच आले, १ कांदा, प्रत्येकी १ लाल आणि हिरवी सिमला मिरची, ४-५ किंवा हिरव्या मिरच्या किंवा १ ते दीड चमचा रेड चिली फ्लेक्स; मसाला – काळी मिरी पावडर + धने जिरे पावडर, आवडीचा गरम मसाला, टिक्का मसला; फ्लेव्हरिंगसाठी आवडीचे हर्ब – कोथिंबीर किंवा पार्सली किंवा शेपूची कोवळी पाने, पुदिना आवडीनुसार.
कृती – प्रथम फूड प्रोसेसरमध्ये लसूण, आले, मिरच्या बारीक करून घ्याव्यात. पेस्ट न करता जरा भरड मिश्रण करावे. मिरची, आले, लसणाचे बारीक तुकडे खाताना मस्त स्वाद आणतात. आले, लसणाचे प्रमाण जरा जास्तच सढळ असू द्यावे. हे मिश्रण बाजूला ठेवून कांदा आणि लाल, हिरव्या सिमला मिरच्याही फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घ्याव्यात. या मिश्रणाला पाणी सुटते. त्यामुळे वेगळे ठेवून काही मिनिटांनी नीट दाबून जाळी /गाळण्याने पाणी बाजूला काढून घ्यावे. मिश्रण ओले झाले तर कबाब नीट होणार नाहीत. खीमा/ग्राउंड मीटमध्ये आले-लसूण मिश्रण, कांदे, रंगीत मिरच्यांचे मिश्रण घालावे. त्यात मसाला, फ्रेश हर्ब आणि मीठ घालावे. हे सर्व मिश्रण हाताने नीट कालवून घ्यावे. यात कोणताही बाइंडिंग एजन्ट घालत नाहीत आणि त्यामुळेच हे कबाब लुसलुशीत होतात. आकार देण्यासाठी मिश्रण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावे, म्हणजे ते जरासे घट्ट होते आणि नीट आकार देता येतो. नंतर बाहेर काढून हाताला तेल लावून मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करावेत. ते चपट्या स्क्युअरवर मधोमध खुपसून सर्व बाजूने हलक्या हाताने दाबत लांबट करत जावे. तुमच्याकडे चपटी स्क्युअर नसेल किंवा स्क्युअरचा आकार तव्याच्या मानाने हवा तेवढा नसेल, तर ३-४ लाकडी बार्बेक्यू स्टिक्स एकत्र करून त्यावर ॲल्युमिनियम फॉइल घट्ट गुंडाळून स्क्यूअर तयार करावा. कबाबची जाडी सर्व बाजूंनी सारखी असली पाहिजे. किंचित तेल शिंपडून हे कबाब जाड तव्यावर किंवा ग्रिलमध्ये सर्व बाजूंनी शिजेपर्यंत मध्यम आचेवर भाजावेत. चटणीबरोबर खायला द्यावेत किंवा नुसतेसुद्धा छान लागतात.