लेखक ः डॉ. अविनाश भोंडवे
सोरायसिस हा एक त्वचाविकार आहे. यात त्वचेच्या पेशींची जलद वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजलेले चट्टे येतात आणि त्यावर कमालीची खाज सुटून त्वचेचे पापुद्रे निघतात. त्वचेशी संबंधित या क्लेशदायक व्याधीकडे दुर्लक्ष न करता, त्यावर तत्काळ इलाज करणे महत्त्वाचे असते.
शरीरातील त्वचेच्या पेशी सर्वसामान्यपणे अंत:त्वचेत खोलवर वाढतात आणि हळूहळू पृष्ठभागावर येत राहतात. निरोगी व्यक्तींमध्ये, साधारणतः एक महिन्यामध्ये त्या मृत होऊन त्यांची जागा आतून येणाऱ्या नव्या पेशी घेतात. सोरायसिस हा एक ऑटोइम्युन पद्धतीचा आजार आहे. यात रुग्णाची प्रतिकारप्रणाली त्याच्याच शरीरातील पेशींना आणि उतींना नष्ट करू पाहते. त्यामुळे त्वचापेशींचे जीवनचक्र खूप जलद होते. सोरायसिसमध्ये त्वचेच्या बाह्यस्तरावरच्या पेशी साधारणतः सात दिवसात नष्ट होऊन त्यांचे ढीग किंवा थर बनतात आणि पापुद्र्यांच्या किंवा खवल्यांच्या स्वरूपात झडून जातात आणि त्यांची जागा अर्धवट तयार झालेल्या पेशी घेत राहतात.
जागा
सोरायसिसचे चट्टे साधारणतः गुडघे, कोपर अशा सांध्यांवर, तसेच हात, पाय, मान, टाळू, चेहरा यावरदेखील आढळतात. काही प्रकारांमध्ये रुग्णांची नखे, तोंड आणि जननेंद्रियांच्या आसपास सोरायसिसचे चट्टे आढळतात.
वर्ष २०२१मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जगाच्या लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के म्हणजे एकुणात साधारण १२.५ कोटी व्यक्ती सोरायसिसग्रस्त आहेत. त्वचेच्या वर्णानुसार असलेल्या वेगवेगळ्या वंशांचा विचार केला तर सोरायसिसचे प्रमाण खालीलप्रमाणे आढळते-
- गौर वर्णीय ३.६ टक्के
- गैर-हिस्पॅनिक आणि वर्णसंकर झालेल्या व्यक्तींमध्ये ३.१ टक्के
- आशियायी व्यक्तींमध्ये २.५ टक्के
- मेक्सिकन, अमेरिकी लोकांसह हिस्पॅनिक वंशामध्ये १.९ टक्के
- कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये १.५ टक्के
- टाइप-२ मधुमेह, आतड्यांचा दाह, हृदयरोग, सोरायटिक संधिवात तसेच चिंता आणि नैराश्य अशा व्याधीग्रस्त व्यक्तींमध्ये सोरायसिस जास्त करून आढळतो. हा आजार जनुकीय असल्याने यात आनुवंशिकता आढळते.
लक्षणे
सोरायसिसची लक्षणे व्यक्तीपरत्वे भिन्न असतात आणि त्या व्यक्तीला असलेल्या सोरायसिसच्या प्रकारावर अवलंबून असतात. काही रुग्णांमध्ये टाळूवर किंवा कोपरावर उमटणाऱ्या छोट्या चट्ट्यांपुरते मर्यादित असते तर काही व्यक्तींच्या सर्वांगावर हे चट्टे पसरलेले असू शकतात.
- सर्वात सामान्य लक्षणांमध्ये, त्वचेवर सूज वाटेल असे लाल चट्टे उमटतात. गौरवर्णीय व्यक्तीत ते लाल दिसतात तर कृष्ण आणि गहूवर्णी व्यक्तीत तपकिरी किंवा जांभळे दिसतात
- या चट्ट्यांवर गौरवर्णी व्यक्तीत पांढरट किंवा चंदेरी रंगाचे खवले असतात. कृष्णवर्णीय व्यक्तीत ते राखाडी रंगाचे असतात.
- चट्ट्यांच्या खालील त्वचा खूप शुष्क आणि कोरडी बनते, तिला भेगा पडतात आणि त्यातून काही वेळेस रक्तस्रावही होऊ शकतो.
- हे चट्टे खूप वेदनादायी असतात. तसेच त्यांच्या भोवती खूप खाज सुटते आणि त्या त्वचेची जळजळ होते.
- नखे जाडसर होऊन त्यावर छोटी छिद्रे निर्माण होतात.
- सांधे सुजून वेदनादायक बनतात.
