ईव्ही ठेवा ‘कूल’

लेखक : सागर गिरमे

जागतिक तापमानवाढीमुळे सध्या तुलनेने थंड असणाऱ्या शहरांतही उन्हाळ्यात तापमान अगदी सहजच चाळिशी पार करायला लागले आहे. साहजिकच त्याचा परिणाम सर्वांवरच होत आहे. अगदी आपल्या गाड्यांवरही.. त्यातही जर आपली न्यू जनरेशनला साजेशी स्मार्ट ईव्ही असेल तर होणारा परिणाम जास्त असू शकतो.

इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्ष-दोन वर्षांपूर्वी अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच दिसणाऱ्या ईव्ही आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेल्या आहेत. जवळजवळ शून्य मेंटेनन्स, चालविण्याचा अत्यंत किरकोळ खर्च आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी यामुळे त्या वाहनचालकांच्या पसंतीस उतरलेल्या असल्या तरी उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यकच आहे. उन्हाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे गाड्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कारण, ईव्हीचे हृदय असणारी तिची बॅटरी आणि वाढत्या तापमानाचा छत्तीसचा आकडा आहे. उन्हाळ्यात तापमान वाढ होत असल्याने बॅटरीच्या कार्यक्षमतेवर आणि तिच्या आयुष्यावरही परिणाम होतो. त्यामुळेच वाढत्या उन्हात ईव्हीला आग लागण्याच्या घटना कुठे कुठे घडल्याचे आपण बातम्यांमधून किंवा सोशल मीडियावर पाहत असतो. आपल्या ईव्हीसोबत असे घडू नये, ही आपल्या सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी उन्हाळ्यात ईव्हीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

पार्किंग सावलीतच!

वाढत्या उन्हापासून ईव्हीचा बचाव करण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे आपली गाडी सावलीत उभी करणे. ईव्ही चालवत असताना बॅटरीवर लोड आलेला असतो. त्यामुळे तिचे तापमान आधीच वाढलेले असते. चालवताना किमान हवा लागून तापमान नियंत्रित राहण्याची शक्यता असते. मात्र प्रवास करून आल्यावर इतर वाहनांप्रमाणे आपण ईव्ही उन्हातच पार्क केली, तर वाढलेल्या तापमानामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.

शहरांमध्ये फोर व्हीलर पार्किंगची मोठी समस्या आहे. ईव्ही आहे म्हणून पार्क करायला झाडांची सावली मिळेल किंवा कव्हर्ड पार्किंग मिळेल, अशी शक्यता कमीच! पण अशा वेळेस आपली गाडी किमान आतून तुलनेने थंड राहील यासाठी प्रयत्न करायला हवा. गाडीच्या काचा टिंटेड करून घ्याव्यात, अर्थात कायद्यानुसार काचा पूर्ण काळ्या करायची परवानगी नाही, मात्र पारदर्शक असणाऱ्या आणि उन्हापासून संरक्षण करणाऱ्या फिल्म लावून घेता येऊ शकतात. अनेक कंपन्या आपल्या गाड्यांच्या काचांना अशा फिल्म आधीच लावून देतात. हा पर्याय वापरायचा नसेल, तर कर्टन अर्थात पडदे वापरण्याचा पर्याय असतो. पुढची मुख्य काच सोडून इतर काचांसाठी तो वापरता येऊ शकतो. यामुळे ईव्ही किमान केबिनमध्ये थंड राहून बॅटरीचे तापमान नियंत्रणात राहू शकते.

बॅटरीचे आरोग्य राखा

तापमान अतिथंड असो वा अतिगरम ईव्हीच्या बॅटरीच्या आरोग्यावर अर्थात तिच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये बॅटरी योग्य पद्धतीने कार्यरत आहे ना? याची खात्री करण्यासाठी तिची तपासणी करणे आवश्यक असते. ईव्हीमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम दिलेली असते. याद्वारे बॅटरीचे आरोग्य, तिच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवले जाते. मात्र आपण स्वतः देखील किमान उन्हाळ्यामध्ये त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या सिस्टीममध्ये आलेला डेटा काय सांगतोय? हे वेळोवेळी तपासायला हवे. त्यात काही बदल जाणवल्यास त्वरित सर्व्हिस सेंटरला तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

जास्त लोड नकोच

ईव्ही कमी खर्चात आपल्याला वापरता येत असली, तरी तिची वजन वाहून नेण्याची क्षमता ठरलेली आहे. प्रत्येक गाडीनुसार ती बदलते. टू व्हिलरच्या बाबतीत विविध कंपन्यांच्या मॉडेलनुसारही ती बदलते, त्याचप्रमाणे फोर व्हिलरसाठीही ती बदलते. आपल्या गाडीची वजन वाहण्याची क्षमता किती आहे, ते मॅन्युअलमधून समजू शकते. असे असले तरी उन्हाळ्यात मात्र गाडीवर जास्त भार देऊच नये. त्यामुळे बॅटरी आणि मोटरला जास्त क्षमतेने कार्य करावे लागते, त्यातून गाडीच्या तापमानात वाढ झाल्याने आग लागण्याची शक्यता वाढते.

गाडीच्या टायरमध्येही हवेचा दाब योग्य ठेवणे आवश्यक आहे. हवा कमी असल्यास गाडीवर नाहक ताण येऊन तापमान वाढू शकते.

आपली जागरूकता महत्त्वाची

  • पेट्रोलवरील बाईक प्रवासादरम्यान गरम झाली तर, आपल्या पायांना ते जाणवते. स्कूटर असेल तर तिचा कमी झालेला परफॉर्मन्सही आपल्याला जाणवतो. अनेक वर्षांच्या वापरातून आलेल्या अनुभवांमुळे आपल्याला हे जाणवते.
  • याच पद्धतीने आपणही आपल्या ईव्हीला ओळखायला हवे. उन्हात तिच्या परफॉर्मन्सवर सतत बारीक लक्ष ठेवायला हवे. तसेच थांबल्यावर (स्कूटरच्या बाबतीत) डिकीमध्ये उष्णता वाढतीये का? हे पण बघायला हवे.
  • जास्त चढाच्या रस्त्यांवर, घाटांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणे टाळावे. त्यासोबतच रस्त्यावरील खड्डे, स्पीडब्रेकरवर रफ ड्रायव्हिंग करू नये. त्यामुळे बॅटरीला धक्का लागू शकतो आणि शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.
  • ऑफ रोड ड्रायव्हिंग टाळणेच योग्य ठरेल. त्यामुळे बॅटरी आणि मोटरवर अतिरिक्त ताण आल्याने तापमान वाढ होते.
  • गाडी कोणतीही असो फास्ट चार्जिंग करण्याला आपण प्राधान्य देतो. पण त्याने बॅटरीचे तापमान वाढते आणि तिची कार्यक्षमता देखील कमी होते. त्यामुळे हे टाळणेच योग्य आहे.
  • कंपनीने दिलेल्या ब्रॅण्डेड चार्जरनेच बॅटरी चार्ज करावी, आफ्टर मार्केट चार्जर वापरू नये.
  • ईव्हीचे हृदय अर्थात बॅटरीचे तापमान नियंत्रणात राहून ती सुरळीत आणि कार्यक्षमतेने कार्यरत राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये योग्य काळजी, देखभाल आणि आपली जागरूकता हीच त्रिसूत्री आपल्याला फायद्याची ठरेल, हे नक्की!
0
0
error: Content is protected !!