लेखक : साधना शाळू
राजगिरा लाह्यांची खीर
साहित्य – (४ ते ५ वाट्या खिरीसाठी) अर्धी वाटी राजगिरा लाह्या, ३ वाट्या दूध, प्रत्येकी ४ ते ५ बदाम, चारोळी, खजूर, मनुके, काजू (सर्व सुका मेवा ऐच्छिक), २ मोठे चमचे तूप, ३ ते ४ काड्या केशर (ऐच्छिक), वेलची पूड, सुंठ पूड आणि दालचिनी पूड.
कृती – प्रथम खजूर स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून घ्याव्यात. एका कढईत एक चमचा तूप घेऊन त्यात खजूर परतून घेऊन काढून घ्यावेत. मग बदाम, काजूचे काप ,चारोळी, मनुके घालून बारीक आचेवर एक ते दोन मिनिटे परतून घेऊन तेही काढून घ्यावेत. अजून एक चमचा तूप घालून राजगिरा लाह्या बारीक आचेवर एक ते दोन मिनिटे परताव्यात. गरम दुधामध्ये केशर घालून ते उकळून घ्यावे. हे दूध खिरीमध्ये घालून खीर उकळू द्यावी. तुपावर परतलेला खजूर आणि मनुके हाताने बारीक करून घ्यावेत. ते खिरीमध्ये घालावेत. बदाम, काजूचे काप आणि चारोळी घालावी. वेलची पूड, सुंठ पूड आणि दालचिनी पूड घालावी. खीर नीट हलवून गॅस बंद करावा. या खिरीत खजूर आणि मनुक्याचा गोडवा येतो. साखरेची गरज असल्यास घालावी. ही खीर उपवासाच्या फराळाला चालते.
वरईचा उपमा
साहित्य – (४ ते ५ व्यक्तींसाठी) एक वाटी वरई, २ मध्यम आकाराचे कांदे आणि टोमॅटो, १ छोटे गाजर आणि ढोबळी मिरची, २ मोठे चमचे मटार, १ इंच आले, २ हिरव्या मिरच्या, १ छोटा डाव तेल, १ छोटा चमचा मोहरी, जिरे, पाव चमचा हिंग, हळद, मीठ, साखर, कढीलिंब, २ चमचे तूप, कोथिंबीर.
कृती – प्रथम एका कढईत वरई खमंग भाजून घ्यावी. ती काढून घेऊन त्याच कढईत तेल गरम करावे व मोहरी, जिरे, हिंग, कढीलिंब आणि मिरचीच्या फोडणीत कांदा परतून घ्यावा. थोडे मीठ घालून हळद घालावी. त्यात टोमॅटो घालून दोन ते तीन मिनिटे परतावे. बारीक चिरलेले गाजर, ढोबळी मिरची आणि मटार घालून थोडे शिजू द्यावे आणि भाजलेली वरई घालावी. दुसऱ्या गॅसवर तीन वाट्या पाण्यात मीठ व साखर घालून उकळून घ्यावे व ते पाणी कढईत घालावे. उपमा परतून सात ते आठ मिनिटे शिजू द्यावा. गॅस बंद करून कढईच्या बाजूने उपम्यात तूप सोडावे. वरून कोथिंबिरीने सजवावे.
ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा
साहित्य – (४ व्यक्तींसाठी) शंभर ग्रॅम ज्वारीच्या लाह्या, अर्धी छोटी वाटी दाणे, १ छोटा डाव तेल, १ छोटा चमचा मोहरी, जिरे, पाव चमचा हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर, कढीलिंब, लाल तिखट, थोडी कोथिंबीर.
कृती – प्रथम एका मोठ्या कढईत तेल तापवून त्यात भाजलेले दाणे तळून घ्यावेत व बाजूला काढावेत. त्याच तेलात मोहरी, जिरे, कढीलिंब, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. त्यामध्ये ज्वारीच्या लाह्या परतून घ्याव्यात. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि पिठीसाखर मिसळावे. चिवडा चांगला परतावा. वरून कोथिंबिरीने सजवावे.
तांदूळ, डाळ आणि नाचणी इडली
साहित्य – (२५ ते ३० इडल्यांसाठी) तीन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी नाचणी, अर्धा छोटा चमचा मेथी दाणे, चवीनुसार मीठ. (याच पिठाचे उत्तप्पे करायचे असल्यास कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, तेल, कोथिंबीर.)
कृती – तांदूळ, उडीद डाळ आणि नाचणी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या पातेल्यामध्ये भिजवावे. उडीद डाळीबरोबर मेथी दाणे भिजवावेत. सात ते आठ तास भिजवल्यानंतर डाळ, तांदूळ आणि नाचणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. तांदूळ आणि नाचणी एकत्र चांगले वाटले जाते. डाळ आणि मेथी दाणे वाटून ते सगळे एकत्र करावे. मीठ घालून थोडे अजून पाणी घालून १० ते १२ तास उबदार जागी आंबवायला ठेवावे. पीठ आंबल्यानंतर इडली पात्रात इडल्या कराव्यात. इडल्या छान फुलतात. चटणी किंवा सांबरबरोबर छान लागतात. याच पिठाचे उत्तप्पेही करता येतात. उत्तपा करताना पिठामध्ये अर्धी वाटी ताक घालावे. तव्यावर तूप अथवा तेल घालून हे पीठ घालावे. वरून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालून दोन्ही बाजूने उत्तप्पा शिजवून घ्यावा. चटणी किंवा सांबरबरोबर हा उत्तप्पा छान लागतो.