प्रत्येक रुग्णामध्ये ही सर्व लक्षणे आढळत नाहीत. काहींना लक्षणे सौम्य स्वरूपातही जाणवतात. सोरायसिसचे रुग्ण लक्षणांच्या एका ‘चक्रातून’ जातात. यात काही आठवडे लक्षणे गंभीर होतात नंतर ती कमी होत एकदम दिसेनाशी होतात. पण काही आठवड्यांतच काही विशिष्ट कारणांनी ती पुन्हा उद्भवतात आणि गंभीर होतात. काही व्यक्तींत सोरायसिसची लक्षणे दीर्घकाळ उद्भवत नाहीत. जेव्हा रुग्णामध्ये कोणतीही सक्रिय लक्षणे नसतात, त्या काळाला ‘रेमिशन’ म्हणतात. या काळात रुग्ण या व्याधीच्या त्रासातून काही काळ मुक्त राहतो. पण तो पूर्ण बरा झालेला नसतो, काही कालावधीनंतर सोरायसिस पुन्हा उद्भवतो.
‘ट्रिगर’ होण्याची कारणे
सोरायसिसचे निदान करण्यासाठी शारीरिक चाचणी आणि त्वचेची बायोप्सी केली जाते.
शारीरिक चाचणी : सोरायसिसची लक्षणे स्पष्ट दिसत असल्यामुळे त्वचेच्या इतर आजारांपासून त्यांचे वेगळेपण लक्षात येऊन वैद्यकीय तज्ज्ञ सोरायसिसचे निदान सहज करू शकतात. या तपासणीत रुग्णाने शरीरावर जिथे जिथे हा आजार असेल ते सर्व दाखवून घेणे आवश्यक असते. तसेच आनुवंशिक कौटुंबिक इतिहास असल्यास त्याचीही नोंद करावी लागते.
बायोप्सी : रुग्णाची लक्षणे स्पष्ट नसल्यास, किंवा त्यासमवेत दुसऱ्या आजाराची शंका आल्यास निदानाची पुष्टी करण्यासाठी त्वचेचा एक छोटा नमुना घेतला जातो. यालाच बायोप्सी म्हणतात. यात वेदना होऊ नये म्हणून नमुना घेण्याची जागा इंजेक्शन देऊन बधीर केली जाते. त्यानंतर बायोप्सीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला जातो आणि निदान पक्के केले जाते.
सुप्त असलेला किंवा रेमिशनमध्ये गेलेला सोरायसिस काही कारणांमुळे पुन्हा डोके वर काढतो. या कारणांना ‘ट्रिगर’ म्हणतात. ताण-तणाव, अतिरिक्त मद्यप्राशन, अपघात, त्वचा कापली किंवा खरचटली जाणे अशा कारणांमुळे सोरायसिस पुन्हा उद्भवू शकतो. याच प्रमाणे इंजेक्शन, काही लशी, उन्हाने त्वचा भाजून निघणे (सनबर्न) तसेच लिथियम, मलेरिया विरोधी औषधे, उच्च रक्तदाबासाठी असलेली औषधे, त्याचप्रमाणे काही संसर्गजन्य आणि इन्फेक्टिव्ह आजार सोरायसिस ट्रिगर करतात.
सोरायसिसचे विविध प्रकार
सोरायसिस हा आजार ऑटोइम्युन असून अजिबात संसर्गजन्य नसतो. त्याचे काही उपप्रकार आहेत.
प्लाक सोरायसिस : सोरायसिसच्या रुग्णांपैकी ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. यात त्वचेवर लाल किंवा राखाडी असे फुगीर चट्टे उमटतात. त्यावर पांढरे किंवा चंदेरी खवले असतात. सामान्यतः ते कोपर, गुडघे आणि टाळूवर आढळतात.
गट्टेट सोरायसिस : साधारणतः लहान मुलांमध्ये आढळणारा हा प्रकार आहे. यात छाती, पाठ, हात आणि पाय या भागांवर गुलाबी किंवा गडद जांभळे दिसणारे लहानसे ठिपके उद्भवतात. क्वचितप्रसंगी ते जाड होतात किंवा प्लाक सोरायसिससारखे वाढतात.
पुस्च्युलर सोरायसिस : यात हातापायांवर पांढरट पू भरलेले, लाल किंवा जांभळट चट्टे आढळतात. हा प्रकार प्रौढांमध्ये जास्त आढळतो.
इन्व्हर्स सोरायसिस : यात काखेत, स्तनांखाली, मांडीवर किंवा गुप्तांगांभोवतालच्या त्वचेवर लाल चट्टे निर्माण होतात.
एरिथ्रोडर्मिक सोरायसिस : हा सोरायसिसचा एक गंभीर आणि दुर्मीळ प्रकार आहे. यात शरीराच्या त्वचेचा खूप विस्तृत हिस्सा मोठ्या प्रमाणात बाधित होतो. त्वचा उन्हाने भाजल्यासारखी किंवा करपल्यासारखी (सनबर्न) दिसते. यात विकसित होणारे खवले त्वचेतून खाली पडतात. या प्रकारात रुग्णांना ताप येतो आणि तब्येत गंभीर बनू शकते. साहजिकच यात त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करावेत.
निदान
सोरायसिसचे निदान करण्यासाठी शारीरिक चाचणी आणि त्वचेची बायोप्सी केली जाते.
