सेकंड हॅण्ड कार घेताय?

लेखक : सागर गिरमे

स्वतःची गाडी असावी, हे सर्वांचेच स्वप्न.. ते पूर्ण करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असतात. पण हे स्वप्न खिशाला परवडेल अशा रकमेतही प्री-ओन्ड कारच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकते… मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात घरी आणण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे.

सध्याच्या नवीन युगात स्वतःची कार असणे ही पण अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारखीच एक गरज होत चालली आहे. एकत्र कुटुंब किंवा नोकरीनिमित्त रोजचा अनेक किलोमीटर करावा लागणारा प्रवास जास्तीत जास्त आरामदायी व्हावा यासाठी कार खरेदी करण्याकडे सध्याचा कल आहे. पण प्रत्येकवेळी नवीन कार घेणे हे प्रत्येकाच्याच खिशाला परवडेल असे नाही, त्यामुळे प्री-ओन्ड कारचा अत्यंत चांगला पर्याय अनेकजण स्वीकारू पाहत आहेत. त्यासोबतच गाड्यांची आवड असल्यामुळे सतत गाड्या बदलण्याची इच्छा बाळगणारेही प्री-ओन्ड गाड्यांकडे वळत आहेत. त्यामुळेच भारतासारख्या देशांमध्ये हे मार्केट खूप मोठे आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतात सुमारे ३५ लाख प्री-ओन्ड कार विकल्या गेल्या. तर जगभरात साधारण चार कोटीहून अधिक अशा गाड्या विकल्या गेल्या आहेत. यावरून भारताची प्री-ओन्ड वाहनांची बाजारपेठ किती मोठी आहे हे लक्षात येते. पण अशी वापरलेली गाडी घेताना अर्थात प्री-ओन्ड कार घेताना काही काळजी घेणे आवश्यकच आहे.

आपली गरज ओळखा       

आपण नव्याने गाडी चालवायला शिकला असाल, तर प्री-ओन्ड कारचा ऑप्शन घेणे बऱ्याचदा फायद्याचे ठरते. वेटिंग नसल्यामुळे या गाड्या आपल्याला लगेच मिळतात, तसेच कमी बजेटमध्ये भरपूर व्हरायटी आपल्यासाठी असते. यासोबतच नवीन ड्रायव्हरकडून दुर्दैवाने काही अपघात घडलाच तर नवीन गाड्यांच्या तुलनेत कमी खर्चात गाडी पुन्हा आधीसारखी होते. नंतर एकदा गाडीवर ‘हात साफ’ झाला की नवीन गाडी घ्यायला हरकत नाही!

आपल्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, रोज या गाडीतून कितीजण किंवा किती किलोमीटर प्रवास करणार आहेत याचा विचार करूनच हॅचबॅक, सेदान, एमपीव्ही किंवा एसयूव्हीपैकी कोणती गाडी घ्यायची हे ठरवा.

रोजचा प्रवास किती होणार आहे किंवा महिन्यातून किती वेळ गाडी पार्किंगमधून निघणार आहे, याचा विचार करून गाडी डिझेल किंवा पेट्रोल इंजिनवर चालणारी घ्यायची, हे ठरवावे. साधारण रोजचा किमान १५० ते २०० किमीचा प्रवास होणार असेल तर डिझेल इंजिनवरील आणि फार प्रवास नसेल तर पेट्रोल इंजिनची गाडी घ्यावी. पेट्रोल इंजिनाची मेंटेनन्स कॉस्ट तुलनेने खूप कमी असते.

अपघात झालेली गाडी कशी ओळखावी ?

अनेकदा अपघात झालेल्या गाड्या डागडुजी करून विक्रीसाठी आणलेल्या असतात. नेमकी आपल्याच पदरी अशी गाडी येऊ नये म्हणून प्री-ओन्ड कार घेताना ती सर्वतोपरी तपासून घ्यायला हवी. गाडी तयार होत असताना तिची बॉडी अनेक ठिकाणी रिव्हेटने किंवा लेजरने सील केलेली असते. पण अपघात झालेला असेल तर हे सील निघतात. एकदा हे सील निघाले की ते पुन्हा करता येत नाहीत. मग अशावेळी वेल्डिंग करून या गाड्या पूर्ववत केल्या जातात.

हे ओळखण्यासाठी गाडीचे फ्रंट आणि रिअर बॉनेट उघडून त्यांच्या कोपऱ्यांवर असलेले रिव्हेट सील तसेच दरवाजाच्या आजूबाजूला असणारे रबर काढून त्याखालील रिव्हेट सील आणि बूट स्पेसमध्ये स्पेअर व्हील ठेवलेल्या जागेसह त्याखालील रिव्हेट सील तपासायला हवेत. अपघात झालेला असेल तर त्या ठिकाणी वेल्डिंग केलेले दिसू शकते.   