नाचणी व भाज्यांचे व्हाइट सूप
साहित्य – (५ ते ६ वाट्यांसाठी) तीन मोठे चमचे नाचणी, २ चमचे तूप, प्रत्येकी अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर, पत्ता कोबी, फरसबी, मक्याचे दाणे वाफवून (ऐच्छिक), १ वाटी दूध, ३ वाट्या पाणी, हिंग, चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती – प्रथम एका कढईत तूप घेऊन त्यात हिंग घालून नाचणी पीठ एक ते दोन मिनिटे भाजून घ्यावे. त्यात गाजर, कोबी आणि फरसबी परतून घ्यावे. मक्याचे वाफवलेले दाणे घालावेत. दूध आणि पाणी गरम करून घालावे. १५ ते २० मिनिटे हे सूप शिजू द्यावे. मीठ आणि मिरपूड घालून गॅस बंद करावा. हे सूप पुलाव अथवा खिचडीबरोबरही घेता येते.
मिश्र पिठांचा गाजर पराठा
साहित्य – (१० ते १२ पराठ्यांसाठी) दोन वाट्या गाजराचा कीस, २ वाट्या कणीक, अर्धी वाटी नाचणी पीठ, २ चमचे ज्वारीचे पीठ, २ चमचे डाळीचे पीठ, २ चमचे ताजे दही, १ चमचा तेल, १ इंच आले, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, छोटा पाव चमचा ओवा, थोडी कोथिंबीर.
कृती – प्रथम एका परातीत किसलेले गाजर घ्यावे. ओवा, आले आणि
हिरव्या मिरचीचा ठेचा करून त्यात घालावा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हळद मिसळावी. कणीक, नाचणी पीठ, ज्वारी पीठ आणि डाळीचे पीठ त्यात मिसळावे. चवीनुसार मीठ, साखर आणि दही घालून पीठ भिजवून घ्यावे. वरून एक चमचा तेल लावून कणीक झाकून ठेवावी. १५ ते २० मिनिटांनंतर पराठा करायला घ्यावा. हा पराठा दाण्याची चटणी आणि दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर छान लागतो.
रताळे, राजगिरा व वरई पिठाचे कटलेट
साहित्य – (१० ते १५ कटलेटसाठी) पाव किलो रताळी उकडून, प्रत्येकी ३ ते ४ चमचे राजगिरा पीठ व वरईचे पीठ, तेल अथवा तूप, १ इंच आले, जिरे, हिरव्या मिरच्या, मीठ, थोडी कोथिंबीर.
कृती – उकडलेल्या रताळ्यांची साले काढून ते स्मॅश करून घ्यावे. हिरवी मिरची, जिरे आणि आले मिक्सरमधून वाटून घ्यावे. हा ठेचा रताळ्यात घालावा. कोथिंबीर बारीक चिरून घालावी. त्यात चवीनुसार मीठ घालावे. तीन ते चार चमचे राजगिरा आणि वरईचे पीठ घालून गोळा करून घ्यावा. हातावर छोटे कटलेट थापून तव्यावर तेल अथवा तूप घालून कटलेट भाजून घ्यावे. हे कटलेट उपवासाच्या फराळाला चालतील. दह्याबरोबर अथवा सॉसबरोबर छान लागतात.
नाचणीचे लाडू
साहित्य – (१४ ते १५ लाडवांसाठी) दोन वाट्या नाचणी पीठ, १ वाटी गव्हाचे पीठ, अर्धा ते पाऊण वाटी तूप, बदाम, पिस्ता, काजू (सर्व सुकामेवा ऐच्छिक), पाऊण ते १ वाटी पिठीसाखर अथवा बारीक चिरलेला गूळ, वेलची पूड.
कृती – प्रथम एका कढईत दोन चमचे तूप घेऊन त्यात बदामाचे काप, काजूचे काप, पिस्त्याचे तुकडे घालून बारीक आचेवर एक ते दोन मिनिटे परतून घेऊन काढून घ्यावे. पाऊण वाटी तूप घालून नाचणी आणि गव्हाचे पीठ एकत्रित १५ ते २० मिनिटे बारीक आचेवर खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद करावा. बदाम आणि पिस्ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. बदाम, पिस्त्याची पूड आणि वेलची पूड लाडूच्या मिश्रणात घालावी. गूळ अथवा साखर घालून हाताने लाडूचे मिश्रण चांगले मळून घ्यावे. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळावेत. वरून काजूचे काप लावून लाडू सजवावा.