शेफची पसंती

शेफ नीलेश लिमये 
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष
शेफ मंडळी नवनवीन पदार्थ करून बघत असतात. काही पदार्थ तर त्यांची निर्मिती असते. लोणच्यांतही ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. अशाच काही वेगळ्या रेसिपीज..

आल्याचे लोणचे 
साहित्य : शंभर ग्रॅम आले बारीक चिरून, ६ सुक्‍या लाल मिरचीचे तुकडे, ४ कांदे बारीक चिरलेले, १ चमचा चिंच, ५-६ कढीपत्त्याची पाने, ३ चमचे खोबरेल तेल. 
कृती : तेल सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करावे व ते जाडसर वाटून घ्यावे. नंतर त्यामध्ये तेल टाकून मिश्रण एकजीव करावे. चिरलेले लसूण आणि आले टाकून छान परतून घ्यावे.

भरलेली लाल मिरची 
साहित्य : एक किलो मोठ्या लाल ताज्या मिरच्या, ३०० मिली मोहरीचे तेल, ६० ग्रॅम बडीशेप, ८० ग्रॅम मेथी बिया, चवीनुसार मीठ. 
कृती : प्रथम मिरच्या धुऊन कोरड्या करून घ्याव्या आणि एका बाजूने चिरून घ्याव्या. त्यानंतर एका कढईत तेल घेऊन ते छान कडकडीत गरम करावे. नंतर आचेवरून खाली घेऊन थंड होऊ द्यावे. बडीशेप आणि मेथीचे दाणे बारीक कुटून घ्यावे. त्यामध्ये मीठ आणि मोहरीचे तेल घालून मिश्रण थोडेसे जाडसर-पातळ करून घ्यावे. हे मिश्रण चिरून ठेवलेल्या लाल मिरच्यांमध्ये भरावे. या मिरच्या काचेच्या बरणीत भरून ठेवाव्यात. त्यात उरलेले तेलाचे मोहन घालावे. बरणीचे तोंड मलमली कापडाने घट्ट बांधून बरणी चार दिवसांसाठी उन्हामध्ये ठेवावी. नंतर मलमली कापड काढून बरणीचे तोंड झाकणाने बंद करावे.

पापलेटचे लोणचे 
साहित्य : दोन मोठे पापलेट, २ चमचे जिरे, १ चमचा मोहरी, १ कप किसलेला गूळ, ६ हिरव्या मिरच्या, १०-१२ काळी मिरी, १ कप तिळाचे तेल, चवीनुसार मीठ. 
वाटणाचा मसाला : दोन कप व्हिनेगर, १ इंच हळकुंड, १६ काश्‍मिरी मिरच्या (बिया काढून), २ इंच आले, १५ लसूण पाकळ्या. 
कृती : प्रथम पापलेटचा पोटाचा भाग साफ करून घ्यावा. डोक्‍याचा व शेपटीचा भाग वेगळा करून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. सगळे तुकडे स्वच्छ धुऊन घ्यावेत. हिरवी मिरची आणि काळी मिरी वाटून पापलेटच्या तुकड्यांना लावून घ्यावी. चवीनुसार मीठ लावावे. वाटणासाठी दिलेला मसाला १ कप व्हिनेगर टाकून वाटून घ्यावा. मध्यम आचेवर एका कढईत तेल तापायला ठेवावे. त्यात वाटलेला मसाला घालून २-३ मिनिटे परतावे. मंद आचेवर पाच मिनिटे ठेवावे. त्यामध्येच १ कप व्हिनेगर टाकून एक उकळी येऊ द्यावी. त्यात किसलेला गूळ घालून ते नीट हलवून घ्यावे. नंतर या मसाल्यामध्ये पापलेटचे तुकडे घालून हळुवारपणे परतावे. ते मसाल्यामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत. पुन्हा मंद आचेवर दहा मिनिटे वाफ येऊ द्यावी. थंड करून काचेच्या बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे फ्रीजमध्ये साधारणतः महिनाभर टिकते.

गाजराचे लोणचे 
साहित्य : अर्धा किलो गाजर, पाव कप व्हिनेगर, २ चमचे तिखट, १ चमचा हळद, २ चमचे राईपूड, २ चमचे साखर, चवीनुसार मीठ. 
कृती : गाजराची साले काढून त्याचे बोटाएवढे लांब काप करून घ्यावेत. सॉसपॅनमध्ये मध्यम आचेवर गाजराचे काप ५ ते १० मिनिटे वाफवून घ्यावे. नंतर पॅन बाजूला ठेवून गाजर थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर या गाजरांना मीठ, तिखट, राई पावडर चांगली चोळून घ्यावी. वरून हळद भुरभुरावी. 
    गाजराचे हे तुकडे काचेच्या बरणीत भरून ठेवावे. त्यावर व्हिनेगर आणि साखरेचे मिश्रण घालावे आणि चांगले एकजीव करून घ्यावे. हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवावे.

तोंडलीचे लोणचे 
साहित्य : दोनशे ग्रॅम तोंडली, १ हिरवी मिरची, ४ कप तेल, ७ लसूण पाकळ्या बारीक चिरून, ६ इंच आले बारीक चिरलेले, १ कप व्हिनेगर, ४ चमचे तिखट, २ चमचे हळद, ४ चमचे साखर, चवीनुसार मीठ. 
कृती : तोंडली धुऊन त्याचे चार भाग करून घ्यावेत. व्हिनेगर आणि मीठ घालून तोंडली रात्रभर ठेवावीत. एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवावे. त्यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले लसूण व आले टाकून छान परतून घ्यावे. परतल्यानंतर त्यात तिखट, हळद, व्हिनेगर, तोंडली आणि साखर टाकून एक उकळी येऊ द्यावी. गॅस बंद करून पातेले बाजूला ठेवावे. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे पूर्णपणे बुडेल एवढे तेल त्यात घालावे.

संबंधित बातम्या