लेखक : वैशाली खाडिलकर
दाल मिक्स

साहित्य – प्रत्येकी १ कप तूर डाळ व मूग डाळ, पाव कप चणा डाळ.
आमटीसाठी – एक टीस्पून तेल, राई, जिरे, हिंग, हळद व कढीपत्ता याची फोडणी, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून गोडा मसाला, १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, १ टीस्पून गूळ, स्वादानुसार मीठ, ओल्या नारळाचा चव व कोथिंबीर.
कृती – गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये तेल तापवावे. मंद आचेवर सर्व डाळी खमंग भाजाव्यात. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्यांची भरड करावी. चार लवंगा व मिरी टाकून घट्ट झाकणाच्या डब्यात भराव्यात. जरुरीप्रमाणे वापरावे.
आमटीसाठी – कढईत तेल घेऊन चार टेबलस्पून ही भरड, मीठ व पाणी जरुरीप्रमाणे घालून गॅसवर उकळत ठेवावे. चांगली उकळी आल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट, गोडा मसाला, चिंचेचा कोळ व गूळ घालून एकजीव करावे. तडका पॅनमध्ये खमंग फोडणी करून त्यावर ओतावी. व्यवस्थित ढवळावे व चांगले शिजले आहे का ते तपासावे. चविष्ट आमटी तयार! वाडग्यात काढून नारळ चव व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी!
एनर्जी पावडर मिक्स

साहित्य – दोन टीस्पून तूप, १ टेबलस्पून डिंक तुकडे, १ कप ओट, प्रत्येकी पाव कप सुक्या खोबऱ्याचा कीस व बदाम तुकडे, प्रत्येकी पाव टीस्पून सुंठ पूड, वेलची व जायफळ पूड, ड्रायफ्रूट तुकडे आवडीप्रमाणे.
कृती – गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये तूप तापवून डिंक तुकडे फुलवून घ्यावेत व प्लेटमध्ये काढावेत. त्याच पॅनमध्ये ओट, खोबरे कीस, बदाम व ड्रायफ्रूटचे तुकडे मंद आचेवर भाजून प्लेटमध्ये काढावेत. हे सर्व थंड करून याची मिक्सरमध्ये पावडर करावी. बाऊलमध्ये घेऊन सुंठ, वेलची-जायफळ पूड घालून एकजीव करावे.
तयार एनर्जी पावडर काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवावी.
पेय कृती – ग्लासभर दुधात ही पावडर दोन टेबलस्पून व साखर किंवा मध आवडीप्रमाणे घालून एकजीव करावे. सकाळी प्यायल्यास दिवसभराची एनर्जी मिळते.
टीप ः सोया दूधही वापरू शकतो.
चटणी मिक्स

साहित्य – दोन कप चणा डाळ, प्रत्येकी अर्धा कप उडीद डाळ व मूग डाळ, अर्धा कप धने, २ टीस्पून जिरे, ७-८ सुक्या लाल मिरच्या.
कृती – गॅसवर पॅनमध्ये मंद आचेवर वरील सर्व जिन्नस क्रमाक्रमाने खमंग भाजावेत. थंड झाल्यावर घरघंटीवर किंवा मिक्सर जारमध्ये याची पूड करावी. चटणी मिक्स तयार! घट्ट झाकणाच्या डब्यात भरून जरुरीप्रमाणे वापरावे.
चटणीसाठी – बाऊलमध्ये वरील पूड जरुरीप्रमाणे घ्यावी व स्वादानुसार मीठ, आमचूर पावडर व पिठीसाखर घालून एकजीव करून चटणी करावी. भाकरी, पोळी, डोशांबरोबर खायला द्यावी.
हेजलनट बटर

साहित्य – एक कप हेजलनट (पहाडी बदाम), १ टीस्पून दालचिनी पूड व अर्धा टीस्पून मीठ.
कृती – गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये हेजलनट मंद आचेवर पाच मिनिटे भाजावेत. थंड झाल्यावर फूड प्रोसेसरच्या जारमध्ये घेऊन मिनिटभर कमी स्पीडवर फिरवावे. मधेच ढवळून पुन्हा एकदा मिनिटभर फिरवावे. मीठ व दालचिनी पूड घालून पुन्हा पंधरा सेकंद फिरवावे. मऊसर मिश्रण करावे आणि काचेच्या हवाबंद जारमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवावे. ब्रेडवर स्प्रेड करण्यासाठी याचा उपयोग होतो.
चणा डाळ-बदाम हलवा मिक्स

साहित्य – दोन कप चणा डाळ, अर्धा कप बदाम तुकडे, ३ टीस्पून तूप, प्रत्येकी १ कप साखर व दूध.
कृती – चणा डाळ स्वच्छ धुवावी व चाळणीत निथळत ठेवावी. कापडावर घेऊन कोरडी करून नॉनस्टिक पॅनमध्ये खमंग भाजावी. नंतर बदाम तुकडे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरवर पावडर करावी. प्री-मिक्स तयार!
हलवा कृती – गॅसवर पॅनमध्ये तूप घालून वरील पावडर अर्धा कप मंद आचेवर मिनिटभर परतावी. नंतर साखर व दूध घालून ढवळत राहावे. मिश्रण घट्टसर झाले की हलवा तयार. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून ड्रायफ्रूटच्या तुकड्यांनी सजवून खायला द्यावे.