लेखक : डॉ. अविनाश भोंडवे
स्व-दुखापत करण्याचे एकच असे कारण नसते, अनेक गुंतागुंतीच्या घटना आणि विचारांचा तो परिपाक असतो. सामान्यपणे स्व-दुखापतीची प्रवृत्ती असणारे रुग्ण ताणतणाव, दुःख, चिंता, अपमान, अपेक्षाभंग, अपयश अशा गोष्टींना सामोरे जाताना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. भावनांना अनेक पदरही असतात. चांगल्या, वाईट, त्रासदायक अशा भावनांचे मिश्रण स्वतःला दुखापत करून घेण्यास कारणीभूत ठरते. नगण्यपणाची भावना, एकटेपणा, पॅनिक होणे, कमालीचा राग येणे, मनोमन अपराधी वाटणे, अपेक्षित गोष्टीतला नकार, स्वतःबाबतची खंत आणि द्वेष, धमक्या मिळणे, कमालीचा छळ किंवा स्वतःच्या लैंगिकतेबाबत समस्या अशा असंख्य भावनांच्या मिश्रणाचा तो आविष्कार असतो.
स्वतःच्या हातावर, मनगटावर, पायांवर, मांड्यांवर, छातीवर किंवा गालावर कापून घेतल्याच्या आणि तळहाताला नाहीतर हाताच्या बोटांना दिव्यावर धरून भाजून घेतल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण वाढल्याचे गेल्या पाच-सहा वर्षांत दिसते आहे. या सर्व प्रकारात स्वतःला दुखापत करून आत्मघात करून घेण्याचा प्रयत्न मुळीच नसतो. उलट स्वतःच्या भावनिक वेदना, दुःख, राग आणि तणाव अशा मानसिक त्रासांना शमवण्याचा, स्वतःला अपाय करून घेण्याचा हेतू असतो. त्यामुळे स्वतःला कापून किंवा भाजून घेण्याच्या या प्रयत्नाला आत्महत्या विरहित स्व-दुखापत (सेल्फ इंज्युरी) म्हणतात.
स्वतःला अशा रीतीने जखमी करून घेण्याने या व्यक्तींना क्षणिक मनःशांती मिळते, शारीरिक आणि मानसिक तणाव काही काळापुरता कमी होतो. पण काही वेळानंतर त्यांच्यातली अपराधीपणाची भावना, लज्जा, वेदनामय भावना पुन्हा उफाळून वर येतात. स्व-दुखापतींमध्ये सहसा प्राण-गंभीर घटना घडत नाहीत, पण क्वचितप्रसंगी स्व-दुखापती जिवावर बेतू शकतात,.
लक्षणे
- स्वतःला दुखापत करून घेणाऱ्या व्यक्तींमध्ये खालील लक्षणीय गोष्टी आढळतात…
- पूर्वी करून घेतलेल्या इजांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्रण
- जखमांचे ताजे ओरखडे, कापून घेतल्याने त्वचेवर उमटलेल्या चिरा, जखमा, चावल्याच्या खुणा
- पूर्वी भाजल्यामुळे उमटलेले व्रण, भाजण्याच्या ताज्या निशाण्या
- दुखापत करणारी धारदार किंवा तीक्ष्ण वस्तू किंवा तत्सम हत्यारे हातात असणे
- गरम हवामानातही दुखापती लपविण्यासाठी घातलेला लांब बाह्यांचा सदरा किंवा पायघोळ पँट वापरणे.
- जखमांबद्दल सांगताना- सतत अपघात होऊन जखमा झाल्याचे सांगणे
- नातेवाईक, मित्रमंडळींशी तणावपूर्ण संबंध
- भावना आणि वर्तन -काही घडलेले नसतानाही अचानकपणे आवेगपूर्ण, तीव्र, अतिरेकी बनणे
स्व-दुखापतीची वैशिष्ट्ये
स्वतःला दुखापत करून घेणाऱ्या व्यक्ती या दुखापती बहुतेकदा ते एकटे असतानाच करून घेतात. प्रत्येक वेळी नियंत्रित पद्धतीने आणि एकाच प्रकाराने दुखापती केल्या जातात. वेगवेगळ्या वेळी झालेल्या जखमांमध्ये एक समानता दिसून येते.
दुखापतींचे प्रकार
- तीक्ष्ण वस्तूने किंवा हत्याराने कापून घेणे, त्वचेवर इजा करत सलग हत्यार फिरवणे, हत्याराने स्वतःवर वार करून घेणे
- पेटवलेली आगकाडी, सिगारेट, तापवलेला चाकूने त्वचेवर चटके घेणे
- त्वचेवर काही शब्द किंवा चिन्हे कोरणे.
