लेखिका : सोनिया उपासनी
आजकाल बाजारात खूप नवनवीन प्रकारचे ब्लाऊज उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीचे, तुम्हाला साजेसे असे ब्लाऊज विकत घेऊ शकता. अथवा कुठल्याही बुटीकमध्ये जाऊन पाहिजे तसे माप देऊन शिवूनही घेऊ शकता.
साडी हा एकमेव असा पोशाख आहे जो प्रत्येक भारतीय स्त्रीला प्रिय आहे. प्रत्येक मंगलकार्य प्रसंगी, वाढदिवस, सणवाराला; वयोगट कोणताही असो आजही साडी आवडीने नेसली जाते. साडी या पोशाखाचा एक अविभाज्य भाग म्हणजे ब्लाऊज! साडीचे व साडी परिधान करणारीचे सौंदर्य खुलवण्याचे काम ब्लाऊजच करत असतो.
प्रत्येक बदलत्या फॅशननुसार जसे साड्यांचे रंगरूप आणि डिझाईन बदलते, त्याचप्रमाणे ब्लाऊजच्या डिझाईनमध्येही बदल होतात. बऱ्याचदा प्रसंगासाठी साजेसे कुर्ते नसतात, अथवा ड्रेस नसतो. काही प्रसंग असेही असतात जिथे जीन्स, स्कर्ट अथवा ट्राउझर परिधान करून जाणे योग्य दिसत नाही, पण भरजरी कपडे घालणेही योग्य नसते. जेव्हा केव्हा एखाद्या प्रसंगाला काय परिधान करावे असा प्रश्न पडतो; अशा वेळी मदतीला धावून येते ती साडी! जरा विचारपूर्वक साड्यांची निवड केली, तर कुठल्याही प्रसंगी तुम्ही चारचौघांत उठून दिसू शकता.
मागील दशकात फक्त साड्या चांगल्या असण्यावर भर दिला जायचा व त्यावर ब्लाऊज स्लीव्हलेस, कोपऱ्यापर्यंतच्या बाह्यांच्या अथवा फूल हातांचा याच प्रकारामध्ये शिवले जायचे. गळ्यांच्या पॅटर्नमध्ये फक्त नावीन्य असायचे. अलीकडे साडीला थोडेसे कमी महत्त्व देऊन ब्लाऊजचे नवनवीन प्रकार व पॅटर्नवर लक्ष केंद्रित केले जाते. एक आगळा वेगळा नवीन पॅटर्नचा ब्लाऊज एका साध्याशा प्लेन साडीलासुद्धा एक डिझायनर लुक देतो. म्हणजेच साडीमध्ये जर छान लुक खुलवायचा असेल, तर एक परफेक्ट ब्लाऊज टीमअप करणे गरजेचे आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ट्रेंडमध्ये येऊ लागल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही साडीला मान्यता मिळाली. फंकी ब्लाऊज आणि रेडी टू वेअर साडी यांनी आपल्या देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठाही सजल्या. सुटसुटीत व वेगळा लुक म्हणून विदेशी लोकांनीही आपल्या साडीला आपलेसे केले.
आजकाल बाजारात खूप नवनवीन प्रकारचे ब्लाऊज उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीचे, तुम्हाला साजेसे असे ब्लाऊज विकत घेऊ शकता. अथवा कुठल्याही बुटीकमध्ये जाऊन पाहिजे तसे माप देऊन शिवूनही घेऊ शकता. आजकाल प्रत्येक बुटीकमध्ये डिझायनर आपली सर्जनशीलता वापरून आपल्या क्लाएंटला कसे फॅशन ट्रेंड अप टू डेट ठेवता येईल याकडे जास्त कल देतात.
