उषा लोकरे
येत्या बुधवारी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला पक्वान्न हमखास होतेच आणि पक्वन्नांना केशरामुळे आणखी स्वाद येतो. अशाच काही केशरयुक्त पाककृती खास गुढीपाडव्यानिमित्त…
श्रीखंड केशरी
साहित्य- अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, मीठ, अर्धा चमचा जायफळ उगाळून, १५-२० केशराच्या काड्या, चारोळी/बदामाचे काप.
कृती- चक्का व साखर एकत्र मिसळून पाच-सहा तास ठेवावी. आवडीप्रमाणे खाण्याचा रंग (ऐच्छिक) मिसळावा. हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे. भांड्यामध्ये पंचा घ्यावा व त्यावर थोडे थोडे मिश्रण फेटून घालावे व गाळून घ्यावे. यामुळे श्रीखंड छान नितळ होते.
केशराच्या दोन-तीन काड्या कोमट दुधात भिजवून ठेवाव्यात. थोड्या वेळाने त्या कुस्करून तयार श्रीखंडात घालाव्यात. जायफळ पेस्टही घालावी. मिश्रण कालवून चांगले एकजीव करावे. वरून चारोळ्या/बदामाचे काप घालून गार करावे व सर्व्ह करावे.
बासुंदी
साहित्य
म्हशीचे २ लिटर घट्ट दूध, २०० ग्रॅम साखर, अर्धा चमचा वेलदोडा व जायफळ पूड, १२-१५ केशराच्या काड्या कोमट दुधात कुस्करून, चारोळ्या/पिस्त्याचे काप.
कृती
कढईत मोठ्या गॅसवर दूध आटवावे. दूध आटत असताना एकसारखे झाऱ्याने हलवावे, जेणेकरून खाली लागणार नाही. साधारण दोन तृतीयांश आटवावे. त्यात साखर घालून उकळी आणावी. गार करून त्यात वेलदोडा, जायफळ पूड मिसळावी. केशर मिसळून घ्यावे. पिस्त्याचे काप/चारोळीने सजवून थंड बासुंदी सर्व्ह करावी.
केशर चहा
साहित्य
दोन कप पाणी, १ टेबलस्पून साखर, केशर, १ चमचा चहापत्ती, पाव कप दूध.
कृती
पाणी भांड्यात उकळायला ठेवावे. त्यात पाच-सहा केशर काड्या घालून उकळी आणावी. साखर व चहापत्ती घालून मिश्रण थोडे उकळावे (चहा कडू होऊ देऊ नये). त्यात उकळते दूध मिसळावे. मिश्रण झाकून मुरू द्यावे. कपात चहा गाळून घ्यावा. त्यावर दोन-तीन केशर काड्या पेराव्यात, त्यामुळे चहा दिसायला छान दिसतो. चवीलाही छान लागतो.
केशर केक
साहित्य
एक कप मैदा, १०० ग्रॅम लोणी, पाऊण कप पिठीसाखर, ३ अंडी, अर्धा चमचा केशराच्या काड्या १ टेबलस्पून कोमट पाण्यात कुस्करून, १ चमचा व्हॅनिला फ्लेव्हर, पाऊण चमचा बेकिंग पावडर, सजावटीसाठी पिस्ता व बदामाचे काप.
कृती
एका भांड्यात मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्यावी. दुसऱ्या भांड्यात लोण्यात पिठीसाखर थोडी थोडी घालून मिश्रण हलके होईपर्यंत फेटावे. याच मिश्रणात एकेक अंडे फोडून घालावे व मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटत राहावे. वरील मिश्रणात केशर व व्हॅनिला इसेन्स घालावा व मैदा अगदी हलकेच मिसळून घ्यावा. केक टीनला लोणी चोळून मैदा भुरभुरावा व त्या भांड्यात मिश्रण ओतावे. वरून बदाम, पिस्त्याचे काप पेरावेत. १८० अंश सेल्सिअसला २५-३० मिनिटे केक बेक करावा.