- स्वतः:ला थपडा किंवा गुद्दे मारणे, चावणे किंवा भिंतीवर डोके आपटणे
- तीक्ष्ण वस्तू त्वचेत भोसकणे
- टोकदार वस्तू कातडीखाली सरकवणे
स्व-दुखापतीची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्ती बहुतेकदा, हात, पाय, छाती आणि पोट यावरच नव्हे तर शरीराच्या कोणत्याही भागावर जखमा करून घेतात, काही व्यक्ती वरील प्रकारांपैकी एक किंवा अनेक पद्धती वापरून इजा करून घेतात. मानसिक अस्वस्थता वाढल्यावर स्वतःला दुखापत करून घ्यावीशी वाटते. काही जणांच्या बाबतीत स्वतःला इजा करून घेण्याचा प्रकार काही काळाने थांबतो, पण काही जणांमध्ये तो दीर्घकाळ आणि वारंवार होत राहतो.
- वैद्यकीय सल्ला ः तुम्हाला स्वतःला किरकोळ किंवा मोठी जखम करून घेण्याची सवय असल्यास किंवा स्वतःला दुखापत करून घ्यावी असे वाटत असल्यास मानसरोगतज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. त्याचप्रमाणे कुटुंबातील एखादी व्यक्ती, तरुण, किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी, छोटी मुले किंवा त्यांचे मित्र अशांपैकी कुणाला अशी सवय असेल तर त्यांनाही मानसरोगतज्ज्ञांना दाखवून घ्यावे.
- आपत्कालीन उपायः स्व-दुखापतीमुळे खूप रक्तस्राव झाल्यास, व्यक्ती बेशुद्ध झाल्यास किंवा शरीराचा मोठा भाग भाजला गेल्यास, तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावून त्या व्यक्तीला जवळील इस्पितळात घेऊन जावे.
कारणे
स्व-दुखापत करण्याचे एकच असे कारण नसते, अनेक गुंतागुंतीच्या घटना आणि विचारांचा तो परिपाक असतो. सामान्यपणे ताणतणाव, दुःख, चिंता, अपमान, अपेक्षाभंग, अपयश अशा गोष्टींना सामोरे जाताना स्व-दुखापतीची प्रवृत्ती असणारे रुग्ण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. भावनांना अनेक पदरही असतात. चांगल्या, वाईट, त्रासदायक अशा भावनांचे मिश्रण स्वतःला दुखापत करून घेण्यास कारणीभूत ठरते. नगण्यपणाची भावना, एकटेपणा, पॅनिक होणे, कमालीचा राग येणे, मनोमन अपराधी वाटणे, अपेक्षित गोष्टीतला नकार, स्वतःबाबतची खंत आणि द्वेष, धमक्या मिळणे, कमालीचा छळ किंवा स्वतःच्या लैंगिकतेबाबत समस्या अशा असंख्य भावनांच्या मिश्रणाचा तो आविष्कार असतो.
तीव्र मानसिक त्रास किंवा चिंता नियंत्रित करण्याचा प्रयत्नात स्व-दुखापत करून घेतली जाते. दुखापत करून घेतल्यावर त्या व्यक्तीच्या मनात एकप्रकारची सुटकेची भावना निर्माण होते. शारीरिक दुखापती हा वेदनादायी भावना दाबण्याचा एक प्रयत्न आणि केलेल्या चुकांबद्दल स्वतःला केलेली शिक्षा असते. किशोरवयीन मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये स्वतःला दुखापत करून घेण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणात आढळते, मात्र अनेकदा ही सवय बालवयातच लागते. जलद आणि अनपेक्षितपणे होणारे भावनिक बदल, मित्रांचा वाढता दबाव, एकाकीपणा, पालकांशी आणि मोठ्या व्यक्तींशी वाद आणि संघर्ष यातून हे प्रकार किशोरवयीन कालखंडात घडतात.
जोखमीच्या बाबी
- खालीलपैकी काही गोष्टींमुळे स्व-दुखापतीची प्रवृत्ती निर्माण होऊन वाढण्याचा धोका असतो.
- स्वतःला दुखापत करणारे मित्र असणे.
- जीवनातील समस्या- दुर्लक्षित असल्याची भावना, लैंगिक, शारीरिक किंवा भावनिक शोषणाचे क्लेशदायक अनुभव. अस्थिर कौटुंबिक वातावरण, सामाजिक समारंभ टाळण्याची सवय, स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या लैंगिकतेबाबत प्रश्न असणे
- मानसिक आरोग्यसमस्या ः स्वतःला सतत दोष देण्याची वृत्ती, जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, यामुळे स्व-दुखापतीची मानसिकता बळावते. बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, नैराश्य, चिंता विकार, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, खाण्याबाबतचे विकार अशा विकारात स्व-दुखापतीची वृत्ती वाढते.
- मद्य, नशील्या पदार्थांचा वापर ः मद्याच्या, नशेच्या किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली स्व-दुखापत करून घेण्याचा धोका वाढतो.