फ्रंट बॉनेट उघडल्यावर दिसणारी गाडीची मेन फ्रेमही तपासून घ्यायला हवी. त्यावर वेल्डिंग केले आहे का? किंवा त्यावर हीट ट्रीटमेंट करून डेंट काढण्याचा प्रयत्न झाला आहे का? हे लक्षात येऊ शकते.

गाडीचा डॅश बोर्ड आणि मुख्य विंड शिल्डमध्ये गॅप आहे का? हे पण तपासून घ्यावे. 

योग्य सस्पेन्शन

जुनी गाडी आधी कोणी आणि कशा पद्धतीने वापरलेली आहे, हे सांगता येत नाही. रफ ड्रायव्हिंग झालेले असेल तर गाडीच्या सस्पेन्शनवरून ते ओळखता येऊ शकते.

टेस्ट ड्राईव्ह घेताना अशा गाडीच्या सस्पेन्शनमधून आवाज येऊ शकतात. ते तपासण्यासाठी गाडी जाणीवपूर्वक खड्यातून न्यावी किंवा ओबडधोबड रस्त्याने चालवावी. गाडी थांबलेली असताना सस्पेन्शन भार देऊन दाबून बघावे. ते उसळी मारून पूर्ववत होत असेल तर सस्पेन्शन खराब झालेले आहे.

सस्पेन्शनवर दाब दिल्यावर ते लगेचच पूर्ववत व्हायला हवे. मात्र त्यानंतरही ते बाऊन्स होत असेल तर खर्च निघू शकतो.

इंस्ट्रूमेंटल क्लस्टर, ओडोमीटर

गाडी घेताना तिच्या इंस्ट्रूमेंटल क्लस्टरवर कोणतेही वेगळे इंडिकेटर लाइट लागलेले नाहीत ना ते तपासावे. इंजिन, एअरबॅग सिस्टीम, ऑइल यासह अनेक बाबींची माहिती किंवा त्यात काही बिघाड झाला आहे का? याची माहिती या इंडिकेटरद्वारे आपल्याला मिळू शकते.

ओडोमीटरमध्ये गाडीचे रनिंग किती किलोमीटर झालेले आहे, हे समजते. मात्र असे असले तरी ओडोमीटर सेट करता येतो, त्यामुळे निव्वळ त्यावर दाखवलेल्या किलोमीटरवर विसंबून राहू नये. गाडीच्या नोंदणीचे वर्ष आणि कंडिशन यावरून किलोमीटरचा अंदाज बांधता येतो. अशी गाडी घेताना सर्व कागदपत्रे म्हणजेच व्हेइकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, हस्तांतरण पत्र, आधीचे कर्ज असल्यास बँक एनओसी तपासून घ्यावीत. या कागदपत्रांवर गाडीचा चॅसी आणि इंजिन क्रमांक लिहिलेला असतो, तोच नंबर गाडीच्या बॉडीवर आणि इंजिनवर आहे ना यांची खातरजमा नक्की करावी.

भारतामध्ये पेट्रोल गाड्यांसाठी पंधरा वर्षे तर डिझेल गाड्यांसाठी दहा वर्षे आयुर्मान ठरवून दिलेले आहे. त्यामुळे या मर्यादेचा विचार करून खूप जास्त रनिंग झालेली जुनी गाडी घेणे टाळावे.

कार्यक्षम इंजिन

गाडीच्या इंजिन कंडिशनवर तिचे मायलेज, मेंटेनन्स अशा अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे प्री-ओन्ड कार घेताना कारच्या बॉडी सोबतच इंजिनही तपासून घ्यायला हवे. त्यासाठी गाडीची टेस्ट राइड घेणे आवश्यक आहे.
चांगल्या कंडिशनमधील कारचे इंजिन व्हायब्रेशनशिवाय किंवा इतर वेगळ्या आवाजाशिवाय एकदाच स्टार्टर दिल्यावर स्टार्ट होते. 

  • गियर शिफ्टिंग एकदम स्मूथ असावे. डिझेलसाठी तुलनेने हे थोडे हार्ड असू शकते.
  • इंजिनमध्ये व्हायब्रेशन न येता गाडी फर्स्ट गियरमध्ये डिले न येता निघायला हवी.
  • वेगात गाडी चालवताना इंजिनमधून इतर आवाज येत नाहीत ना, हे तपासावे.
  • बॉनेट उघडून इंजिनच्या आजूबाजूने ऑइल किंवा कुलंट लिकेज तपासावे.
  • गाडी सुरू असताना एसी लावून इंजिनची कॅपॅसिटी कमी होतीये का, याचीही खातरजमा करावी.          
  • इंजिन नॉकिंग होतंय का ते बघावे. तसे असल्यास इंजिनावर खर्च करावा लागू शकतो.
0
0
error: Content is protected !!