मिक्स अँड मॅच करायचे असेल, तर प्रत्येक साडीचा मॅचिंग ब्लाऊज वगळता तुम्ही विविध प्रकारचे फॅब्रिक घेऊन त्यांचे काही वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. उदाहरणार्थ, कॉटन, जॉर्जेट, शिफॉन, सॅटिन, नेट, खादी, लिनन, लायक्रा इ. या सर्व प्रकारच्या फॅब्रिकपासून विविध प्रकारचे ब्लाऊज शिवता येतात. शर्ट स्टाइल ब्लाऊज, टरटल नेक ब्लाऊज, ऑफ शोल्डर ब्लाऊज, बोट नेक ब्लाऊज, केप स्टाइल ब्लाऊज, हाय नेक ब्लाऊज, फुल एम्बरॉयडर्ड ब्लाऊज, इल्यूजन नेक लाईन्स, स्ट्रॅपी ब्लाऊज, लेस वर्क, मिरर वर्क ब्लाऊज, यू नेक ब्लाऊज, स्ट्रॅपलेस ब्लाऊज, शीअर-स्ट्रॅप ब्लाऊज, स्वीटहार्ट नेकलाईन ब्लाऊज, जॅकेट स्टाइल ब्लाऊज, हॉल्टर नेक ब्लाऊज, कोर्सेट ब्लाऊज डिझाइन, चायनीज मॅन्डेरिन कॉलर ब्लाऊज डिझाईन, की होल नेक ब्लाऊज डिझाईन, बिकिनी ब्लाऊज, शिमर ब्लाऊज, पेपलम स्टाईल ब्लाऊज, कटवर्क ब्लाऊज, क्रिस्टलाईज्ड-टॅसल्ड ब्लाऊज, बिडेड ब्लाऊज, हाफ नेक एम्ब्रॉयडरी ब्लाऊज, बंदगळा ब्लाऊज, कट आउट बॅक ब्लाऊज, मल्टिपल डोरी ब्लाऊज, पॉम पॉम लेस बॅकलेस ब्लाऊज, नॉटेड बॅक ब्लाऊज, क्रिसक्रॉस बॅक ब्लाऊज, स्पोर्ट्स ब्रा झीपर ब्लाऊज, ब्रालेट, नीटेड बिड्स ब्लाऊज, ट्रॅडिशनल डोली कट वर्क ब्लाऊज, झुमकी बॅक स्टाइल, वन साईड शोल्डर ब्लाऊज डिझाईन, रफल्ड स्लीव्ह ब्लाऊज, कोल्ड शोल्डर ब्लाऊज, पफ स्लीव्ह ब्लाऊज, बेल स्लीव्ह ब्लाऊज, नेट स्लीव्ह प्लेन ब्लाऊज, एम्ब्रॉयडर्ड नेटस्लीव्ह ब्लाऊज… असे असंख्य डिझाईनचे ब्लाऊज ट्रेंडमध्ये आहेत.
ऋतुमानानुसार जर बघितले, तर आत्ता या ऋतूमध्ये कॉटन, लिनन, मल कॉटन, खादी, लिझिबिझी कापडापासून तयार केलेले वैविध्यपूर्ण ब्लाऊज तुमच्या एखाद्या साध्याशा साडीची व्हॅल्यू वाढवतील. हल्ली अजरख, दाबू प्रिंट, बाटीक, इकत प्रिंट, बाघ प्रिंट, कलमकारी प्रिंट, बांधणी प्रिंट, लहरिया प्रिंट, सांगानेरी ब्लॉक प्रिंट, मधुबनी या सर्व प्रकारांमध्ये ब्लाऊजची मागणी आहे व सध्या याची फॅशन चलनात आहे. एक सुंदरसे कॉटन कलमकारी शर्ट कॉलर व कोपरापर्यंतच्या बाह्यांचे ब्लाऊज शिवले, तर ते तुमच्या अनंत प्लेन कॉटन अथवा खादीच्या साड्यांवर परिधान करता येईल. सर्व प्रकारच्या खादी, लिनन व कॉटनच्या साड्यांवर अशा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये शिवून घेतलेले अथवा रेडीमेड ब्लाऊज तुमच्या प्रत्येक साडीची शोभा वाढवतील.