केशरी भात
साहित्य
दोन वाट्या बासमती तांदूळ/लांब तांदूळ, ३ वाट्या पिठीसाखर, १ चमचा लिंबाचा रस, ५ वेलदोडे, ५ लवंगा, पाव वाटी साजूक तूप, अर्धा चमचा वेलदोडा पूड, केशर, काजू बेदाणे.
कृती
तांदूळ धुऊन निथळून पंधरा- वीस मिनिटे ठेवावेत. त्याला लिंबाचा रस लावावा. कुकरमध्ये तूप गरम करून त्यावर वेलदोडा, लवंग परतावे. मग तांदूळ घालून मिश्रण चांगले परतावे. त्यावर थोडे काजू किसमिस पेरावेत. केशराच्या काड्या, वेलदोडा पूड, आणि दीडपट पाणी घालून भात शिजवून घ्यावा. त्यानंतर भात मोकळा करून गरम असतानाच त्यावर साखर घालावी आणि मंद आचेवर कोरडा होईपर्यंत शिजवावा. शेवटी परतलेले काजू, किसमिस घालून सजवावे.
केसर बाटी
साहित्य
गाईचे १ लिटर दूध, १ चमचा व्हाइट व्हिनेगर किंवा १ चमचा लिंबाचा रस, १ कप साखर, पाव चमचा केशर, केशरी रंग (ऐच्छिक), १ चमचा मैदा, चिमूटभर बेकिंग पावडर, ३ कप पाणी.
कृती
दूध गरम करून त्यावरील साय काढून घ्यावी. परत दूध गरम करून उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात व्हिनेगर मिसळून थोडे थोडे मिश्रण दुधात घालावे. दूध पूर्णपणे फाटले की त्यातील पाणी मलमलच्या कापडाने गाळून घ्यावे. ते पनीर स्वच्छ कोमट पाण्याने धुऊन कोरडे करावे. पनीरमध्ये मैदा व बेकिंग पावडर घालून हे मिश्रण हाताच्या तळव्याने चांगले मळून घ्यावे. अगदी एकजीव करून गोळा करावा (किंवा मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यावे). या मिश्रणात दुधात कुस्करलेल्या केशराच्या काड्या घालाव्यात. हवा असल्यास केशरी रंग घालावा. आता हलक्या हाताने मिश्रणाचे गोळे करून घ्यावेत आणि त्याला थोडा चपटा आकार द्यावा. जड बुडाच्या भांड्यात तीन कप पाणी उकळून घ्यावे. उकळी आल्यावर त्यात दोन-तीन वेलदोडे, थोड्या केशराच्या काड्या कुस्करून घालाव्यात. हवा असल्यास केशरी रंग घालावा. साखर विरघळली की त्यात वरील केशरी बट्ट्या अलगद सोडाव्यात. झाकण ठेवून पंधरा मिनिटे मंद आचेवर उकळावे. हलक्या जाळीदार बट्ट्या भांड्यात तरंगताना दिसतात. मिश्रण थंड करून बट्ट्या बाऊलमध्ये काढाव्यात. केशराच्या काड्यांनी सजवून सर्व्ह कराव्यात.
जर्दा (मोगलाई केशर भात)
साहित्य
एक कप बासमती तांदूळ, २ कप दूध, वेलची पूड, १०-१२ केशराच्या काड्या, ५-६ वेलदोडे, ४ टेबलस्पून साखर, काजू, बेदाणे, पिस्ते, २ टेबलस्पून साजूक तूप.
कृती
दोन टेबलस्पून तूप गरम करून त्यात प्रथम बेदाणे परतून बाजूला काढून ठेवावेत. त्याच तुपात वेलदोडे आणि धुतलेले तांदूळ घालावेत व मंद आचेवर छान परतून घ्यावे. दुधात केशराच्या काड्या कुस्करून घ्याव्यात व हे दूध, वेलची पूड, साखर, तांदळाच्या मिश्रणात घालून मंद आचेवर शिते मोकळी होईपर्यंत भात शिजवावा. मग त्यात बदाम, पिस्त्याचे काप व बेदाणे घालावेत. झाकण लावून मंद आचेवर भात शिजवावा.
टिप – दिलेल्या प्रमाणात साधारण ४ व्यक्तींसाठी पदार्थ होतील.