शारीरिक चाचणी : सोरायसिसची लक्षणे स्पष्ट दिसत असल्यामुळे त्वचेच्या इतर आजारांपासून त्यांचे वेगळेपण लक्षात येऊन वैद्यकीय तज्ज्ञ सोरायसिसचे निदान सहज करू शकतात. या तपासणीत रुग्णाने शरीरावर जिथे जिथे हा आजार असेल ते सर्व दाखवून घेणे आवश्यक असते. तसेच आनुवंशिक कौटुंबिक इतिहास असल्यास त्याचीही नोंद करावी लागते.
बायोप्सी : रुग्णाची लक्षणे स्पष्ट नसल्यास, किंवा त्यासमवेत दुसऱ्या आजाराची शंका आल्यास निदानाची पुष्टी करण्यासाठी त्वचेचा एक छोटा नमुना घेतला जातो. यालाच बायोप्सी म्हणतात. यात वेदना होऊ नये म्हणून नमुना घेण्याची जागा इंजेक्शन देऊन बधीर केली जाते. त्यानंतर बायोप्सीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला जातो आणि निदान पक्के केले जाते.
उपचार
सोरायसिस पूर्ण बरा होईल असा कोणताच उपचार आजमितीला नाही. त्यामुळे सोरायसिसच्या उपचारात, शरीरातील दाह कमी करणे, त्वचेवरील खवले कमी करणे, त्वचेच्या पेशींची वेगाने होणारी वाढ मंद करणे, रुग्णाच्या त्वचेवरील प्लाक्स काढणे अशा उपचारांचा समावेश असतो.
सोरायसिसचा उपचार तीन प्रकाराने केला जातो.
त्वचेवर असलेल्या सोरायसिसचा उपचार (टॉपिकल ट्रीटमेंट) : सौम्य ते मध्यम सोरायसिस कमी करण्यासाठी क्रीम, ऑइंटमेंट या स्वरूपातील मलमे त्वचेवर लावली जातात. या मलमांमध्ये
टॉपिकल कॉर्टिकोस्टिरॉईड
टॉपिकल रेटिनॉइड
अँथ्रॅलिन
व्हिटॅमिन डी
सॅलिसिलिक अॅसिड-
मॉइस्चरायझर यांचा समावेश असतो.
गोळ्या-औषधे-इंजेक्शने (सिस्टेमिक ट्रीटमेंट) : मध्यम ते गंभीर सोरायसिस असलेल्या रुग्णांना आणि ज्यांना इतर उपचार प्रकारांमुळे फारसा उपयोग झालेला नाही अशांना तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे औषधे वापरण्याची आवश्यकता असते. यापैकी बऱ्याच औषधांचे गंभीर दुष्परिणामही असतात. त्याकरिता ती अल्पावधीसाठी वापरली जातात.
मेथोट्रीक्सेट : रोगप्रतिकार प्रणालीला दबवते.
सायक्लोस्पोरिन : रोगप्रतिकारक प्रणालीची प्रतिक्रिया कमी करून सोरायसिसची लक्षणे कमी होतात
बायोलॉजिक्स : या वर्गातील औषधे रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये (इम्युन सिस्टीम) बदल घडवून आणतात. त्याद्वारे रोगप्रतिकार प्रणाली आणि दाह मार्ग (इन्फ्लेमेटरी पाथवेज) यांच्यातील साद-प्रतिसाद प्रतिबंधित होतो. ही औषधे सलाईनप्रमाणे शिरेद्वारे दिली जातात.
ओरल रेटिनॉइड : ही औषधे वेगाने वाढणाऱ्या त्वचेच्या पेशींचा उत्पादन वेग कमी करतात. मात्र ती बंद केल्यावर, सोरायसिसची लक्षणे पुनश्च उद्भवतात. यांच्या दुष्परिणामांमध्ये केस गळणे आणि शरीरांतर्गत आवरणामध्ये कोरडेपणा (म्यूकोझल ड्रायनेस) असे त्रास होतात. गरोदर स्त्रिया किंवा ज्यांना पुढील तीन वर्षात गर्भधारणा होण्याची शक्यता आहे अशा स्त्रियांना रेटिनॉइड देता येत नाहीत, कारण त्यामुळे गर्भावस्थेतील अर्भकामध्ये जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात.
अल्ट्राव्हायोलेट प्रकाश उपचार : सोरायसिसच्या उपचारात अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किंवा नैसर्गिक प्रकाशाचा वापर केला जातो. सोरायसिसमध्ये त्वचेच्या पेशींवर परिणाम करून त्यांची वाढ वेगाने करण्याचे कार्य अतिक्रियाशील पांढऱ्या रक्तपेशी करत असतात, सूर्यप्रकाशामुळे त्या नष्ट होतात. यामध्ये यूव्हीए आणि यूव्हीबी असे दोन्ही प्रकारचे प्रकाश वापरले जातात. सौम्य आणि मध्यम सोरायसिसची लक्षणे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
मध्यम आणि गंभीर स्वरूपात असलेल्या रुग्णांना सोरायसिसच्या या वेगवेगळ्या उपचारांचे एकत्र संयोजन केले जाते. काही रुग्णांत हे उपचार अधूनमधून केले जातात, मात्र बहुसंख्य व्यक्तींमध्ये ते कायमस्वरूपी घ्यावे लागतात.