- गुंतागुंत ः स्व-दुखापतीमुळे आत्मलज्जा, अपराधीपणाची आणि आत्मसन्मान गमावल्याची भावना वाढते. जखमांमध्ये जंतुसंसर्ग होणे, अंगावर विद्रूप व्रण निर्माण होणे, हातापायांची बोटे किंवा असाच एखादा अवयव गमावणे असे अनेक गुंतागुंतीचे त्रास उद्भवतात. योग्य उपचार न मिळाल्यास काही मानसिक त्रास विकोपाला जातात. जखमा चिघळल्यास सेप्टीसिमिया होऊन प्राणांतिक परिस्थिती उद्भवू शकते.
- आत्महत्येचा धोका ः स्व-दुखापत सहसा आत्महत्येचा प्रयत्न नसतो, परंतु स्वतःला इजा करत राहिल्याने भावनिक समस्यांचा होणारा उद्रेक आत्महत्येचा धोका वाढवतो. संकटाच्या वेळी शरीराला हानी पोहोचवण्याच्या प्रवृत्तीमधून आत्महत्येची शक्यता वाढते.
प्रतिबंध
स्वतःला दुखापत करणाऱ्या वर्तनाला प्रतिबंध करण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही. परंतु त्याचा धोका कमी करायला वैयक्तिक आणि सामुदायिक प्रयत्नांची गरज असते. पालक, कुटुंबातील सदस्य, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, परिचारिका, प्रशिक्षक किंवा मित्र यात मदत करू शकतात. स्व-दुखापतीची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन करणे, त्यांच्याशी एकत्रितपणे सामुदायिक चर्चा करणे, समस्यांच्या निराकरणाच्या उपायांचे आदान प्रदान करणारे मदत गट -हेल्प ग्रुप्स -बांधणे आणि काही वेळा समाजमाध्यमे, मोबाईल गेम, चित्रपटातील दृश्ये अशांचा परिणाम होऊन ही प्रवृत्ती निर्माण होत असल्याने त्याबाबत सार्वजनिक जागृती निर्माण करणे गरजेचे असते.
निदान
स्व-दुखापतीच्या रुग्णांचे निदान करण्यासाठी कोणतीही विशिष्ट चाचणी नाही. याचे निदान शारीरिक आणि मानसिक मूल्यांकनावर आधारित असते. मानसरोगतज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक अशा स्व-दुखापतीची प्रवृत्ती असणाऱ्या रुग्णांचे व्यक्तिमत्त्व, जीवन, विचार, भावना, आणि वर्तन यांचे परिशीलन करून या आजाराचे निदान करू शकतात.
उपचार
स्व-दुखापत करून घेणे ही एक प्रकारची मानसिक विकृती असल्याने मानसरोगतज्ज्ञ डॉक्टर अशा विकृतीमागील कारण, उदा. चिंता, नैराश्य, अपराधीपणाची भावना शोधून त्यावर औषधोपचार तसेच समुपदेशन करतात. सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि प्रशिक्षित समुपदेशकांचादेखील स्व-दुखापत प्रवृत्तीच्या व्यक्तींना उपयोग होऊ शकतो.
- स्व-दुखापतीची भावना निर्माण झाल्यास तिचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने काही सूचना…वर्तमानपत्रे, मासिके किंवा कार्डबोर्ड फाडून त्याचे शक्य होईल तेवढे छोटे-छोटे तुकडे करा.
- उशांवर, गादीवर ठोसे मारा, किंवा किंचाळायेत असल्यास कोणताही नाच करा, अथवा जमिनीवर पाय जोरात आपटा, जोर-बैठका किंवा पुलअप्ससारखा व्यायाम करा, एखादा वेगवान खेळ खेळा, काहीतरी वेगवान हालचाल करा.
- गरम किंवा थंड पाण्याने स्नान करातुमच्या प्रिय व्यक्तीशी मनसोक्त गप्पा मारा
- तुमच्या पाळीव प्राण्यासोबत वेळ घालवाघराच्या कॅम्पसभोवती भरभर चाला किंवा जॉगिंग करा.
- आवडता चित्रपट पहा, चांगले पुस्तक वाचा किंवा मन शांत करणारे संगीत ऐका.डोके चालवण्याची गरज असलेली मनोरंजनाची साधने वापरा- उदा, शब्दकोडे सोडवणे
- श्वसनाचे साधे व्यायाम करा. उदा. १ ते ५ आकडे श्वास आत घेण्यासाठी मोजावेत, त्यानंतर ६ ते १० आकडे श्वास रोखून धरण्यासाठी, त्यानंतर ११ ते १५ आकडे मोजत श्वास सोडावा. हा प्रकार ५ किंवा १० वेळा पुनःपुन्हा करावा.